प्रितफुल प्रित

Others

4.3  

प्रितफुल प्रित

Others

स्त्री

स्त्री

6 mins
559


स्त्री ही अत्यल्पकालीन पत्नी आणि अनंतकालीन माता असते....ब-याच वेळा हे वाक्य ऐकलं, वाचलं....पण आज जेव्हा हे वाक्य पुनश्च वाचनात आलं; तेव्हा मात्र अचानकच मन त्या अनुषंगाने विचार करू लागलं. त्या अस्वस्थतेमुळे स्वतःच्याही नकळत हातात पेन आणि पॅड आलं. मनातल्या कल्पनाचित्राची रांगोळी कागदावर झरझरू लागली. जसं जसं लेखणीला विचारांची जोड मिळाली; तसं तसं या अतिशय गहन अर्थ भरलेल्या वाक्यामागची मूळ संकल्पना अधिकाधिक सुस्पष्ट होत गेली.... 


घरात सगळीकडे मंगलमय वातावरण....सनईचौघडे वाजत आहेत...आनंदमय सहजीवनाच्या प्रवासासाठी निघालेले नवपरिणित जोडपे दरवाजात तिष्ठत उभे.... शेवटी एकदाची घटिका भरते...अन् साजश्रुंगार ल्यायलेली नववधू उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडून गृहप्रवेश करते....जमिनीवर काढलेल्या लक्ष्मीच्या पावलांवरून चालत आत येताना सोबतच आणलेल्या ऐश्वर्याची म्हणजेच भरभराट, सुबत्ता, सुख, आनंद, शांती, समाधान इत्यादींची ती घरात उधळण करते; म्हणून तिला खऱ्या अर्थाने "गृहलक्ष्मी" म्हणत असावेत...जुन्या मुरलेल्या लोणच्यातील कैरीच्या फोडीसारखी ती माहेरपणात मुरलेली असते आणि आता नुकत्याच चिरलेल्या कैरीच्या करकरीत फोडीसारखा तिचा एका नवीन लोणच्याच्या बरणीत म्हणजे एका नव्या कुटुंबात एकरुप होण्याच्या दृष्टीने प्रवास सुरू होतो.... बहुतेक तेव्हाच अचानक कधीतरी मातृत्वाच्या वाटेवर तिचे पहिले पाऊल पडलेले असते....


   जणू काही लग्नात हाताला बांधलेल्या कांकणासोबतच तिचे सारे जीवन तिच्या नव-याच्या जीवनाशी जोडले जाते...आता तो, त्याचं कुटुंब आणि त्यांचे वैवाहीक जीवन हेच तिचं सर्वस्व असतं. आपल्या पतीविषयीच्या माफक अपेक्षांचं रुखवत, जे तिने तिच्या मनात अगोदरच मांडलेलं असतं; त्याचा पेटारा ती यथावकाश तिच्या या नवीन घरात त्याच्या समोर रिता करत असते...पहिले मिलन, पहिली रात्र हा एक गोजिरा सोहळाच असतो....एक पुरूष आणि एक स्त्री दोघेजण ज्या लग्नसंस्थेत "पती-पत्नी" या नात्याने म्हणून बांधले गेलेले असतात, त्या नात्याला परिपूर्णता आणण्याचा एक पावन विधी म्हणजे त्यांचे "शरिरमिलन"....मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक....पण पत्नीसाठी हा खरं तर एक अतिशय पवित्र "यज्ञकर्म" असंच म्हणता येईल. कारण या यज्ञात पत्नी आपल्या सर्वस्वाचंच जणू अर्ध्य देेेेते; त्याच्याशी तना-मनाने तादात्म्य पावते....एक पुरूष व स्त्री म्हणून या दोघांचे या मिलनाबाबतचे दृष्टिकोन, शारिरीक मानसिक अपेक्षा, समाधानाच्या/तृप्ततेच्या व्याख्या काही अंशी वेगवेगळ्या असतात. पण तीचा कल हा त्याची तृप्तता होण्याकडेच जास्त असतो आणि हेच तिच्यातील अंगभूत सुप्त मातृत्वाचे परिमाण आहे. "सर्वार्थाने समर्पण" या संज्ञेची यापेक्षा अचूक व्याख्या दुसरी कोणती असू शकते? अशाप्रकारे स्वत्वाची पुर्णाहुती देऊन तयार झालेलं हे अद्वैत नातं दोघांना दृढार्थाने पती-पत्नी बनवतं.... 


   खरंतर हे पहिले मिलन, पहिले समर्पणच फक्त ती एक परिपूर्ण स्त्री, सहचारिणी, अभिसारिका म्हणून जगते.... पण ही मिलनरात अलगद सरते अन उगवतीचं स्वागत करत करत, जेव्हा ती त्या शामियान्यातून बाहेर येते. तेव्हा ती फक्त पत्नी राहिलेली नसते. "मंगळसूत्र" या दागिन्यासोबत अनेक कर्तव्य, जबाबदाऱ्या माळून आलेल्या असतात....पण थोड्या वेगळ्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास; त्याच्या दोन वाट्या म्हणजे एक "पत्नीरूप" आणि दुसरे "मातृरूप" असे मला प्रकर्षाने वाटते. त्यातला सोन्याचा प्रत्येक मणी म्हणजे एक-एक कर्तव्य असतं आणि असंख्य काळे मणी म्हणजे त्याच्यासोबत अध्याहृतपणे आलेल्या अगणित जबाबदाऱ्या....ते मंगळसूत्र नाही तर अवजड शिवधनुष्य असते; जे तिला तिच्या अंतापर्यंत पेलावं लागतं आणि म्हणूनच ते पेलण्यासाठी तिला फक्त पत्नी असून चालत नाही. तर चिरकालीन आई बनावं लागतं...

 संपूर्ण वैश्विक शक्ती "आई" या शब्दाभोवती फिरते...हे मातृत्व या पत्नीच्या प्रत्येक कृतीतून, बोलण्यातून, रुसव्या-फुगव्यांतून आणि ब-याच वेळा मौनातूनही व्यक्त होत राहतं.... 


सुरुवातीचा सहजीवनाचा काळ एकमेकांना समजून घेण्यात जातो...नवचैतन्याचा काळ असतो तो....पण कालांतराने ती या संसारीक जीवनाच्या मैदानात आपले पाय घट्ट रोवून उभी राहते...पुढच्या आव्हानांना, जबाबदा-यांना खंबीरपणे तोंड देण्यासाठी...पत्नीला मिळालेलं हे हक्काचं मातृत्व तिला शेवटपर्यंत अबाधितच ठेवावसं वाटतं; अन् ती तिच्या कृतीतून ते वेळोवेळी ते सिद्ध करत असते. आत्तापर्यंत, सकाळ झाली की "आई, अगं झाला का डबा तयार?......किती वेळ ? .....माझा रुमाल?..... मोजे कुठे ठेवले आहेस ? कितीदा सांगितले, माझं कपाट नको आवरू म्हणून ..... उशीर होईल ऑफिसला अशाने !" असे वाक्बाण सुरू व्हायचे अन् त्याला तोंड देताना आईची भंबेरी उडायची. पण तेच आता "अगं बायको, ऐकलंस का ? डबा देतेस का लवकर प्लीज ? माझे मोजे, रुमाल सापडत नाहीयेत. गाडीची चावी कुठे पडली माहित नाही. येतेस का जरा इकडे ?" अशी आर्जवे ऐकायला मिळतात आणि ती बिचारी..... मग ती नोकरदार महिला असो किंवा गृहिणी, अगदी तारेवरची कसरत करत त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करते..स्वत:चा डबा पर्समध्ये ठेवतानाही त्याने डबा विसरू नये म्हणून त्याचा डबाही त्याच्या बॅगेत भरते. एवढेच नाही, तर तो कितीही वैतागला तरी जेवणाच्या वेळेला त्याला फोन करून "भाजी आवडली ना?" हेही आवर्जून विचारते...या सगळ्याचा आढावा घ्यायचा झाला तर त्याच्यासाठी फक्त माणूस बदललेलं असतं; पण ती तिच्या वागण्यातून हा मातृत्वाचा वसा आणि वारसा कायम ठेवते....


रात्र झालेली....ती नुकतंच सर्व आवरून दिवाणखान्यातल्या सोफ्यावर स्थिरावलेली...समोर टिव्हीवर तिची आवडती मालिका सुरू आहे..नवरेसाहेब शयनकक्षात...नेहमीप्रमाणेच त्यांची नजर आजही टेबलावर ठेवलेल्या लॅपटाॅपमधील क्लिष्ट रिपोर्टच्या आकड्यांवर खिळलेली...अन् अचानक "आई गं !!" असा आवाज येतो..ती लगोलग आवाजाच्या दिशेने धावत येते. बघते तर काय, बेडरूममधील टेबलाजवळच्या खुर्चीत नवरेमहाशय पाय चोळत बसलेले....चेह-यावर वेदनांचे अनेक ढग जमा...त्याचा तो स्थितप्रज्ञ अवतार पाहून एव्हाना तिच्या लक्षात आलेले असते की, सध्या ऑफीसमध्ये कामाचं खूप प्रेशर आहे. त्यामुळे घरी येऊन देखील पुन्हा काम करावे लागत आहे; त्यामुळे तो आधीच त्रस्त आणि वैतागलेला आहे...त्याच विचारांत मग्न असलेला तो उठबस करतानाच त्याचा पाय टेबलाच्या काठांवर आपटला असावा....पायापासून मस्तकात गेलेल्या वेदनांनी बेजार असतानाही त्याच्या व्यक्ततेवर ताबा मिळवला असावा; त्यामुळेच लागल्याच्या कळीसरशी अचानक कंठातून आलेल्या "आई गं !!" या उच्चारांखेरीज तो आता काहीही बोलू शकणार नाही; हे ती ताडते...आता तिच्यातल्या मातृत्वाला करूणेचा अंकुर फुटतो.. ती हळूच आत जाते.."बघून चाल नं रे जरा, असा कसा धडपडलास ?" असे निरर्थक प्रश्न ती त्याला अजिबात विचारत बसत नाही...त्याच्या जवळ जाते अन् अलगद त्याला आपल्या कवेत घेते. तो लहान मुलासारखा रडत रडत धावत येेेऊन तिला बिलगणार नाहीच....पण कदाचित त्याची मनोवस्था ढासळलेली असेल....काही व्यक्त करण्याचे त्याच्यात त्राणही नसतील...तरी तो या अवस्थेतही सहनशील असल्याचा आव आणेल...खरं तर मनमोकळं रडणं हे मनातल्या दु:खाचा, ताणाचा कचरा साफ करण्याचं प्रभावी साधन आहे पण का कोण जाणे, पुरूष मंडळी ह्या साधनाचा अभावानेच वापर करतात.... कदाचित त्यांचं "पुरुष" असणं त्यांना रडू देत नसावं...तर, त्याचं मन तिला लहान मूल जसं आईला धावत येऊन बिलगतं तसं बिलगायला आतूर असेल पण तरीही तो खंबीरतेचा आव आणेल...पण तिला काही धीर धरवणार नाही... ती त्याच्या जवळ येण्याची वाट पाहत बसणार नाही; आपला व्यर्थ अहंकार कुरवाळत बसणार नाही.... अगदी शांतपणे जवळ जाऊन त्याला आपल्या मिठीत सामावून घेईल....या घटकेला त्या मिठीत त्याला प्रणयभावना उद्यपित करणारी जवळीक कदापिही जाणवणार नाही ..... तर तिच्या पदरात त्याला त्याच्या आईने त्याच्यासाठी तिच्या साडीच्या शिवलेल्या मऊसर गोधडीची उब जाणवेल..अगदी जणू काही तो बाल्यावस्थेतील त्रिमूर्ती आहे आणि ती सती अनुसूयाच जणू; ..तसंच ते दृृृश्य असावे..... ती जसं जसं त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहते. तसं तसं त्याची सर्व दुःख, विवंचना त्या प्रत्येक स्पर्शागणिक गळून पडत असलेली त्याला जाणवतील....


ती त्याच्या केसातून हात फिरवेल तेव्हा त्याला रणरणत्या उन्हात अचानक बरसलेल्या श्रावणसरीसारखं वाटेेल आणि हळुहळु साऱ्याचा त्याला विसर पडेल... पाळण्यात शांतपणे विसावलेल्या बाळकृष्णासारखा तो तिच्या कुशीच्या पाळण्यात शांतपणे झोपी जाईल....


अहो, या नवरोबांची बढती काय उगीचचं होत असते का ? त्यासाठी परिक्षा द्याव्या लागतात. तो बिचारा रात्र-रात्र जागून अभ्यास करत राहतो...मग ती पण...... बिचारीच की ! ...का काय विचारताय ? अहो तीही त्याच्या सोबतीने जागत बसते ना ! गरम दूध, कॉफी अशी सरबराई मग सतत चालू राहते... एवढेच नाही, तर कधी महाशय आजारी पडले तर बॉसची नाराजी पत्करून का होईना; ती सुट्टी घेईल आणि त्याच्या उशाशी तासन-तास बसून राहील, हवं नको ते पहात राहील. गार पाण्याच्या घड्यांचे थरावर थर पडतील कपाळावर, पेज म्हणू नका, फळं म्हणू नका; एकदम कडक बडदास्त ठेवली जाईल... शेवटी तोच वैतागून उपहासाने म्हणेल, "अगं बाई, आता पुरे कर नाहीतर मी बरा होईन; पण तू आजारी पडशील आणि मग तुझी अशीच बडदास्त ठेवायची जबाबदारी माझ्यावर पडेल"....मग बघा, कशी खुदकन् हसेल ती.....आईची अपरंपार माया कशी पत्नीच्या प्रत्येक कृतीतून ओसंडते पहाताय ना !!....खात्री पटली नं आता ? की अजून पुरावे देऊ ?...... 


वाचक हो, "स्त्री ही अत्यल्पकालीन पत्नी आणि अनंतकालीन माता असते" हे विधान आणि त्यांना पटवून देण्यासाठी ज्यांचा आधार घेतला ते प्रसंग, हे थोड्या-फार फरकाने अगदी बहुतांशी घरांत घडून येणारे आहेत किंवा बायकोकडून असलेल्या अव्यक्त किमान अपेक्षांच्या यादीत बसणारे तर नक्कीच आहेत....मी काही फार जगावेगळं सांगत नाहीये...पण एक गोष्ट नक्कीच प्रशंसनीय आहे; आणि ती म्हणजे पत्नीची या बाबतीतली निरागसता..... कारण ब-याच अंशी आपण पत्नीत्वासोबतच मातृत्वाचेही आंतरिकीकरण केलेले आहे; या भावनेविषयी ती पुरती अनभिज्ञ असते..तीच्या वैवाहीक जीवनाचा संपूर्ण जीवनालेख जर पाहिला अन् त्यातील घटनांचे जर मोजमाप केले तर मातृत्वाचेच पारडे जड होईल... सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तिला कोणताही आव आणावा लागत नाही किंवा ते शिकण्यासाठी विशेष कार्यशाळेचीही तिला गरज नसते.


थोडक्यात काय, तर "स्त्री" म्हणजे त्या विश्वनियंत्याच्या "सृष्टी" नामक प्रयोगशाळेतील एक "सर्वात अद्भुत निर्मिती" आहे....आणि तिच्या अद्वैत पत्नीस्वरूपात घडवलेले हे "अदृष्यदशेतील मातृत्व" म्हणजे त्या विधात्याचा एक "अद्भुत आविष्कार" आहे...


Rate this content
Log in