STORYMIRROR

vaishu Patil

Tragedy

4  

vaishu Patil

Tragedy

मी मुडक्या संसाराची लाज टाकली (भाग 1 )

मी मुडक्या संसाराची लाज टाकली (भाग 1 )

5 mins
346

डोळ्यातून पाण्याची धार चालूचं होती तिच्या. एका हाताने डोळे पुसत होती आणि दुसऱ्या हाताने मनात नसतानाही कपाटातून बाहेर काढलेले कपडे बॅग मध्ये भरत होती .

"वसुधा " तिचं नाव . नावाप्रमाणेच सालस ,गुणी , शांत अशी ती वसुधा . कोणी कितीही त्रास देऊ देत कोणालाही एका उलट शब्दाने उत्तर न देणारी ती . मनमिळावू , आपल्या प्रेमळ बोलण्याने लगेच सगळ्यांना आपलंसं करवणारी ती ..     त्यादिवशी मात्र सीमा झाली होती ,प्रत्येकाच्या वागण्याची . किती दिवस सहन करायचं तिने . तिनेही ठरवलं होतं मग . बस झालं आता ,खुप सहन केलं , आपल्या एकुलत्या एक मुलासाठी , वडील नाहीत ,पण आजी आजोबांचं तरी छत्र हरवू नये म्हणून आपण सर्वकाही सोशित इथं राहिलो पण आता नाही ... झालं ते खूप झालं आता मी सहन नाही करणार .

असं मनाला समजावत ,ती आपली आणि आपल्या मुलांची एक एक कपडे बॅग मध्ये भरत होती .

छोटासा तो ' अनुज ' बाहेरून खेळून नुकताच आला होता .त्याला कोणीतरी सांगितलं होत की तुझी आई खुप रडतेय ,घरातील सगळेजण तिला ओरडतायतं. हे ऐकून तो आपला अर्धा खेळ सोडून घरी पळत पळत आला होता आपल्या आईला काय झालं हे बघण्यासाठी .


आईला बॅगेत कपडे भरताना पाहून अनुज थोडं गोंधळला, त्याला समजेना आई आपले कपडे बॅगेत का भरतेय , सुट्टी पण अजून खूप लांब आहे मामाकडे जायला.. मग आई अचानक का बॅग भरतेय . त्याने आधी तिला जाऊन मिठी मारली आणि प्रेमाने तिचे डोळे पुसले, आणि त्याने विचारलं "आई का ललतेयसं गं तू " ? अशी नको ना ललत जाऊ , मग तू ललली की मला पण ललू येत .  चार पाच वर्षांचं ते पोर ,ज्याला अजून "पप्पा " , "बाबा " या शब्दाचा नीटसा अर्थ देखील कळला नव्हता ,त्याच्या डोक्यावरून बाप नावचं छत्र हिरावून घेतलं होतं त्या विधात्याने .. ज्याला पोटभरून प्रेमही अनुभवता आलं नव्हतं आपल्या बाबांचं , ते छोटंसं बाळ ..पोरकं झालं होतं . आपल्या बाबांना .....


निमित्तमात्र झालं काविळीचं ... घरच्या काळजीपोटी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देणारा तो मानस ... काम काम नि फक्त काम ... जिथे जाईल तिथे कधी कोणाला एका शब्दाची देखील चुकी भेटणार नाही असं त्याचं काम ... स्वतःच्या हिमतीवर BST मध्ये नोकरी मिळवली त्याने .. नुकता महिना चं झाला होता त्याला नोकरीत पर्मनंट होऊन .. हे सुखही देवाने त्याला पचू दिले नाही ... नोकरीत पर्मनंट झाल्यावर महिन्याभरातचं काळाने घाला घातला त्याच्यावर .


कामाच्या ध्यासापुढे शरीरात ताप मुरलेला कळलचं नाही मानसला . आणि ताप पुढे बळवून काविळीमध्ये रूपांतरित झाला . जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा वेळ मात्र निघून गेली होती . शरीरातील पांढऱ्या पेशींच प्रमाण खूप कमी झालं होतं . उपचार चालू होते पण उपचारांचा काही फायदा नाही झाला ..


आणि वसुधापासून तिचा मानस हिरावला गेला . अवघ्या तीन वर्षाचा संसार मानस-वसुधाचा ...उभं अख्ख आयुष्य एकटीला जगण्यासाठी सोडून गेला तो .. नियती देखील असं वागते , शेवटचे क्षण देखील वसुधा जगू शकली नाही तिच्या मानस सोबत , प्राणज्योत मालवली त्याची दुसऱ्या कोणाच्या तरी मांडीवर ,तो असताना ती शेवटचं मन भरून बघू ही शकली नाही त्याला .. तो तिकडे शहरात आपल्या नोकरीसाठी . आणि ही गावी सासरी ' अनुज ' लहान असल्यामुळे ..   " संक्रांतीचा सण " नटूनथटून बसलेली वसुधा .. घरातील सगळ्याजणी आपापल्या गडबडीत .. कोणी मंदिरात जायच्या तयारीत ,कोणी कुंकुवाचा करंडा तयार करण्याच्या गडबडीत ... सगळ्या सुहासिनी जमल्या की हळदी कुंकूवाला गडबड नको व्हायला म्हणून ... तेवढ्यात फोनवरून बातमी आली ... मानसची ...


तेव्हापासूनची येणारी प्रत्येक संक्रांत ,कुंकवाचा लाल आणि साडी बांगडी चा हिरवा रंग ... वसुधाच्या आयुष्यातून काढून घेऊन निघून गेली ती कायमचीचं...


वीस बावीस वर्षाची ती कोवळी पोर .. पदरात एक मूल .. ठेवून ,, सोडून निघून गेला होता तिचा प्रियकर तिला . ज्याच्याबरोबर सात जन्म साथ रहायची वचनं घेतली होती .. ज्याने आयुष्याचा प्रत्येक क्षण सोबत जगायचं ठरवलं होतं ,तोच अर्ध्यात सोडून गेला होता ... तिला एकटीला या स्वार्थी जगात ठेवून ....


या अचानक चालून आलेल्या दुःखाने वसुधा पुरती खचून गेली होती . तिची जगण्याची इच्छा संपल्यात जमा होती कारण आयुष्याला साथ देणारा साथीदार तिने गमावला होता . तिच्या वयात मुली अजून आपल्या आई वडिलांच्या घरी हसत खेळत होत्या . शाळा कॉलेज शिकत होत्या . त्याचं वयाच्या वसुधाच्या नशिबी मात्र एकटेपण आलं होतं . समाजात ज्या स्रियांना काडीमात्र ही स्थान नसतं असं विधवा जगणं आलं होतं . सर्व रंगच जणू काही हिरावून घेतले गेले होते तिच्या आयुष्यातून , पण तिच्या एकुलत्या एक मुलासाठी तिला जगणं भाग होत .


ती एकच अनंत काळासाठी साथ देणारी तिच्या नवऱ्याची आठवण होती . तिचा 'अनुज '

आई वडिलांची ही परिस्थिती बेताचीच ... वसुधाने उगाच आपल्यामुळे आई वडिलांना त्रास नको म्हणून , उर्वरित आयुष्य सासरी राहण्याचाचं निर्णय घेतला . सासरचे तसे बरेच होते . रांधा वाडा ,उष्टी काढा ... या उक्तीप्रमाणे बिनपगारी मोलकरीण बनवून ठेवली होती वसुधाला त्यांनी .. अगदी गाई - गुरांपासून ते शेतातील मजुरीपर्यंत तिला कामाला लावलं जायचं . मुळातच गरीब स्वभावाची वसुधा .. शांतपणे सहन करायची सगळं , आपल्या मुलासाठी ... आपल्या मोडलेल्या संसारासाठी ...कारण इथेच तर तिच्या आठवणी होत्या . तिच्या पतिशी जोडलेल्या . त्या कडू गोड आठवणीच तर होत्या ज्यामुळे तिला जगण्याचं बळ मिळत होत . त्यामुळे कितीही त्रास झाला तरी सासर सोडून जाण्याचं तिचं मन नाही व्हायचं . नवऱ्याच्या आजारपणातल्या गोळ्यापासून ते गळ्यातल्या मंगळसूत्रापर्यंत सगळं काही जपून ठेवलं होतं तीनं ... नवऱ्याची आठवण आली की त्या अर्ध्या संपलेल्या गोळ्यांची पाकिटं आणि ते अभागी मंगळसुत्र हातात घेऊन एकटीच रडत बसायची बिचारी ,आपल्या कायमची साथ सोडून गेलेल्या नवऱ्याच्या आठवणीत ...          मग त्यादिवशीचं अस काय झालं , की वसुधा अचानक राहत घर सोडून जाण्यास हतबल झाली ..   


 क्रमशः ...


( सत्यघटनेवर आधारीत कथा आहे ही .. खुप वाईट वाटत कोणाला अस दुःखात बघताना खासकरून जर ती आपल्याच वयाची समवयस्क स्त्री असेल ... मन हेलावून जात .. पण सलाम तिच्या जिद्दीला .. एवढं मोठं संकट ,एवढं मोठं दुःख येऊनही ती ढळली नाही एकदाही हिमतीने उभी आहे ,येईल त्या सुख दुःखाचा सामना करण्यास ...आपल्या मुलाला सोबत घेऊन )


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy