पुनरपि प्रीती बहरा आली
पुनरपि प्रीती बहरा आली


मीना आणि टीना दोघीही अगदी घट्ट , जिवाभावाच्या मैत्रिणी . ' समानशीलेषु व्यसनेषु मित्रम ' असे संस्कृत वचन आहे, पण इथे मात्र मीना शांत, अबोल, सोशिक स्वभावाची तर टीनाबडबडी , लगेचच उसळून उठणारी , स्वतःला स्वतंत्र विचाराची , आधुनिक समजणारी , धसमुसळी. इतके टोकाचे फरक असूनही अनेक वर्षे शेजारी राहिल्याने सहवासाचे प्रेम त्यांच्या मैत्रीत झिरपत असे. दोघी जेवायला खायला बरोबर . आज एकीकडे तर उद्या दुसरीकडे जेवायचे ठरलेले असे. नाश्तासुद्धा एकमेकींना सोडून खात नसत.
मीना बिचारी साधी , भोळी. कोणाला कधी उलटून बोलत नसे. तिच्या गरीब स्वभावावर टीना कायम कॉमेंटस करत असे.
" अगं तुला कुणीही गंडवेल !! कुणी अरे म्हटलं तर आपण कारे म्हणायला हवं "
" अगं बाई तू शहाणी बास का? असे म्हटल्यावर तात्पुरता संभाषणाचा शेवट होत असे .
दोघीही बरोबर हसत खेळत शैशवातून यौवनाच्या उंबरठ्यावर आल्या.प्रीतीची चाहूल खरं म्हणजे टीनाला लागायला हवी पण मीनाला अविनाश आवडला व अविनाशला मीना !!
"अगं जाऊन बोल ना त्याच्याबरोबर त्याशिवाय प्रेम कसं पुढं जायचं तुमचं? असं मूग गिळून कशी बसतेस गं तू ? मी असते तर........
"माहितीयं गळ्यात पडणारी!! अगं माझं धैर्यच होत नाही गं तो दिसल्यावर. सगळ्या संवेदना उमलून येतात पण त्याला कसं सांगायचं तेच कळंत नाही".
"तो पण शामळू आहे हं !!नुसता हसतो तुझ्याकडे बघून . कधी फिरायला येतेस का विचारत नाही की तुला हॉटेलात नेत नाही. आपण पिक्चर टाकू या का विचारत नाही कसं गं जमायचं तुमचं प्रेम ? कठीणंच दिसतंय एकंदरीत ............
बाईसाहेबांचं ह्या......असं म्हणून मीना हसून तिच्या गळ्यात हात टाकून म्हणे " अगं कधीतरी कळेल त्याला माझ्या हस-या डोळ्यातलं प्रेम !! अगं मी पण मागे रहाणार नाही काही
"देखते है आगे आगे होता है क्या "
पण नंतर टीना प्रेमात पडली तेव्हा पहिली रदबदली मीनालाच करावी लागली. नंतर टीनाने पंख पसरले. धीटपणाने त्याच्याबरोबर त्याच्या घरीही गेली. निघताना मीनाच्या कुशीत धाय मोकलून रडली. मीनाने तिला धीर दिला. काही दिवसांनी व्हाल सगळे एकत्र अशी आशाही दाखवलीपण तिलाही मनाला पटत नव्हते. हे चांगले झाले तर ठीक नाहीतर आयुष्याचा बट्ट्याबोळ व्हायचा. टीना गेली ती पार सीमापार. तिच्या घरातल्यांनी तिला खोदून खोदून विचारले. तिलाही सर्व सांगावेच लागले .
तिच्या आईवडिलांनी तिचे नाव टाकले. दोघे नमस्कार करायला आले तर वडिलांनी तिला उंबरा ओलांडू दिले नाही. शेवटी मीनाच्या आईनेचतिला गोडधोड खायला दिले ओटी भरली.
नंतर मीनाच्या वडिलांची दिल्लीला पाच वर्षांसाठी बदली झालीतेव्हा मोबाईल नव्हते टीनाच्या सासरी/माहेरी कुठेच फोन नव्हता आणि मीनाचा आता नंबर बदललेला. जीवाभावाच्या मैत्रिणी दुरावल्या. दोघींनाही चुटपुट वाटायची,पण काही साधनच नव्हते भेटीचे. भेट होणार का नाही हेही माहित नव्हते.
पाच वर्षांनी त्यांनी बदलीमधे तेच गाव मागून घेतले. सहज चक्कर टाकायला ती बाहेर पडली
"अगं तू मीना का ?
"हो अगंतू टीना का ?"
हो म्हणताच दोघीही मैत्रिणी गळ्यात पडल्या . पाच वर्षांनी भेटत होत्या दोघीजणी!! मीना नीटनेटकी व्यवस्थित नेहमीप्रमाणेच पण टीनाचा मात्र अवतार बघण्यासारखा झालेला . मीना गोंधडली. तिला टीनाचे हे रुप अपेक्षित नव्हते. तासातासाला मेकअप , पावडर बदलणणारी केस सदानकदा नीट करणारी टीना कुठे अन् कुठे ही अवतारातली टीना !!ड्रेस तर साधासुधा. डोळ्यांत काजळाचा पत्ता नाहीत्यामुळे ते खोल गेल्यासारखे !! किती भावपूर्ण डोळे टीनाचे !!
"ह्या डोळ्यांच्या जाळ्यातच अडकायचं कुणी " असं मीनाने म्हणताच
"मोठंमोठं डोळं जसं कोळ्याचं जाळं" असं साभिनय म्हणून दाखवायची टीना. आज पार सुकून गेलेली टीना बघून मीनाला भडभडून आले
" ए चल आपण कटलेट आणि डोसा खाऊ"
"चल"
असे नुसते 'चल' टीना कधीच बघायची नाही. तिला काहीतरी चटपटीत नवेनवे खायला आवडायचे. काहीतरी गंभीर इतक्या वर्षांत घडलंय. बरंच पाणी वाहून गेलंय एवढेच मीनाने ताडले. हॉटेलात गेल्यावर मेनूकार्ड टीनाच काबीज करायचीपण आज कुठेतरी हरवली होती जुनी टीना.
"अगं किती वर्षांनी भेटतोय. मी पंधरा दिवस गावाला गेले तरी पूर्वी किती भरभरुन बोलायचीस "
टीना मूक झाली . तिचे सगळे बडबडीचे विषय पहिल्या प्रेमाने उधळून लावले. स्वतःच्या आयुष्याचाच रंग विटला तर दुस-याची खुशाली कशी विचारणार ? तेवढ्यात गरम कटलेट आले. तिने काहीही कॉमेंटस न करता भराभर खाऊन संपवले. मीना काही बोलणार तोच टीनाला भरुन आले. डोळे भरभरुन वाहू लागले.
" अगं टीना हे काय हे !! काय झालं ते मला अथपासून इतिपर्यंत सांग बरं . अगं नुसती मैत्रीण नाही ,मी बहीण आहे मी तुझी . मला कळलंच पाहिजे सारं "
"अगं मीना मला घरचे आणि तू सारखे सावध करत होतात रविपासून सांभाळून रहा म्हणून पण मला त्याच्या रुपाची ,वागण्याची , श्रीमंतीची काय भुरळ पडली कुणास ठाऊक ? मला भारी भारी प्रेझेंटस द्यायचा. गोडगोबृड बोलायचा , सिनेमाला न्यायचा , हॉटेलमधे न्यायचा , ह्यालाच मी प्रेम समजले. गाडी लग्नाच्या स्टेशनवर पोचली , तसा तो उडवाउडवी करायला लागला. मग मी त्याच्याशी बोलणंच सोडलं . माझा नकार ही माझी अदा आहे असं त्याला वाटलं आणि " मी फिदा आहे त्याच्यावर "असं म्हणून तो लग्नाला तयारही झाला.
"अरे माझ्या घरच्यांचा लग्नाला विरोध आहे , तुझ्या घरच्यांचा तरी आपल्याला आधार पाहिजे"अशा विचाराने मी भेटीसाठी त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. सासू सासरे बोललेच नाहीत. माझी मैत्रीण मीनल त्याची धाकटी बहीण. तिनेही चहा देऊन अगदी जुजबी संभाषण केले . तो वरच्या मजल्यावर गेल्यावर "अगं तू नको ह्याच्या नादी लागूस पस्तावशील"असे कानाशी येऊन पुटपुटली. मी "का " म्हणून विचारताच तो दत्त म्हणून पुढे उभा ठाकला
" चलं निघू या आपण " असे म्हणून सांगून निघण्याऐवजी मला तसेच त्याने बाहेर नेले . मग मलाही तेथून निघावे लागले. तो वडिलांच्या धंद्यात मदत करुन चार पैसे मिळवत असे. मीही काहीतरी करीन ही जिद्द तेव्हा फार मनात असायची आम्ही दोन्हीही घरचा विरोध पत्करुन लग्न केले.
लग्न करणे सोपे पण निभावणे फार कठीण गेलं गं !!पुन्हा एकदा हुंदका गळ्यात दाटला. मीनाने जवळ घेऊन प्रेमाने थोपटले. असा मूक स्पर्शच खूप काही सांगून जातो आधार देतो.
" अगं त्याचा व्यवसाय चालूच राहिला. तेवढी तरी देवाची कृपा !!रवी खूपच चंचल मनाचा . त्याचा मैत्रीण परिवारही मोठा. त्याचा फायदा घेणा-या अनेकजणी. कोणाकोणाशी मी भांडणार? अगं घरात कुठली वस्तू कमी असली तर चालते . गरीबीचा संसारही मी आनंदाने केला असता तशी माझी संपूर्ण
तयारी होती पण ह्याचे मैत्रिणींचे नाद मला सहन होईनात. मी एक दिवस मीनलला गुपचुप भेटले. तिला आपल्या भावाचे हे रंग चांगलेच माहित होते . म्हणूनच कुजबुजत्या आवाजात तिने मला सावध करायचा प्रयत्न केला होता.
लग्नानंतर तरी हा सुधारेल अशी आशा तिला नंतर वाटली पण ह्याच्या अशा वागण्याने तीही लयाला गेली गं !! त्याचा व्यवसायात सहभाग चांगला आसे. आईवडील त्याला सांगून सांगून दमून गेले . त्यांनाही लग्नानंतर सुधारेल असे वाटले पण त्यांच्याही आशेवर पाणी पडले "
"अगं पण तू तर अशी मुळुमुळु रडणारी नाहीस काही विरोध नाही केलास ?"
"एकदा मी हा काय करतोय हे बघण्यासाठी त्याच्या मागे मागे गेले. तिथे त्याच्या पैशाला चटावलेल्या साळकाया माळकाया होत्या "Welcome"म्हणून माझ्याच गळ्यात पडल्या. मला त्यांच्या चवचालपणाची किळस आली. रवीच्या खांद्यावर हात ठेवणा-या मैत्रीणीच्या मी खाडकन् मुस्काडित दिली. तेवढ्यात रवीने चिडून एवढ्या मोठ्या हॉटेलमधे माझ्या इतक्या जोरात मुस्काडित दिली की माझ्या डोळ्यापुढे काजवेच चमकले. मी तत्क्षणी बेशुद्ध पडले. कोणीतरी घरी आणले मी झोपेत काहीबाही बरळत होते.
दुस-या दिवशी सकाळीच रवीने मला दारु व गर्लफ्रेंडच्या बाबतीत सडेतोड सांगितले .
"मी हा असा आहे तुला रहायचे तर रहा नाहीतर जा" असे खणखणीत आवाजात सांगितल्यावर माझा सारा अभिमान गळून पडला. मी परोपरीने त्याला सांगायचा प्रयत्न केला पण व्यर्थ !!जोपर्यंत ह्या गोष्टी बाहेरच्या बाहेर होत्या तोपर्यंत मी 'नशीब' आपलं !! आता लग्न केलयं ना . काय करणार आलिया भोगासी असावे सादर म्हणून सारे मुकाटपणे सहन करीत राहिले, पण गोष्टी घरापर्यंत आल्या ,येणा-या मुली राजरोस राहू लागल्या तेव्हा माझी सहनशक्ती संपली. माझे सर्व सामान घैऊन मी रडतरडत आई बाबांकडे आले."
" माझी चूक झालेली खरीपण आईवडिलांचे नाते असे आहे की लेकीने हंबरडा फोडल्यावर कोणतेच आईबाबा पाझरल्याशिवाय रहाणार नाहीत. मी सर्व काही सांगितले . माझी चूक झाली क्षमा करा " असेही विनवून सांगितले .
"अगं ह्या सगळ्या गोष्टींची आधी बाहेरून माहिती काढायची असते. तू आम्हांला त्याच्या घरी गेलीस कधी , आईवडील का बोलले नाहीत ? मीनलनेही "तू नको याच्या नादी लागूस"असे जे सांगितलेते जर वेळीच आम्हांला सांगितले असतेस तर वेळीच तुझे आयुष्य वेळीच सावरले अ. तुझी फसवणूक झालीय.पहिलं प्रेम हेच खरं प्रेम असं जे तुम्ही धरुन चालता नाते अगदी वाळवंटातले मृगजळ आहे , पण असू दे अजूनही वेळ गेलेली नाही. पुन्हा त्याच्याकडे जायचं नाही. बोलायचं नाही. त्याचं तोंड बघायचं नाही .
"कसली जबरदस्त ठोकर बसलु होती मला. मला तुझीच प्रकर्षाने आठवण आली. मी तशी धीट असल्यानेखेळकरपणे तुला बोलायची तू तशी लाजरीच पण हा धीटपणा मला कुठल्या रसातळाला घेऊन गेला बघ. माझी चूक असूनही आई बाबांनी मला सावरले. मी शिक्षण पूर्ण केले. नोकरीही मिळवली, पण खरं सांगू का मन जे उध्वस्त झालंय ना ते काही सांधलं गेलं नाही . चांगल्या रहाणीची , छानछोकीची माझी आवड विरुन गेली . 'गेले ते दिन गेले ' असेच समजते मी "
पुन्हा टीनाला जोराचा हुंदका आला. मीनाने कॉफी मागवली. टीनाचे मन मोकळे झाल्याने थोडीशी सावरली.
" अगं मी माझंच पुराण सांगत बसले . अगं तुझी मैत्रीण नीलापण आमच्या अॉफिसमधेच आहे .एकदा ये ना आमच्या अॉफिसमधे "
आठ दहा दिवसांनी टीनाच्या अॉफिसमधे मीना जाते . नीला मीना टीनाच्या खूप गप्पा होतात.
आज टीना विशेष मूडमधे असल्याने मीना सेल्फीही घेते.अगं तुझ्या अविनाशचं काय झालं सांग ना!!खूपच उत्सुकता आहे मला . तिच्या चेह-यावर पुसटसे हसू उमटले मीनाला फार बरे वाटले "
"बाईसाहेब किती वाजलेत माहिती आहे का?आता सहा वाजून गेलेत आता अविनाशपुराण पुढील भेटीत आणि हे अॉफिस आहे भिंतीनाही कान असतात बरं !!
पुढील भेटीत टीना
ब-यापैकी सावरलेली. तिचा पहिला खेळकरपणा पुन्हा ओसंडून चाललेला चेह-यावरुन !!
"मीना आता नो प्रस्तावना. अगदी सरळसरळ अविनाशचं काय झालं सांग बरं "
मीनालाही तिच्या उत्सुकतेचे हसू आले.
" अगं माझी कहाणी काय सांगू? अविनाश आणि मी साताजन्मीचे साथीदार होणार होतो पण अविनाशला परदेशी जाण्याची चांगली संधी मिळाली. तो मला घेऊन जायला तयार होता. लग्नाच्या आणाभाका झालेल्या. उद्या तो घरी येणार आसे ठरलेपण त्याच दिवशी आईला सकाळी massive heart attack आला. काही कळायच्या कळायच्या आतच ती गेलेली होती. हे सर्व बघून मी आणि बाबा हतबुद्ध झालो. साध्यासाध्या गोष्टींमधे रडणारी मी रडूबाई !! पण त्यावेळी डोळ्यांत एक टिपूसही नव्हता. बाबांचा शोक अनावर झाला. त्यांचे
B p shoot झाले व त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. संपूर्ण उजवी बाजू लुळी पडली. सुंदर सजवलेला पहिल्या प्रेमाचा बंगला क्षणार्धात कोसळून पडला. अविनाश भेटायला आला पण मूकपणेच त्याचेही बरोबर होते त्याला त्याचे ध्येय गाठायचे होते. मला पण बाबांना अशा अवस्थेत एकटे सोडता येत नव्हते . त्यातच आमची ताटातूट झाली.पण अविनाशचे फोन मला सतत दिलासा देत असत. आता बाबांची तब्बेत ठीक असली तरी मी त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला सांगणार आहे. आमचे प्रेम खरे असल्याने आम्ही एकमेकांवाचून दुस-या कोणाचा विचार करु शकलो नाही. "अगं मीने किती पोळलीस गं तू सुद्धा !!"टीनाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या हलकेच मीनाने त्या पुसल्या.
अगं पुढच्याच महिन्यात अविनाश इथे येतोय.
"खरंच!!टीना डोळे विस्फारुन आनंदाने म्हणाली
"अगं खरंच !!आणि आम्ही 15 दिवसांनी लग्न करतोय. लग्न ठरलेल्या मुलीने लाजून सांगावेअशी मीना झक्कपैकी लाजली .
" बाईसाहेब आपल्यासाठी एक गोल्डन अॉफर आहे "
"माझ्यासाठी?काय अॉफर सांग बरं!!"अतीव उत्सुकतेने टीना म्हणाली
"अगं अविनाशचा सुनील पण इथे परत येतोय त्याचे एका अमेरिकन मुलीवर प्रेम होते. पहिल्या प्रेमाच्या भरात त्यांनी लग्नही केले.थोडे दिवस पहिल्यावहिल्या प्रेमात ते नाहून निघालेपण सहा महिने संगतीला आणि सहा महिने पंगतीला राहिल्यावर स्वभाव कळतो असे म्हणतात ना ते अगदी खरे आहे. रोज जवळ राहिल्यावर एकमेकांच्या सवयींची आवडीनिवडींची जास्त जवळून ओळख होते. तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या होत्या शाकाहारी मांसाहारी इतके अंतर तर त्यालाही माहित होतेच तो अँडजेस्ट करतच होता,पण मित्रवर्गाशी नको इतकी सलगी ,चेष्टामस्करी नाचगाणी अंगचटी जाणे रहायच्या ट्रीपला जाऊन बेफाम वागणे त्याच्या सहनशक्तीच्या बाहेरचे झाले. त्याला वाटले त्याच्याशी लग्न केल्यावर ती बदलेल त्याच्यासाठी पण तो केवळ भ्रम ठरला एकतर्फी तडजोड करुन कितीसे पटणार ?तिने अगदी सहजपणे घटस्फोटाचा पर्याय सुचवला. त्याच्या मनाच्या ठिक-या ठिक-या उडाल्यापण अविनाशने त्याला सावरले. आता सावरतोय हळूहळू. मी आठ दिवसांपूर्वी माझ्याजवळ आपण जायच्या वेळेस काढलेला फोटो अविनाशला पाठवला. "
आता टीनाची उत्सुकता शीगेला पोचली .
"मग?" चमकत्या डोळ्यांनी टिनी उदगारली
"मग काय ? टीनाबाई तुम्ही आवडलायत त्याला खूप हा बघ अविनाशचा आणि त्याचा फोटो !!"
तिच्या हातातून फोन घेत ती टक लावून सुनीलकडे पाहू लागली .
"कळली कळली हं बाईसाहेब पसंती आधी दोघेही विश्वासभरल्या मनाने एकमेकांना निवांत भेटा एकमेकांचे घटस्फोटाचे कागद आगदी खुल्या मनाने एकमेकांना दाखवा जे काही घडले ते प्रामाणिकपणे एकमेकांना सांगा"
"आणि मग!! खट्याळपणे टीना खळखळून हसत म्हणाली
"आणि मग दोन्ही घरच्या पसंतीने "शुभमंगल सावधान!!"