प्रेम विवाह
प्रेम विवाह
सर्व काम आटपवून दुपारी एकच्या दरम्यान वेळेत मी निवांतपणी लिहायला बसलेच होते की, दारावर टकटकचा आवाज आला. कोणीतरी बेल न वाजवता दरवाजावर उभे असल्याने मी जावून पटकन दार उघडले. शेजारची बाई दारात उभी होती.काही विचारायच्या आतच भळभळून रडायला लागली. मी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, तोच अजूनच रडायला लागली. मला काही अनुचित घटना झाल्याची मनात कल्पना आली. मी म्हटल, काय झाल ? तिला काहीतरी सांगायच होत, पण ती सारखी रडत होती. रडता रडता ती सांगायला लागली .
आपली बाली गेली. तोच दचकून मी तिला म्हणाली ! काय, कुठे गेली , ती म्हणाली घर सोडून पळून गेलीजी. तेव्हा माझ्या लक्षात आलय. ती मुलगी अगदी साधी भोली होती. मी म्हणाली ! कुठे गेली कधी गेली, कोणासोबत पळून गेली, ती तशी दिसत नव्हती ,काय झालय, थोड सविस्तर सांग बघू ! ती सांगायला लागली. तो पोरगा नेहमी घरी यायचा, तुम्हीबी त्याला बघितल हाय ताई ! हो त्या मुलाला मी बघितले आहे. आमच्या घराच्या समोरच जुणे मंदिर आहे. त्या मंदिराची देखभाल करायला म्हणुन आम्हिच त्या परिवाराला ठेवले होते. त्यामुळे ती आम्हाला जवळचे समजुन सु:ख दु:ख सांगत असे, मंदिरालगत थोडी रिकामी जागा होती तिथे एक वेगळी रूम तयार करून त्यात त्यांच्या तीन अपत्यासह राहायचे. पती पत्नी दोन मुली व एक मुलगा, परिवार छान साधाभोळा होता. नाइट वॉचमन होता, पगार खुपच कमी ,स्वत:चे घरही नव्हते. किराया द्यायला ही पैशे नव्हते, म्हणुन तोच आला होता आमच्याकडे मी इथ खोली काढून राहू का म्हणुन विचारायला, माझ्या सासऱ्यांनी लगेच होकार दिला. मंदिराच्या साफसफाईला कोणीतरी पाहिजेच होते. त्यामुळे काही मदत देवून त्याने रूम उभारली, त्यात तो आपल्या परिवारासोबत राहू लागला होता. लहान लहान मुले आमच्या समोरच मोठी झालेली होती, एका मुलीच लग्न पण करून दिल होत. ही दोन नं.ची मुलगी शिकत होती, बारावी झाली होती, बऱ्यापैकी हुशार होती. माझ्या प्रशिक्षण केंद्रात मोफत कोर्सचे प्रशिक्षण पण दोघीही बहिनींनी घेतले होते , पुन्हा बँकेत एंजेंटशिप करित होती. सर्वांना तिचे कौतूक वाटायचे , काहीतरी करून ती आपल्या कुटूंबाला मदत करित होती. दिसायला सर्वसाधारण सावळी पण चेहऱ्यावर तजेला होता. आणि वरून चेहऱ्यावर भोळेपणा होता. उंच सडसडित शरीरयष्टी छान दिसायची. पण तिच्या एका चुकिने, सुखी परिवार दु:खाच्या सागरात लोटलेहोते. कष्टाळू करती सवरती मुलगी घरातून निघुन गेली. आईवडिलावर दु:खाचा पहाड कोसळला. ती भळभळून रडत होती आणि रूदन करता करता बोलत होती. देव आमचीच काहून का परीक्षा पहातो, आम्ही काय बिगडवल कोणाच, दहा दिवस झाले पोरगी आली नाही, बापान तिचे कपडेलत्ते कचराकुंडीत नेवून टाकले. तिच्या शाळेचे कागदपत्र बी जारून टाकले. मी तिला प्यायला पाणी दिले आणि शांत व्हायला सांगितले. कशी शांत होवू मी माह्या पोटचा गोरा न मले सोडून गेला. मले कोणीतरी सांगलजी, तो पोरगा दोन पोराचा बाप आहे, त्याले बायकोबी आहे, काही दिवस ठेवण म्हणे, आन पोरीले ईकून टाकणार हाय, कस होईन माह्या पोरीच आता मी काय करू सांगा, बापान डोक्यात राख टाकली हाय, बाप जागेवरून उठाले तयार नाही .वरतून म्हणते माह्यासाठी थे मेली. आता तुम्हीच सांगा बाई, अशी पोरीची माया तुटते काजी ? माह्या
पोटचा गोरा त्यो, मही माया कशी तुटनार काजी ?काही तरी करा या परीक्षेच्या घडीले आमची मदत करा, तुमचे लई उपकार हाय आमच्यावर , आता अजून एक उपकार करा , मही बाली मह्या घरी आली पाहिजेन.
मी तिला धीर देवून म्हणाले, दहा दिवसानंतर का सांगत आहे, गेल्या बरोबर का नाही सांगितले. ती म्हणाली बदनामीच्या भितीन मी गप राह्यली. अन मले आशा भी होती. का परतून येईन, अन रागबी होता. म्हणल जावूदे गेली हाय तर, कुठबी राहो सुखी राहो. पण मले जसच माहित झाल का थ्यो पोरगा बालीले ईकणार हाय, तशिच मी तुमच्याकड धावत आली. मी तिला धीर देवून माझ्या मिस्टरांना ही गोष्ट सांगितली व मी पण तिला घेवून तडक पोलीस स्टेशनला गेली. रितसर कंप्लेंट दर्ज केली, पोलीस कार्यवाही ताबडतोब कामी लागली, तब्बल दोन तासात त्या मुलाला व बालीला पोलीस स्टेशनला आणले ,तशीच एका पोलीस इन्पेक्टरने त्या मुलाच्या थोबाडित चपराख दिली. तशिच बाली कळवळली व म्हणाली त्यानले नोका मारूजी मले मारा. सारा गुन्हा माह्याकडून झाला आहे. मग परिस्थीती पाहाता इन्पेक्टरने समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले गुन्हा झाला आहेना तुझ्या हातून मग का केलेस तु असे. न सांगता का केले त्याच्याशी लग्न ? बाली एकदम चुप बसली. तेव्हा इन्पेक्टरने त्या मुलाची पुर्ण माहिती बालीला दिली. तरी बाली त्याचाच पक्ष घेत होती, पर्याय म्हणुन त्या मुलाच्या पत्नीला बोलवण्यात आले. तिने सोडचिठ्ठी द्यायला नकार दिला आणि म्हणाली कसाही राहो माह्या लेकराईचा बाप हाय, मी मजूरी करून पोसून घेईन लेकराइले. पण याले फारकत देणार न्हाय.
नंतर बालीला एंकातात नेवून इन्पेक्टरने समजवल , की आता तू त्या मुलाची रखैल होवून राहणार आहेस काय ? तुला त्याने लग्नाचे आमिश दाखवून तब्बल दहा दिवस नेवून ठेवले ,मग लग्न का नाही केले. त्याची अशी लग्न करायची इच्छा होती व तो तुझ्यावर खरच प्रेम करत होता तर त्याने लग्न का नाही केले आणि तुला अस लपवून का ठेव. अश्या एखाद्या मंदिरात हार टाकले म्हणुन लग्न झाले का ? त्याने टू व्हिलर विकून खोलीचे भाडे दिल ,यानंतर तुझे भरण पोषण कसा करणार तो ? तिकडे त्याची पत्नी शेतात मजूरी करून लेकर पोसत आहे. तुला तो धंद्यावर लावणार ही गोष्ट त्याच्या मित्राकडून कळली, बाली तुला हे सर्व आवडेल काय? इन्पेक्टरने तऱ्हेतऱ्हेने तिला समजवल ,अनेक उदाहरण दिलेत. तेव्हा बालीची बोलती बंद झाली. वाळलेल्या खोडासारखी खाडकण ढासळली. ती दोन दिवसाच्या प्रेमासाठी,आईवडिलाच्या प्रेमाला ठोकर मारणार होती. ही गोष्ट त्या भोळ्या भाबड्या आईवडिलांना किती पचनी पडली असती , बिचारे मंदिरात दिवसरात्र पुजा अर्चना करणारे , त्यांची अशी का परीक्षा बघावी. यातून ते बाहेर पडले, बालीच्या डोळ्यावरची पट्टी उतरली, तिला घरी आणुन लगेच मावशीकडे नेवून ठेवली, छानसा मुलगा भेटला तिच लग्न करून दिले. ती सुखाने तिच्या सासरी नांदत आहे. तिला दोन मुले आहेत प्रेम करणारे लोक आहेत. सुखी संसार करते आहे. जर का ती आली नसती इकडे तर तिची काय दैना झाली असती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या तरून मुलामुलिंनी जपून वागायला पाहिजे. नाहीतर अख्खी जिंदगी नरकवास भोगावे लागतात. जन्म देणारे आईवडिल तुमचे दुष्मन नसतात, त्याना धोक्यात ठेवने म्हणजे पुर्ण जगाला व देवाला सुद्धा धोका देणे आहे.