ऑफर
ऑफर


"किती हा धुराचा वास... पहिली तरी एक सिगारेट असायची, आता दिवसाला पाच पाच... असह्य झालंय मला हे सगळं काही तरी उपाय काढलाच पाहिजे..."
मनू लगेच राहुलला न सांगता घराबाहेर पडते. थोड्यावेळाने राहुल मनवाला घरभर शोधतो.
"कुठे गेली ही न सांगता... फोनही रिसिव्ह करत नाही..."
"हे कुठे गेलेलीस तू... मी किती फोन करत होतो आणि हे काय तुझ्या हातात ही बीयरने भरलेली बॅग..."
"हो बियर... त्यात काय, माझ्यासाठी आणली मी..."
"वेडी झाली आहेस का, अगं आई-बाबांना कळलं तर काय होईल माहित आहे तुला... सून म्हूणन शोभत नाही हे आणि आमच्या घरात तर अजिबात चालत नाही..."
"हो का, मग कळू दे..."
"काय कळू दे... कळतंय का तुला मी काय म्हणतो ते..."
"रिटर्न कर ती..."
"पण का..."
"मी पण पिणार..."
"हे मधीच नवीन खूळ डोक्यात कुठे घातलंस..."
"का तू सिगारेट पिलेली चालते मग मी..."
"अगं सिगारेट पिण्यात आणि बियर पिण्यात फरक आहे..."
"काय फरक आहे, दोन्हीही व्यसनंच ना..."
"हे बघ तू असं काहीही करणार नाही, ओके..."
"ओके मी नाही करणार, पण माझी ऑफर तुला मानावी लागेल..."
"ऑफर कसली?"
"तू जर सिगारेट सोडशील तर मी हे काही करणार नाही, तू जर एक सिगारेट पिलीस तर मी पण बियर पिणार... चालेल तुला... पुरुषांनी केलेलं व्यसन... बाईनी सांभाळून घ्यायचं मग बायकांनी केले तर त्यांना शोभत नाही... वाह वाह ते सिगारेट असो वा बियर पिणे हे एक व्यसन आहे, जे आरोग्यास हानिकारक असते. हे माहित असूनसुद्धा आपण त्याला बळी पडतो. पहिली पहिली एक सिगारेट असायची तुझी, आज पाच पाच दिवसाला... अरे त्या शरीराला कशाला उगीच धुराने निकामी करतोस... कॅन्सरसारख्या आजाराला निमंत्रण देण्याचा हेतू आहे का तुझा? तू जर असा वागतोय, तर मग मी अशी वागलेली का वाईट वाटते तुला... त्या ड्रॉवरमध्ये सिगारेट सोडणाऱ्या गोळ्या ठेवल्या आहेत, आता तूच ठरव तुला काय करायचं ते... मी मात्र मागे हटणार नाही."