फेसबुक मैत्री
फेसबुक मैत्री
नेहमीप्रमाणे रात्री अकरा वाजता नरेशने आपल्या मोबाईलवरील डाटा ऑन केला आणि फेसबुक चाळत बसला होता. तसं पाहिलं तर नरेशला दिवसभर थोडी सुद्धा उसंत नसते फेसबुक बघण्यासाठी. तो पंचविशीतला तरुण होता आणि जवळच्या शहरातील एका कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या शिक्षणाला अनुसरून ती नोकरी होती. आय टी आय चे शिक्षण पूर्ण केले असल्यामुळे पहिल्यांदा त्याला संधी मिळाली. गेल्या तीन वर्षांपासून तो या कंपनीत नोकरी करत आहे. सकाळी आठ वाजता तयार होऊन जो बाहेर पडायचा तो रात्री दहा वाजता घरी यायचा. घरी आल्यावर हात-पाय तोंड धुतले की जेवण आटोपून घ्यायचा आणि मग मोबाईल हातात घ्यायचा. कंपनीत त्याच्या जवळ मोबाईल ठेवण्याची परवानगी नसायची. त्याचजवळ स्वतःची बाईक होती. साधारणपणे त्याचे घर ते कंपनी दीड तासाचा अवधी लागत असे. घरी आई वडील एक बहीण राहत होती. बहीण लहान नवव्या वर्गात शिकत होती. त्यादिवशी देखील तो मोबाईलवर फेसबुक पाहत पाहत एका फोटोवर येऊन थांबला. ती मुलगी दिसायला चांगली होती, पाहताक्षणी त्या फोटोला त्याने लाईक केले आणि पुढे जाऊ लागला. फेसबुकवर त्याचे खूप मित्र होते. सर्वाना अपडेट देण्यासाठी तो रोज रात्री फेसबुक पाहत असे आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी दिवसभर फेसबुकवरच राहत असे. यावरून बऱ्याच वेळेला त्याचे नि बाबांचे वाद ही झाले होते. पण नरेश काही ऐकायला तयार होत नसे. रात्री झोपणार म्हटले की एक मेसेज आला, ते त्याने उघडून पाहिले त्यावर लिहिले होते "थँक्स फॉर लाईक माय फोटो." त्याला क्षणभर आठवले नाही म्हणून प्रिया साळवे असे नाव होते त्यावर क्लिक केल्यावर तिचे प्रोफाइल उघडले गेले. लगेच कोणता फोटो लाईक केला होता म्हणून नरेश शोध घेऊ लागला. लगेच त्याच्या दृष्टीला परत एकदा तेच फोटो आले ज्याला नरेशने लाईक केल्याचे निळसर चिन्ह दिसत होते. तिला काही तरी उत्तर द्यावे म्हणून नरेशने "ओके यु आर वेलकम" असा मेसेज पाठविला आणि झोपी गेला. कारण रात्रीचे बारा वाजले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि नित्यनेमाने आपले काम उरकून कंपनीत निघून गेला. सायंकाळी घरी आल्यावर जेवण उरकून घेऊन अंथरुणात पडल्या पडल्या मोबाईल घेऊन फेसबुक पाहण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात एक मेसेज आला. "हॅलो, नरेश हाऊ आर यु ?" प्रियाचा मेसेज वाचून नरेश द्विधा मनस्थितीमध्ये पडला काय करू ? या विचारात होता. त्याने अगोदर तिचा प्रोफाइल चेक केला. तिचं नाव, शहर आणि जन्मदिनांक साऱ्या बाबी चेक केल्यावर ती ज्याठिकाणी कंपनी आहे त्याठिकाणची राहणारी आहे आणि वय बावीस वर्ष असे दाखवीत होतं. मनात काही तरी विचार करून नरेशने तिला "हाय, आय अॅम फाईन" म्हणून मसेज केला. मग सुरू झाला त्यांचा फेसबुक संवाद. अनेक गप्पा गोष्टी करण्यात बाराच्या जागी एक वाजू लागले. दिवसभर तर त्याला मोबाईल बघता येत नव्हते मात्र रात्रीला तो हमखास प्रियाशी संवाद करू लागला. तिच्या प्रोफाईलला तोच एकमेव फोटो होता. त्याच्या व्यतिरिक्त एक ही पोस्ट तिच्या वॉलवर दिसत नव्हते. त्यांचे रोज रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगू लागले. एकमेकांच्या भेटी न होता देखील ते जिवलग मित्र झाले होते. एके दिवशी नरेशने प्रियाला भेटण्यासाठी विनंती केली. तेंव्हा तिकडून ही लगेच होकार मिळाला. या रविवारी ताज हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले. दोघांचेही चेहरे एकमेकांना ओळखीचे झाले होते त्यामुळे कसे ओळखणार असा प्रश्न निर्माण होणे अशक्य होते. आजच्या भेटीत तिला लग्नाची मागणी घालणार असा तो विचात करत होता. कधी एकदा रविवार उजाडतो असे झालं होतं. अखेर तो दिवस उजाडला. नरेश सुट्टी असून ही लवकर तयार झाला आणि शहरात जाण्यासाठी बाहेर पडताना त्याचे बाबा म्हणाले, "नरेश, अरे आज सुट्टी आहे, कुठं निघालास ?" यावर नरेश ने " थोडे काम आहे जाऊन येतो " म्हणून गाडीवर स्वार होऊन निघाला. बरोबर अकरा वाजता ताज हॉटेलमध्ये येऊन प्रियाची वाट पाहू लागला. कधी एकदा ती येते आणि तिच्याशी माझे बोलणे होते असे झाले होते. बारा वाजले, एक वाजले तरी प्रिया आलीच नाही. फोन करावं म्हटलं तर आपने डायल किया हुआ नंबर अभी बंद है, कृपया थोडी देर बाद डायल करे असे म्हणत होते. दिवसभर फोन बंद येत होता. काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी नाराज होऊन तो तसाच परत घरी गेला. त्यादिवशी रात्रभर त्याला झोप लागली नाही. फेसबुक वर " हाय " असा मेसेज टाकून ठेवला होता. पण त्याला ही काही रिप्लाय मिळालाच नाही. त्यामुळे तो खूपच नाराज झाला होता. सकाळ झाली आणि तो रोजच्या प्रमाणे कंपनीत गेला. सायंकाळी घरी आल्यावर झोपण्यापूर्वी फेसबुक सुरू केल्याबरोबर प्रियाचा मेसेज दिसू लागला,
"सॉरी, काल अचानक बाबांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना घेऊन दवाखान्यात जावं लागलं म्हणून मी ताज हॉटेलात येऊ शकले नाही."
मेसेज वाचून नरेशने "इट्स ओके" म्हणून मेसेज टाकला.
"खरंच मला माफ करावं, तुम्हांला माझ्यामुळे खूप त्रास झाला."
"काही हरकत नाही, असो काय झालंय बाबांना"
"डॉक्टर म्हणत होते की खूप गंभीर आजार आहे, यासाठी हैद्राबाद किंवा मुंबईला जावे लागेल."
" आजार काय सांगितलं डॉक्टरांनी "
"ब्रेन ट्युमर आहे असे म्हटलं आहे"
"बाप रे........! ब्रेन ट्युमर"
"जवळपास दोन ते तीन लाख खर्च येणार असे सांगितले"
"दोन ते तीन लाख खर्च सांगितलं आहे, बाप रे मग पुढे...."
"काय करावं ? आमच्याकडे तर तेवढा पैसा नाही."
"मग काय करायचं ठरवलं आहे ?"
"पाहू, देवाच्या हातात आहे सर्व "
" काही मदत लागल्यास नक्की कळव, शुभ रात्री"
असा मेसेज करून दोघे ही झोपी गेले. परत दुसऱ्या दिवशी रात्रीला फेसबुक वर संवाद सुरू झाला.
"पुढे काय झालं ?" नरेश ने मेसेज केला. थोड्या वेळात तिने मेसेज केला " घरातले सर्व दागदागिने, घर हे सर्व एकत्र केले तर दीड लाख होत आहेत अजून दीड लाखाची गरज आहे, काय करावं काही कळत नाही."
"असं करू या का, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत घेऊ या का ? " तिला पटविण्यासाठी तो सहानुभूतीपूर्वक संवाद करत होता.
" चांगली आयडिया आहे, मात्र लोकं मदत करतील काय ?" ती देखील मदत मिळवून घ्यावी म्हणून उत्साहाने संवाद करत होती.
" का करणार नाहीत, नक्की करतील."
" ठीक आहे तर, मग तुम्हांला जे योग्य वाटते ते करा"
"ठीक आहे मग असं करा, तुमचा बँकेचा अकाउंट नंबर आणि त्याचे डिटेल्स द्या, लगेच पोस्ट करतो."
"ठीक आहे पण, माझ्याकडे एकही बँक अकाउंट खाते क्रमांक नाही" असा तिने मेसेज केला. यावर नरेशने आपल्याच बँक अकाउंटची माहिती देऊन मदत जमा करण्याचे ठरविले. यानिमित्ताने तरी आपली भेट होईल असा एक अंदाज मनात तयार झाला.
नरेशने एक चांगली मदत मिळेल अशी पोस्ट तयार केली आणि लोकांना मदत करण्यासाठी आवाहन केले. एक दिवस झाले, दोन दिवस झाले कोणी ही मदत करायला तयार नाही. त्याच्या खात्यात एक ही रुपया जमा होत नव्हता. प्रिया मात्र रोज रात्री एकच विचारत होती, किती पैसे जमा झाले ? यावर प्रियाचा मन राहावे म्हणून नरेश काही तरी एक हजार जमा झाले असे पोस्ट टाकत होता. असे करता करता त्याचा आकडा एक लाख रुपयापर्यंत पोहोचला होता. वास्तविकमध्ये त्याच्या खात्यात एक ही रुपया जमा झालेला नव्हता. आता नरेशलाच पैश्याची काळजी वाटू लागली. मी तर एक लाख रुपये जमा झाले आहेत म्हणून सांगितलो आता काय करायचे ? पंधरा दिवसानंतर प्रियाचा मेसेज आला " आज बाबाचं ऑपरेशन आहे, तेंव्हा तू एक लाख रुपये घेऊन ये." मेसेज वाचताच नरेशची पायाखालची जमीन सरकली. त्याने " ओके " असा मेसेज केला. आत्ता काय करावं ? हे कळत नव्हतं. पैसे तर द्यावे लागणारच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि बँकेतुन एक लाख रुपये घेऊन प्रियाच्या फोनचा वाट पाहत बसला. थोड्याच वेळात प्रियाचा फोन आला, ती म्हणाली, "बागेच्या बाजूला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये लाल शर्टाचा एक माणूस बसलेला आहे, त्याचे नाव बाबुराव आहे, त्याला ते पैसे दे. मी दवाखान्यात बाबाजवळ आहे म्हणून त्याला पाठविले आहे." नरेश तो पैसे घेऊन बागेजवळच्या हॉटेलमध्ये गेला. खरोखरच तिथे एक लाल शर्टाचा माणूस बसलेला होता. त्याला नाव विचारलं तो "बाबुराव " असे म्हणाला. नरेशला खात्री पटली. त्याने एक लाख रुपयांची बॅग त्याच्या हातात दिली आणि म्हणाला, "लवकर नेऊन दे प्रियाला." तो " होय लवकर देतो " असे म्हणत तेथून बाहेर पडला. नरेशला त्या एक लाख रुपयांचे काही वाटत नव्हते मात्र प्रियाचे वडील ठीक व्हावेत म्हणून प्रार्थना करू लागला. त्यादिवशी रात्री त्याने प्रियाला मेसेज केला
" एक लाख रुपये त्या लाल शर्टाच्या बाबुराव सोबत पाठविलोय, मिळाले ना ....बाबाची तब्येत कशी आहे ?
हा मेसेज करून एक दिवस उलटला, दुसरा, तिसरा तसे दहा दिवस संपले पण प्रियाचा काही रिप्लाय आला नाही. म्हणून त्याने प्रियाचा नंबर डायल केला तर आपने डायल किया हुआ नंबर मौजुद नहीं है, एक बार नंबर चेक करे किती ही वेळा डायल केला तरी हेच वाक्य कानी पडत होते. रोज रात्री फेसबुक ओपन करून तो प्रियाच्या रिप्लायची वाट पाहत होता. मेसेज ही नाही आणि फोन ही लागत नाही. फोन क्रमांक कोणत्या व्यक्तीच्या नावाने आहे याची माहिती घेऊन तेथे जाऊन पाहिलं तर त्या नावाची कोणतीच व्यक्ती इथे राहत नाही अशी माहिती मिळाली. नरेशला आता पूर्ण जाणीव झाली होती की, त्याची फसवणूक झाली आहे. ती प्रिया साळवे एक फेक अकाउंट आहे, फोन क्रमांक चुकीचा आहे आणि तिचा कोणता बाप आजारी नाही. सुंदर प्रोफाइल पाहून लग्नाच्या इच्छेने आपण पुरता फसलो गेलो आहोत याची जाणीव झाली पण याची वाच्यता आपण कोठे केली तर लोकं आपल्यावरच थुकतील म्हणून त्याने कोठे ही काही सांगितले नाही. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नोंद केली नाही.
संजयने ( अन्य फेसबुक युजर, वय जेमतेम तेच 25-26) आपला फेसबुक ओपन केलं की, त्याची नजर प्रिया साळवेच्या त्याच फोटोवर स्थिरावली, त्याने त्या फोटोला लाईक केलं. थोड्या वेळाने त्याला एक मेसेज आला
" थँक्स फॉर लाईक माय फोटो." मग सुरू झाला संजयला फसविण्याचा एक नवा प्लॅन.