प्रेमबंधन
प्रेमबंधन


ओसंडून वाहते या धारा
पर्वताच्या शिखरावरूनी
उमंग जागते, संगमाची
धडपड ही भेटीची
कुठे कुठे नेती
निर्विकार ओढ जशी
अजाणता जागती...
प्रेमाची परिभाषा तशी खूप सखोल आहे.प्रेमाची ओळख करणे किंवा पारखणे हे परिणीतीच्या पलिकडे गेल्यावरच कळते. आपल्या आई-बाबा सोबतचे प्रेमबंधन, आई-बाबाचं आपल्या मुला मुलींचा सोबतचे प्रेमबंधन. पत्नीचे पतीसोबत आणि पतिचे पत्नीसोबतचे प्रेमबंधन. बंधन ही संकल्पनाही तितकीच महत्त्वाची. मानवाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याची भाषा एकमेवचं ती म्हणजे प्रेम. . बाकी सगळं शुन्यचं नाही का ? समोर चा व्यक्ती कोण,कसा, काय हे तो जाणत नाही. त्याला फक्त प्रेमाचे बोल हे चट्कन कळते आणि तो त्याप्रमाणे प्रेमाच्याच भाषेत दादही देतो. याचा अर्थ मानव हा मुळातच प्रेममयी असतो.. प्रेम हे तो अंतरंगात घेऊनच जन्माला येतो . जीवनात प्रेम नसतं तर ? अर्थ असतो का त्या जगण्याला? मानव प्रेमासाठीच जगतो. प्रेम देणं आणि घेणं, यासाठीच ही जगमाया आणि जीवनमाया आहे.
झुळझुळ वाहणारी नदीचा प्रवाह जसे लख्ख स्फटीकासारखी पारदर्शक आणि स्वच्छ दिसते ; तसेच आपुलकी, सहानुभूती, निस्वार्थपण जिथे भरभरून असते तिथे प्रेमाचं बंधन अतुट असते. प्रेम ; संपूर्ण आयुष्यात हे कुठलं ही दुःख पहाडाएवढं जरी असले तरी ते सुईंच्या टोकाएवढचं वाटतं!
उमललेल्या फुलांचा प्रांगणात
भृंगा करतोय जसे लाळ
ह्रदयात हेलकावे घेतो श्वास
जिंकून मन करेल घायाळ....
एक स्त्री आणि एक पुरुष यांच नैसर्गिक प्रेमबंध असतो .स्त्री जेव्हा किशोर अवस्थेत आल्यावर एखादा तरूणावर भाळणे किंवा पुरुष एखाद्या स्त्रिच्या प्रेमात पडतो.आकर्षण हे नजरेतून असते तर प्रेम हे अंत:करणातून असते.म्हणजेच नजरेतून ते अंत: करणापर्यंत यायला अवधी द्यावा लागतो; म्हणजेच प्रेमामध्ये आत्मियता येण्यासाठी वेळ द्यावा लागतो. ऊठ- सुटपणा नसतो. इतकं स्वस्त किंवा सोप नसतं प्रेमात पडणं ! प्रेम फुलवण्यासाठी त्याची जड घट्ट करावी लागते. मुरावं लागते, तेव्हा खर्या प्रेमाचं अंकुर वाढू लागतो. विरह हा प्रेमाला अधिक फुलवतो.तेव्हाच प्रेमाची खरी ओळखही पटते.
स्त्री जेव्हा प्रेमात पडते तेव्हा ती केवळ आकर्षणावर भाळत नाही, ती साथीमधे विश्वास आणि त्याच्यामधली प्रेमभावना कुठल्या स्तरावरची आहे हे सदैव पारखीत असते.ती प्रेमामध्ये सुरक्षितता शोधत असते,अन् अधीरताही असते. साथीच्या नजरेतं (स्वत: बद्दलचा) सन्मान बघत असते.
बावरे मन का हसतो तालात
काय हरवले, भाव हे लपवत
वेड धावते अकारण परिणीतीत
शैलीत दिसते प्रित ही नकळत
जागते आशा मनोपाशात
क्षणक्षण वेध घेते उसावेच
कल्पनेच्या घेरयात उधळते रंग
नेहात स्वप्न सजते पुणर्वेंच.....
बंधन हे कश्यारितीने निभावलं जाते याला अधिक महत्व आहे.बंधनात तडजोड, जबरपणा किंवा लादलेलं बंधन, स्वार्थपणा, एकतर्फीपणा यातून निर्माण होणारे प्रेमबंधन आत्मानंदात वावरतो का ? हल्लीचं advance युगातलं युवा- युवतीमधलं प्रेम ....नासमजुतीतून म्हणा किंवा एका नजरेतलं ज्याला सिनेमात घडत तस्स!.... आजची पिढींना instant प्रेम हवं असतं टाईमपास साठी ! ....इथे प्रेमात आत्मियता असते का?.... का उगीचच प्रेमिका , प्रियकर असावा फिरण्यासाठी ......किंवा शारीरिक,मानसिक गरज भागविण्यासाठी !
जर एखाद्या प्रेमबंधनात तरुण मुलगी आपलं सर्वस्व अर्पण करून तीचा प्रेमभंग झाला तर्र, ......काय अवस्था होवू शकते.? ही फार मोठी गंभीर बाब तिच्या साठी होवू शकते; असे अनेकानेक उदाहरणे आपल्याला आजुबाजुला नजरेतं येतच असते.
अबोल तुझी वाणी का, मला छळते सतत
एकांतातल्या निवांत क्षण, का आठवे मला
उस्वासाचा श्वास मीच, का भरला असावा
नाही उमगले तुझे का असे वागणे मला....!!
पण होय !... आजही प्रेमाच्या भावना तेवढ्याच उजळ माथ्याच्या आहेत. प्रेमबंधन निभविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जातो. आणाभाका खऱ्याही असतात. पण काही ठिकाणी सकस परिस्थिती आणि सकारात्मक दृष्टिकोन पहायला मिळते तर काही ठिकाणी नकारात्मक दृष्टिकोनाचा प्रेमीयुगुलांना सामना करावा लागतो. यथायोग्य संस्कार आणि समजुतदारपणा ही तरूण मुला- मुलींमध्ये योग्य पाऊल उचलण्यासाठी मदत करते.
अजब प्रितीचे धागे विणलेले
चित्त रुपातलं जुळले काळजात
सानिध्यासाठी साद ही घालून
रमते प्रेमनगरीच्या अंगणात
संगसंगती जुळते मन-मनात
तुझ्या माझ्या प्रेमाची छाया
त्याग परित्याग कशास हवे
अखंडीत झरेल प्रेमाची माया...