नासा येवतीकर

Inspirational

0.9  

नासा येवतीकर

Inspirational

परतफेड

परतफेड

5 mins
1.9K


राम आणि श्याम लहानपणापासून एकाच वर्गात शिकत होते. पण राम एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर काम करू लागला तर श्याम मात्र कोणतेही काम न करता वाया गेला. आज खूप दिवसांनी राम आपल्या गावी आला होता आणि श्यामला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. त्याची ती अवस्था पाहून राम खूपच दुःखी झाला होता. घरात तो पलंगावर आडवा पडला होता, त्याला पलंगावरून धड उठता देखील येत नव्हते. त्याला कॅन्सर झाला होता आणि दिवसागणिक त्याची शक्ती कमी कमी होत चालली होती. घरात त्याची बायको आणि दोन लेकरं होती मात्र कोणाच्याही चेहऱ्यावर कसलाही उत्साह दिसत नव्हता. लहानपणी शाळा शिकतांना जसे घर होते आजही तसेच होते. ज्या जागेवर दोघे मिळून खेळले होते, अभ्यास केला होता आणि एकत्र जेवण देखील केले होते ती जागा पाहून राम भूतकाळात गेला. दुसरीच्या वर्गात असतांना घडलेली एक घटना त्याला आठवली. बाई वर्गात आले आणि हजेरी घेतली. रामची हजेरी झाली की श्यामचे नाव येते. त्यादिवशी श्याम शाळेत आला नव्हता. लगेच बाईने रामला श्यामच्या घरी जाऊन बोलावून येण्यास सांगितले. तसा राम त्याच्या घरी गेला. तेंव्हा श्याम आपल्या घरीच खेळत होता. रामला पाहून तो रागात आला आणि तू मला घेऊन जाण्यास का आलास ? म्हणून हातात जे येईल त्याच्याने रामकडे फेकू लागला. तोंडात आले ते अपशब्द बोलू लागला. त्याचे आई-वडील तिथेच होते मात्र त्यांनी त्याला काहीच म्हणत नव्हते. पण राम काही एक न ऐकता त्याला शाळेत घेऊन गेला. शाळेत गेल्यावर बाईने श्यामला शिक्षा केली आणि यानंतर घरी राहिल्यास जास्त मोठी शिक्षा करण्यात येईल अशी तंबी दिली. हे सर्व राममुळे झालं म्हणून त्याच्या मनात रामविषयी कटुता निर्माण झालं. त्यादिवशी पासून श्याम दूर दूर राहू लागला. त्याच्याशी कट्टी केलं. राम मात्र सर्व काही विसरून त्याच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करत असे. राम हा शांत स्वभावाचा, मनमिळाऊ आणि अभ्यासात हुशार होता. त्यामुळे तो बाईचा लाडका विद्यार्थी होता. रामला चांगला धडा शिकवायचं असे श्यामच्या मनात चाललं होतं. तो संधीचं फक्त वाटच पाहत बसला होता. तशी एक संधी त्याला मिळाली. एके दिवशी राम शाळेत आला नव्हता. लगेच बाईने रामला बोलावून आणण्यासाठी श्यामला पाठविले. आज रामला खूप शिक्षा करायला लावू या विचारात तो रामच्या घरी पोहोचला. घराच्या बाहेर कोणीही दिसत नव्हते. त्याने बाहेरूनच राम..... राम .......असा आवाज दिला. त्याच्या आईने " कोण आहे ?" असे म्हटल्यावर श्यामने आपले नाव सांगितले. "श्याम का ये मध्ये." श्याम घरात गेला. घर कसलं ते तर एक झोपडी होती. राम जमिनीवर झोपला होता आणि त्याची आई त्याच्या बाजूला बसली होती. रामला खूप ताप भरलं होतं हे त्याच्या घरी गेल्यावर कळाले. "तो आज शाळेत येऊ शकणार नाही " असे त्याच्या आईने त्याला सांगितले. श्यामच्या मनात वेगळाच विचार होता मात्र आजारी रामला पाहून तो सारे विसरला. लवकर बरा हो आणि शाळेला ये असं बोलून तो परत शाळेला गेला. बाईला खरे कारण सांगितला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. आज शाळेत राम आला नाही तर त्याला देखील करमत नव्हते. राम आठवडाभर शाळेत आलाच नाही. त्याचा आजार काही बरा होत नव्हता. त्याचे वडील तो लहान असतांनाच वारले होते तर त्याची आई मोलमजुरी करून जगत होती त्यामुळे रामला मोठ्या दवाखान्यात दाखविण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा ही नव्हता. श्यामला आता रामची खूपच काळजी वाटू लागली. श्यामचे वडील श्रीमंत नव्हते पण त्यांच्याजवळ बऱ्यापैकी पैसा होता. श्यामने अगदी सहज आपल्या बाबांना म्हणाला, "बाबा तुम्ही रामला मदत करू शकता का ?"

" काय झालं रामला ?"

" तो आजारी आहे, आठ दिवस झाले तो शाळेत आला नाही"

" काय झालंय ?"

" माहीत नाही मला, पण त्याचा ताप उतरत नाही, असे त्याची आई म्हणाली. मोठ्या दवाखान्यात जायला पैसे नाहीत असे ही बोलली"

" असं आहे का ? काय मदत करू मग ...!"

" त्याला मोठ्या दवाखान्यात दाखविण्यासाठी थोडे पैसे द्या ...."

श्यामच्या बाबाला श्यामचे कौतुक वाटले. त्यांनी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी श्यामच्या बाबानी रामला आपल्या गाडीवर बसवून शहरातल्या मोठ्या दवाखान्यात नेले. तेथे सर्व तपासणी झाली आणि डॉक्टरने औषध गोळ्या दिल्या ते घेऊन सायंकाळी घरी आले. त्या औषध गोळ्यामुळे रामची तब्येतीत हळूहळू सुधारणा झाली. तब्बल वीस दिवसांनी तो शाळेत आला होता. तापेमुळे राम खूपच बारीक दिसत होता. मात्र त्यादिवशी दवाखान्यात गेलं नसतं तर कदाचित काही तरी विपरीत घडलं असतं असे डॉक्टरांनी बोलले होते. रामच्या आईने श्याम आणि त्यांच्या वडिलांचे खूप आभार मानले. या घटनेमूळे राम आणि श्यामची मैत्री गाढ झाली. आत्ता राम जास्तीत जास्त वेळ श्यामच्या घरी राहू लागला. राम हुशार होता, त्याच्या संगतीने श्याम मध्ये सुधारणा होईल म्हणून श्यामचे बाबा काही म्हणत नव्हते. रामची अभ्यासातील प्रगती चांगली होती मात्र श्यामची तेवढी नव्हती. शाळेत त्याचे इतर मित्र त्याला वेगवेगळी कामे करायला लावायची. त्यामुळे तो अभ्यासापासून दूर जाऊ लागला. हायस्कुलचे वर्ग शिकण्यासाठी ते दोघे शहरात गेले. श्याम एक खोली घेऊन राहू लागला तर राम हॉस्टेलमध्ये राहू लागला. दोघे एकाच शाळेत आणि एकाच बाकावर बसायचे. श्याम सकाळच्या सत्रात राहायचा आणि दुपारच्या सत्रात गायब राहायचा. रोज दुपारी तो कधी पिक्चर पाहायला जायचा तर कधी गावात फिरत राहायचा. त्याला वाईट मित्रांची संगत लागली होती. त्याचे काही मित्र सिगारेट ओढत होते, तर काही तंबाखू, गुटखा खात होते. अभ्यासात मात्र सारेच शून्य होते. तीन वर्षांच्या काळात श्यामच्या वडिलांनी कधी ही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दहावीचा निकाल लागला आणि श्याम सर्वच विषयात नापास झाला तर राम चांगल्या मार्काने पास झाला होता. राम शिकण्यासाठी तेथेच शहरात राहिला तर श्याम आपल्या गावी परत गेला. गावी गेल्यावर श्यामला दुसरे काही कामच नव्हते. सिगारेट ओढत आणि तंबाखू खात रिकामटेकडा फिरत राहायचा. त्याचे हे व्यसन वाढतच गेले. काही वर्षानंतर त्याचे लग्न झाले. रामला लग्नाची पत्रिका द्यायची होती पण तो सध्या कोठे आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे श्यामच्या लग्नाला त्याचा जिवलग मित्र उपस्थित नव्हता. राम चांगला शिकून पुण्याच्या एका कंपनीत नोकरी करू लागला होता. त्यात त्याला चांगला पगार देखील मिळत होता. तो आणि त्याची आई सुखात होते. स्वतःचे घर झाल्याशिवाय लग्न करायचे नाही म्हणून तो अजून ही लग्न केलेला नव्हता. एके दिवशी सहज फेसबुक चाळत असतांना त्यांच्याच एका मित्राने पोस्ट केली. श्याम कॅन्सरच्या आजाराने त्रस्त आहे, कोणी तरी समोर येऊन मदत करावे. ती पोस्ट वाचल्यापासून राम अस्वस्थ होता. म्हणून त्याला एकदा तरी भेटायला जावं म्हणून आज तो गावी आला होता. त्याची अवस्था खूपच बिकट झाली होती. त्याला पाहवले नाही. लगेच त्याने श्यामच्या बायकोला म्हणाला, "वहिनी, आपण श्यामला घेऊन पुण्याच्या दवाखान्यात जाऊ या."

" पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, दवाखान्यात दाखवायला." 

" तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना ..!"

लगेच सर्वांनी पुण्याला जाण्यास निघाले. पुण्यातील सर्वात मोठ्या कॅन्सरच्या दवाखान्यात श्यामला भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून दहा दिवस दवाखान्यात ठेवण्यास सांगितले. रामच्या आईला ही बातमी कळाली तसं एक दिवस ती देखील श्यामला भेटायला आली. दहा दिवसांनी श्यामच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. दवाखान्यात भरती होतांना श्यामला चालता देखील येत नव्हते मात्र आज तो पलंगावरून स्वतः उठू शकत होता. डॉक्टरांनी दहा दिवसांनी सुट्टी दिली आणि सोबत औषध गोळ्या ही दिल्या. रामने दवाखाण्याचा सर्व खर्च भरला. श्याम कॅन्सरच्या रोगापासून आणि व्यसनापासून देखील मुक्त झाला होता. श्याम मनोमनी रामचे खूप आभार मानले. जेवढे काही शिल्लक जमापुंजी होती ते सारे श्यामच्या उपचारासाठी खर्च केले. पैसे खर्च झाले यापेक्षा जिवलग मित्राला वाचवून उपकाराची परतफेड करता आली त्यातच रामला खूप आनंद झाला होता. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational