STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy Others

3.7  

Pandit Warade

Tragedy Others

पुन्हा एक आत्महत्या

पुन्हा एक आत्महत्या

5 mins
9.6K


रामपूर. रात्रीच्या विश्रांतीनंतर जागे झालेले गांव. सकाळची काम आटोपून ग्राम पंचायतीच्या ओट्यावर पंचायती करत बसलेली मंडळी. वर्तमानपत्रातल्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले होते. बातमी शेजारच्याच गावातली होती, भणभणपूरची !

   "कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या" या शीर्षका खाली लिहिले होते, 'भणभणपूर गावातील तरुण शेतकरी बाजीराव नेहमीच्या नैसर्गिक आपत्तीने, दरवर्षीच्या नापिकीने जीवनाला कंटाळला होता त्यातच सावकाराकडून घेतलेले कर्ज न फेडता न आल्याने त्याने गळफास घेऊन आपली सुटका करून घेतली. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन अविवाहित मुली आहेत.'

  बाजीराव हा वडीलांचा एकुलता एक मुलगा. अचानक दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन अल्पावधीतच वारले. बाजीराववर दुःखाचा डोंगर कोसळला. घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली. शिक्षण अर्धवट राहिले. आईचे दुःख बघवत नव्हते. एकमेकांकडे बघून दोघेही दुःखी होत होते. चार लोकांच्या सल्ल्याने त्याचे लग्न झाले. सुंदर, सालस, गुणी बायजा त्याच्या जीवनात आली. आई, बायजा आणि तो असे छोटेच कुटुंब. परंतू वडिलांच्या आजारावर झालेल्या खर्चामुळे आर्थिक अडचण होतीच. तशातच आई देखील आजारी पडली. बाजीरावला दुःख होऊ नये म्हणून आईने आजार लपवला. 

   लपवल्याने आजार लपतो थोडाच, वाढतच जाणार. व्हायचे तेच झाले. आजार वाढत गेला, दवाखान्याशिवाय पर्याय नव्हता. दवाखान्याचा खर्च झेपण्या सारखा नसला तरी करावा लागणारच होता. एखादा हंगाम साधला कि फेडून टाकू म्हणत त्याने सावकाराचे पाय धरले, जमीन तारण ठेऊन कर्ज काढले. इलाज चालू झाला. आईच्या आजार सोबत दवाखान्याचा खर्चही वाढत गेला. ... आणि ... कर्जाचे खूप मोठे ओझे बाजीरावच्या डोक्यावर देऊन आईने इहलोकीची यात्रा संपवली. बाजीरावचा आधार गेला, बाजीराव पुरता खचून गेला.

  हताश झालेल्या बाजीरावला मित्रांनी धीर दिला. मदतही देऊ केली. मात्र स्वाभिमानी बाजीरावला ती गोष्ट रुचली नाही. अर्धपोटी राहून दिवस काढू पण आणखी उपकाराचे, कर्जाचे ओझे डोक्यावर नको असे दोघांनीही ठरवले होते. बायजाने स्वतःचे स्त्रीधन काढून बाजीरावच्या हाती दिले. दागिने विकून आलेल्या थोड्या फार पैशात शेती कसायला सुरुवात केली. 

   पावसाळा सुरु झाला. शेतात पेरणी केली. पीक जसजसे वर येऊ लागले तस तसे बाजीरावच्या मनात आशेचे अंकुर फुटायला लागले. हळूहळू परिस्थितीत सुधार व्हायला लागला. बायजानेही अगदीच काटकसरीने संसार सावरला. कसेबसे दोनवेळीचे पोटभर जेवयला मिळू लागले. दोघेंही समाधानाने राहू लागले. आणि अशातच एक दिवस ती आनंदाची बातमी बायजाने हळूच कानात सांगितली. 

   बायजाला दिवस गेले होते. बाप बनायच्या कल्पनेने बाजीराव सुखावला होता. दिवस भरत आले. आणि एक दिवस पुन्हा दवाखान्याची पायरी चढावी लागली, बायजाच्या प्रसूतीसाठी.  

   बायजाने सुंदर, गोंडस मुलीला जन्म दिला. 'पहिली बेटी, धनाची पेटी' म्हणत दोघांनीही आनंदाने तिचे स्वागत केले. घरात लहान मूल खेळायला लागले कि दुःख, निराशा जीवनातून पळायला लागतात. बाजीराव, बायजा आनंदाने राहू लागले. 

   दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्ष गेले. आणि पुन्हा बायजाला दिवस गेल्याची बातमी मिळाली. पण... पहिल्या एवढा आनंद का नाही दिसला चेहऱ्यावर? बायजा आणि बाजीराव नकळत चिंतेत पडल्यासारखे दिसले. दुसऱ्यांदा मुलगा कि मुलगी ? काय असेल ? जे असेल ते ! पहिली मुलगी आहे आता मुलगाच व्हावा अशी आशा मनात येऊ लागली. एक मन उगाच शंका घेऊ लागले. दुसरीही मुलगीच झाली तर ?

  'तपासून घ्या, उगाच जोखीम नको' एक अनाहूत सल्ला. 

  'नको नको, नशिबात जे असेल ते होईल' बाजीरावाचा विचार. जवळ पैसा नसल्यामुळे तत्वाचा आधार. तपासणीसाठी ही पैसे लागतात ना. आणि पुन्हा एकदा दवाखाना अन् पुन्हा एकदा मुलगीच! नाही म्हणायला दोघेही जरा दुःखी झालेच.

   मुली वाढायला लागल्या तसा त्यांचा खर्चही वाढायला लागला. हाता तोंडाची भेट दुरापास्त होऊ लागली. आर्थिक ओढाताण होऊ लागली. आणि पुन्हा एकदा बायजाला दिवस गेले. आता मात्र दोघेही सावध झाले. आता उगाच जोखीम नको, तपासून घेण्याचे निश्चित केले. थोडे फार पैसे जमवून त्यांनी दवाखाना गाठला. डॉक्टरांनी

तपासणी केली, गंभीर चेहऱ्याने सांगितले, 'गर्भ मुलीचा आहे'. 

  "डॉक्टर, आम्हाला अगोदर दोन मुलीच आहेत, काही करता येणार नाही का ?"

   " म्हणजे? तुम्हाला म्हणायचं काय? " सगळं समजूनही उगाच साव बनत डॉक्टरचा प्रश्न.

   "डॉक्टरसाहेब, अहो गरीब जोडपे आहे, तिसरी मुलगीच झाली तर किती अडचणीत येतील ते. काही उपाय करता येत असेल तर बघा". एक सल्लागार, डॉक्टरांनीच ठेवलेला.

   "हे बघा, माझ्याजवळ असा कुठलाही उपाय नाही कि पोटातील बाळाचं लिंग बदल करता येईल. त्यासाठी मी असमर्थ आहे". डॉक्टर.

   " डॉक्टरसाहेब, तुम्ही मनावर घेतलं तर यांना तुम्ही अडचणीतून सोडवू शकता. पुढील खर्च वाचवण्यासाठी ते आता थोडाफार खर्च कसाही करतील, काहो, मी म्हणतोय ते बरोबर ना? " सल्लागार.

   "होय हो डॉक्टरसाहेब, कसंही करून यातून मार्ग काढाच" बाजीरावाचा अजिजीचा स्वर.

   "हे बघा, मला तुम्ही विनाकारण पातक करायला लावू नका. कायद्यानंही बंदी आहे, पकडल्या गेलो तर बाराच्या भावात जाईल मी, आयुष्य बरबाद होईल माझं. आयुष्यभर केलेली कमाई पुरणार नाही निस्तरायला" डॉक्टर.

   "डॉक्टरसाहेब, नाही म्हणू नका, येईल तेवढा खर्च येऊ द्या" बाजीराव. 

    मनात नसल्याचं उगाच दाखवत डॉक्टरांनी बायजाच्या उदरात वाढत असलेला मुलाचाच गर्भ मुलीचा म्हणून काढून टाकला, केवळ पैशासाठी.

   आधीच हलाखीचे दिवस, दवाखान्याचा खर्च, यातून सावरणे जरा जडच गेले. पुन्हा एकदा सावकाराकडून कर्ज घेणे भाग पडले. सावकारानेही मनातून आनंदाने, परन्तु त्याच्यावर दयाभाव दाखवत उरलेली जमीन तारण ठेऊन कर्ज दिले.

   कर्जाचा बोजा वाढला. वाढत्या वयाबरोबर मुलींचा खर्चही वाढत गेला. त्यातल्यात्यात निसर्ग सुद्धा साथ देईनासा झाला. एका मागून एक वर्ष कोरडेच जाऊ लागले. एखाद्या वर्षी चुकून हुकून पीक जरा चांगले आले तरी व्यापारी वर्ग अडवू लागला. शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीच बिघडत चालली. निसर्गानं हात द्यायच्या ऐवजी हात दाखवला. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. भरात आलेले पीक पावसा अभावी डोळ्यादेखत जळतांना पाहून बाजीराव मनातल्या मनात खचून गेला. सावकाराचे देणे थकले. त्यातच मोठी मुलगी लग्नाच्या वयात आली. तिच्या लग्नाच्या चिंतेने दोघांनाही ग्रासले. कसातरी घास तुकडा खायचे तोही अंगी लागायचा नाही. शरीर प्रकृती खालावत चालली. तशातच बायजाही आजारी पडू लागली.

   सावकाराने कर्जफेडीसाठी तगादा लावला. 'कर्जफेड कर नसता जमिनीची रजिष्ट्री करून दे' म्हणू लागला. गयावया करत तो सावकाराला समजावू लागला, पण सावकाराच्या मनात काही वेगळेच होते, जमीन बळकवायची किंवा वयात आलेली मुलगी तरी. मुलीला पाहून सावकाराची नियत फिरली होती. 

   एक दिवस सावकाराने बाजीराव कडे सरळ सरळ कर्जफेडीसाठी मुलीला रात्रभर देण्याची मागणी केली. साहजिकच मागणी मान्य करणे शक्यच नव्हते. त्याने नकार दिला. सावकार संतापला. जमिनीवर ताबा करतो म्हणत निघून गेला. 

   रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठल्यावरही डोळ्यासमोरून सावकार आणि सावकारातील सैतान दिसत होता. 'आपण सावकाराचे कर्ज फेडण्यास असमर्थ आहोत, मुलीची अब्रू सांभाळण्यास असमर्थ आहोत' या विचाराने तो अस्वस्थ झाला.

   बाजीराव वैफल्यग्रस्त झाला. जसजसा विचार करू लागला तसतशी त्याला स्वतः बद्दलची घृणा वाटू लागली. 'या जगण्यात काही अर्थ नाही, आपण जगण्याच्या लायकीचेच नाही, आपण आता स्वतःला संपवलेच पाहिजे' असा विचार मनात घोळू लागला. 

   वैफल्याने ग्रासलेल्या माणसाचा सारासार विवेक नष्ट व्हायला लागतो. बाजीरावच्या बाबतीत तेच झाले. 'आपण गेल्यावर आपल्या पत्नीचे काय होईल? आपल्या मुलीच्या लग्नाचे काय? तिचा सांभाळ, तिचे रक्षण कोण करील? आपण गेल्याने प्रश्न सुटणार का? याचा जरासाही विचार न करता त्याने अगदी टोकाचा निर्णय घेतला, गळफास घेऊन आत्महत्या केली. 

   अशा आणखी किती आत्महत्या होणार? जगाचे पोशिंदे किती बळीराजा बळी जाणार? असे असंख्य प्रश्न मागे सोडून बाजीरावने स्वतःला मुक्त करून घेतले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy