रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग


रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अशीच अवस्था सध्या आमची झालेली आहे. या आम्हीमध्ये हॉस्पिटल, आरोग्य खाते, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी, पोलिस खाते, वाहतूक खाते, फायर ब्रिगेड आणि सीमेवरचे सैनिक तर कायमच. अशी एवढी मंडळी आहोत.
आज सारं जग कोरोनासाठी स्वतःची काळजी घेत असताना आम्ही मात्र कंपल्सरी ड्युटीवर जातो. तसेच आमच्याबरोबर दररोज बेस्टचे ड्रायव्हर-कंडक्टरदेखील बघतो. ते पण तोंडाला मास्क लावून त्यांची ड्युटी निभावत असतात.
भूकंप होवो, वादळे होवो किंवा 26 जुलै, 26 /11 सारखे प्रसंग जरी झाले किंवा साथीचे आजार आले तरी आम्हाला अशावेळी कंपल्सरी ड्युटीवर जावे लागते. तेथे हयगय केलेली चालत नाही. आमच्याकडे रोज ड्युटीवर येण्याचा फतवाच निघतो. जसे लढाई सुरू झाल्यानंतर सैनिकाला पळ काढता येत नाही तसेच आम्हाला अशा परिस्थितीमध्ये घरी राहता येत नाही.
आता रस्त्याने जाताना, बस एकदम खाली असतात, रस्ते पण मोकळे असतात. कित्येकांच्या मुलांना आणि नवर्यांना सुट्टी आहे ते घरात आहेत किंवा वर्क फ्रॉम होम करताहेत. इतर वेळी निवांत वेळ कधी नसतोच. प्रत्येक जण कामाच्या मागे धावतो धावतो. त्यामुळे आता तिलादेखील वाटत असेल मी पण सगळ्यांबरोबर घरात थांबावे. पण अशा वेळी परिचारीकेला मात्र कामावर जावंच लागतं. कारण तिने असं जर म्हटलं तर तिच्या रुग्णांना कोण पाहणार, त्यांची सेवा कोण करणार? याउलट ती इतरांना सांगते-
"बंद करो रोना धोना
कोरोना से डरो ना...”
आपल्या मराठीत एक म्हण आहे ना
कर नाही त्याला डर कसली तसंच हे आहे. इकडेतिकडे फिरू नका, स्वतःची काळजी घ्या. साबण पाण्याने हात धुवा. तोंडाला मास्क लावा किंवा स्वच्छ रुमाल लावा. खोकताना शिंकताना नाकावर रुमाल ठेवा. एकत्र गर्दी करू नका. सध्या सगळे सण-समारंभ भेटीगाठी पुढे ढकला. बस मग कोरोना गेला समजा.