vaishu Patil

Drama Tragedy Children

4  

vaishu Patil

Drama Tragedy Children

पण, माझा विचार कोणी केला का?

पण, माझा विचार कोणी केला का?

6 mins
421


   विभा एकटीच उभी होती किचनमध्ये, भात, आमटी, भाजी बनवून झाली होती.. फक्त चपात्या तेवढ्या बनवायच्या राहिल्या होत्या ... ओट्यावरचा सगळा पसारा आवरून तिने चपात्या बनवण्यास सुरवात केली ...बाहेर हॉल मध्ये घरातील सगळ्यांचा आवाज ऐकू येत होता .. मुलांची दंगा, मस्ती चालली होती ... मोठ्या माणसांचं काहीतरी बोलणं चाललं होतं ...


चपाती लाटता लाटता .. पोळपाटावरती लाटलेली चपाती ओली झाली ...कणकेत चवीसाठी मिसळलेल्या मिठात, तिच्या डोळ्यांतले क्षारही त्या चपातीत मिसळत होते .. तिने हलकेच पदराच्या एका टोकाने आपले ओले डोळे कोरडे केले .. आणि ती लाटलेली चपाती बाजूला ठेवून दुसरी लाटायला घेतली .. तसंही इथे कोण होतं जे तिचं अश्रू पुसणार होतं , या तिची विचारपूस करणार होतं तसंही इथे तिच्या अश्रूंना कवडीमोलाचीचं किंमत होती ..

कारण , तिच्या जीवनात साखरेच्या गोडीपेक्षा मिठाचा खारटपणाचं जास्त होता ... असं समजा की तोच खारटपणा ती आपल्या अश्रू द्वारे रिता करत असेल .. पण कोणाला कळू मात्र देत नव्हती ..कारण .. अश्रू आणि दुःख या दोन्ही गोष्टी तिथेच व्यक्त केल्या जातात ,जिथे खरंच त्याची किंमत असते ... पर्वा असते..


   कोणीतरी आपल्या दुःखचं हसू करण्यापेक्षा, ते दुःख त्या वेदना आपल्या जवळच ठेवलेल्या बऱ्या ... विभाचं ही असंच होतं .. घर माणसांनी भरलेलं होतं पण तिचं असं त्या घरात कोण नव्हतं ..जे तिला समजू शकेल ...तिच्या भावना , तिचं दुःख समजू शकेल .. ना तिचा नवरा .. ना तिची स्वतःची पोटची दोन्ही मुलं .. 


     त्यामुळे ती सहसा आपले अश्रू आपल्यापर्यंत चं ठेवायची ... बिचारी गरीब गाय ..त्यामुळे सगळे तिचा फायदा घ्यायचे.. एकत्र कुटुंब .. सासू सासरे .. नणंदा .. दिर .. जावा .. त्यांची मुलं .. हिची मुलं .. हिचा नवरा .. 


       तसं घरी नणंदा, सासू-सासरे आणि विभाचं कुटुंब म्हणजे तिचा 10 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी .. आणि नवरोबा .. एवढीच माणसं असतं ... पण अचानक आलेल्या कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे भारतीय सरकारला नाइलाजाने सम्पूर्ण भारत बंद करावा लागला ..अगदी बंद म्हणजे कोणीही घराच्या बाहेर देखील पडायचे नाही ... हे लॉक डाऊन ची पुसटशी हालचाल कळताच .. इकडे सासू सासऱ्यांकडे रहायला यायचं म्हणल्यावर नाक तोंड वाकडं करणाऱ्या सुनांनी म्हणजे विभाच्या दोन्ही जावांनी आपापल्या नवऱ्यांच्या मागे गावी यायचा तगादा लावला .. कारण शहरात राहणं जास्त धोक्याचं होतं ... गाव म्हणजे अगदी गावचं म्हणावं असं नव्हतं ते .. चांगलं सुधारलेलं होतं .. मिनी शहर म्हणा हवं तर ... फरक फक्त एव्हढाच की मुंबई पुण्यासारखं मोठं नव्हतं .. 


        विभा लग्न करून सासरी आली . नव्याचे नऊ दिवस सरले .. प्रत्येकाने आपापल्या ढोलीतून डसणारे फन बाहेर काढण्यास सुरवात केली .. खाऊ की गिळू अशी नजर असायची प्रत्येकाची तिच्या कामाकडे .. दुसऱ्या घरची मुलगी आपल्या घरी सून म्हणून आली की तिने फक्त सासरच्या लोकांपुढे फक्त हांजी हांजी चं केलं पाहिजे . उठ म्हणेल तिथं उठ ..बस म्हणेल तिथं बस ... प्रत्येकजण आपापल्या परीने तिला जास्तीत जास्त त्रास कसा होईल याची तसदी मात्र चांगली घेत असतो .. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही तिच्या चुका काढणं .. तिला बोल लावणं ... अरे , पण ती नवखी पोरं ...लग्न करून जरी आली तरी कितीही केलं तरी परक्या सरखाचं घर ते तिच्यासाठी , तिथे रुळायला ,रमायला , कामांना ,माणसांना समजून घ्यायला तिलावेळ द्याल की नाही ... की कामाचा रहाटगाडा तिच्या मागे लावणार तुम्ही ..   


   विभाही अशाच काहीशा मनःस्थितीच्या लोकांत फसली होती ... आणि तिला ते सहन करणं , सोसण नाईलाजास्तव भाग होतं ... असं नव्हतं की तिचा नवरा सुशिक्षित नव्हता ...किंवा त्याला चांगली नोकरी नव्हती ... पण " जसं पेरालं तसं उगवतं " या म्हणी प्रमाणे तो देखील घरच्यां प्रमाणे .. कठोर .. तिला कधी समजूनचं नाही घेतलं त्याने ..


   ती मात्र काटेकोरपणे आपल्या पत्नी, सून होण्याची सर्व जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडत होती ... सासू सासर्याना अगदी सकाळच्या चहा पासून ते रात्रीच्या जेवणाच्या ताटापर्यंत हातात नेऊन द्यायचं ... शहरातल्या लेकांच्या बायकांपुढे हांजी हांजी करणाऱ्या सासूबाई, धाकली सूनबाई घरात आली नि सासूबाईंनी बाहेरच्या सोफ्यावर आपली जागा मुक्कामी केली .. अगदी इकडचा तांब्या तिकडे करायचंदेखील बंद झालं ....


    दोन्ही नणंदा एक कॉलेज तर एक कसलासा कोर्स करतेय म्हणून दिवसभर घराबाहेर ... सकाळच्या चहा नाष्ट्यापासून , दुपारचा टिफिन ,ते रात्रीच जेवण ...वहिनी होती की त्यांची सेवा पुरवायला .. नवरोबा ही तसेच ... सगळं वेळच्या वेळी हातात हवं ,अगदी पाण्याचा ग्लास सुध्दा ...जर विभा काही करत असेल तर ...मग राहूदे गं ..! मी घेतो ..तू बस ..तू जेव .. जरा आराम कर .. असले शब्द कधी तिच्या नवऱ्याच्या तोंडून आले नाहीत .. विभा काहीही करत असली तरी ,आदी उठ नि माझं काम कर ..असा धाकात ठेवणारा तिचा नवरा ...मग मुलंही तेच शिकलीत ..


   पोराला कधी कुठलं काम सांगितलं आणि आईचं काम त्याने ऐकलं असं कधीचं होणार नाही ... एकचं आशा होती तिच्या मनात तिची मुलगी ती तरी समजेल तिला मोठी झाल्यावर ... असं म्हणत तिला जवळ घेतल्यावर आपोआप विभाच्या डोळ्यातून पाणी घरंगळायचं ..  ती चिमुकली , आपल्या चिमुकल्या हातांनी आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत विचारायची देखील मम्मी काय झालं , तू का रडते ? पण विभा काही नाही म्हणत ,आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत .. लटकेचं हसायची नि म्हणायची काही नाही झालं बाळा ...ते असंच पाणी येतंय डोळ्यातून ... ती चिमुकलीही मग आईच्या गालाचा गोड पापा घेऊन हलकेच हसायची ...


       त्या ही दिवशी असंच झालं ...ही सगळी मंडळी येऊन 2 दिवस झालेले ... सगळ्याजणी घरीच होत्या ..पण कोणी म्हणून विभाच्या कामात मदत नाही केली .. अगदी चहाचा कप देखिल कोणी उचलत नव्हते .. दिवसभर चहा ,नाश्ता ,जेवण ..भांडी .. कपडे ..उरकते ना उरकते तोच .. रात्रीच्या जेवणाचं टाइम ...   सासूबाई ...मी तर सगळ्यांची सासू ..मी का म्हणून करु काम .. ह्या मताची ..   नणंदा ... सासरी गेल्यावर करायलाच लागणार आहे, मग इथे आम्ही का करू .. ह्या मताच्या .. आणि जावा ...आम्ही तर चार दिवस रहायला आलोय बाई इथं .. आम्ही का म्हणून करायचं काम या विचाराच्या ...


राहिलं कोण मग विभा एकटी .. ती कोणाला सांगणार ... सून म्हणून.. सगळी जबाबदारी तिची ...तिने कोणाला सांगायचं .. तिला येत नसेल का कंटाळा या दिवसभराच्या उचापती काढून ..तिला नसेल का वाटत, आपल्याही थोडी मोकळीक , कामातून थोडा आराम मिळावा .. कोणीतरी जास्त नाही निदान थोडीतरी मदत करावी .. मान्य आहे स्त्रियांचं कर्तव्य आहे ...हे सगळं करणं .. घरातील लोकांना हवं नको ते बघणं ... (असं काही थोरा जणांचं मत)   पण , तिला कोण विचारणार .. तिला येत नसेल का कंटाळा ... 


शिवाशिव .. देवाला चालत नाही, अशात हात लावलेलं ..तू बाजूलाच बस .. मी करेन दोन चार दिवस असं म्हणणाऱ्या सासूबाई .. जेव्हा कामाचा ताण पडू लागला ..तेव्हा हे सगळे शिवाशिव, छुआछुत सगळं धाब्यावर बांधलं नि विभाला त्या दिवसात घरात कामाची मुभा दिली ...पण दोन मुलांना जन्म, वाढत वय ... शरीराची न घेतली जाणारी काळजी .. पोटात वेळेवर न पडणार अन्न .. घरातील कामाचा एकटीवर पडलेला भार ... पुरती कोलमडून गेलेली होती विभा .. त्या रात्रीही ती चपात्या बनवत असताना ...तिचा रजोमास चालू होता .. असह्य वेदना, दिवसभरच्या कामाने थकलेलं शरीरं .. आणि पुढ्यात अजून उरलेल्या कामाचा ढिग .. शरीरातलं उरलं सुरलेलं सगळं त्राण एकवटून ती .. हाती आलेलं काम संपवायचा प्रयत्न करत होती ... शरीरातील शक्ती जरी एकवटत होती तरी मन मात्र पुरतं घायाळ होतं तिचं .. आणि तेच डोळ्यातील अश्रूंद्वारे बाहेर ओसंडत होतं ...की, का नाही माझी काळजी कोणाला ...

  का नाही माझी पर्वा कोणाला ...

  मान्य आहे आम्हां स्त्रियांचं हे कर्तव्य आहे .. पण कधीतरी आम्हालाही मिळुद्या विसावा ..

  जीव मलाही आहे ...

  मन मलाही आहे ....

  पण, माझा विचार कोणी कधी केला? कधीच नाही..

  ...कधीच नाही..


विभाला माहीत होतं ...मी कितीही त्रासात असले तरी माझे अश्रू कोणीच पुसणार नाही ... ते मलाच पुसायला हवे ... आणि माझ्या कर्तव्यासाठी असंच खंबीर रहायला हवं .. शेवटपर्यंत ...

..................

टीप - या कथेद्वारे कोणाचं मन, भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नाही ..पण ही खरचं समाजातील सत्यता आहे .. अगदी तुमच्या आमच्या घरात .. हो ना ..! दहात एखादं कुटूंब असं असतं जिथे घरातील स्त्रिया, त्यांचं काम, त्यांच्या भावना .. आदर केला जातो .. आणि कमीपणा न वाटून घेता, त्यांच्या घरकामात मदतदेखील केली जाते, आणि खरंच हे वाईट किंवा लांछनास्पद बिल्कुल नाही ... जी स्त्री आपल्यासाठी करते, ती आपलीच आहे, मग तिच्यासाठी थोडं केलं तर मुळातच काही बिघडत नाही ...बर काही करायचं राहू द्या ... मोकळ्या मनाने तिची ...विचारपूस तर कराल ... तेवढं केलंत तरी तुम्ही जिंकलात ...स्वतःला ही आणि त्या घरच्या आपल्या कर्तीलाही ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama