Pranjali Lele

Inspirational

3  

Pranjali Lele

Inspirational

परीक्षा मातृत्वाची

परीक्षा मातृत्वाची

3 mins
240


आई होणं ही जगातली सगळ्यात सुखद अशी अनुभूती असते. एका मुलीचे एका आईमध्ये रूपांतर होताना ती शरीर आणि मनानेही परिपक्व होत असते. मी आई होणार ही सुखद बातमी सावीला कळताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. लग्नाचे नव्यानवलाईचे दिवस संपल्यावर सावी आणि संजय ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ते गोड स्वप्न साकार होणार होते.


लग्नानंतर नुसते घरी रिकामे न बसता काहीतरी शिकावे म्हणून तिने आपल्या पुढच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे शिकत असतानाच तिला ती गरोदर असल्याची गोड बातमी कळली. पहिले आठ महिने रोजचे कॉलेज, अभ्यास यात कसा सरला ते तिलाही कळले नाही. घरी सारे काळजी घ्यायला होतेच आणि कॉलेज मध्येही या दरम्यान मैत्रिणीं ची खूप छान सोबत लाभली. भर आठव्या महिन्यात फायनल परीक्षा देऊन सावी नववा महिना लागताच बाळंतपणासाठी माहेर आली. 


माहेरी आल्यावर मात्र तिचे भारीच कोडकौतुक सुरू झाले. डोहाळे जेवण काय नी रोजचे तिच्या आवडीचे पदार्थ काय आई, आजी साविचे नुसते लाड करत होत्या. सुरुवातीपासूनच ती ॲक्टिव राहिल्याने डिलिव्हरी नॉर्मल होईल असं च सगळे म्हणत होते. तरीही दिवस जसजसे जवळ येऊ लागले तशी सावीच्या मनात एक अनामिक भिती देखील होतीच.


सगळं ठीक असतानाही ऐनवेळी काही अपरिहार्य कारणामुळे सिझर करावे लागले. आणि साविने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला बघताच तिला शरीराच्या साऱ्या वेदनेचा जणु विसरच पडला होता. बाळाचा तो प्रथम स्पर्श कधीच विसरता येणे शक्य नव्हते. शब्दच फुटत नव्हते तिच्या तोंडातून..मातृत्वाची एक वेगळीच अनुभूती होती ती..


सिझर झाल्यामुळे साविला निदान आठवडा तरी हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होते. सुरुवातीच्या दिवसात तर तिला अजिबातच हालचाल करता येत नव्हती. डोकं एकदम भारी वाटायचं.. ऑपरेशन नंतर अस होतच असे डॉक्टर म्हणाले. पण तीन दिवसानंतर देखील डोकेदुखी काही कमी होत नव्हती. उलट आता जास्तच त्रास व्ह्यायाला लागला होता. पाचव्या दिवशी तिच्या अंगात तापही भरला. डॉक्टरांनी मग औषध बदलली.


बघता बघता आठवडा उलटला..सावीला अजूनही डोकेदुखी आणि बारीक ताप सतत येताच होता. त्यामुळे तिला बाळाला धड जवळ घेताही येत नव्हते त्यामुळे खूप वाईट वाटत होते. डॉक्टरांनी विविध टेस्ट करविल्या. पण कशातही काही निघाले नाही. सतत डोकेदुखी आणि ताप मात्र येतच होता. त्याचे काही केल्या निदान होत नव्हते. अश्या तब्येती मुळे तिला बाळाला अंगावरचे दूध देखील नीट पाजता येईना... मग घरच्यांनी बाळाला वरचे दूध सुरू केले.. त्याचे सावि ला खूप वाईट वाटत होते..पण आईने तिची समजूत काढली.. तिची आजी आणि आई बाळाची सगळी काळजी घेत होत्या.


सावीला आता दवाखान्यात राहण्याचा कंटाळा आला होता पण तब्येत पूर्णपणे बरी होईस्तोवर डॉक्टर पण डिस्चार्ज द्यायला तयार नव्हते. आता तर घरच्यांना सगळ्यांनाच तिच्या तब्येतीचे टेन्शन आले होते. वरवरून जरी सगळे तिला धीर देत होते तरी ते पण काळजीत होते. आज सावी सकाळी उठली तर अचानक तिला डाव्या डोळ्याने नीट दिसेनासे झाले..ती घाबरून ओरडली. डोळ्यावर खूप पाणी मारले..डॉक्टरांना लगेच बोलाविण्यात आले..काहीतरी मोठाच प्रॉब्लेम आहे हे डॉक्टरांनी ओळखून तिला लगेच एमआरआय साठी दुसऱ्या हॉस्पिटलला नेण्यात आले.


एम आर आय रिपोर्ट मध्ये तिच्या मेंदूच्या डाव्या बाजूला डाव्या डोळ्यामागे एक छोटा ब्लड क्लोट आढळला. त्यामुळेच हा कमी दिसण्याचा प्रॉब्लेम चालू झाला होता..आणि डोकेदुखी आणि ताप देखील त्याचमुळे येत होता हे निष्पन्न झाले. असला आजार लाखोतून एखादीला होतो असे डॉक्टर म्हणाले..आणि त्यात तिचाच नंबर लागावा याचे सावी ला खूपच वाईट वाटले..पुरती कोलमडले होती ती..


मग तिला ताबडतोब नवीन ट्रीटमेंट सुरू झाली. रक्ताची गुठळी अगदीच लहान असल्याने इंजेक्शन देऊन ती विरघळता येईल म्हणून तीला रोजचे दोन ब्लड थिनर चे इंजेक्शन सुरू करण्यात आले. या काळात ती मानसिक रित्या अगदीच ढासळली होती.. पण नवऱ्याच्या आणि घरच्या सगळ्यांच्याच सपोर्ट मुळे या कठीण परिस्थितीला सावी धैर्याने सामोरे गेली. 


योग्य ट्रीटमेंट सुरू होताच हळूहळू तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. डोळ्यांचा प्रॉब्लेम, डोकेदुखी आणि ताप हळूहळू कमी होऊन पूर्णपणे गेला. साधारण एक महिना तिला इंजेक्शन चा कोर्स करावा लागला नी पुढे सहा तब्बल सहा महिने तरी साविला ब्लड थिनर औषधे घावी लागली. पण आपल्या बाळासाठी तिनें हसत हसत सारे सहन केले.


या सर्व दिव्यातून बाहेर पडताना तिला शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक त्रासही खूप झाला. बाळाला आपण या आजारपणामुळे नीट सांभाळू शकत नाही याचे खूप वाईट वाटे तिला...पण बाळासाठी तिने खंबीरपणे सारे सहन केले...घरच्या माणसांचा आधार व नवऱ्याचे असीम प्रेम आणि देवावरील अढळ श्रद्धा यामुळेच सांवी या जीवघेण्या संकटाला धैर्याने सामोरे जाऊ शकली. मातृत्वाच्या या अग्नी परीक्षेतून जाताना सावीच्या डोळ्यापुढे फक्त तिचे बाळ होते ज्याच्यासाठी त्या हिरकणी ने हा बिकट परिस्थितीचा कठीण डोंगर पार केला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational