प्रितफुल प्रित

Inspirational


4.6  

प्रितफुल प्रित

Inspirational


परी- प्रवास तिमीराकडून तेजाकडे

परी- प्रवास तिमीराकडून तेजाकडे

11 mins 560 11 mins 560

आज फार खुशीत होते मी ! पहिल्यांदाच प्रेरणाच्या घरी जाण्याचा योग जुळून आला होता. प्रेरणा आणि माझी काहीच महिन्यांपूर्वी झालेली "नेटभेट"; पण अल्पावधीतच छान मैत्री झाली आमची. फोनवर ब-याच वेळा बोलणे होते; पण आज तिच्या घरी प्रत्यक्ष जाण्याची ही पहिलीच वेळ. 


नोकरदार मुंबईकरांचा "रविवार" हा एकमेव हक्काचा..... आरामाचा दिवस. रोज वा-यालाही लाजवेल अशा जलद गतीने धावणारे हे मुंबईचे घड्याळ आज.... रविवारी विलक्षण मंदावते व सकाळपासूनच दिनक्रम कासवाच्या गतीने चालू होतो; तसंच माझंही झालं होतं. पण तरी जमेल तेवढं लवकर सगळं आटोपलं आणि प्रेरणाकडे जाण्यासाठी बाहेर पडले. तिच्या घरी जशी पोहोचले तशी मला पाहताच आनंदाने तिने मला दरवाजातच मिठी मारली. 

आम्ही पहिल्यांदा भेटतोय हे कुणालाच सांगून खरं वाटलं नसतं...

खूप घनदाट "मायेची मिठी"....


घरात प्रवेश केला आणि...... मनातल्या मनात एकच शब्द उच्चारला "अप्रतिम"..अंतर्गत सजावट खूप छान होती घराची; मी पहातच राहिले. प्रेरणाने झटपट चहा करून आणला अन् सोबत बिस्किटेही. चहा घेता घेता आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यात आम्ही कधी रंगून गेलो ते आमचं आम्हालाच कळलं नाही. तेवढ्यात माझी नजर समोरील भिंतीवरील एका फोटोकडे गेली आणि तिथेच खिळून राहिली. प्रेरणाचा फॅमिली फोटो होता तो. ती, तिचा नवरा आणि २ मुली. नीट निरखून पाहिल्यावर मला काहीतरी जाणवलं. मी म्हटलं, "प्रेरणा, या फोटोतील ही तुझी मोठी मुलगी रिया ना.. गं....? आणि ही दुसरी परी. बरोबर ?..... (अर्थात आमचं फोनवरचं बोलणं इतकं नक्कीच झालं होतं ) पण परी तर तुम्हा सर्वांपेक्षा खूप वेगळी दिसते..?" 

     

हे ऐकून प्रेरणा चमकल्यासारखी वाटली. समोरील रिकाम्या कपबशा उचलून स्वयंपाकघरात गेली. २-३ मिनिटांनी ती बाहेर आली खरी पण वेगळ्याच विश्वात हरवली होती. मी न राहवून तिच्या खांद्यावर हात ठेवला; तशी ती भानावर आली अन् खुदकन हसली म्हणाली, "थांब, एक गंमत सांगते तुला....."  

तिच्या खळखळून हसण्याने माझ्याही मनावरचं ओझं उतरलं...!!!


तिने.... आपल्या बोलण्याची गाडी पुढे दामटली.....


'तुला माहित आहे ना, मुंबईची जीवनवाहिनी, आपली ट्रेन. ती कशी रोज एखाद्या महाराणीसारखी डौलात धावत असते ?". 


मी म्हंटलं, "हो ना ! काय तो तिचा रुबाब ! आजूबाजूचा धुरळाच नाही तर इमारती, रस्ते, झाडे सगळ्यांनाच जणू "गेलात उडत" असं म्हणत ती मागे लोटत धावत असते आणि आपण बापडे आज्ञाधारक दासींसारखे गपगुमान तिच्यासोबत जात असतो".


प्रेरणा म्हणाली, "मग काय तर ! आणि त्यात हा मुंबईतील उसळलेला गर्दीचा महापूर. अगदी नकोशी वाटते ही गर्दी. बसायला जागा तर सोडाच; धड उभं राहणं म्हणजे सुद्धा जिकिरीच॔च. त्यातून दरवाज्यात उभं राहिलं नाही तर उतरायलाच मिळणार नाही. त्यामुळे मला रोज जीव मुठीत घेवून दरवाजाच्या कडेला उभे राहून प्रवास केल्याशिवाय गत्यंतर नसतं. धडधाकटपणे उतरायला आणि सुरक्षित अवस्थेत घरी पोहोचायला मिळणे..... म्हणजे, नशिबाने आणि काळाने आपल्यावर केलेली मेहेरबानी जणू". 


"एके दिवशी मी ऑफिसला निघाले. प्रवासाच्या मधल्या पट्ट्यात एका विशिष्ट जागी रोज सिग्नल लागतो आणि तेवढ्यापुरती गाडी जवळजवळ पाच मिनिटे तिथे थांबते; तशीच ती आजही थांबली होती. तेवढ्यात मला ती दिसली. रुळांच्या लगतच असलेेल्या रेल्वे पटरीजवळ राहणार्या बांधकाम मजुरांनी तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या एका घराबाहेर एक मुलगी खेळत होती. जेमतेम चार-पाच वर्षाची असेल. मातीने नखशिखांत बरबटलेली होती ती; आपल्याच मस्तीत टिप्पर खेळण्यात दंग होती. मध्येच ती थांबली. कपाळावरून वाहणारा घाम आणि गळते नाक फ्राॅकच्या बाह्यांना पुसत उभी राहिली. दिसायला तशी काळीसावळी, नाजूक चणीची, विलक्षण बोलके डोळे. आजूबाजूच्या पिलावळीशी चिवचिवाट करताना त्या वयातही तिच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसत होता. गाडी सुरु झाली तशी ती आणि तिचे छोटेसे विश्व दोन्ही मागे पडलं. नोकरीच्या निमित्ताने इतकी वर्षे ट्रेनच्या प्रवासात गेली. त्यादरम्यान डब्याच्या अल्पकालीन रहिवासी असलेल्या असंख्य बायकांची तसेच ट्रेन पुढे जाताना मागे पडलेली अशी बरीच विश्वे नजरेच्या खिडकी पलीकडून गेली; तरी आजतागायत त्या खिडकीत कोणतंच विश्व स्थिरावलं नाही. पण का कुणास ठाऊक ? त्या छकुली मध्ये, होय तिचं नाव मी छकुली असं ठेवलं, असं काय होतं की, माझ्यावर मोहिनी पडली आणि मला मागे वळून पाहण्यास भाग पाडलं. तो मातीतला ठिपका दिसेनासा होईपर्यंत मी मागे वळून पाहत राहिले".


"पुढे ती रोज मला दिसायची. कधी ...टिप्पर खेळताना लयबद्ध नाचणारी, तर कधी त्याच मातीत फतकल मारून बसलेली आणि हातातल्या मळक्या बाहुलीचे लाड करण्यात तल्लीन. "कोण काय म्हणेल" ? असले विचार तिला काय माहित ? त्या सिग्नल लागलेल्या पाच मिनिटांत जणूकाही आमचं एक छोटेसे विश्व तयार झालं. पूर्वी ती सिग्नलची पाच मिनिटं.. म्हणजे मला जीवावर यायचं. त्यामुळे त्या मोटरमनला आणि त्या सिग्नलला मनातल्या मनात शिव्यांची लाखोली ठरलेलीच...; कारण त्यामुळे ब-याच वेळेला उशीर व्हायचा. पण आता त्या छकुलीच्या विश्वात तेच क्षण आनंदात जायचे". 


"एक दिवस खेळता-खेळता त्या ठिकाणी अचानक भांडण सुरू झालं. एका थोराड मुलाने छकुलीच्या पाठीत धपाटा घातला. बिचारी नाजूक पोरगी; कळवळली, रडायला लागली. मलाही गलबलून आलं. पण क्षणभरच. दुस-याच क्षणी तिने त्या पोराच्या पाठीत असा काही गुद्दा मारला की तो मटकन् खालीच बसला आणि मोठ्याने भोकाड पसरलं.... तशी ती आनंदाने टाळ्या वाजवत नाचू लागली. मीही आजुबाजुचं भान विसरले आणि टाळ्या वाजवल्या. तिने त्या ऐकल्या असाव्यात; तिने मान वळवून माझ्याकडे पाहिले आणि तिही खुदकन हसली. किती गोड निरागस हास्य होतं ते ! त्याची सर कोणत्याही मौल्यवान वस्तूला येणार नाही. तेवढ्यात ट्रेन सुरु झाली तशी मी तिला टाटा केला आणि फ्लाईंग किस दिला. तसं तिनेही मला टाटा केलं. पुढे पुढे या रोजच्या धावत्या भेटीत ती रोज मला न चुकता हात करायची; हसायची. माझ्या मध्ये तिला काय दिसलं माहीत नाही. आई, बहीण, मैत्रीण की अजून काही जगावेगळं नातं. पण तरीही एक जिव्हाळ्याचं नातं आमच्यात तयार झालं होतं एवढं नक्की. अधूनमधून मी ट्रेनमधूनच चॉकलेट, पिना, हेअर बँड अशा छोट्या छोट्या गोष्टी तिच्या दिशेने टाकायचे. तिला त्याचं एवढं अप्रूप असायचं की जणू काही खजिना गवसल्यासारखं ती त्या वस्तू घेऊन नाचायची. साहजिकच होतं म्हणा. बरेच दिवस चाललं असंं". 


"एकदा मी खूप आजारी पडले. मग काय, ऑफिसला सक्तीची विश्रांती. ते चार-पाच दिवस तपाप्रमाणे भासले मला. माझंही स्वतःचं कुटुंब होतंच की ! नवरा, एक लहान मुलगी. तरी हे जगावेगळं नातं मला प्रिय झालं होतं; छकुलीला रोज सकाळी भेटायची सवय लागली होती ना ! त्यामुळे अजिबातच करमेना मला. तब्येत थोडी सुधारल्यावर मी ऑफिससाठी निघाले. कधी एकदा छकुलीला पाहेेेन, असं झालं होतं. गाडी सिग्नलला थांबली पण ती कुठेच दिसेना. अरे, कुठे गेली असेल ती ? नजरेच्या टप्प्यात, समोर सगळीकडे तिला शोधली पण व्यर्थ. तशी थोडी नाराज झाले मी. पण म्हटलं, असेल घरात जेवत नाहीतर झोपलेली. दुसऱ्या दिवशी पाहिलं, तरी ती नव्हती. असा जवळजवळ आठवडा निघून गेला; तशी मनात कालवाकालव सुरू झाली. मनाभोवती नको त्या विचारांनी रुंजी घालायला सुरुवात केली. तिच्या जीवाचं काही बरंवाईट तर नाही ना झालं ? आणि एक जुना प्रसंग आठवला. एकदा खेळता खेळता आपल्याच नादात ती कधी रुळांच्या जवळ आली, तिलाच कळले नाही. मी जोरात ओरडले तेव्हा ती दचकली आणि पटकन मागे फिरली. ते सारं आठवलं आणि पुढच्या विचाराने माझ्या पायातलं त्राणच निघून गेलं. पण...... तरी पटकन मनाला सावरलं; देवाकडे तिच्या खुशालीसाठी प्रार्थना केली आणि ऑफिसला गेले. असाच पंधरवडा उलटला पण ती काही दिसेना. आता मात्र मन तिच्यासाठी व्याकुळ व्हायला लागलं होतं. कसले तरी अशुभ विचार मनात यायला लागले. त्या लोकांचा तिथला मुक्काम हलला असं म्हणावं, तर तसंही काही नव्हतं. मग कुठे गेली असेल तो ? तिच्या जिवावर बेतलं नसेल ना ? बापरे, किती हे अभद्र विचार !!! मी गपकन् डोळेच मिटून घेतले".


"एक दिवस ऑफिसच्या काही कामासाठी दादरला जावं लागलं. स्टेशन आलं, तशी उतरले आणि तिकडे जायला टॅक्सी पकडली. थोड्या वेळाने सिग्नल लागला अन् टॅक्सी थांबली. आपल्याच विचारात गुंग असतानाच टॅक्सीच्या खिडकीवर कोणीतरी टकटक केलं. सिग्नलला भिकाऱ्यांचा, चणे-दाणे, खेळणी विकणार्‍यांचा सुळसुळाट असणारच. हे सगळे सिग्नलच्या ठिकाणी तो परिसर त्यांना त्यांच्या सासऱ्याने आंदण दिल्याप्रमाणे वावरतात. तर त्यातलाच एक समजून नजर वर करून न बघताच मी हातानेच पुढे जायची खूण केली. पण एका नकाराने ही माणसं थोडीच हटायला! परत खिडकीवर टकटक झाली. असे दोन-तीनदा झाल्यावर मात्र मी वैतागले आणि काहीतरी सुनवण्यासाठी मान वर केली. पण समोर जे पाहिलं त्याने ओठांवरचे शब्द तोंडात विरून गेले. डोळ्यांवर विश्वासच बसेना. समोर ती होती. हो छकुुलीच होती ती ! धुळीने बरबटलेली, केस विसकटलेली, डोळे खोलवर गेलेले, अंगावर, चेहऱ्यावर जागोजागी सूज अन् मारल्याचे व्रण. किती भयानक अवस्था होती तिची ! मला ते सारं बघवेच ना. नजर जागच्या जागीच थिजून राहिली. हाॅर्नचा कर्कश्श आवाज कानात घुमू लागला. सिग्नल सुरु झाला होता; तशी टॅक्सी पण सुरू झाली. आमचं विश्व पुन्हा मागे पडत चाललं होतं; पण त्याच वेळेला कुठली तरी एक आंतरिक शक्ती हे सुचीत करत होती की.. कदाचित...... यावेळेला हे मागे पडणं थांबवलं नाही तर मोठाच अनर्थ ओढावेल. छकुली मला कायमची दुरावेल. अजून विचार करायला वेळच नव्हता. मी जवळजवळ ओरडूनच ड्रायव्हरला लगेच टॅक्सी रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगितली. पटकन टॅक्सीतून उतरले अन् आजूबाजूला न बघता छकुलीच्या दिशेने धावत सुटले. ती तिथेच उभी होती रस्त्याच्या मधोमध; स्तब्ध, निर्जीव बाहुल्यासारखी, मुंबईच्या मायाजाळात हरवलेली. मी हाताने बळेच मागून येणा-या गाड्यांना थांबवले आणि तिला उचलून रस्त्याच्या कडेला आणली. 

   तिचे भकास निर्जीव डोळे आणि तिचं अस्तित्व भलत्याच कुठल्यातरी जगात हरवल्यासारखं. पण मला पाहताच तिच्या डोळ्यांच्या त्या रखरखीत काठांवर पाणी जमा झाले. तिच्या त्या अवस्थेतही मी तिला उराशी कवटाळली. दोघींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. माझ्या आश्वस्त मिठीत तिला जणू धृवता-याचं अढळ स्थान गवसलं होतं की काय कोण जाणे, पण ती मला घट्ट बिलगली होती". 


"मी आधी माझ्या ऑफीसला फोन करून घरगुती अडचण आल्याने घरी जात आहे; असे कळवले आणि तिला त्याच टॅक्सीत घालून घरी आणली. रियानेच दरवाजा उघडला. दारात छकुलीला पाहताच, "आई, कोण ही...? हिला घरी का आणलं आहेस ?


    काय झालंय हिला ? ही अशी का ?" अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तिच्या मागेच माझा नवरा, प्रसाद उभा होता. त्याच्या चेह-यावरही प्रश्नांची दाटी व्हायला लागली होती. ते पहाताच मी त्यांना म्हंटलं, "मला थोडा वेळ द्या. मी सर्व काही सांगते. आत्ता ह्या क्षणी हिला माझी गरज आहे".


"मग मी छकुलीला घरात घेऊन गेले. तिला छान अंघोळ घातली, वाटेत तिच्यासाठी काही कपडे घेतले होते ते तिला घातले आणि जेवायला वाढलं. कुणाला माहीत, किती दिवसांची उपाशी होती ती ! वाघ मागे लागल्यासारखी जेवत होती. नंतर तिला शांत झोप लागली. मग मला जरा हायसं वाटलं. मी हाॅलमधे आले अन प्रसाद आणि रियाला हाक मारली. तशी रिया धावतच माझ्याकडे आली, "आई, कोण आहे गं ही ? हिला इथे का आणलंय?" तिचा तक्रारीचा सूर पाहून मी मनात थोडी कचरले. पण तरीही सावरलं स्वतः ला. रियाला जवळ घेतलं, तिला लाडाने कुरवाळलं आणि माझ्या व छकुलीच्या बाबतीत सुरूवातीपासूनच दोघांनाही सर्व काही सांगितलं. मुख्य म्हणजे दोघांनीही ते शांतपणे ऐकून घेतलं. "थोडे दिवस कृपया छकुलीला इथे राहू द्या. यथावकाश आपण हिच्या बाबतीत निर्णय घेऊ. चालेल ना !" माझं नशीब बलवत्तर की दोघांच्या समंजसपणाने बाजी मारली माहित नाही....., पण...... छकुलीला रहायची परवानगी मिळाली"......!!!!


"१-२ दिवस मी असेच जाऊ दिले; काहीच विचारलं नाही तिला. पण काय झालं असेल याची तिच्याकडे बघून एकंदरीत कल्पना आली होती मला. तिला त्याबद्दल विचारायलाही जीव कचरत होता; पण एक दिवस तिचा मूड पाहून तिला विचारलंच. त्या कोवळ्या जीवाकडून तेव्हा एवढंच कळलं की एक दिवस तिचा दारुडा बाप तिला एका गलिच्छ वस्तीतल्या एका माणसाकडे घेऊन गेला. थोडा वेळ त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले आणि मग त्या माणसाने त्या बापाच्या हातात काही कागद दिले. त्या निर्दयी बापाने तिच्याकडे एकदाच पाहिले आणि नंतर तिला तिथेेेच सोडून जो तरातरा निघून गेला तो आजतागायत फिरकलेला नाही". 


"यापुढे तिला काही विचारायची गरजच नव्हती. या एक-दोन वाक्यात तिच्यावर काय काय प्रसंग घडले असतील त्या कल्पनेनेच मन विषण्ण झालं. थोड्या पैशांसाठी तिला त्या "बाप" नावाच्या नराधमाने विकलं होतं आणि तिला भीक मागायला लावली होती... नशीब बलवत्तर की आमचे जन्म-जन्मांतरीचे काही ऋणानुबंध म्हणून ती मला दिसली आणि अजून काही वाईट घडायच्या आत जीवघेण्या यातनांपासून तिची सुटका झाली". 


"छकुली आता घरात बरीच सावरली होती. माझ्या कुटुंबात मिसळायला लागली होती. रियालाही हळूहळू ती आवडायला लागली होती. एखाद्या लहान बहिणीसारखी ती तिची काळजी घेत होती, माया करत होती. पण तिचं पुढे काय ? हा प्रश्न आता भेडसावत होता. तिला अनाथाश्रमात भर्ती करावं असा विचार एक क्षण मनात आला; पण पुढच्या भितीने लगेच मनात घर केलं. कोण जाणो, तिथेही तिला अशीच किंवा किंबहुना अजून वाईट वागणूक मिळाली तर ? दुष्कृत्यांचा महाराक्षस हल्ली सगळीकडेच बोकाळला आहे. मला आता छकुलीच्या बाबतीत कोणताच धोका पत्करायचा नव्हता. त्या नराधमांनी तिला शोधून काढले आणि तिच्यावर स्वतःचा हक्क साांगितला तर? परत ती त्या नरकयातना देणा-या जगात जाईल. या विचारानेच अंगावर काटा आला. काय करावे ? मी आता छकुलीला माझ्या नजरेआड अजिबातच होऊन देण्यात तयार नव्हते".  


अचानक डोक्यात एक कल्पना आली. खरंतर बराच धाडसी विचार होता तो. असं घाईघाईत त्यावर निर्णय घेणे चुकीचे होते; कारण या निर्णयाला माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचीही संमती तितकीच महत्त्वाची होती. छकुलीच्या अन् आमच्याही आयुष्यभराचा प्रश्न होता हा ! पण माझा विचार पक्का होता. मी उठले अन् प्रसादकडे, माझ्या नव-याकडे गेले. त्याला म्हंटलं, प्रसाद मला तुझ्याशी एका खूप महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे. कृपया शांतपणे ऐकून घेशील ना !


 मला ना.....". "थांब प्रेरणा..."प्रसादने माझे बोलणे तिथेच तोडले ......

मला क्षणभर वाटलं झालं, संपलं आता सारं....आणि तो बोलायला लागला. "छकुलीला तू जेव्हापासून घरात आणलंस, तेव्हापासून मी ब-याच गोष्टी हेरल्या आहेत. तू मला तिच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना दिलीस खरी; पण त्यासोबतच तिला तुझा व तुला तिचा लागलेला लळा, तिच्यावरील तुझी मातेची पखरण, पावलोपावली वाटणारी काळजी हे सगळं मी पूर्णपणे जाणून आहे. खरंतर मी स्वतःच तुझ्याशी या विषयावर बोलणार होतो; पण म्हंटलं, तू बोलायची वाट पाहू. मला हेही माहित आहे की तू आत्ता माझ्याशी काय बोलणार आहेस? आपण छकुलीला दत्तक घेऊया, हेच ना ! अगं वेडे, तू विसरलीस का आपला प्रेमविवाह आहे ते ? आपल्या सहवासाच्या ४‐५ वर्षांच्या त्या काळात आपण एकमेकांना आधी पूर्णपणे जाणून, समजून घेतलंय व मगच लग्न केलंय. मला तुझ्या मनातलं समजणार नाही का ? छकुली मलाही आवडते. भाबडी वेडी पोर आहे ती. आपल्या रियालाही लहान बहीण मिळेल. तसेच दोघींवरही अन्याय होणार नाही; याची मात्र खबरदारी घ्यावी लागेल हं ! आपण लवकरच योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छकुलीला दत्तक घेऊ. आपल्या आयुष्यात अशी अचानकपणे अवतरली म्हणून तिचं नाव आपण "परी" ठेवू या. चालेल ?" 


"मला पुढे काही बोलायची गरजच नव्हती. माझं सगळं बोलणंच खूंटलं होतं. मी फक्त "आ" वासून प्रसादकडे बघतच राहिले. आपल्या भावनांचा आदर करणारा, आपण न बोलताही आपले विचार समजणारा, आपल्या प्रत्येक निर्णयात आपल्यासोबत खंबीरपणे, विश्वासाने उभा असणारा असा प्रेमळ जीवनसाथी असेल तर स्त्री कोणतेही महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने तसेच योग्य रितीने घेऊ शकते. मी आनंदाने प्रसादला मिठीच मारली अन् तोही मला लाडाने थोपटत राहिला. अचानक माझी नजर मागे उभी असलेल्या परीवर गेली. बोलण्याच्या नादात ती कधी मागे येऊन उभी राहिली; ते कळलंच नाही. आमची दोघींची नजरानजर होताच ती पट्कन आली आणि आम्हाला बिलगलीच. कालांतराने परी कायदेशीररित्या आमच्या कुटुंबाची सभासद झाली. रियानेही तिला धाकटी बहीण म्हणून सहज स्विकारले अन् अशा प्रकारे आमच्या कुटुंबाची सोनेरी चौकट ख-या अर्थाने पूर्ण झाली". अल्पावधीसाठी "गतीला" खिळ बसवणा-या "सिग्नलने" परीच्या आयुष्याला मात्र ख-या अर्थाने गती दिली".


प्रेरणाचं बोलणं संपलं होतं; पण माझ्या ते लक्षातच आलं नाही. मी मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहिले होते. प्रेरणाने माझा हात पकडला तेव्हा कुठे मी भानावर आले अन् तिच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते; ते पाहून मी तिला मिठीच मारली.


"आई, मला खायला दे ना गं ! खूप भूक लागली आहे". मी मागे वळून पाहिले. परी प्रेरणाला येऊन बिलगली होती." आणि या कोण गं ?", तिने विचारलं. तशी मी तिला जवळ घेतले, गोंजारले, लाडाने तिचा पापा घेतला अन् म्हंटलं, "मी तुझ्या आईची मैत्रीण आणि आता तुझीही. करशील माझ्याशी मैत्री ?" तशी ती खुदकन् हसली व मला नमस्कार केला. तिला व रियाला शुभाशिर्वाद देऊन, एक सुंदर अनुभूती घेऊन मी घराबाहेर पडले होते.

एका परीचा "तिमिरातून तेजाकडचा प्रवास" मी स्वतः अनुभवत होते.... आणि ती अनुभूती फार वेगळी होती..... फार वेगळी.....!!!!


Rate this content
Log in

More marathi story from प्रितफुल प्रित

Similar marathi story from Inspirational