आरसा - दांभिक समाजमनाचा
आरसा - दांभिक समाजमनाचा
आज सहजच सकाळी लवकर उठलो. बाहेर मस्त सकाळची गार हवा सुटली होती. मनात द्वंद्व प्रश्न उभा राहिला की काय करावे? मस्त ब्लॅंकेट घेऊन परत एक छानशी झोप मारावी की फिरायला जावे?
मग फिरायला जायचे ठरवले. आणि निघालो मग. आता मामाच्या गावी आल्यामुळे त्या ग्रामीण भागात नदी नाले, झाडे यांच्या कडेने मस्त गाणी गुणगुणत फिरत होतो. सकाळचे अल्हाददायक वातावरण मनाला प्रसन्न वाटत होते. त्यात हवेची गार झुळुक अंगाला स्पर्श करून जात होती. साधारणतः सकाळचे एक 6.00 वाजले असतील. नदीच्या कडेने फिरताना ते प्रेत जाळण्यासाठी जे शेड असते ना ते नजरेस पडले. आणि त्या शेडच्या बाजुला बांधलेल्या कट्टा वजा फरशीवर अंगावरपुर्ण एक चादर ओढलेला व्यक्ती दिसत होता. जसं मी पाहिलं तसं थोडसं आश्चर्य वाटलं, खरं तर घाबरलोच म्हणा, कारण ते प्रेत म्हणावं तर आजूबाजूला कोणीही नव्हते. तसा थोडं जवळ जाऊन पाहिलं तर एक 70-75 वयाचा एक वृद्ध म्हातारे दिसले. माझी चाहुल लागुन बहुधा ते वृद्ध म्हातारे डोळे चोळत उठले. व मला त्यांच्या थकलेल्या बारीक डोळ्यांनी कष्टाने उघडत पाहत म्हणाले,"का र पोरा, कशापायी आलास इथं? काय पाहिजे तुला?"
मी त्या म्हाताऱ्या बाबाला म्हणालो, " अहो बाबा मला काही नाही पाहिजे". "आर मग आलास तरी कशापायी इथं मसनवट्यात? बाबांनी विचारलं.
मी हसलो आणि बाबांना एक प्रश्न विचारला. " बाबा तुम्हाला इथं भीती नाही का वाटत ?" "कशाची" बाबानी विचारलं?
मग मी म्हणालो," अहो बाबा इथल्या भुतांची, प्रेत, आत्म्याची?
बाबा माझ्याकडं पाहुन हसले आणि म्हणले " आरं लेका, ही बिचारी भुतं, प्रेत, आत्मे काय आपल्याला तरास देणार तवा, अन ह्यांच्यापासून कसली भीती?अन मग कशाला घाबरायचंय?" "पण तरीही बाबा" मी म्हणालो. बाबा म्हणाले" खरी भीती तर ह्या समाजात, दुनियात वावरणाऱ्या जिवंत भुतांची, लोकांचीच वाटती. लोकासनी लुबाडणं, फसवणं, याजाच पैक खाणं ही खरी भुतांची लक्षणं हायती अन ती या मतलबी समाजात वावरत्यात, अन खरा त्रास तीच जिवंत भुतं द्यात्याती.
आर बाळा ही तर आपलयासनी सोडुन गेलेली माणसं हायती. ही मेलेली माणसं मला काय बी बोलत नाय बग .. कुणाचं हिथं आल्यालं मी निवद खातू, कुणी वाहिलयालं, नारळ, बिस्किटं, कधी जेवण खातू... तरीबी कायबी बोलत नाहीती बघ." नायतर हिथं समाजात कोण कोणासनी विचारणा झालंय बघ, सगळी स्वार्थानी बरबटल्याती. लगीन झालं की पोटचं पोरगं आई-बापाला घराच्या बाहिर काढतया, जमिनीसाठी बहीण भावाला भांडतीया, भाऊ-भाऊ शेतीसाठी एकमेकांचं मुडदं पाडायला माग बघनां झाल्याती, मग बाहिर लक्ष द्यायासनी वेळचं कुठंय? "
"ती जिवंत माणसं खरी भुतं हायती. म्हणुन मी हिथं स्मशानात राहतुया. हिथं आसलं काय बी नाय बग लेका, सगळी शांतता अन निस्वार्थता हाय, म्हणुन आपलं हिथचं बरं हाय."
खरोखरच, बाबा जे बोलले ते अगदी 100% खरं बोलले होते आणि समाजातील दांभिक, स्वार्थी, दिखाऊपणा च्या वृत्तीच्या, खोट्या लोकांचा खरेपणा सांगितला होता. खरंच माझ्या मनाला आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती मनाला विचार करायला भाग पाडणारी गोष्ट बाबानी त्यांच्या अनुभवातून सांगितली होती.
"खरं तर बाबांनी खोट्या व दांभिक समाजाचा आरसाच माझ्या समोर धरला होता म्हणा ना"....
