पांडू
पांडू
माझे बालपण आमच्या कसबा पेठ मधील तीन मजली मोठ्या वाड्यात गेले. लहानपणी सगळ्या मुलांप्रमाणे आम्हाला दिवाळीच्या सुट्टीची व मे महिन्यातील उन्हाळी सुट्टीची ओढ लागलेली असायची पण ह्या ओढीमागे अजून एक कारण असायचे ते म्हणजे आजी, बाबा घर आवरायला, रंगवायला काढायचे म्हणजे आमचा लहान मुलांचा लाडका पांडू घरी येणार.
पांडू हा बऱ्याच वर्षांपासून आमच्या घरी येत होता... म्हणजे आम्हाला कळायला लागल्यापासून तो वर्षातून किमान दोनदा तरी कामाच्या निमित्ताने घरी यायचा, पांडू हा मूळचा कोकणातला, दापोली तालुक्यातील दमामे हे त्याचे मुळगाव. पांडू हा चांगला सहा फूट उंच सडपातळ पण कष्टाच्या कामानी बनलेले पिळदार शरीर, अंगात हाल्फ बदामी शर्ट कोपरीवर घातलेला, खाली गुडघ्या इतकी हाल्फ खाकी चड्डी (पूर्वी शाखेची (संघाची )असायची तशी ), डोक्यावर पांढरी (मळकट )गांधी टोपी, उभट चेहरा जो कामाने व उन्हाने रापलेला, चार्ली चॅप्लिन सारखी छोटीशी मिशी, कानाच्या पाळीवरून बाहेर डोकावणारे कुरळे केस, सतत हसरा चेहरा... आमच्यासाठी तो त्याकाळी अमिताभ बच्चन वाटायचा. अतिशय सरळ, साधा, मायाळू, मुलांत मुलं होऊन रमणारा घरगडी होता पण तो आम्हाला कधी तसा भासायचा नाही... पांडू घरी आला की आम्ही सगळे खुप खूष असायचो... त्याला सारखं सारखं पांडू पांडू म्हणून हाका मारून लपायचो, तो पण न थकता किंवा न रागवता आमच्या प्रत्येक हाकेला ओ द्यायचा. मागे वळून पाहून हळूच डोळे मिचकावायचा. कधी कधी उचलून खांद्यावर घ्यायचा, आमच्या बरोबर खेळायचा, आमचे क्रिकेट चालू असलेकी हमखास त्याला बॉल अनेकदा वरकर्मी लागायचा पण तो कधी, कधीच रागावला नाही की ओरडून बोलला नाही. घरातले पडेल ते सगळं काम तो करायचा, घराची साफसफाई, गवंडीकाम, लाकडे फोडणे (बंबासाठी) वाड्यामधली कॉमन मोठी मोरी तुंबली की पट्टी घालून गाळ काढणे, पावसाळा जवळ आला की कौलारू छप्पर शेकारणे, पत्रे नीट व्यवस्थित एकमेकांवर ठेवून ठोकून बसवणे, जुने पत्रे जिथे फाटले असतील तिथे तुकडा जोडणे किंवा प्लास्टिकचा कागद त्यावर ठेऊन वर दडपण म्हणून विटा किंवा कौले रचणे अशी एक ना अनेक कामे वर्षनुवर्षे तो न थकता आमच्या घरी अगदी हसत व फारच कमी मजुरीवर बिनभोभाट करत होता. दिवाळी आली की वरती तिसऱ्या मजल्यापासून ते तळमजल्यापर्यंत सर्व वाडा झाडून, जाळीजळमटे साफ करायचा, ते करत असताना त्याच्या अंगावर, डोक्यावर अनेक जळमटे पडत व त्यामुळे मुळात रापलेला चेहरा थोडा पांढरट दिसें तेंव्हा आम्ही त्याला म्हातारा पांडू म्हणून चिडवत असू.हा पांडू पावसाळ्यात गायब होत असे. पावसाळ्यात तो गावाकडे शेतीची कामे करायला जातं असे ते मग तो गणपती झाल्यावरच परत पुण्यात येत असे.
मला आठवते आहे भऊतेक मी सहावीत किंवा सातवीत असेल तेंव्हा आमचा नेहमीचा सुतार काशिनाथ हा वाईट बातमी घेऊन आला की पांडूचा गावाकडे ऍक्सीडेन्ट झाला, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, खुबा मोडला म्हणून कळले... पुढे 2-3 वर्षे पांडू पुण्यात आलाच नाही. त्यानंतर एक दिवस अचानक तो घरी आला पण ह्या वेळचा पांडू आम्हाला फार खचलेला, निराश, परिस्थिती पुढे हताश झालेला दिसला... त्याला असे पाहून आम्हाला सुद्धा रडू येत होते... आता त्याला काम करायला बरीच लिमिटेशनस येत होती... तरीही हॉस्पिटल, आजरपणाचं खर्च खुप झाला म्हणून परत तो कामाला आला होता... तो आला त्यावेळी खरेतर आमच्याकडे काही काम नव्हते तरी माझ्या आजीने त्याची परिस्थिती पाहून त्याला लाकडे तोडायला सांगितली,मग आमचा व्हरांडा, जिना साफ करायला सांगितले त्याला.. तो सगळं काम निमूटपणे करत होता.. आता त्याचे जेवण ही कमी झाले होते पूर्वी 3भाकरी एका जेवणात खाणारा पांडू आता एका भाकरीमध्ये जेवण उरकते घेऊ लागला होता. काही दिवस पुण्यात राहून नंतर पांडू जो गावी गेला ते कायमचाच. मधून एखादी त्याची खुशाली काशिनाथ गावी गेला तर कळायची आता ते ही बंद झाले पाच वर्षांपूर्वी काशिनाथ परत न येण्याच्या गावाला निघून गेला तेंव्हा पासून पांडूची काही खबरबात नाही आली... मी देवाकडे प्रार्थना करतो की तो स्वस्थ व आनंदी असावा.
