Pandit Warade

Tragedy

4.0  

Pandit Warade

Tragedy

राधिका

राधिका

3 mins
491


        राधिका! आंबेवाडीची एक मुलगी. आईबापाचा पत्ता नाही. गाव कुठले माहीत नाही. कुठून आली? कशी आली? कुणाला काहीच माहीत नाही. एक दिवस सकाळी सकाळी श्रीकृष्ण मंदिरात दिवा लावायला गेलेल्या लक्ष्मीबाईला ही मुलगी तिथे खेळत असलेली दिसली. लक्ष्मीबाईने तिला नाव, गाव विचारले पण तिने काहीच सांगितले नाही. पुन्हा पुन्हा विचारले तरी ती, 'माहीत नाही' याच्याशिवाय दुसरे उत्तर देत नव्हती. तोपर्यंत इतरही बायका, मुले, माणसे तिथे जमली होती. सर्वच जण तिला आश्चर्याने, कुतूहलाने बघत होते. इतक्यात सखूबाईने मार्ग काढला, म्हणाली..


    "काय बी म्हणा लकसाबाय तुमच्या त्या किसनाचाच ह्यो परसाद आसायला पाह्यजेल. तुम्ही लई करता न्हवं किसनाचं. त्यानंच ईला तुमच्या वटीत टाकलं आसंन."


    तसंही लक्ष्मीबाईला जवळचं असं कुणीच नव्हतं. 'एकटा जीव नि सदाशीव.' छोट्याशा झोपडीत रहायचं, जमेल तेवढं काम करायचं, मिळेल ते खायचं आणि वेळ मिळेल तशी कृष्ण भक्ती करायची. असा तिचा दिनक्रम. सर्वांनीच सखूबाईचा विचार उचलून धरला. त्या मुलीला लक्ष्मीबाईंनी घरी घेऊन जावं, असं सर्वांनी सुचवलं. 


    "पर बाबानू, आरं जिथं यका पोटाची पंचाईत तिथं आणि एक पोट कुठून भरू रं बाबांनु?" लक्ष्मी बाईंचा रास्त सवाल होता.


    "लक्षुमी बाय तू काय काळजी करू नगस. आमी हाय तुह्या पाठीमागं. घेऊन जाय ईला घरी. अन जवा कवा तुला काय आडचन आली तर आवाज द्ये, लगीच हाजर ऱ्हाऊ." पाटलांनी हमी भरली. तेव्हा पासून लक्ष्मी बाईंनी तिला सांभाळलं. कृष्ण मंदिरासमोर सापडली म्हणून तिचं नाव *राधिका* ठेवलं गेलं.


    अशी ही राधिका. लक्ष्मीबाईंकडेच लहानाची मोठी झाली. लक्ष्मीबाई सोबतच जे मिळेल ते काम करायला ती शिकली. मोलमजुरी करून खाता खाता राधिका मोठी झाली अन् एक दिवस लक्ष्मीबाई तिला पुन्हा एकदा एकटी सोडून गेली. आधीही ती एकटीच होती. आता पुन्हा एकदा ती एकटी झाली. मात्र तेव्हा ती लहान होती, आता तिनं नेमकं तारुण्यात पदार्पण केलं आणि डोईवरचं छत्र हरवलं. कठीण काळात ती पोरकी झाली. गावानंही लक्ष्मीबाई हयात असे पर्यंत शक्य तेवढी मदत केली होती. पण आता त्या प्रत्येकाची दृष्टी बदलली होती. जो तो राधिकेकडून जास्तीत जास्त काम कमीत कमी खर्चात कसं करून घेता येईल तेवढं पाहू लागला. तिच्या एकटेपणाचा फायदा कसा उठवता येईल याचा विचार करू लागला. 


    गावातील काही रिकामटेकडे तरुण तिच्या झोपडीच्या समोरून घिरट्या घालू लागले. जास्तीत जास्त वेळ तिच्या झोपडी समोर घालू लागले. गावात घराघरात चर्चा व्हायला लागली. 'कुठून हिला ठेऊन घेतली अन् हा व्याप लावून घेतला. आता पोरांना कसं आवरावं? काम धंदे सोडून पोट्टे रिकामे फिरायला लागलेत. त्या पोरीमुळंच हे सारं घडाया लागलं.' हे ज्याला त्याला कळत होतं. पण आता काय करता येईल ते काही सुचत नव्हतं. अन् अचानक एक दिवस सकाळीच गावात चर्चा सुरू झाली. राधिका बेपत्ता झाली होती. ती स्वतःहून गेली? की तिला कुणी पळवून नेलं? याचं कुणाला काही म्हणता काही कळलं नाही. 


    कुणी तरी तिला शहरात नको त्या गल्लीत पाहिलं म्हणे. असेलही कदाचित. जिला स्वतःच्या आई वडिलांनीच नाकारलं तिचा समाज तरी कसा स्वीकार करेल? तिच्या प्राक्तनात असेल तसं घडेलही. कुणी सांगावं तिच्या भविष्यात आणखी काय काय लिहिलं गेलंय ते? ती काही एकटीच नाही. समाजाने नाकारलेल्या हजारो स्त्रिया अशा गल्लीत नरक यातना भोगत आहेत. त्यात राधिकेची एक भर पडली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy