पंचक४
पंचक४


भाग::-- चौथा
मावशी गेल्याच कळताच अंतूला गरगरायला लागलं.पाच वर्षांपासून सारं मागे टाकून आलेल्या अंतूच्या ह्रदयात आई च्या ठिकाणी मावशीच होती. लहानपणी मावशीनं आपली आभाळ होऊ दिली नाही हे त्याला आठवलं. त्यानं बाॅसला भेटत अजंती धरणाची साईडवर जाण्याचं पक्कं केलं व मावशीबाबतही कळवलं.
पिना व तो तारणीकडं निघाले. पण तो पावेतो बारा वाजले. मध्येच रस्त्याचं काम चालू असल्यानं व अपघात झाल्यानं ट्रफिक जाम झाली. दोन्ही बाजूस सहा सात किमीच्या रांगा लागल्या. तारणीस पोहाचणं शक्य वाटेना. तेथेच त्यांना मावशीस अग्नी देत उरकल्याचा फोन आला. आपल्यासाठी मावशीस थोडा वैळ तरी ठेवणारं तारणीत कोणीच नाही याचं अंतूला वाईट वाटलं व काळजात कळ उठली. सहा वाजेला रस्ता सुरळीत होऊन ते रवाना झाले.जिल्ह्यात यायला त्यांना दहा वाजले. पिनानं वडिलांना फोन केला.तारणीतलं वातावरण बघता व वच्छा ताई तर गेल्याच आहेत म्हणून सुंतीला विचारत दत्ताजीनं त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी सुंतीच्या घरीच रात्र काढायला लावली.
सकाळी नऊ वाजता अंतू तारणीत आला. पाच वर्षात हवेलीत बरेच बदल जाणवत होते. जी हवेली आपली होती ती आता परकी भासत होती.सज्जात खुर्चीवर रांगेत जया, मावशी व लहान मुलाचा फोटो ठेवलेला.अंतूला मावशीचा फोटो पाहताच कालवून आलं. वय झालं असलं तरी आईसारखं सांभाळणाऱ्या माऊलीचं अंतिम दर्शन होऊ शकलं नाही याचंच वाईट वाटलं. त्यानं कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रितीनं डोळ्यात तरळणारे थेंब पुसले. लहान मुलाचा फोटो पाहताच त्याला अचंबा वाटला. अंदाजानं हा सुंतीचा मुलगा हे त्यानं ताडलं पण आपल्या वालेट मध्ये असलेल्या लहानपणी मावशीनं यात्रेत काढलेला आपलाच फोटो ठेवलाय असंच त्याला वाटलं.आपणाशी साधर्म्य?
सया जवळ बसलेला पण अवाक्षर बोलला नाही. अंतूला आपण उगाच आलो की काय असंच वाटू लागलं.तोच दत्ताजी व सदा सर आले.त्यांना पाहताच सयानं उठत अंगणाकडं पचकन थुकलं. अंतूला आतून बोलावणं आलं.तो आत जाऊ लागताच दत्ताही मागोमाग उठत जाऊ लागला.
" भटजी बसा! आत तुमचं काय काम! त्याचे जुने संबंध असल्यानं तो आत चाललाय, तुमचं कोण आहे आत एवढं लगबगीनं जायला?" सयानं विखार ओकत बोलताच दत्ताजी वरमला.
अंधाऱ्या खोलीत सुंती बसलेली. अंतूला पाहताच बांध फुटला. अंतूस तो बांध जयासाठी वाटला. पण सुंतीलाच माहित असावं तो बांध नेमका बाल्या साठी होता की अंतूसाठी की मावशीसाठी की तिच्या अस्थिर जिवनासाठी? बराच वेळ तसाच गेला. अंतूला पाच वर्षात पुलाखालून इतकं पाणी वहावं की रडणाऱ्या सुंतीचं सांत्वन कसं करावं हे आपणास कळू नये,याचं आश्चर्य वाटलं.
"अंतू.....!"
"............"
" आलास खूप चांगलं झालं. आता निवांत थांब. खूप काही सांगायचंय तुला. इथं खूप काही घडतंय! आता या घडीला सांगणं गरजेचं असलं तरी इथल्या भिंतीला देखील कान आहेत. मी लवकरच भेट घेतेच तुझी जिल्ह्याला घरी. तरी दत्ताजी व सदा सरांना भेट. ते सांगतीलच तुला"
" आता सांगण्यासारखं काय राहिलंय हिच्याकडं! जे होतं ते सारंच संपवल्यावर!" अंतू मनात चरफडला.
क्षणीक अंतराळ त्याला युगासमान भासू लागला. लवकर सुटका व्हावी म्हणून मुलाच्या दु:खाचं सांत्वन करण्यासाठी सुंती जवळ येत अंतूनं हात हातात घेतला. पाच वर्षात प्रथमच असा परपुरुषाचा स्पर्श तिला जाणवला. दुष्काळात थोड्याशा थेंबानं भुईत मृदगंध दाटावा तसाच.
अंतूला तिथं थांबणं अवघड वाटू लागलं. दत्ताजीनं सदा सरांसोबत त्याला आपल्या घरी नेत जेवणाचा आग्रह केला. वच्छाताईची इच्छा व जमिनीबाबत करावयाच्या साऱ्या बाबी सांगितल्या.
"अंतू पोरा! सुंतीवर अन्यायच झालाय रे! हळदीच्या डागावर ती बसलीय.नी आता तर तिच्या आयुष्यात पोकळीचं विवरशिवाय काहीच नाही.
अंतूचा श्वास वाढू लागला.जीव गुदमरू लागला.जमीन, सुंती या बाबीत त्याला आता अजिबात स्वारस्य वाटेना.या साऱ्या गोष्टी त्यानं पाच वर्षांपूर्वीच पुसून टाकल्यामुळं हो ला हो करत तो तेथून केव्हा निसटावं याच विचारात होता. त्यानं रजा घेत तिथूनच चार पाच किमी अंतरावरील अजंती साईडवर गाडी दामटली. साईडवर तीनेक वर्षांपासून काम चालू होतं.तेथे कंपनीनं निवासासाठी क्वार्टर्सची सोय केली होतीच. ज्यु. इंजिनीअर्स ना घेत त्यानं सारी साईड पाहत माहिती घेतली धरणाखाली व बॅक वाटरखाली जाणाऱ्या क्षेत्राचे वाद चालू होते.लोकांना भरपाई अधिक हवी होती शिवाय पुनर्वसन या सारख्या सरकारी बाबी होत्या. त्या सरकारी अधिकारी पाहतच होते.पण त्यामुळं यांच्या कंपनीस काम करण्यात अडथळे होत होते.त्यानं सारे डिटीयल्स घेत अंधार पडायच्या आत तेथून पुण्याकडं रवाना झाला. प्रवासात त्याच्या डोक्यात सुंती, मावशी, सया, जया, बाल्या थैमान घालू लागले.ड्रायव्हर गाडी सुसाट पळवत होता. त्याच वेगान तो विचार चक्र पळवत होता. मावशीनं फोनवर
' हळदीचा डाग' व 'बाल्या' हे सांगितलं तेव्हा त्याला मावशीचा संताप आला होता.एकीकडं हळदीवर बसलीय नी दुसरीकडं मुलगा बाल्या गेलाय हे त्याला परस्पर विरोधी वाटत होतं. पण आज खुर्चीवर ठेवलेल्या फोटोत त्याला बालपणीचा अंत्या दिसला. त्यानं ड्रायव्हरला लाईट सुरू ठेवायला सांगत खिशातलं वालेट बाहेर काढलं. मावशी यात्रेत घेऊन गेली होती तेव्हा तिनं हौशेनं सुंती व आपला फोटो काढला होता. सुंतीचं जमलं नी तो त्यानं दोन तुकडे करत ठेवला होता.त्याला आपल्या फोटोत बाल्या दिसू लागला.म्हणजे ....खरचं हळदीच्या डागावर बसलीय. त्यानं फोटोचं दुसरं सुंतीचं तुकडं कप्प्यातून काढलं.परकरातली सुंती अंधुकशा प्रकाशात त्याला दिसताच आजचा तो थंड स्पर्श त्याला जाणवला. व दुपारचं दत्ता भटजीचं बरळणं आठवलं."पोरा तु पण अजुन एकटाच आहेस व आता सुंती ही... विचार करा दोघे.
एकत्र या.जया गेला नी मावशीनं पण तेच ठरवलं होतं. "
पहाटे पुण्यात येताच तो गाढ झोपला.
दिवसा त्यानं बाॅसची भेट घेत साऱ्या बाबी स्पष्ट करत साईडवरील सरकारी अडचणीबाबत सांगितलं. तो दिवस व रात्र पुण्यात थांबून त्यानं साऱ्या अडचणी सोडवत रात्री आठच्या सुमारास तो अजंती साईडवर परतला. दोन दिवसाच्या धावपळीत त्यानं त्याचा पर्सनल मोबाईल पाहीलाच नव्हता.कंपनीचा हॅण्डसेट ठेवत त्यानं बंद केलेला मोबाईल चार्जिंगला लावत आॅन केला. तर त्यावर दत्ताजी, सदा सराचे बरेच आलेले काॅल दिसले. त्याला संताप आला.आपण टाळतोय तर हे लोक पुन्हा आपल्याला ओढू पाहतायेत. त्याला थकवा जाणवत होता म्हणून त्यानं तो पुन्हा बंद केला.
तोच साईडवरच्या माणसानं तारणी गावातले दत्ताजी व सदा सर दुपारी येऊन गेल्याचं कळवलं. अंतूनं थोडी रिचवत जेवण घेतलं व थकव्यानं व सततच्या धावपळीनं झोपणं पसंत केलं. झोपता झोपता आठवणीचा धूर धुराडा करू लागला.
' सुंती आपल्यापासून दूर झाली नी आपण नंतर आयुष्यात कुणाला जवळ न करण्याचं ठरवलं.आपणास वाटत होतं की आपणच त्याग करतोय! पण जयाशी लग्न करूनही ती पण तशीच राहिली तर मग ती पण....
पण मग तिनं लग्नास होकार द्यायलाच नको होता त्यावेळेस!' अंतू विचारातच झोपू लागला. सकाळी जाऊ या व सुंतीला भेटूच या. आता साईडवरच रहायचंय तर मग भेटता येईल.शिवाय त्या दिवशी ती काही तरी सांगणार होती व नंतर भेटते असंही बोलत होती. तो घोरू लागला. तोच क्वार्टर्सच्या पत्र्यावर ताड ताड आवाज सुरू झाला.मार्च महिना.अचानक बेमोसमी पाऊस व वादळ सुटलं. टपोऱ्या गारा बरसू लागल्या. पावसानं व टपोऱ्या गारानं अजंती काठावरील शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू खलास होऊ लागला.शेतात गव्हाच्या लोमीचा पसारा मातला.अर्ध्या तासातच जिकडे-तिकडे धूळधाण झाली. गारा थांबल्या व नंतर वादळ निमत पाऊस ही थांबला.
तोच अंतूला कुणीतरी दार ठोठावल्याचा आवाज आला. अंतूची पावसानं चाळवलेली झोप उघडली. एवढ्या रात्री कोण? दत्ताजी तर नसावा? या वेळेस तरी नको तो.
दरवाज्याची टकटक वाढतच होती.अंतूनं धुंदीतच दार उघडलं. दारात सुंतीला पाहताच तो चक्रावला.
" सुंती तू? नी असल्या अवेळी?" अंतू बुचकळल्यागत विचारता झाला.
" येणं गरजेचं होतं रे अंतू! तुझी खूप वाट पाहिली मी ! पण नाही आलास तू मग काय करणार!" दाराआड ओलिचिंब सुंती उत्तरली.
" ये आत,पावसातच आलीस ओली झालीयेस!"
" अंतू आत नको.तूच बाहेर ये! खूप काही सांगायचं बाकी राहिलंय रे! आज सारं सारं अपुरं सांगायचं, बोलायचं , करायचं आहे.बाहेरच जाऊ जरा चल!"
" अगं पण बाहेर अशा अपरात्री फिरणं बरं नव्हे!" धुंदीत असला तरी अंतूचा मेंदू काम करीत होता.
" अंतू वेळ कमीय ना रे! ऐक चल बाहेरच! किती वर्षात असा एकांत मिळतोय!"
अंतूला नकार द्यावासा वाटत होता.पण एवढ्या रात्री आली म्हणजे नक्कीच गंभीर काही तरी असावं.दत्ताजी, सदा सर ही बोललेच होते व येथल्या घटना ही तशाच घडल्यात.असा विचार करत बूट चढवत तो बाहेर निघाला.
बाहेर पाऊस थांबल्यानं आभाळ निरभ्र होतं.रजत पिवळा गोलाईस आलेला चांद मावळतीस झुकला होता.पावसानं हवेत गारठा वाढला होता.चांदण प्रकाशात पांढऱ्या साडीवर ओलेती सुंती अधिकच खुलून दिसत होती. सुंती पुढं धरणाची वाट पकडत तारणीकडं निघाली.धरणातून खोदाईमुळं अनेक वाटा फुटत होत्या त्या पार करत ती शेतमळ्याच्या वाटेला लागली.सुंती पुढे चालतेय व अंतू तिच्या मागोमाग. महादबा नेहेतेचं पिंपरीवालं रान लागलं.अंतूनं पाच सहा वर्षानंतर ही ते ओळखलं. पिंपरणीखाली सुंती उभी राहिली.
" अंतू! बस ! तुला आठवतंय मळ्यातली ती रात्र!"
सुंतीनं अंतूचा हात हातात घेतला.
अंतूस त्याचा स्पर्श शेवाळल्यागत लागला. तो शहारला.
" सुंती अशा वेळी असं फिरणं योग्य नाही.कुणी पाहिलं तर नाहक?"
" अंतू! पाच वर्षांपासून थांबलेय मी तुझी वाट पाहत! फक्त दु:ख एका गोष्टीचं वाटतंय की आपल्या बाल्यास नाही वाचवू शकले रे!"
"....." अंतूला कळूनही काही उमगेना.
" अंतू! तुला वाटत असेल मी लग्नास संमती का दिली? पण मावशी,आई-वडीलाच्या हातातील विषाची बाटली व सया जयानं तुलाच उडवण्याचा घातलेला घाट यानं माझ्यासमोर पर्यायच उरला नाही.पण तरी मी पण बदला घेतलाच. जयाला फिरकूच दिलं नाही. व नंतर तर नियतीनंच त्याला ......" सुंतीचा शेवाळलेला हात अंतुच्या साऱ्या देहावर शहारा उठवू लागला.
" अंतू कसक फक्त एकाच गोष्टीची वाटते रे! त्या हरामी सयाची पाच वर्षात किती तरी वेळा वासनांध नजर मागोवा घेत होती. तरी त्याची तकद झालीच नाही.पण त्याचा बदला घेता नाही आला रे......! "
" काय केलंय त्यानं?"अंतूचा भाव केव्हा बदलला हे त्यालाही कळलं नाही.
सुंती उठली व पिंपरणीच्या मळ्यातून चालत तारणीकडं चालू लागली.उलट दिशेनं येणारा वारा तिच्या ओलेता अंगाचा धुमार गंध अंतूस पूर्वीसारखाच धुंद करू लागला. पण तोच एकदम हवा पलटली व कुजका उग्र दर्प उठला.पिंपरणीवरची वटवाघळं उठबस करू लागली.घुबडं विचीत्र घुत्कारू लागली.
" अंतू! त्या सयानंच आत्या... ,'आपल्या बाल्यास मारलं.नी....नी...!"
" नी काय गं सुंती? सांग ना?" अंतू मागं मागं जात सुंतीला विचारू लागला.
" अंतू सयाला जिता नाही सोडायचा! म्हणूनच तर घ्यायला आलेय मी बघ तुला! येशील ना माझ्यासोबत! एकटी मी नाही घेऊ शकत रे बदला!"
"सुंती ,घाबरू नकोस मी आलोय ना आता! तो आता तूझं काहीच करू शकणार नाही!"अंतू त्वेषानं उद्गारला.
चांद कलायला लागला.उगवतीला तांबुस सिमाकी आभा डोकावू लागली.पिंपरणीवर रानातून परतणारी वटवाघळं लटकण्यासाठी गर्दी करू लागले. तोच सुंतीच्या मागं मागं चालणाऱ्या अंतूस परत उग्र दर्प झोंबला.
" अंतू चल मला उशीर होतोय ,जाते मी.पण येशील ना? वाट पाहीन मी!एकटी आहे रे मी!"
"सुंते आलो ना मी आता जा तू सकाळी येतोच मी हवेली वर!"
नंतर धुंदीतच अंतू फिरत राहिला व हवेलीकडं चालू लागला.
तारणीत हवेलीवर पहाटे मागच्या परसात सालदार गड्यास आडाकडं उग्र दर्प जाणवल्यानं त्यानं वहिवाटात नसलेल्या आडात डोकावून पाहिलं. वास तिथनंच येत होता.त्यानं सकाळ होताच सयाला सांगितलं.सयानं अचंबा दाखवत त्याच्यासोबत डोकावून पाहिलं व सालदार गड्यानं बोंब ठोकली. सुंतीचं फुगलेलं प्रेत वर काढण्यात आलं.सारं शेवाळलेलं व कुजायला सुरूवात झालेलं. बोंब ऐकताच सारी तारणी गोळा झाली.सदा सर दत्ता भट आले .दोन दिवसांपासून तारणीत सुंती गायब झाल्याची कुजबूज होतीच .आज त्या कुजबुजीला विराम मिळाला.
नेमक्या त्याच वेळी अंतू हवेलीसमोर आला. त्याची धुंदी खुलली.आडाजवळच्या सुंतीच्या फुगलेल्या देहास पाहताच त्याला
'मी वाट पाहतेय' हे वाक्य आठवलं. शेवाळलेला हात आठवला. उग्र दर्प आठवला नी तो थरथरत, खाली पडला..
.
.
कुणाला कळू न देता सयानं आधीच मिसींग केस दर्ज केलीच होती.
आठ वाजताच पोलीसगाडी व अॅम्ब्युलंस आवाज करतच हवेलीसमोर आल्या.
भटानं सदा सरांच्या मदतीनं अंतूस उठवत बसवलं. " पोरा तुला किती फोन केलेत पण तू उचललाच नाही व नंतर फोनच बंद येत होता.
" सदा सर ! पंचकातला तिसरा बळी गेलाय!" दत्ता भट कुरकुरला.
.
क्रमशः