नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others

पाकीटमार

पाकीटमार

3 mins
370


दीपक एक बेरोजगार युवक. रोज सकाळी तयार व्हायचा आणि कामावर चाललो म्हणून आईला सांगून बाहेर पडायचा. दीपकचे काम कोणते तर पाकीट मारण्याचे. रोज सकाळी देवगिरी एक्स्प्रेसला प्रवाश्याची एकच गर्दी राहते आणि त्याच गर्दीत हा दीपक देखील घुसायचा आणि लोकांचे पाकीट मारायचा, हा त्याचा रोजचा धंदा. लोकं आपणाला पाकीटमार समजू नये म्हणून तो अगदी टापटीप व्यवस्थित राहायचा. चांगले कपडे वापरायचा आणि एखादा कर्मचारी जसा राहतो त्या पद्धतीने राहायचा. तो कोणाचे मोबाईल चोरायचा नाही की कोण्याच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढायचा नाही. फक्त आणि फक्त पाकीट मारायचा. दिवसातून एक-दोन तरी पाकीट मारायचा आणि त्यातून त्याला काहींनाकाही रक्कम मिळायची, पैसे काढून घेतले की तो पाकीट फेकून द्यायचा. त्यात तो मजेत दिवस घालवायचा. पाकीट मारण्यात दीपक एवढा तरबेज झाला होता की, आजपर्यंत त्याला कोणीही रंगेहात पकडले नव्हते. 

याच दीपकवर मात्र एका व्यक्तीची खास नजर होती. तो देखील रोज त्याच देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करायचा. त्याचे डोळे नेहमी दीपकला शोधायचे. त्याने एकदा दीपकला पाकीट मारत असताना पाहिले होते पण कोणाला सांगण्याचा पूर्वी तो डब्यातून उतरून गेला होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्याची तो नेहमी पाठलाग करू लागला. दीपकला हे माहीत नव्हतं की, कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवलेलं आहे. त्या दिवशी त्या व्यक्तीने हटकून तरी दीपकच्या पुढे उभे राहून रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या मागच्या खिशात त्याने एक पाकीट असे ठेवले होते की, ते दिपकच्या दृष्टीस पडावे. मग काय दीपकची नजर त्या व्यक्तीच्या पाकिटावर पडली आणि काही क्षणात त्याने त्या व्यक्तीचा पाकीट मारला आणि समोरून उतरून गेला. ती व्यक्ती हे सारे पाहत होता. स्टेशनच्या बाहेर गेल्यावर नेहमीप्रमाणे दीपकने आजची कमाई किती झाली असेल ? असे विचार करत ते पाकीट बाहेर काढलं. सर्वच रकाने तपासले पण त्यात काहीच नव्हते. एक कागद मात्र त्यात आढळला. पैसे नव्हते म्हणून तो पाकीट फेकून देणार होता मात्र त्यात एकच कागद असल्याने उत्सुकतेने त्याने कागद उकलून पाहिलं, त्यात लिहिलं होतं, 

प्रिय पाकीटमार

दुसऱ्याचे पाकीट मारणे हा तुझा जरी एक धंदा झाला असला तरी ज्याचे पाकीट तू मारतोस बिचाऱ्या त्या व्यक्तीचे काय हाल होत असतील याचा जरा विचार केलास का ? त्याच्या पाकिटात असलेले पैसेच फक्त तुला कामाला येतात, पण त्याव्यतिरिक्त जे की महत्वाचे कागदपत्रे किंवा कार्ड्स असतात ते तुला कामाला येत नाही म्हणून फेकून देतोस. मात्र तीच कागदपत्रे गोळा करण्यासाठी त्या व्यक्तीला काय त्रास सहन करावा लागतो ? याची कदाचित तुला जाणीव नसेल. आजकाल लोकं सापडलेला पाकीट ज्यांचे त्याला परत करतात कारण त्यात पैसा नव्हता म्हणून नाही तर त्याच्यात असलेल्या महत्वाच्या दस्तऐवजमुळे. माझ्या मित्रा, तुला नम्रतेची विनंती की, पाकीट मारणे हा धंदा सोडून एखादा दुसरा धंदा शोधून घे, ज्यात लोकांचे आशीर्वाद मिळतील आणि तुझे आयुष्य नकळत वाढेल. पाकीटमार करण्याच्या धंद्यात तुला पैसा मिळतोय सोबत लोकांचे श्रप देखील मिळत आहेत. 

माझे हे बोलणे तुला पटले असेल तर उद्या सकाळी रेल्वे स्टेशनवर भेटू या. तुझी तयारी असेल तर तुला आनंद मिळवून देणारं काम मी देतो. 

हे पत्र वाचून दीपक खूप चिंताग्रस्त झाला. त्या पत्राचा त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्याला रात्रभर झोप लागली नाही. सकाळ कधी होते आणि त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला मी कधी भेटतो असे त्याला झाले. 

रोजच्या प्रमाणे दीपक तयार झाला. कामावर जातो असे आईला सांगत असतांना, आई, आजच्या कामाला जाण्यापुर्वी मला आशीर्वाद दे असे तो म्हणाला. दीपक च्या आजच्या वागण्याने आई देखील जरा हैराण झाली तरी तिने दीपकला आशीर्वाद दिला. एका वेगळ्याच धुंदीत दीपक रेल्वे स्टेशनवर पोहोचला. जी व्यक्ती रोज दिपकला शोधत होती, आज दीपक त्या व्यक्तीचा शोध घेत होता. स्टेशनवर रोजच्या सारखी तुफान गर्दी होती. दीपक आज कोणाचे तरी पाकीट मारतोय का ? हे ती व्यक्ती दुरून पाहत होती. दिपकवर त्याची नजर खिळून होती. दीपकने आज कोणाचेही पाकीट मारले नव्हते आणि डब्यातून उतरलाही नव्हता. आपल्या पत्राने काम केले याची जाणीव त्याला निर्माण झाली. म्हणूनच दीपकच्या खांद्यावर पाठीमागून एक हात पडला. त्याबरोबर दीपक मागे वळून पाहिला असता. त्याला साक्षात आपण परमेश्वराला भेटतोय की काय ? असे वाटले. दोघेजण डब्यात सीटच्या वरच्या बाजूला बसले आणि त्या परमेश्वरासारख्या व्यक्तीने दीपकला आनंद मिळवून देणारे काम सांगितले. दीपक मनोमन खूप सुखावला आणि योग्य रस्ता दाखविल्याबद्दल त्या व्यक्तीचे आभार व्यक्त केले. 

आज दीपक त्याच रेल्वेत हॉकर्स म्हणून काम करतो आणि जे कोणी प्रवाश्याचे पाकीट मारतात त्यांना त्या व्यक्तीने जसा मार्ग दाखविला मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करतो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational