Neha Ranalkar

Inspirational

4.8  

Neha Ranalkar

Inspirational

पणतीची करामत

पणतीची करामत

3 mins
755


     आज स्वप्निल मित्राने पाठवलेला निकाल पाहून पार कोलमडून पडला. तो अभियांत्रिकीच्या पदवीका परिक्षेच्या शेवटच्या सेमीस्टरला एका विषयात अनुत्तीर्ण झाला होता. आईवडील व एक बहीण अशा चौकोनी कुटुंबात तो वाढत होता. त्याचे वडील रोजंदारीवर काम करत तर आई चारघरी धुणीभांडी!तशाही परीस्थितीत ते त्याच्या लहान बहिणीला,आशाला व त्याला शिक्षण देत होते. स्वप्निलला क्षणभरासाठी पाया खालची जमीन सरकल्याचा भास होऊन तो निराशेच्या गर्तेत ढकलला गेला. सा-या घराच्या आकांक्षा पूर्ण करण्यात तो आज अयशस्वी ठरला होता. कसाबसा संसाराचा गाडा रेटत आपला लेक यशस्वी होईल व चांगल्या प्रकारे नोकरीला लागेल व आपल्या खांद्यावरचा भार थोडासा हलका होईल या एकाच आशेवर ती दोघे पोटाला चिमटा देऊन राबराब राबून दोन्ही पाल्यांना शिक्षण देत होती. अगदी याच आशेवर स्वप्निलही परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न पूर्वक मेहनत घेत होता. सा-या नकारात्मक विचारांनी तो हताश होऊन गेला. त्यावर अखेरचा उपाय म्हणून आत्महत्येचा विचारही त्याच्या मनात आला.त्याचे पाय लटपटायला लागले, छाती धपापू लागली कपाळावर घर्मबिंदू जमून, घशाला कोरड पडली. क्षणात तो त्या विचारांतून बाहेर आला. वडील घरी नव्हते. त्यात आशाही आईसह शहरात काही खरेदी करण्यासाठी गेलेली. घरी तो एकटाच!निराशामय विचारचक्रांत गुंतलेल्या स्वप्निलला जोरदार वा-याने वीजपुरवठा खंडीत कधी झाला ते देखिल समजले नाही. संध्याकाळ नंतर घरात पूर्ण अंधार झाला याचेही भान त्याला उरले नव्हते. 

   सात वाजले तशी दरवाजातून आई व ताई घरात आल्या दरवाजा पूर्ण उघडा,घरात मि्ट्ट काळोख पाहून त्यांच्या उरात एकदम धस्स झालं.त्यांनी मोठ्या आवाजात स्वप्निलला आरोळी दिली. त्यासरशी तो गोंधळून उठून बसला.आईला काही कळेचना. ती जवळ जाऊन लेकराला काही झालं तर नाही ,म्हणून त्याच्या कपाळावर हाताचा स्पर्श करीत काकूळतीने त्याची सर्व विचारपूस करू लागली. घरात व देवासमोर अंधार पाहून आशानं कोनाड्यातली पणती घेऊन त्यात कापसाची वात व दिव्याचे तेल टाकून आगपेटीनं ती पेटवली व देवासमोर चौरंगावर ठेवली.त्यासरशी ती छोटी खोली देव्हा-यासह प्रकाशात न्हाऊन निघाली.एवढयाशा त्या पणतीने काळोखावर केलेली ही मात पाहून स्वप्निलला स्वत:चीच लाज वाटू लागली. दरम्यान त्याचे वडीलही घरी परतले, त्यांना पाहून स्वप्निलला रडूच कोसळले. स्फूंदुन स्फूंदुन रडतच तो स्वत:च कसा कुचकामी ठरला व नापास झाला म्हणून स्वत:लाच दूषणं देऊ लागला! त्याचा असा अवतार पाहून त्याची समजूत काढावी का स्वत:ची हे न समजल्यामुळे त्याचे पालक निशब्द, स्तब्धच होते. 

   आत येणाऱ्या वा-याच्या झोतातही स्वत:ला तेवत ठेवण्या-या पणतीच्या ज्योतीची ती धडपड आशा न्याहाळत बसली होती.ते दृष्य पाहून तिला अचानक काहितरी सूर गवसला. नेहमी घरात हसतखेळत बागडणारा, कुठल्याही शिकवणी शिवाय मेहनतीने, बेताच्या आर्थिक परिस्थितीतही परिक्षेत यश मिळवण्यासाठी धडपडणारा, समजूतदार असा तिचा दादा यापूर्वी इतका हतबल झालेला तिनं कधीही पाहिलेला नव्हता. ‌ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर थोपटत त्याला पणती कडे बोट दाखवून म्हणाली,"दादा!, बघ त्या इवल्याश्या पणतीकडे! तिनं तिच्या कुवतीनुसार घरातला अंधार नाहीसा केला आहे.आतापण वा-याने विझू नये म्हणून स्वत:ला वाचवण्यासाठी ती कशी झुंज देत आहे बघ की जरा! निर्जीव अशा या पणतीत देखिल अस्तित्व जपण्यासाठी एवढी धडपड व चिकाटी! आपण तर सजीव शिवाय बुद्धिमान माणसे!आपल्या अंतरंगातली जिद्दरुपी संजिवक,आश्वासक, ज्योत आपण नको का जागवत ठेवावयाला?आपणही अपयशावर मात करण्यासाठी लढा नको का द्यायला? तूच ना रे लहानपणी मला षट्पाद असा कोळी दाखवुन बडबड गीत शिकवलं! मला ते आजही स्मरणात आहे.

  रमतगमत कोळी भींतीवर चढे

  भिजत पावसाने खाली तो पडे!

  सुखद जमीन सारी ऊन ते पडे

  रमतगमत कोळी परत वर चढे!


  तुला आवडत असलेली ती कविता, "कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती," इतनी शक्ति हमे देना दाता,मन का विश्वास कमजोर हो ना "हे इतक्यातच विसरलास? अरे तु आई-वडिलांना समजवायला हवं की त्यांनी तुला? तु पुन्हा प्रयत्नपूर्वक परीक्षा दे माझी पूर्ण खात्री आहे तू नक्कीच यशस्वी होशील ! सावर बरं स्वत:ला! उगाच रडून,हतबल होण्यापेक्षा निश्चयपूर्वक अभ्यास करून जिद्दीने परीक्षा दे पाहू!मग यशोमाला तुझ्याच गळ्यात पडते की नाही बघ! "

    आपल्या पेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या बहिणीच्या या सुज्ञ अशा बोलांनी स्वप्निल स्तंभितच झाला.तिच्या त्या समजूतदार, धीरोदात्त विचारांनीच तो प्रभावित झाला. पणतीकडे पाहून व बहिणीच्या सकारात्मक अशा प्रेरणादायी उदाहरणांनी प्रेरीत होऊन तो तडक आई-वडिलांना बिलगून त्यांची माफी मागू लागला व पुन्हा नव्या दमाने परीक्षा देण्यासाठी तो तयार असल्याचा त्याचा निर्णय त्याने सांगितला तत्पूर्वीच आशाच्या त्याआशादायी बोलांनी आईवडील चांगलेच भारावून गेले होते.शिवाय आता स्वप्निलही पुन्हा पूर्ववत झालेला पाहून त्यांना थोडे हायसे वाटले! त्या दोघा समंजस पोरांना त्यांनी ममतेने थोपटीत अलगदपणे आपले साश्रू नयन टिपले .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational