प्रितफुल प्रित

Classics

5.0  

प्रितफुल प्रित

Classics

प्रीतीचा गुंजारव

प्रीतीचा गुंजारव

6 mins
1.2K


निसर्ग म्हणजे माझ्यासाठी नवचैतन्याचा ओतप्रोत उत्सर्ग, निरपेक्ष प्रेमाची बाराखडी शिकवणारा शिशूवर्ग अन् जगाला बेदखल करून स्वत:त रमण्याचा लागलेला संसर्ग च म्हणा ना !!


कधी पाहिले आहेस निरखून..? खुलत्या उषेचा हात धरुन बागडणा-या, गावठी गुलाबाच्या वेलीच्या फांद्यांच्या कुशीतून अलगद डोकावणा-या, अन् दवबिंदूंचे हिरे मिरवणा-या लालचुटूक कोवळ्या पर्णपात्यांना एकटक्? किती अधीर असतात ती !! नवजीवनाचे सोहळे उपभोगण्यासाठी, बालअवस्थेतून पौंगडावस्थेत येण्यासाठी, स्वतः चे स्वतंत्र हरित अस्तित्व निर्माण करण्यासाठी. जसं नववधूला लगीनघाईमधे लाल शालू नंतर हिरवा शालू नेसून कधी एकदा बोहल्यावर चढतेय असं होतं ना? अगदी तसच. आणि या उलट ती इवली इवली द्वाड गुलाबी कळी; तिला काहीही घाई नसते वयात येण्याची आणि मग पर्यायाने कोमेजण्याची. मस्त बागडते ती वा-याच्या रथावर स्वार होऊन, डुलते वेलीच्या मायाळू हातांच्या कुशीत. स्वतःच्याच बंद मंद सुवासात महकत झुलत असतेे दुनियेची पर्वा ही न करता. पण या तिच्या मगन मनविश्वामधे, स्वत:च्या कौमार्य अवस्थेतून तरुणाई कडे झुकत असलेल्‍या त्या मोहक वाटेवर, तिच्याही नकळत एक इंतजार फुलत चाललेला मला जाणवत असतो; आणि तो असतो सतत गुंजारव करत तिच्या भोवती भुणभुुण करणा-या त्या भ्रमराचा. अशातच एका पहाटे ही कळी स्वतः च्याच तंद्रीत डुलत असतानाच हा कृष्ण सावळा दुडक्या चालीने तिच्या जवळ कधी येतो आणि आपल्या मधूर गुंजारवाच्या बासरी वादनाने या गोपिकेचे चित्त हरण करून तिला हा मोहन आपल्या मोहात कधी पाडतो हे तिचं तिलाच कळत नाही. एक गोंडस निरपेक्ष प्रेमकहाणी इथेच फुलायला लागते अन प्रेमाच्या धुंद गुंजारवात या नाजुक गुलाबकळीची निरागस प्रेमभावना तिच्या मनाच्या आणि पाकळीच्या एक न् एक पापुद्रयागणिक अलगद उलगडू लागते. असेच हा मदनभृंग आणि ही कळी हळुहळु भेेेटू लागतात, एकमेकांवर प्रेमाची पाखरण करू लागतात, स्पर्शांचे मकरंद कळीच्या अंतरंगात जमू लागतात आणि एक दिवस या नाजूक राधिकेचं तारुण्याच्या ऐन भरातल्या परिपक्व राधेमधे, एका मोहक प्रितफुलात परिवर्तन होतं. राधेच्या सहवासासाठी वेडा श्यामभ्रमर तिच्या भोवती सतत पिंगा घालत रहातो अन् ही तशीच वेडी राधा कृष्णमय होऊन प्रेमरंगात डुलत राहते.


ऐकतोस ना रे? या प्रेमजीवांना एकटक न्याहाळताना आपल्या प्रेमाच्या उदयकाळाचे दिवस माझ्या नजरेसमोर तरळायला लागतात एखाद्या चित्रफितीसारखे. तुला आठवतं? तो त्या दिवशीचा एका कातर सांजवेळी गडगडाटाच्या वाजंत्र्यांसह अवचित दिमाखात आलेला उद्दाम पाऊस. माझ्या घरी लवकर जाण्याच्या मनसुब्यांवर नुसतच पाणी नाही तर चिखल पसरवून आता माझ्या सकट स्वतःही थकलेला, माझ्या सोबतच परतीच्या प्रवासाला लागलेला हळूवार निथळता पाऊस. या अचानक छुप्या हल्ल्यामुळे गाफील म्हणून निशस्त्र आणि पर्यायाने ओतप्रोत निथळती मी; एका तशाच निथळत्या बसथांब्याचा एक कोपरा गाठून स्वतः ला गोऴा करुन उभी असलेली व बोच-या वा-याने माझ्याच अंगावर बस्तान बसवल्यामुऴे थंडीने थरथरती कावरी बावरी मी. अन् त्याच निथळत्या बसथांब्याच्या दुस-या कोप-यात आधीच आपले बस्तान बसवून असलेला निथळता तू. स्वत:ला सावरण्याचा, अंगावरच्या धारा झटकून टाकण्याचा निष्फळ प्रयत्‍न करत असतानाच अचानक तू समोर दिसतोस, तशी नजर तुझ्यावर येऊन खिळते अन् लक्षात येते की मी ह्या आस-याला येण्यापासूनची माझी ही सगळी केविलवाणी धडपड तू मिश्कल हसत अगदी तुझ्या ही नकळत, नजरेत टिपून घेत आहेस; आणि मी गांगरतेच एकदम. लाजेने चूर माझी मान जी खाली जाते ती बराच वेळ वर येतच नाही. मग रस्त्यावर वाजलेल्या एका कर्कश हाॅर्न ने मी भानावर येते आणि मग माझी व्यर्थ लगबग सुरू होते स्वतः ला सावरायची, माझा ओलेता देह जमेल तेेेेवढा त्या पारदर्शक ओढणी मागे झाकायची. जरा स्थिरस्थावर झाले की हातातल्या एकुलत्या एका कंगनला उगाचच कुरवाळत मी माझी नजर तुझ्यावर स्थिरावते तर तू अजूनही तसाच स्टॅचू दिल्यासारखा मला न्याहाळत उभा. माझी नजरानजर होते आणि अचानक तू भानावर येतोस. उंचा पूरा, गोरा पान, सुदृढ बांध्याचा तू. तसा तूही आकर्षक वाटलास जेव्हा तुझी कमावलेली पिळदार देहयष्टी त्या आधीच घट्ट आणि आता पुरता चिकटलेल्या शर्ट मधे अधिकच उठून दिसली होती. असेच काही एकमेकांना सावध करणारे क्षण निसटत असतानाच तुझी समाधी भंग पावते अन् तुझी धीट पावले हळुहळु माझ्या दिशेने पडू लागतात. इतका वेळ स्तब्ध असलेली मी आता मात्र पूरती घाबरते. आतापर्यंत माणसांच्या, वहानांच्या ओल्या गर्दीचे अन् धावपळीचे ओझे वाहणारा रस्ता आता अचानक निर्मनुष्यतेचं पांघरूण ओढून गपगुमान निपचीत पडलेला असतो. ते बघून अजुनच चपापलेली माझी नजर मान वळवून तुझ्यावर स्थिर होईपर्यंत तू माझ्या निकट पोचलेला असतोस. आता मात्र भितीने पुरती गलितगात्र झालेली मी, सगळं उरलंसुरलं अवसान गुंडााळून पलायनाच्या दिशेने कूच करणार तेवढ्यात तुझा धिरगंभीर सूर कानावर पडतो, "अहो मिस्, जरा थांबा थोडं"!! मी वळून मागे पाहते खरी, पण तनामनावरचा भितीचा अंमल काही कमी होत नव्हता. काही ही न बोलता थोडी मागे सरकून उभी राहिले मी, आता पुढेे काय घडतयं या विवंचनेत. ह्या माझ्या लाचार परिस्थितीचा तू गैरफायदा तर घेणार नाहीस ना? खुलत्या कळीला फुलायच्या आधीच खुडून कुस्करणार नाहीस ना? ह्या अग्नीदिव्यातून माझी सुटका कोण अन् कशी करेल? अश्या शंभर विचारांचा अजून एक पाऊस डोक्यात कोसळायला सुरूवात झाली होती. पण त्याला मधेच खिळ बसली तुझ्या बोलण्याने. "कुठे रहाता तुम्ही? आत्ता ह्या क्षणी तुम्हाला कोणतही वाहन मिळण्याची सुतराम शक्यता नाही. ह्या निर्जन स्थळी असे एकटेच उभे रहाणॆॆ धोक्याचे आहे. त्यापेक्षा चला माझ्या सोबत. मी तुम्हाला सोडतो तुमच्या घरी". आता मात्र माझ्या बुद्धीची कसौटी लागणार होती. काय करावं? ह्या अपरिचितावर ज्याला मी आत्तापर्यंत कधी भेटलेच काय पाहिलंं ही नाही; त्यावर विश्वास ठेवून त्याच्या सोबत जावं? की एखादा चमत्कार होऊन पाऊस थांबण्याची वाट पहावी? आता मात्र परस्परविरोधी विचार डोक्यात कबड्डी खेळायला लागले होते पण उत्तराचा डाव काही केल्या हाताला लागत नव्हता. आणि या सगळ्यात दोघांचे भांडण तिस-याचा लाभ या म्हणीला साजेसं उदाहरण म्हणू की कसं? पावसाने परत जोर वाढवत थैमान घालायला सुरूवात केली होती.


आता बहुतेक तुझ्या सहनशक्तीने माझ्या उत्तराची वाट पहाण्याची परिसीमा गाठली असणार. तुझा परत आवाज आला, "हे पहा, आपण एकमेकांना अपरिचित असलो तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता; किंबहूना तुमच्याकडे दूसरा पर्यायही नाही. मी तुम्हाला कोणती ही इजा करणार नाही. चला तुम्ही माझ्या बरोबर, रात्र पण बरीच झाली आहे, आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही". आणि इतके बोलून माझ्या उत्तराची अपेक्षाही न करता मला तुझ्या सोबत गृहीत धरून तू एकटाच रस्त्यालाही लागलास.  


आता खरोखर हा निर्जन आसमंत आणि विद्युल्लतांना अंगावर मिरवत कोसळणारा मगरूर पाऊस एका हिंस्त्र श्वापदासारखा अंगावर धावून येत होता. आणि अचानक मला जाणिव झाली की हे सगळं तुझ्यावर अविश्वास दाखवण्यापेक्षाही भयानक आहे. त्या क्षणी पटकन मी तुझ्याकडे पाहिलं तर तू समोर नव्हतास. भितीने काळजात चर्र झालं अन् शोधक नजर लगेच रस्त्याला लागली तर तू हाकेच्या अंतरावर पोचला देखील होतास. सगळं हळूच एकवटून तुला हाक मारली, "अहो, जरा थांबा ना!! येतेय मी पण". अन् धावतच तुझ्यापर्यंत पोचले देखील. काय सांगू तुम्हाला, एखादा किल्ला सर केल्याचा आनंद माझ्या चेह-यावर ओसंडून वहात होता. नकळत तुझ्याकडे लक्ष गेलं तर खट्याळ तू, हे माझ्या चेह-यावरचे निरागस भाबङे भावही त्याच मघाच्या मिश्कील नजरेने गालातल्या गालात हसतच टिपून घेत होतास. खरं सांगते, उभ्या आयुष्यात जाणवला नसेल एवढा लाजेचा ताटवा त्या क्षणी माझ्या चेह-यावर फुलला होता. 


त्यानंतरच्या एकत्र प्रवासात प्राथमिक चौकश्यांची, विचारांची औपचारिक देवाणघेवाण होत होतीच, मधेच नजरांचा लपंडावही सुरू होता, गालावरची खळी अवचित आलेल्या हास्याने भरत होती. पण खरं सांगू का? हळुहळु तशीच एक गुलाब कळी नकळत माझ्या मनाच्या वेलीवरही उमलू लागली होती, तुझ्या मधाळ बोलण्याने ती खुुुलू लागली होती. तू अगदी घरापर्यंत सोडलस मला पण तूझी पाठ फिरल्यावरही ही कळी तुझ्या मधाळ बोलांच्या गुंजारवात मग्न होती. तुझ्या विचारांच्या झंझावातात ही झूलत होती आणि तूझ्यातही एका भ्रमराचा आवास तिला स्पष्टपणे दिसायला आणि जाणवायलाही लागला होता. तुलाही मागे फिरवत नव्हतं. माझ्या कडे तू ही अजाणतेपणे आकर्षित होऊ लागला होतास. माझ्या सहवासाचा नाद तुलाही लागला होता; हे तुझ्या मनातली घालमेल आणि पावलांची चुळबुळ विनासायास दर्शवत होते.


परतीच्या नकोशा क्षणी तेवढ्यातच ओल्या हातांवर फोन नंबरची देवाणघेवाण करताना दोघांनाही त्यांच्या निरागस वेडेपणा वर हसू आवरेना. आता ती राधा वेलीच्या प्रेमळ कुशीत कृष्णसावळ्या भ्रमराला मनाच्या पाकळ्यांमधे बंद करून शांत निद्राधीन झाली खरी; पण तुझ्या मनातला भ्रमर अजूनही राधेच्याच विचारांभवती रुंजी घालत होता. 


आज तश्याच एका धुंद सायंकाळी, आपल्या लाडक्या मिलनस्थळी म्हणजे सागरकिनारी आपण वाळूत पहूडलो आहोत. स्वतः बरोबर दिवसालाही मावळतीला झुकवणा-या रवीच्या साक्षीने अन् या गोजी-या लाटांच्या मधुर मैफिलीवर एकमेकांच्या उबदार बाहुपाशांत रममाण तू आणि मी झुलत आहोत. परत त्या ओल्या आठवणींमधे चिंब भिजत आहोत अन् त्या अविस्मरणीय पार्श्वभूमीला लपेटून एकमेकांच्या प्रेमवर्षावात वाहून जात आहोत, त्याच कळीला अन् भ्रमराला स्वतःमधे जागे करत त्यांच्या रासरंगात मशगूल....



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics