पहिली परी 🥰
पहिली परी 🥰
घरातील पहिली परी 🥰
ताईचे लग्न झाले तेंव्हा आम्ही भावंड खूप लहान कच्चे बच्चे होतो ताई घरातील सर्वात मोठी मुलगी लाडाकौतुकात वाढलेली.ताईचे लग्न झाले आणि काही महिन्यातच सर्वांनाच उत्सुकता होती ती बातमी ऐकायला मिळाली'ताई आई होणार'असल्याची आणि काय सांगता सगळीकडे आनंदी आनंद उत्साह वाहू लागला....मला तर ताईला कधी भेटू नी तिला पाहू असं झालेलं.पाहता पाहता सात महिने निघून गेले ताईला सातवा महिना लागला रिवाजानुसार ताईला आणायला मुराळी गेले आणि ताई डिलेव्हरी साठी माहेरी आली... ताईचे रूप निखरले होते चेहऱ्यावर तेज आलेले सुंदर ताई आणखीनच जास्त सुंदर भासत होती अगदी देवी सारखी, ताई घरी आली तसे चोहीकडे आनंद पसरला ज्याला त्याला येणाऱ्या बाळाची ओढ उत्सुकता लागली होती काय असेल कसे दिसेल मुलगा असेल की मुलगी असेल पण ताईचे एकच वाक्य असायचे तीला पहिली मुलगीच हवी होती.
ताई पहिलिटकरण असल्यामुळे आणि आमच्या घरातील होणार हे पहिलं बाळ असल्यामुळे घरातील सर्वच जण तीची खूप खूप काळजी घेत होते आमची आई तर अगदी दिवसभर तिच्याच सेवेत असायची. थन्डीचे दिवस होते त्यामुळे तर स्वेटर घाल,कानाला बांध,आणि विशेष म्हणजे ताईला चप्पल घातल्याशिवाय घरात आणि बाहेर सुद्धा फिरण्यास सक्त मनाईच होती. आई वडील ताईला काय खावंसं वाटतं काय नको वाटतं सतत हे खा ते खा तिच्या मागेच असायचे कधी कधी तर ताईला काही खायचा कंटाळा आला की हळूच आईची नजर चुकवून आम्हा भावंडाणा ते खायला द्यायची.जेवण झाले की रात्रीची शतपावली ताईला आवर्जून करावीच लागायची त्यानिमित्ताने आम्हाला घरात नवनवीन गोष्टी पाहायला मिळतं होत्या. ताईच्या काळजी सोबतच डिलेव्हरीनंतरच्या पण विशेष तयारी सुरूच होत्या त्यात सर्वात जास्त आणि अतिशय आंनदाने तयारी करत होती ती म्हणजे बाळाची होणारी पणजी. म्हणजे डिलेव्हरीत लागणाऱ्या सुती मऊ कापडापासून ते शेक द्यायला लागणाऱ्या कोळशापर्यंत बाळाचे होणारे पणजी आणि पणजोबा तयारी करत होते. ताईला आठवा महिना लागला डॉ.च्या भेटी सर्व तपासण्या वैगरे वेळेवर होतं होत्याच तरीपण अचानक ताईला नेमक्या आठव्या महिन्यातच वेणा सुरु झाल्या आणि सहज चेकिंगसाठी म्हणून तिला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले..पण डॉ. सांगितले की डिलेव्हरीची वेळ आली आहे ऍडमिट करावं लागेल मग काय घरात एकच गडबड त्यात आमच्या आईची ही आजी होण्याची पहिलीच वेळ पण तयारीत कुठे गडबड न्हवती बरं सगळं जिथल्या तिथे आणि अगदी तंतोतंत व्यवस्थापन होतं.
आणि पाहता पाहता तो क्षण आला आमच्या ताईने एका गोड नाजूक परीला जन्म दिला अहाहा काय वर्णवा तो क्षण म्हणजे मी इथे लिहू पण शकत नाही असा तो आवर्णनीय क्षण होता.नऊ महिने ज्या बाळाची ओढ उत्सुकता होणाऱ्या आई वडिलांना असतेच तशीच ओढ होणाऱ्या आजी आजोबांना, मावशी मामाला ,पणजी पणजोबाला पण खूप खूप असतेच. सकाळी सकाळी ती गोड बातमी आम्हा सर्वांना समजली "मुलगी झाली". सर्वांनाच खूप खूप आनंद झाला आम्ही वडिलांसोबत हॉस्पिटल मध्ये गेलो आणि आता आठवतंय जातेवेळी वडिलांनी पाच किलो जिलेबी घेतली होती.तेंव्हा खरच वडिलांच्या चेहऱ्यावरचा आंनद पाहण्यासारखाच होता इथे एक नक्की सांगते, घरातल्या पहिल्या बाळासाठी एक वेगळाच आनंद उत्साह आणि उत्सुकता असते बरं...
बाळाला पाहिला तो क्षण आजही आठवतोय ती इवलीशी परी सुती कापडात छान गुंडाळून ठेवली होती कापसासारखी पांढरी शुभ्र,गुलाबी ओठ,पाणीदार पण टपोरे डोळे इवल्याशा हाताची मूठ आवळून चुळबुळ चुळबुळ करत निवांत आईच्या कुशीत पडून होती. बाळ इतकं सुंदर असू शकत हा माझ्या बालिश मनाला तेंव्हा आवर्जून पडलेला प्रश्न.. मला तर ती बाहुलीच वाटली होती.
दुसऱ्या दिवशीच बाळाला घरी घेऊन जाण्यास डॉ. परवानगी दिली आमच्या पिटूलक्या परीचे आम्ही जल्लोषात घरी स्वागत केले घरभर फुगे लावून त्यावेळी आता सारखा वेलकम प्रोग्राम आमच्या तरी भागात होतं न्हवता. पण आम्ही शक्य तितके प्रयत्न करून बाळाचे छान स्वागत केलेच होते...आईने ताई आणि बाळावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि आमच्या परीचे घरात आगमन झाले त्यावेळी घरात वेगळीच प्रसन्नता आली. सगळ्या घरभर सुखं भरून गेले आहे असं वाटतं होते.त्या एका बाळासाठी संपूर्ण घर नातेवाईकांनी भरून गेले.बाळाच्या आगमनाने आता सर्वानाच एक पदवी प्राप्त झाली होती.
आणि आता सुरु झाली एका नवीन जीवाची काळजी.आजीबाईचे बाळाला झोळीत हालवून झोपवण्यासाठी रात्रभर जागरण, पणजीची शेक देण्यासाठी सकाळ संध्याकाळ तयारी,आजोबा लागणारे सामान आणून देण्यात व्यस्त झाले, मामा मावश्या बाळाला खेळवण्यात मग्न झाले...बाळाचे लाडाचे नाव गुड्डी असं ठेवण्यात आले.
आणि काही दिवसात घरभर दुधदुपट्याचा वास...शेक देते वेळी शेपाचा उग्र पण हवाहवासा वाटणारा सुगंध,किचन मधून साजूक तुपा बरोबर अनेक पौष्टिक पदार्थाचा घमघमाट, बाळचे हसणे बाळाचे टँटँटँ करून रडणे सगळे कसे नियमित होऊ लागले आणि आमच्या मनाला आनंद देऊ लागले.
बाळ येते घरात पण त्याच्या सोबत इतरांचे पण बालपण घेऊन येते. म्हणजे मला एक गोष्ट इथे मुद्दाम सांगावीशी वाटते आमची गुड्डू काही महिन्यांची झाली असेल तेंव्हा तिला सेरेलॅक नावाचं फूड सुरु केले आणि शेवटी ते छोटस बाळाच नं जितकं दिले तितके सगळेच थोडीच खाणार त्यातही आमच्या गुड्डू बाईच लहान पनीपासूनच जेवढ्यास तेवढंच खाण आहे.. मग तिचे खाऊन राहिलेले सॅरेलॅक हे लिहिणारी तीची मावशी आवडीने खाऊन घ्यायची 😄.
आम्रपाली घाडगे
