प्रवास वर्णन
प्रवास वर्णन
प्रवास वर्णन
जानेवारी महिना चालू होता.वातावरण एकदम छान होते. थंडी संपत आलेली आणि उन्हाळ्याचे आगमन होऊ लागलेले. अशातच एखाद्या सुंदर नैसर्गिक ठिकाणी फिरायला जायची तीव्र इच्छा निर्माण झाली. बच्चे कंपनी तर टपूनच होती. फक्त ठिकाण कोणते ते ठरवायचे होते. नैसर्गिक दृष्टी ने व विविधतेने नटलेले महाबळेश्वर हे ठिकाण ठरवले गेले. जाण्याची तारीख ठरवून रजा वगैरे मिळवली प्रवासाला जाण्याची तयारी सुरू झाली. प्रवासाला जाताना टिकाऊ असा काहीतरी गोड तिखट पदार्थ तयार करणे तसेच बाल गोपाल बरोबर असल्याने चार दिवसाचे कपडे वगैरे घेणे प्राथमिक स्वरूपाची औषध गोळ्या वगैरे हे लहान मुलांच्या आईला करावंच लागतं. सोबत लहान सहान गोष्टी घेणे ठरले.
महाबळेश्वर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ठिकाण. महाबळेश्वर म्हणजे निसर्ग देवतेला पडलेले एक सुंदर स्वप्न. महाबळेश्वर या ठिकाणी महादेवाचे मोठे मंदिर आहे. प्राचीन शिवालय आहे. म्हणून या ठिकाणाला महाबळेश्वर असे नाव पडले आहे. शेवटी श्वर हा शब्द असेल तर ते महादेवाचे ठिकाण असते. सकाळी लवकर म्हणजे सहा वाजता आम्ही घरातून आमच्या गाडीने निघालो. सहा म्हणजे रस्त्यावर अजिबात गर्दी नव्हती. दुतर्फा असलेली दुकाने बंद होती. गजबजलेला रस्ता शांत होता. म्हणून मस्तपैकी जुन्या हिंदी गाण्याचा आस्वाद घेतला.
थंडीचे दिवस असल्याने थंडी वाजत होती. एव्हाना रस्त्यावर कोवळे ऊन पडु लागले होते. रस्त्यावर गर्दी वाढू लागली होती. आम्ही वाईच्या जवळ जवळ गेलो होतो. गणपतीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे होते. आता गाणी बंद करून आम्ही खिडकीतून निसर्ग पाहण्यात दंग होतो. हिरवेगार उंच उंच डोंगर त्यामधून जाणारे काळेभोर डांबरी रस्ते त्या मधून पळणारे वाहने हे दृश्य खूप विलोभनीय होते. आम्ही गणेशाचे दर्शन घेउन पुढे जायला निघालो. किती मोठी मूर्ती आहे गणेशाची नदीकाठी उभे असलेले मंदिर पाहून खूप समाधान वाटले. महाबळेश्वरच्या जसे जसे जवळ जाऊ तसे तसे दुपारीसुद्धा थंड हवा जाणवू लागली. महाबळेश्वर हे नुसते थंड हवेचे नाही तर निसर्ग सुंदर ठिकान आहे. या ठिकाणी अनेक सहली येतात. तसेच अनेक कुटुंब तसेच नवीन लग्न झालेली जोडपी फिरायला येतात. एव्हाना आम्ही शहरांमध्ये पोहोचलो होतो.
सह्याद्रीच्या कुशीत व सावित्री नदी लगत असलेल्या निसर्गरम्य ठिकाणाने आमचे लक्ष वेधून घेतले. पहिल्यांदा आम्ही देवदर्शन करून फिरायचे ठरवले. प्रथम मंदिरामध्ये गेलो. पंचगंगा मंदिरात गेल्यानंतर मध्ये पाण्याची छोटी बारव होती. त्यामध्ये दगडी पायर्या होत्या. त्यामध्ये पाणी पडत होते. यामध्ये सर्वजण सुट्टे पैसे टाकत असत. असे म्हणतात की या ठिकाणी सावित्री, गायत्री, वेणा, कृष्णा-कोयना या नद्यांचे पाणी एकत्र येऊन या मुखातून पडते. आत गेल्यानंतर शिवालयाच्या गाभाऱ्यात व त्यामध्ये खूप वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवलिंग होते. ते बऱ्याच ठिकाणी बेल विभूती यांनी झाकले होते. मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटले. या ठिकाणी अजूनही बऱ्याच देवांच्या मूर्ती होत्या. ओम नमः शिवाय हे सतत कानावर पडत होते. महाबळेश्वरला ऐतिहासिक महत्त्व आहे. इंग्रजांनी या ठिकाणी खूप सुधारणा केल्या. ऑर्थर सीट पाईंट हा त्यामधील एक अतिशय निसर्गसुंदर पॉईंट आहे. या ठिकाणी बसून जॉर्ज ऑर्थर र्निसर्गाचे सौंदर्य बघत असत. असे म्हणतात ते आपली पत्नी व मुलगी यांच्या आठवणी मध्ये तास न तास या ठिकाणी वेळ घालवत असत. खाली पहावे तर खोल दरी, समोर विशाल डोंगर, वरती धुके, असे आल्हाददायक दृश्य होते.
प्रवासामध्ये खूप गमतीजमती आल्या. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना गाडीने जावे लागत असे. परंतु रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार वनराई होती. हिरवे हिरवे डोंगर पाहून वाटत होते की 'वसुंधरा ने हिरवा हिरवागार शालू पांघरला आहे की काय? या डोळ्यांमध्ये ते दृश्य साठवून ठेवावी असे वाटत होते. मुले मात्र फोटो काढणे व मोबाईल शूटिंग मध्ये मग्न होते. डोंगर आपल्या सोबत पळत आहेत का? असा प्रश्न ते विचारत होते. खरतर मलाही लहानपणी हा प्रश्न नेहमी पडत असे, खिडकीतून बाहेर पाहताना झाडे कशी काय पळतात बरे?
ऑर्थर सीट पाईंट कडे आम्ही जात होतो. गाडी थांबली एव्हाना सगळ्यांचे पाय गाडीमध्ये बसून आखडले होते. खाली उतरून आम्ही पाय मोकळे केले व पायऱ्या उतरू लागलो. आमच्या सोबत इतर बरेच पर्यटक होते. मुलेही खूप खुश होती. बाजूचा निसर्ग खूप सुंदर होता. उंच डोंगर तेवढ्यात खोल-खोल दऱ्या होत्या. हवा थंड होती. आम्ही चालत होतो त्या रस्त्याच्या दुतर्फा सर्व विक्रेते च विक्रेते होते. पटकन खावे असे खूप पदार्थ खायला होते. सुंदर सुंदर लालचुटूक स्ट्रॉबेरी ने भरलेल्या डिश त्याही पानाच्या द्रोणातून तसेच उकडलेल्या मक्याच्या कणसाचे दाणे द्रोणातून समोर मांडले होते. हातामध्ये द्रोण घेऊन सर्वजण खात-खात फिरत होते. वेगवेगळ्या आकर्षक भेळ तिथे विक्रीला होत्या. सपाटून भूक लागली होती. त्यामुळे प्रत्येक खाण्याचा आस्वाद घेतला. या ठिकाणी खाली पाहिले तर खोल दरी वरती डोंगर आणि तेही सर्व हिरवेगार खूप छान वाटत होते. इथे आपण खाली टाकलेली प्रत्येक वस्तू छोट्या स्वरुपात ती तेवढ्यातच वेगळ्याने परत वरती येत होती. तो एक खेळच होता.आजूबाजूला विविध माकडे होती.त्यांना मी चॉकलेट दिले तर त्यांनी कव्हर हाताने काढून खाल्ले. आमच्या कन्येच्या हातातील फ्रुटी माकडाने पळवली आणि एकच गोंधळ उडाला. माकडा सोबत मुलांनी फोटो काढले.
कितीही फिरलो तरी मन भरत नव्हते. आणखी पुढे काय असेल? काय असेल? अशी उत्कंठा लागून राहिली होती. या ठिकाणी थंड पाण्याचा एक झरा होता तो पाहून आम्ही बरेच फोटो वगैरे काढले. सहलीला आलेली मुलं इकडे तिकडे पळत होती. त्यांना आवरता आवरता शिक्षकांची पुरेवाट झाली. नंतर आम्ही सन सेट पॉईंट म्हणजेच सूर्यास्त देखावा पाहण्यासाठी निघालो. दुर्मिळ प्राणी बघत-बघत आम्ही निघालो. त्या ठिकाणी पोहोचलो. खरंच टीव्हीमध्ये निसर्ग पाहणे व प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेणे यामध्ये कितीतरी फरक आहे. सूर्यास्ताचा देखावा पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. जसा सूर्य अस्ताला निघाला तसे तसे ते दृश्य खूप विलोभनीय होते. लालभडक झालेला तो सूर्याचा गोळा क्षितिजाला स्पर्श करत होता. हळूहळू तो तिच्यामध्ये बुडाला. या ठिकाणी बच्चेकंपनीला एक आमचे नातेवाईक भेटले. मग खूपच धमाल आली. या दिवशी आम्ही एका निसर्गरम्य ठिकाणी लॉज मध्ये मुक्काम केला. आज खरेदी करण्याचा उत्साह होता. आम्ही परत शिवमंदिरकडे खरेदीला गेलो. पर्यटन स्थळ असल्याने महागाई खूप प्रमाणात होती. अशावेळी 'गड्या आपला गाव बरा' हेच खरे तरीही मोह आवरेना म्हणून बरेच लाकडी खेळणी, आकर्षक वस्तू होत्या. त्या घेतल्या बऱ्याच ठिकाणी लाकडी शोपीस होते. ते विकत घेतले.
यानंतर आम्ही वेणालेक कडे निघालो. म्हणजे खूप मोठे पाण्याचे तळे होते, सरोवर होते. या ठिकाणी नौकानयन होते. हे पाहून मुलांना खूप आनंद झाला. पायऱ्या उतरताना द्रोणामध्ये भरलेल्या काळ्याभोर जांभळानी लक्ष वेधून घेतले, सोबत त्याला मीठ लावलेले पाहून तोंडाला पाणी सुटले. कोणी जांभळ घेतली कोणी भाजलेले मक्याचे कणीस घेतले. आणि खात-खात नौकानयनाचा आनंद लुटला. मुलांना हे घेऊ की ते घेऊ असे झाले होते. नौकानयन पूर्ण केले. अर्थात मुलांचे मन अजूनही पूर्ण भरले नव्हते.परंतु आम्ही घुडसवारी चे आमिष दाखवल्यानंतर ते निघायला तयार झाले. बरेच लहान मुलं माणसे घुडसवारी चा आनंद घेत होते. मुलांनी एकत्र घुडसवारी केली, विभक्त पद्धतीने केली. आणि याचा मनमुराद आनंद घेतला. पांडवांच्या पायांचे ठसे आम्ही जवळ जाऊन पाहिले.आत्ता घरी जाण्याची ओढ लागली होती. काही ठिकाणे बघत-बघत जाण्याचे आम्ही ठरवले. येताना च्या बाजूचा निसर्ग पहायचा राहिला होता तो पाहायचे ठरवले. आता यानंतर कुठे जायचे याची पूर्वतयारी सुरू झाली. मोबाईल मध्ये काढलेले फोटो पाहात पाहात आम्ही येत होतो. हिरवा निसर्ग सोबतीला होता. उंच डोंगर, दरी,निळे आभाळ काही ठिकाणी धुक्याने न दिसणारा रस्ता हे सोबत होते. रस्त्याच्या कडेला डोंगर कपारीला ठिक ठिकाणी त्या भागातील स्त्रिया जांभळे ,काळे मैना यांचे ढिगारे मांडून विक्रीला बसल्या होत्या. काही ठिकाणी स्ट्रॉबेरीचे ढीग होते. सोबत त्यांची लहान मुले पिशवीमध्ये या वस्तू बांधून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, थांबलेल्या गाड्या या ठिकाणी विक्री करत होते. व आपल्या परीने आईची मदत करत होते. काही ठिकाणी छोटे छोटे धबधबे वरून खाली वाहत होते आणि पाणी खालून वाहत होते. त्या पाण्याचा मधुर आवाज येत होता. जणू काही 'जलराणीने पायात पैंजण घातले आहे' असे वाटत होते. कवीने या निसर्गाचे सुंदर वर्णन करताना म्हटले आहे "हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती".
