पडद्यामागील कलाकार - अधिपरिचारिका
पडद्यामागील कलाकार - अधिपरिचारिका
नमस्कार, असं म्हणतात की "आपल्याला हा जो मनुष्यजीव मिळतो तो 84 लक्ष जीवांचा फेरा पुर्ण केल्यावर मिळतो, आणि ते जीवन म्हणजे आपल्याला देवाने दिलेले वरदानचं असते." ते आयुष्य आपल्याला आपल्या कर्माने, आनंदाच्या, सुखदुःखाच्या रंगाने छानसं इंद्रधनुष्य प्रमाणे रंगवायचं असतं....... अशीच एक रुग्णांच्या जीवनात आनंदाचे सप्तरंग उधळवणारी परिचारिका हिची प्रेरनादायी कथा.
ही गोष्ट आहे एका जिद्दी, कष्टाळू मुलीची.एका ग्रामीण भागातील निसर्गाच्या कुशीत वसलेले एक छोटंसं गाव. आणि त्या गावातील एक मध्यमवर्गीय कुटुंबातील एक जिद्दी मुलगी. तशी ही लहानपणापासूनच हुशार, मितभाषी, थोडीशी लाजरी . थोडसं जरी कोणी बोललं तरी डोळ्यात गंगा जमुना आणणारी...पण प्रेमळ स्वभावाची मुलगी.
लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. त्यात आई वडिलांचं नाव मोठं करून देशासाठी म्हणा किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची स्वप्न तिच्या डोळ्यात होती. प्राथमिक शाळेत असताना आई वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन भेटुन तिच्या मनात रंजले- गांजलेल्या लोकांबद्दल दया, प्रेमभाव, करूणा निर्माण होऊन ती मोठी होत गेली.
त्यामुळे तिने 10 वी झाली की विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन पुढे 12 वीला खूप चांगले मार्क्स पाडले. आता प्रश्न उभा राहिला की, पुढे काय करायचं? पुढे आरामदायक जॉब भेटणारे ही खुप पर्याय होते पण त्याच - त्याच रुळलेल्या वाटेवर तिला जाण्यात काही रुची नव्हती. तिच्या मनामध्ये "ज्या समाजाने आपल्याला "मान सन्मान" दिला, प्रेम दिले त्या समाजाचे आपणही काही देणं लागतो" ही जी भावना असते ना, ती तिला स्वस्थ बसु देत नव्हती. एक चॅलेंजिंग कारीयर तिला हवे होते. आणि त्याच भावनेतून तिने मेरिट लिस्टमध्ये यश मिळवत मेडिकल फिल्डला एका मोठ्या महानगरात सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये "नर्सिंग" ला ऍडमिशन घेतले. आता ऍडमिशन तर घेतले पण, एवढ्या मोठया महानगरात आपला कसा टिकाव लागेल? आपल्याला जमेल का? एक दिवस ही आई वडीलांपासून, घरापासुन दूर न राहिलेली, इथे या नवीन माणसांच्या गर्दीच्या महानगरात आपल्याला करमेल का? असे बरेच प्रश्न तिच्या मनात वादळ निर्माण करत होते. परंतु तिच्या स्वप्नांपुढे ते सर्व फिक्के पडत होते. शेवटी तिचे स्ट्रगल सुरू झाले.
अनेक अडचणी आल्या, समस्या आल्या. घरची आठवण यायची, कधी कधी नको वाटायचं, ते मेस मधील दर्जा नसलेलं जेवण, सर्व सोडुन घरी जाऊ वाटायचे पण त्याच वेळेस तिचे काहीतरी वेगळे बनण्याचे स्वप्न, घरची परिस्थिती आणि सर्वात महत्त्वाचे तिच्या आई वडिलांचे कष्ट तिच्या जिद्दीच्या पंखाना बळ, प्रोत्साहन द्यायचे आणि तिला पुन्हा उत्साह यायचा. व मला का जमू शकत नाही? या भावनेने ती पेटुन उठायचे व पुन्हा जिद्दीने ती अभ्यास करायची.
एक दिवस तीच्या कष्टांना फळ भेटले. खुप चांगल्या मार्कांने ती पास झाली. आणि त्याच महानगरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप ला नंबर लागला. आणि यशस्वीपणे तिने ती पूर्ण केली. एका स्ट्रगल चा टप्पा पुर्ण झाला होता.
पण खऱ्या संघर्षाला तर आता सुरुवात झाली होती. कारण परिवारामध्ये सर्वात मोठी असल्याने आई वडिलांना आधार देण्याचे स्वप्न होते व लहान भावापुढे आदर्श निर्माण करायचा होता. त्या दृष्टीने तिची वाटचाल चालू होती. आणि ती त्याच महानगरात एका सर्वात मोठ्या खाजगी हॉस्पिटलला जॉईन झाली व काम सुरू झाले.
आणि एक दिवस....एक दिवस एका भल्या मोठ्या अक्राळ - विक्राळ साथीच्या रोगाने जगात थैमान घातले. माणसाचं जीवन क्षणभंगुर झालं. हॉस्पिटल्स कमी पडायला लागले. बेड भेटणं मुश्किल झालं. लोकांचे मृत्यूचं प्रमाण वाढू लागले. आरोग्य कर्मचारी कमी पडायला लागले. ज्या वेळी संपुर्ण विश्व रोगाच्या भीतीने आपापल्या घरात बंदिस्त झाले तेंव्हा अशा परिस्थितीत मात्र ही मुलगी धाडसाने रुग्णांची सेवा करायला लागली, सुट्टी मिळत नव्हती. आई वडिलांचा जीव टांगणीला लागलेला असायचा, पण त्याही परिस्थितीत ती आई वडिलांना फोनवर आधार द्यायची. पण सर्वात महत्वाचे ती त्याआधी "ड्युटी फर्स्ट" या तत्वाआधारे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आधार द्यायची. असं म्हटलं जातं की, "पेशंट हा निम्मा डॉक्टर च्या बोलण्याने, मानसिक आधाराने बरा होतो". नेमकं हेच "तत्व" तिने हेरलं होतं व त्याच आधारावर तीचं काम, रुग्णांची सेवा अविरतपणे चालु होती.
घरची खुप आठवण यायची. पण इच्छा असूनही कर्तव्यासमोर तिला जाता येत नव्हते, सुट्टी मिळत नव्हती. अशातच एक दिवस ती जीच्यासोबत एकत्र राहायची, जेवण करायची त्या रुममेटचाच रिपोर्ट कोरोना positive आला. हिला टेन्शन आलं.....पण ते यासाठी नव्हे की, आता मलाही कोरोना झाला तर? तर टेन्शन यासाठी आलं की, माझ्यामुळे इतरांना जे कोणी तिच्या संपर्कात आले ते नातेवाईक, मित्र, मैत्रिणी त्यांना काही झालं तर? याची तिला काळजी वाटू लागली. व स्वतः ची कोरोना टेस्ट करून घेतली. पण म्हणतात ना, " कर भला तो हो भला" त्या प्रमाणे तिचा मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आला व तिच्या संपर्कात असलेलेही लोक सुरक्षित होते. देवाचे मनोमन आभार मानले. आणि पुन्हा जे "रूग्णसेवेच व्रत" घेतले होते त्यासाठी ती धाडसाने पुन्हा सज्ज झाली.
एकदा एक अशीच 40-42 वयाची गरीब आजारी स्त्री तिथे त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. तिला एक लहान मुलगा होता. तिचा बिचारा गरीब नवरा किलकिल्या डोळ्यांनी पाहत होता. हातावरचे पोट, रोजीरोटी असणाऱ्या त्या बिचाऱ्या नवरा अन मुलाची घाबऱ्या अवस्थेत मनाची घालमेल सुरू होती, की आता कसं होईल? तिची कोण काळजी घेईल, तिला काही लागलं तर कसं? असे अनेक प्रश्नांचे त्यांच्या मनात काहूर माजले होते. तेच हिच्या लक्षात आले. तिने त्या आजारी स्त्रीच्या नवऱ्याला विश्वासात घेऊन "काळजी करू नका, मी आहे" हा विश्वास दिला आणि खरोखरच आत्मीयतेने त्या रुग्णाची काळजी घेऊन तिला बरे होण्यास भावनिक, मानसिक आधार दिला. ज्या वेळेस ती स्त्री बरी होऊन घरी जाताना तिच्या नवऱ्याने जी सेवा या मुलीने (नर्सने) केली होती त्या सेवेला आणि तिला हाथ जोडुन, डोळ्यात पाणी आणुन धन्यवाद व्यक्त करत होता. हे पाहुन हिच्याही डोळ्यात पाणी आले.
खरं तर डॉक्टर, परिचारिका हे रुग्णांसाठी दुसरे परमेश्वरच असतात. आणि तिथे असलेल्या रुग्णांना तिच्यामध्ये, तिथल्या डॉक्टर मध्ये, नर्स मध्ये परमेश्वराच दुसरं रुपचं दिसत होतं. कारण ज्या कोरोना रोगाच्या काळात सख्खे आई वडील, इतर नातेवाईक जवळ येत नसत,( अर्थात परिस्थितीच तशी होती, आणि तेही सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचं होतं ) अशा परिस्थितीत ती रुग्ण कोण, कुठला, कसा आहे? याचा विचार न करता अगदी धाडसाने, शांतपणे, ठामपणे ते रुग्णसेवा करत होती.
खरं तर "एखाद्या सुनामी चक्रीवादळाच्या तडाख्यात एखादे जहाज सापडावे, आणि त्या जहाजाचा कप्तानाने शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या लीलया कौशल्याने, धाडसाने, निश्चयाने अगदी सुखरूपपणे त्या वादळातून जहाज किनाऱ्यावर पोहोचवावे" अगदी तसेच तिने या कोरोना रूपी वादळातून स्वतःची जीवाची पर्वा न करता ती रुग्णांची काळजी घेत त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी म्हणतात ना, "लोकसेवा हेच आपलं परम कर्तव्य असायला हवे. कुठलाही स्वार्थ न पाहता जे आपण करतो तेच आपल्याला फिरून परत मिळते". आणि शेवटी तो दिवस उजडलाच. ज्या दिवशी तिने केलेल्या कामाची पोहचपावती, तिने आजपर्यंत निस्वार्थी भावनेने केलेली रुग्णसेवा, तिने केलेल्या त्यागाचे फळ जे तिला भेटणार होते.
असे म्हणतात की, " संघर्ष जीतना कठीण, जीत उतनी शानदार". त्याप्रमाणे ती त्या दिवशी अशीच हॉस्पिटलमध्ये काम आटोपुन बसलेली असताना तिचा मोबाईल वर एक एसएमएस आला. का कुणास ठावूक? तिने थोड्या उत्सुकतेनेच तो एसएमएस चेक केला. पण जसा तो एसएमएस पाहिला तशी तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. ओठांवर हसु फुटले. आणि दुसऱ्याच क्षणी तीच्या डोळ्यातुन आनंदाश्रू ओघळू लागले. तिच्या डोळ्यासमोर एका क्षणात तिने केलेल्या संघर्षाचा फ्लॅशबॅक तरळुन गेला. तिने केलेल्या कष्टाचे, त्यागाचे फळ तिला भेटले होते. अनेक रुग्णांची सेवा केलेल्या लोकांचा आशीर्वाद तिला भेटला होता आणि तो म्हणजे तिला "औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये" एक परमनंट "स्टाफ नर्स" म्हणून नोकरी लागली होती.
अशी ती प्रेमळ, जिद्दी, कष्टाळू, हुशार, निश्चयी मुलगी तिचे नाव स्नेहल भास्कर चौधरी आहे आणि आज ती अविरतपणे तिचे रूग्णसेवेचे काम प्रामाणिकपणे चालु आहे. मी तर असे म्हणेन की "मला जर देवाचं रूप कुठं दिसले असेल तर तो या स्नेहल चौधरी या परिचारिकेत दिसले".
