प्रियांश...५
प्रियांश...५
आज मनात एक वेगळ्याच विचारांचं काहूर माजलाय, पहाटेचे ५ होत आलेत, पण तरीही मला झोपेन ग्रासल नाही याची खंत मनाला नक्कीच आहे, पण अंधश्रद्धेच जे काळे ढग आजूबाजूला पाहते तर मनात पाल चुकचुकते.
माझी प्रिय आई हल्ली एका वेगळ्या चिंतेने ग्रासली गेलीय, एका झाडाखाली बसणाऱ्या ज्योतिष्याने म्हणे माझी कुंडली पहिली आणि तो म्हणाला, मुलगी फार छान आहे, पण मनासारखा वर भेटत नाहीय, मंगल आहे, मग काय माझ्या बिचार्या आईला बरच काही सांगून त्यांन भीती नक्कीच दाखवली, वरती त्याने तिला आपण नवीन कुंडली काढून पण देतो आणि का देतो यावर पण प्रवचन दिल। मी आणि बाबांना वेळ नाही लागला तिच्या डोक्यातल हे भूत काढायला. जो माणूस स्वतः इतक्या वर्षांपासून हा धंदा करत आहे, एका पोपटाला जवळ घेऊन, पण त्याला स्वतःच भविष्य सांगता नाही आल का? की तो किती वर्ष त्याच झाडाखाली हे काम करणार आहे? आणि किती माणसाना असा खुळ्यात काढणार आहे. असो, मुद्दा हा नाही कि वयाने मोठी माणसेच अशा भूलथाप्पाना बळी पडतात, पण काही माणसे याचा वापर माणसाना घाबरवण्याकरता पण करतात.
माझी एक मैत्रीण, परजातीच्या मुलाच्या प्रेमात पडली होती, दोघे कितपत एकमेकावर प्रेम करत होते हे एक प्रश्न चिन्हच आहे? पण जेव्हा मुलीपासून सुटका हवी म्ह
णून त्याने अतिशय बालिश आणि मूर्खपणाचा कळस गाठला, कुंडली मध्ये थोडा काय मोठाच लोचा आहे, प्रेम करताना तर पहिली नव्हती कुंडली पण लग्न करताना बरोबर कुंडली आली आणि त्याने छान पळवाट पण काढली.
असेच काही किस्से, माझा मित्रांसोबत पण झालेत, त्यातला एक मित्र जो अशा गोष्टींच्या इतका आहारी गेला होता कि त्याच्या प्रत्येक बोटात एक अंगठी असायची, का? तर एक शांती करता, एक गुरु करता, एक शनी करता. हे बाबा लोक समोरच्या माणसाला इतके घाबरवून टाकतात कि त्यांची विचार करण्याची शक्ती क्षीण होते, आणि ते त्यांच्या आहारी पडतात, किंवा मनोबल हरवलेल्या व्यक्तींना आणखीन घाबरवून, ते उपाय पण सांगतात आणि तितकीच मोठी रक्कम उकळतात.
माणूस जेव्हा पहिला श्वास घेतो तेव्हाच त्याच आयुष्य सुरु होत, आणि जेव्हा तो परमेश्वर नावाच्या या शक्ती समोर लीन होतो तेव्हा तो सगळ्या भूल्थाप्पांपासून दूर राहतो. देव आपल्या मनात वास करतो. प्रत्येक श्वासात तो आहे आणि जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने त्याला आपल्या मनात विराजमान करतो तेव्हा अशे हे उपद्रवी, मूर्ख, ढोंगी लोक आपल काहीच बिघडवू शकत नाहीत. कर्म करत राहा आणि वर्तमानात जगा, कोणीही दुसरी व्यक्ती तुमच भविष्य सांगू शकत नाही, ते फक्त तुम्हीच घडवता, तुमच्या हातानी.