फोटो चाळता
फोटो चाळता


आज सकाळीच सगळी कामे आटोपली होती. जेवण ही उरकुन घेतले. टी.व्ही वरच्या त्याच त्याच सिरियल बघावेसे वाटत नव्हते. पुस्तक वाचायच्या विचाराने कपाट उघडले तर समोर मुलीच्या लग्नाचा अल्बम दिसला. जरा बघू म्हणून बाहेर हॉलमध्ये घेऊन बसले व एक एक फोटो बघू लागले.
फोटो बघता बघता गतकाळात शिरले. किती उत्साह होता त्यावेळी. आपण ही तिच्या नवऱ्याकडच्या लोकांचे सगळे ऐकत गेलो. हे नाही जमणार असे म्हटलेच नाही. माझ्या लहान भावाला किती मी त्रास दिला! आम्ही मुंबईत राहणारे आणि गोव्याला लग्न. एक एक फोटो बघताना भावुक होत होते पण काही फोटो पाहताना चिड ही येत होती. मुलगा मुलगी दोघंही शिकलेली पण मुलाचे काहीच चालत नव्हते. वडिलांच्या सगळ्या गोष्टींना हो. आम्हाला असंच हवं तसच हवं. हॉलच्या सजावटी करता चार वेळा कुरियरने फोटोची ने आण केली. माझा भाऊही सारखा पाठवत राहिला, जो पर्यंत त्यांच समाधान होत नाही तो पर्यंत. मुलीची बाजू म्हणून किती ऐकावं! पण मी एकलं आणि सगळं त्यांच्या मनासारखे केले. मला मुलगा नाही हे माहित होते. असे त्रास देणे योग्य नव्हते. माझे मिस्टर मला काही कळत नाही असं म्हणून काही पुढाकार न घेणारे.
मलाच आता नवल वा
टतं, कसं बरं मी हे सगळं पेलवून घेतलं. लग्नातलं जेवण खाण, देणे घेणे, दाग दागिने सगळं त्यांना हवं तसं. माझी मुलगी शिकलेली, चांगली डॉक्टर झालेली, तरी आपल्या रुढी परंपरेपुढे आम्हाला झुकावेच लागले. गोव्याला माझं कोणी नसतं तर काय झाले असते? त्यावेळी ते वरपक्ष म्हणून सगळं मी निमूटपणे सहन केले. फोटो पाहताना माझीच मला लाज वाटली. एवढा कमीपणा मी का घेतला. मुलीचे वय ही जास्त झाले नव्हते, शिकलेली होती. तिचं मत विचारात घेतलं नाही. तिला मुलगा पसंत ह्यावर मी सगळं ठरवलं. आमच्या ह्यांचा काही उपयोग नव्हता,न धावपळीला न आर्थिक. दोन मुलीच, मी एकटी, कसं करेन ह्यामुळे घाई केली. मुलीच्या लग्नात आई खूप रडते पण मला रडायला ही उसंत नव्हती. आता ऐकटी असले की ते सारे आठवून मात्र खूप रडते. मुलीच्या लग्नाची मी घाई केली हे सारखं आठवतं.
पण म्हणतात ना की लग्नाच्या गाठी देवानेच बांधलेल्या असतात. मग मी का स्वतःला दोषी मानू? नशिबात असतं तसच होतं. नाहीतर एवढ्या माझ्या सुंदर मुलीच्या मागे किती लोकांची रांग लागली होती. पोरीनं ही आईसारखे शिक्षणाला जास्त महत्त्व दिले व त्या लोकांकडे काना डोळा केला. आता ठेविले अनंते तैसेची आनंदी रहावे.