Priya Satpute

Inspirational Others

3  

Priya Satpute

Inspirational Others

प्रियांश...४

प्रियांश...४

2 mins
278


माणसाला सुख बोचतं! मग तो पुरुष असो वा बाई हेच खरे! चांगला पार्टनर पदरात पडला असूनही ज्यांना चार कान होतात त्यांचे संसार उघड्यावर पडल्याखेरीज राहत नाहीत. आजकाल लग्न उशिरा होतात आणि अपेक्षांचे ओझे नुकत्याच फुलणाऱ्या नात्याला कोमेजून टाकते. वयाची तिशी ओलांडून लग्न झालेल्या मुलामुलींना एकमेकांना वेळ देणं, अॅडजस्ट होणं गरजेचं आहे हे वेळेत उमगलं तर संसाररुपी रोपट्याला गुलमोहर फुलतो अन्यथा त्याचा विचका व्हायला वेळ लागत नाही.


आधीच्या काळात कोवळ्या अजाणत्या वयात लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या मुली आपसूकच सासरच्या रितीभातींच्या साच्यात ढळल्या जायच्या कारण एका कुंडीतील रोपटं उपटून जबरदस्तीने दुसऱ्या कुंडीत लावले जायचे! तेच आता काळ बदलला आहे, प्रत्येक मुलाचे जसे स्वतंत्र विचार आहेत तसेच मुलींचेही आहेत आणि त्यात वावगं ते काय? पण, हा पण नेहमी कान उपटून उभा ठाकतो! प्रत्येक मुलगा जन्माला आल्यापासून आपल्या आईला पाहात मोठा झालेला असतो, पहाटे उठणारी आई, रांगोळी घालणारी आई, देवापुढे दिवा लावणारे बाबा, भाजीपाला आणणारे बाबा, घरकामाला बाई आणि इतर सुखसुविधा... प्रत्येक घरात थोड्याफार फरकाने हेच प्रकार अस्तित्वात असतात!


पण, वयात येऊनही नोकरीला लागूनही आपण या जबाबदाऱ्या स्वतः किती पार पाडतो? हे प्रत्येक मुलाने स्वतःला एकदा तरी विचारले पाहिजे! वयाची तिशी ओलांडून झाल्यावरदेखील तुम्हाला या जबाबदाऱ्या घ्यायच्या हे माहीत नसते अगदी त्याप्रमाणेच तुमची बायकोदेखील तिच्या घरी तुमच्याप्रमाणे अथवा कमी जास्त लाडाकोडात वाढलेली असते. लग्न झाल्याझाल्या तिने या जबाबदाऱ्या तीन-चार वर्षांत पार पाडाव्यात अशी अपेक्षा करणे अत्यंत चुकीचे आहे! म्हणजे बायको जन्माला येतानाच बॉर्न वाईफ मटेरियल असते असं काही नसतं, तिलाही मन असतं, तिही एकेकाळी तुमच्याप्रमाणेच लहान होती हे विसरून चालणार नाही. तुमच्या आईचा अनुभव ४०-५० वर्षांचा आहे, तुम्ही जन्माला येईपर्यंत आणि जाणते होईपर्यंत तिलाही अनेक अडचणी आल्या असतील.


प्रॉब्लेम हा आहे की त्या काळात त्यांना जे सोसावं लागलं ते त्या कॅरी फॉरवर्ड करून आपल्या आयुष्यातील घटना तुम्हाला सांगताना भावूक होतात आणि पदरात आलेली नवी सून त्यांना अजाणतेपणी टोचायला लागते आणि तिथून संसाराची घडी विस्कळीत व्हायला सुरू होते. खरे सुखी पुरुष तेच जे समन्वय राखतील, योग्य असेल त्याला योग्य बोलतील आणि दोघींचा मान राखतील! हे जर सर्वांना उमगलं तर अर्ध्याहून संसार कोर्टाच्या पायरीवर चढण्याआधीच वाचतील! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational