मला दिसलेले - पाहिले न मी तुला गीत
मला दिसलेले - पाहिले न मी तुला गीत


सुस्तावलेली पावसाळी संध्याकाळ आसमंतात हळुहळु स्थिरावत आहे, हातात काॅफीचा वाफाळता मग आहे, नजर खिडकीतून बाहेरील विस्तीर्ण आकाशाच्या अंतर्मनात रुतलेली आहे, मनाच्या हिरवाईला विचारांच्या मंद लहरी हलकेच स्पर्शून जात आहेत अन् कानात तोच मंजूळ पण शब्दांशब्दांत आत्मविश्वास पेरलेला आवाज सतत रुंजी घालत आहे, "गुड इविनींग, नमस्ते मुंबईकर, मी तुमचीच लाडकी ....." आह, काय गोड आवाज आहॆ, एक एक स्वर अगदी मधातून बुडवून काढल्यासारखा अन् आवाज, सा-या जगाला गवसणी घालण्याची तयारी असलेला. एफ् एम् मराठीवरील त्या दैनंदीन कार्यक्रमात जेव्हा पासून तुला ऐकलय, सतत ह्याच आवाजाची कानात पेरण होतेय अन् मन तर सारखं तुझ्याच विचारांत गुंग आहे. कधीही न पाहिलेल्या तुझं, मनाच्या को-या कागदावर, कल्पनेच्या सुबक कुंचल्याने चित्र रेखाटणे सुरू आहे. आवाजातच ऐवढा गोडवा, तर दिसायला, वागायला ही तितकीच गोड (सुंदर) असशील का तू? स्वभावात ही एवढच माधुर्य असेल की कसे? नुसतेच तर्क वितर्कांचे घोडे पुढे दामटवायचे, एवढच.
अरे, विचारांच्या ह्या धुमश्चक्रीत ती कधी आली, हे कळलं देखील नाही. तिची ती प्रेमळ हाक कानावर आली अन् झोपेतून खाडकन् जाग आल्यासारखा मी अक्षरश: माझे पंचप्राण त्या आवाजाकडे केंद्रीत करुन स्वत:ला सावरुन बसलोय. आज बहुतेक रेडीओ पण माझ्या भावनांशी, विचारांशी एकरुप झालाय असं वाटायला लागलय आता मला, कारण
पाहिले न मी तुला, तूू मला न पाहिले,
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले.
हे "गुपचुप गुपचुप" या रंजना, कुलदीप पवार, महेश कोठारे इ. अप्रतिम दिग्गज कलावंत असलेल्या चित्रपटातील सुमधूर गाणे कानावर पडायला लागलय.
आधीच संगीताचा भोक्ता मी, त्यात सुरेश वाडकरांसारख्या दिग्गज गायकाचा लहानपणापासूनच खूप मोठा फॅन. सुमधूर आवाज, लाघवी गळ्याची दैवी देणगी, प्रत्येक गाण्याला अगदी आर्ततेेेेने आळवण्याची त्यांची गायनशैली. त्यांच्या गाण्यांनी कुणाला वेड लावलं नाही, अशी माणसे विरळच. अन् शांताराम नांदगावकर, सहजसुंदर शब्दांची गुंफण असणा-या आणि मनाचा ठाव घेणा-या, श्रोत्यांच्या ओठांवर खेळतील अशा एकाहून एक सुंदर गीतांची मेजवानी मराठी चित्रपटसृष्टी ला देणारे जेष्ठ गीतकार. अनिल-अरुण या द्वयीने तर मराठी भावगीत पाश्चात्य वाद्यांनी कुशल वाद्यवृंदाच्या ताफ्यात सजवले. या गीतातील नायक, कुलदीप पवार यांनी स्वत:ची तगड्या खलनायकाच्या इमेजला तडा देत नायकाची भुमिका ही तोडीस तोड निभावली. अन् रंजना ची तर बातच न्यारी. स्वर्गलोकीची अप्सराच जणू पृथ्वीतलावर अवतरली आहे, असा भास हे गीत पाहताना क्षणोक्षणी होत राहतो.
पाहिले न मी तुला, तूू मला न पाहिले,
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले.
खरंच, किती निरागस भावना आहे ना ही? एकमेकांना प्रत्यक्षात न पाहता देखील नुसत्या तुझ्या आवाजाच्या संमोहनी गोडव्याने मी मनापासून तुझ्याकडे आकर्षित झालोय. अन् आता नेमकं हे गाणं लागलय, तर मला त्यातल्या प्रत्येक भावनेचं, व तिला समर्पक शब्दांत गुंफून बनलेल्या प्रत्येक वाक्याचं, माझ्या भावनांशी, विचारांशी साधर्म्य वाटायला लागलय. मी या गाण्यातल्या पात्रांमधे आपल्या दोघांना पहायला लागलो आहे. वास्तवात कशी असशील तू? कशी दिसतेस? बकुळीच्या अन् प्राजक्ताच्या फुलासारखी अलवार निशब्द, की अगदी ते ओघळले तर त्याला स्वतःला ही त्याचा आवाज ऐकू येणार नाही, की उन्हात मधेच अवचित येऊन, कुणाची ही भीड, तमा न बाळगता घनघोर कोसळणा-या उश्रृृंखल
श्रावणसरीसारखी, अविरत बडबडणारी ? विराट धीरगंभीर सागरकिना-यासारखी शांत, की रूद्रावतारी अग्नीसारखी, धुमसण्यास सदैव तयार असलेली? सांग ना गं? कशी आहेस तू खरोखरीची? माझ्या उत्सुकतेचा स्फोट होण्याआधी प्लीज सांगशील? पण तू कशीही अस, मी दिवसेंदिवस तुझ्यात गुंतत चाललोय अन् तुला याची यत्किंचितही कल्पना नाही, ही कल्पना ही मला तितकीच सुखावून जाते.
हिमवर्षावात ही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
दरवळले हीम तुषार, गालावर थांबले,
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले.
अगं वेडे, दिवसा, रात्री, स्वप्नांत अन् जागेपणी देखील सतत तुझाच विचार, तुझाच बोलका चेहरा डोळ्यांसमोर असतो. मनाच्या विमानाला सुंदर कल्पनांचे सप्तरंगी पंख लावून अन् त्यात तुला बसवून आपण जगाच्या पाठीवर कुठेही कधीही जाऊ शकतो. गीतातल्या ह्या ओळींप्रमाणे कल्पना कर, आपल्याच नादात स्वच्छंदी विहरणारे आपण येऊन पोचलो आहोत एका बर्फाने पूर्ण आच्छादलेल्या सुंदर पठारावर. केसरगुलाबी शालू ल्यायलेली मोहक संध्याकाळ हळुहळु आपला जम सर्वत्र पसरवत आहे.
परतीच्या वाटेकडे लागलेले पक्षी अन् पांथस्थ ही काही क्षण उगाचच तिच्या सानिध्यात रेंगाळत आहेत. तसच तुला ही ह्या मनोरम निसर्गाशी सलगी करायचा मोह आवरला नाही अन् तू या बर्फाच्याा शामियानावरच आपलं बस्तान बसवलस व स्वत:च्याच तंद्रीत रममाण होत, त्याच्या श्वेत रंगाशी कमालीचे साधर्म्य असलेल्या आपल्या गो-यापान निमुळत्या बोटांनी त्याला चुचकारत, त्याच्याशी खेळत राहिलीस. तुझ्या ह्या अश्या लागलेल्या समाधीला भंग करायचा मोह निसर्गालाही आवरला नाही बहुतेक. अगं, हे गं काय? अचानक हिमवर्षाव सुरू झाला की? असं वाटतय, आकाशीच्या म्हातारीने वाती करण्यासाठी कापूस पिंजायला घेतला आहे, अन् त्यातील काही कापूस तिच्याशी बंड करून धरतीला भेटायला येतोय, पण एकटा नाही हं. सोबत नवरत्नांसम दिसणा-या तारकांंचा लवाजमा ही आहे. जणू कृष्णसावळा अन् गोपिका धरतीवरील रासझुल्यावर झुलण्यासाठी येत आहेत. वाह, त्यातील काही खट्याळ तारका खेळता खेळता तुझी खोडी काढण्यासाठी म्हणून तुला येऊन बिलगल्या. काही जणी तुला गुदगुल्या करू लागल्या मात्र, तुझ्या शुभ्र संगमरवरी कायेवरून घरंगळूून त्या बर्फातच पडल्या. तशी तू खुदकन् हसलीस बरं का. मग काय, स्वत:च्या ह्या फजितीने त्या भलत्याच ओशाळल्या अन् लाजेने चूर होऊन तुझ्या मागे जाऊन लपल्या. या दरम्यान काही लबाड हिमतुषारांनी तुझ्या घनदाट केशसंभारावरही एकत्रीतपणे आपला जम बसवला होता. असं वाटत होतं की जाईजुईमोग-याचा सुवासिक ताटवाच केसांत दरवळत आहे. पण या तारकांच्या धावपळीत त्यांचा धक्का लागून तुझ्या डोक्यावरचे काही तुषार घसरून तुझ्या गालांवर पडलेत अन् त्या गोड खळीत जाऊन मस्त विसावले आहेत. आहाहा, काय नयनरम्य दृष्य आहे हे ! असं वाटतय तुझ्या परिसस्पर्शाने तुषारांचे हिरे होऊन तेच गालावर चमकत आहेत, त्यांच्या झळाळीने माझे डोळे दिपले आहेत अन् जीव वेडावला आहे...कधीचाच.
मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला, आरशात ज्या क्षणी
रुप देखणे बघून, नयन हे सुखावले,
ना कळे कधी कुुुुठे, मन वेडे गुंतले
हिमवर्षावाने भलताच जोर धरलाय आता अन् साठलेल्या बर्फाच्या राशींवरून विहरणे आपल्याला अशक्य होतय. कुठे तरी आडोसा शोधावा या विचारात, एकमेकांचे हात हातात गुंफून, एकमेकांना सावरत, चालत चालत आपण माझ्या घरी कधी आलो, कळले देखील नाही. सखे, मी आधीच तुला सांगितले आहे, तू सोबत असताना माझ्या कल्पनाशक्तीला कसे पंख फुटतात ते. अगं, तुझ्या विचारांत रात्र रात्र मला झोप लागत नाही. आपल्या सहवासाची सुंदर, मधाळ स्वप्ने मी दिवसा तसेच रात्रीच्या जागेपणी देखील पहात असतो. विचारांमधे तर तू सगळीकडेच व्यापून असतेस. पण वास्तव जगतातले तुझे नसणे खूप सलते अगं. झोपलो तरी मऊशार पलंगावर नाही तर काट्यांच्या शय्येवर झोपल्याचा क्लेशदायक अनुभव येतो. मग मनात उदासीनता भरून खडबडून मी जागा होतो न होतो, तर समोरच्या आरशात तू दिसतेस. नववधूच्या पेहरावात नखशिखांत नटलेली. नखशिखांत गोरापान स्पटिकरूपी देह, त्याला लपेटलेली पिवळीजर्द नऊवारी पैठणी, हिरव्याकंच चुड्याने दोन्ही हात भरलेले, गळ्यात कोल्हापूरी साज, कमरपट्टा, बाजूबंद आणि या सा-यावर कहर म्हणजे तुझ्या चाफेकळी नाकातील ती चमचमणारी नथ..हे सारं सारच काळजाचा ठोका चुकवणारं. हे तुझे रंभा-उर्वशी ला ही लाजवणारे रूप डोळ्यांत अगदी काठोकाठ साठवावे असे वाटते.
का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपीत, गोड स्पर्ष तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत, देहभान हरपले,
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
तो आरसा म्हणजे मला आमच्या सुखद मिलनातला एक अडथळाच वाटतो. दात विचकून तो मला चिडवतोय असा सतत भास होत राहतो मला. मग माझा मुश्किलीने कमावलेला धीर संपतो अन् मी त्वरेने आरश्याकडे जाऊन त्या तुझ्या नयनरम्य रूपाला त्याच्या कैदेतून एकदाचा मुक्त करतो.
सखये, आता हे तुझं खोटं खोटं लाजणं खूप झालं हं. तुझे हे पाणीदार मृगनयनी डोळे, ज्यांच्यात मला सदा स्वत:चेच प्रतिबिंब दिसतेे, त्यांच्यावरून हा झाकलेला हात एकदाचा काढ व माझ्याकडे डोळे भरून पहा तरी. आता तुझा मुलायम हात माझ्या हातात दे बघू. बघ सखे, तुझ्या मनातले जे गोड गुपीत तू आजवर माझ्या पासून, जगापासून लपवत आलीस, त्याच गुपीताचा तुझ्या ह्या एका अलवार स्पर्षाने पर्दाफाश केलाय बघ. नाहीतर तू इतका वेळ तुझा हात माझ्या हातात ठेवलाच नसतास. प्रिये, आता खरोखरच मला राहवत नाहीये, आता जर तू तुझ्या मनातलं माझं प्रेम व्यक्त नाही केलस, माझ्या प्रेमाला होकार नाही दिलास, तर खरोखरच माझा जीव जाईल गं. अगदी खरं खरं सांग, तुला मी आवडत नाही का गं? काय कमी आहे माझ्यात? मी जीव ओवाळून टाकतो गं तुझ्यावर. खरच माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, अगदी मनाच्या अंतरंगापासून बोलतोय मी. प्लीज, माझ्यावर विश्वास ठेव अन् माझा जीवनसाथी म्हणून स्विकार कर, मी तुला काहीच कमी पडू देणार नाही, अगदी फुलासारखं जपेन बघ.
एक तो पाऊस निकट आसमंती
तो ची एक माझीया मनी झरतो,
बिलगण्यास्तव आतूर होतसे जीव
दुरावा तुझा बघ नयनी पाझरतो.
अगं अगं वेडे, इतका वेळ दूरदूर राहणारी तू, अचानक मला येऊन बिलगलीस की. सखे, ह्या मिठीतच खरा स्वर्ग आहे बघ. ज्या आतूर मिठीच्या नुसत्या विचारानेच आजवर मी मोहरून उठायचो, त्या अमृततुल्य मिठीला मी आज प्रत्यक्षात अनुभवत आहे, या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. माझे देहभान हरपत चाललयं सखी. इतक्या प्रामाणिक अन् समर्पित भावनेने आपल्या प्रेमाची सुंदर कबुली आजवर कुणी दिली नसावी. मी जागेपणी स्वप्नात तर नाही ना, असं मला वाटायला लागलय अन् हे स्वप्न असेल तर ते कधीच मोडू नये, असही वाटतय.
"पाहिले न मी तुला, तू मला ना पाहिले...
ना कळे, कधी कुठे, मन वेडे गुंतले..."