बाबा
बाबा
बाबा म्हंटले तर फक्त 2 अक्षरे पण ह्यात संपूर्ण जग सामावलेले असते. मुलांच्या आयुष्यातील पहिला हिरो म्हणजे त्यांचा बाबा असतो. अत्यंत शिस्तप्रिय, कठोर, वक्तशीर, काटेकोर पण तरीही आतून हळवा, मृदू अगदी फणसासारखा असतो बाबा. मुलांच्या, बायकोच्या, घरातील सर्वांच्या इच्छा पूर्णकरण्यासाठी विनातक्रार अहोरात्र जो धडपडत
असतो तो बाबा असतो. दरवर्षी नचूकता दिवाळीला मुलांसाठी नवे कपडे, शूज घेऊन येणारा मुलांचा संताक्लोज म्हणजे बाबा. स्वतः चे जुने झालेले तेच ते ड्रेस शिवून, गादीखाली घडीकरून ठेऊन परत दुसऱ्या दिवशी हसऱ्या चेहऱ्याने अंगात घालणारा एक संन्यस्थ म्हणजे आपला बाबा असतो.
ऍडमिशनसाठी प्रसंगी पुढऱ्यांचे, हेडमांस्टरांच्या घरांचे उंबरे झिजवणारा याचक म्हणजे बाबा असतो. वयात आल्यावर स्वतः हुन पॉकेटमनी देणारा व आपल्यावर करडी नजर ठेवणारा बाबा असतो.स्वतः आयुष्यभर पायी किंवा सायकलवर जाऊन मुलासाठी गाडी (2 व्हिलर ) घेणारा बाबा असतो.आयुष्याची सगळी कामाई मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आनंदासाठी व लग्नासाठी खर्च करणारा फक्त बाबाच असतो.
ह्या बाबाला कधी तुम्ही हताश झालेला, अवसान टाकलेला, हार मानलेला पाहिलंय? कधीच नाही कारण सर्व परिस्थिशी झुंजणारा, प्रसंगी दोन हात करणारा हा फक्त बाबाच असतो.
बाबा तुझी किती रूपे, किती महती वर्णावी तेवढी थोडी. जेंव्हा बाबा कळायला लागताच जो हळूच हातातून वाळू निसटून जावी तसा हळूच निसटून जातो तो बाबा असतो.
