रानवांगं
रानवांगं


शेतातल्या वांग्याची फळं सहसा पिकत नाहीत. खरं सांगायचं तर ती पिकू दिली जात नाहीत. हिरवी असतानाच तोडून विकली जातात. पण कधीकधी कपाशीसारख्या पिकात किंवा बांधावर दोनचार झाडं लावली असतील तर शेतक-याचं दुर्लक्ष झाल्यामुळे वांगे पिकतात. कधी वांग्यांचे भाव गडगडले, तोडून बाजारात नेणंही परवडेनासं झालं की शेतकरी पाणी देणं बंद करतात पिकांचं. कधीकधी उन्हाळ्यात विहिरीचं पाणी आटून जातं अन् पिक होरपळतं. वांग्याचं पिक यात सापडलं की शेवटी येणारी फळं बारीक पडून पिकतात. लहानपणी शेतात निंदणी-खुरपणी करायला, मिरची तोडायला, कापूस वेचायला शेतात जायचो तेव्हा तासात अचानक एखादं वांग्याचं झाड यायचं. पिवळं वांगं दिसलं की मी तोडून घ्यायचो. मिरची-कपाशीच्या शेताला आठवड्याला पाणी दिलं जात असल्यानं, वेळेवर खत मिळत असल्यानं त्यातल्या ह्या वांग्याची फळं आकारानं ब-यापैकी मोठी व्हायची. शेतात पिकलेल्या वांग्याचा तिव्र घाण वास येतो, तेव्हाही यायचा. ते वांगं हातात घेतलं की बराच वेळ हाताचा वास जायचा नाही. पण वांग्याचं देठ काढून फेकलं की त्याच्यासोबत चेंडूसारखं खेळता यायचं. चेंडू मिळत नव्हता म्हणून वांगंच चेंडू व्हायचं. वर फेकून झेलण्याचा सराव व्हायचा
बरंच काही खेळत मनोरंजन व्हायचं.
मागील वर्षी उन्हाळ्यात वर्षभर भीषण दुष्काळ असूनही पाण्याचा थेंबही मिळत नसताना तग धरून असलेलं रानवांग्याचं झुडूप मला रस्त्याकडेला पहायला मिळालं. मी पाहात होतो कि महामार्गाच्या कडेला उगवलेल्या या रोपट्याला अनेक पिकलेली फळं आणि असंख्य हिरवी पानं आहेत. शेतातलं पिक आठ दिवस पाणी नाही मिळालं तर सुकून मान टाकतं. या झुडूपाला गेल्या सहा महिन्यांत पाणी मिळालेलं नाही. त्यात महामार्ग सिमेंटीकरणाच्या नावानं पूर्ण रस्ता खोदून काढलेला. कसं जगलं असेल ते? रानातली झाडं, माणसं अशीच प्रतिकुल परिस्थितीत तग धरून जगतात का?
मी काट्यांपासून हात वाचवत वाचवत याची तीन फळं तोडली. जोरजोरात ओढून तोडावी लागली ती. लवकर तुटेच ना. फारच चिवट दिसली. रानवांगीच ती. हातात घेतली. देठावरचे काटे टोचणार नाहीत अशापद्धतीने खुडून फेकले. हाताचा वास घेतला. वांग्यांचा वास घेतला. वासच आला नाही. गावाकडच्या कष्टकरी माणसांसारखी निर्मळ वाटली ती वांगी. आजूबाजूचं वातावरण बिकट, अस्वच्छ, वाईट, गलिच्छ वाटत असलं तरी आहे ते स्विकारून आपलं स्वत्व जपत प्रामाणिकपणे चिवटपणे तग धरून जगणा-या माणसांसारखी.
मी तिनही फळं खिशात घालून गावाकडे पोहोचलो. वडिलांच्या हातावर ठेवली. दादा म्हणाले,"अरे, रानवांगे कुठी सापडले तुले? आधी लय भेटत व्हते पडितात. आवशिध म्हणून वापरत्या हे. आता गावाकडं दुर्मिळ झाले हे अन् तुले शहरात बरे सापल्डे? "
मी गावातूनच शहरात गेलोय ना, म्हणून असावं कदाचित.