प्रवास जीवनाचा
प्रवास जीवनाचा
प्रवास वर्णन उतरवताना कागदावर ,माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.आणि सुरु झाला तो शब्दांचा प्रवास...... प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे.एका ठिकाणी राहून,सारखा कंटाळा जाणवतो ,एकच एक गोष्ट करून मन थकून जात.कशातच कोणतीच गोष्ट करण्यात मन रमत नसत.तेव्हा प्रत्येकजण हा मनाला प्रफ्फुलीत आणि ताजेतवाने करण्यासाठी प्रवासाचा आधार घेतो.
प्रवास करत असताना निसर्गातील विविध गोष्टीत आपण कधी हरवून जातो ते कळतच नाही.
कधी उजाड रानातील थोडीशी हिरवळ मन खेचून घेते,तर कधी कधी नुसती दाट आणि एकसारख्या दिसणाऱ्या झाडांकडे बघून मन उबल्यासारखे वाटते.कधी भकास रानात तीव्र उन्हाचे चटके जाणवल्यावर एखादे झाड तरी दिसेल या शोधात पुढे वाटचाल करत असतो.मन हे असेच आहे अस्थिर.कधी कुठे घेऊन जाईल याची कल्पना करणे अशक्य.मनाचा वेध घेता नाही.त्याचप्रमाणे वेध घेता येत नाही या आयुष्याचा.
आयुष्य हे खर तर खूप सुंदर,विविध रंगांनी नटलेलं,ना ना तऱ्हेच्या कलाकृतींनी सजलेलं,पण हा प्रवास काही ठरवून केलेला प्रवास नाही.ज्यामध्ये आपण आवडेल त्या ठिकाणी फिरायचं,मन रमवायचं, मौज करायची,आणि परतायच.
ना!
हा प्रवास पूर्णपणे अजाण,अकल्पित आहे.जो विधात्याने निर्मिलेला आहे.कधी हा प्रवास रस्त्यावरील खड्ड्याप्रमाणे असतो.असा खड्डा ज्याची आपल्याला मुळीच कल्पना नसते.आणि त्या खड्ड्यात पाय अडकून आपण पडत असतो.
कधी हा प्रवास समुद्रातील त्सुनामी प्रमाणे असतो.जो अचानक येतो.आणि सर्व काही उध्वस्त करून निघून जातो.
कधी हा प्रवास अनोळखी लोकाप्रमाणे असतो.जे लाखोंच्या संख्येत एकाच रस्त्याने जात असतात.परंतु सर्वांची ध्येय ,उद्दिष्टे वेगळी.त्या वेळी प्रचंड गर्दीमध्ये ही आपल्याला एकटेपणा जाणवतो.
तर,कधी हा प्रवास पावसाच्या पहिल्या पाण्याप्रमाणे असतो.ज्याची उत्सुकता सर्वांनाच असते.आणि भिजण्याचा आनंद वेगळाच!
तुम्ही सर्व जण हा विचार करत असणार,नेमक या लेखिकेच आयुष्याविषयी मत आहे तरी काय? नाही का?
मित्रानो....आयुष्य हे गुंतागुंतीचे असले ,गुंता सोडवताना तो अजूनच गुंतत चालला,तरी आयुष्य जगणे आपण सोडू नये.जीवनाच्या प्रत्येक वाटेवर अनेक नवी संकटे येऊन पुढे राहतील,पण प्रत्येक संकटांचा सामना करण्याची जिद्द मनी बाळगावी.प्रत्येक संकटांना सामोरे जाऊन उंच उभारी घ्यावी त्या फिनिक्स पक्षासारखी...जो राखेतून उडून उंच भरारी घेतो.
जीवनात जरी अनेक त्सुनामी आले असतील ,पण न डगमगता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन असामान्य कर्तृव करा..काही तरी असे तुफानी करा,ज्यासाठी जग तुम्हाला ओळखेल.स्वतःच वेगळं अस्तित्व,वेगळी ओळख निर्माण करा.यश मिळो अथवा न मिळो,पण प्रयत्न प्रामाणिक करा.आणि फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा.
जीवनात कितीही संकटे आली,किती वेळा आपण पडू,चिंता करू नका.पुन्हा उठा.पुन्हा चालायला लागा..चालत असताना थकवा जाणवेल,विचारांची गर्दी मनात दाटेल, खूप प्रश्नाची उत्तरे शोधायची बाकी राहतील,......
पण मित्रांनो,जीवन हे क्षणभंगूर आहे, जीवनात फक्त पुढे पुढे चालायचं असत,काही गोष्टी मागे टाकायच्या असतात..फक्त विचार करून जीवन जगता येणे अशक्य....
जीवनातील प्रत्येक गोष्टी प्रसन्न होऊन करा.प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.भरभरून आठवणी गोळा करा.सर्वांना प्रेम द्या.आणि स्वतःही स्वतःवर प्रेम करायला शिका....तरच हे जीवन हवेहवसे
वाटेल.
नाहीतर पापण्यांची उघडझाप झाली आणि आणि त्या एका क्षणात पूर्ण आयुष्य सरले
हा फक्त विचार बाकी राहील...........
विचार करा? आणि आजपासूनच सुंदर आयुष्याची सुरुवात करा...
