ओम यज्ञेन
ओम यज्ञेन
दुखऱ्या ग्लानीतून जाग आली खरी पण काही केल्या डोळे उघडेना. बंद डोळ्यासमोर बंटी आणि पिंटू आलेत तसे ती ताडकन उठून बसली. त्या तेव्हढ्या कृतीनेही भरपूर श्रम झाल्यासारखे थकली. तिने आजूबाजू पाहिले. किती दगड धोंडे पडले होते. काटेकुटेही. रुतले कसे नाहीत ते पाठीला? महत्प्रयासाने उजवी, डावी करत एकएक पापणी उघडली. ती जिथे निजली होती नेमके तिथे हिरव्या पिवळ्या बेलाच्या पानांचा सडा पडला होता. अर्थात काल शुद्ध हरपून कोसळताना तिला हे माहिती नव्हते.
अंग अंग ठणकत होते. काल तिच्यासोबत जी भयप्रद दुर्घटना घडली ती आता संपूर्णतः आठवत होती. स्वतःच्या नासल्या शरीराची घृणा येऊन तिने दाताखाली ओठ दाबला. रक्ताळलेल्या ओठांतून अधिकच रक्त भळभळू लागले. काल, इथे, याच जागेवर? नाही, असे सळसळते वन तर नव्हते तिथे, त्या... त्या जागी होते गर्द, गुमान, दुष्ट रान ! कमालीचा एकांत नि काळाशार अंधार. ती शहारली. ते तिघे वासनांध इसम अत्यंत निर्घृणपणे तिच्या कायेवर तुटून पडले होते. एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा आळीपाळीने बलात्कार करत होते. ती स्फुंदत होती, रडत होती, ढोरासारखी ओरडत होती, हात जोडून विनवत होती पण त्यातील एकानेही तिच्यावर दयामाया दाखविली नाही.
मध्यरात्रीच्या काळीमेत आपला अमानुष कार्यभाग उरकून ते तीन नराधम आले तसे काळोखात गडप झाले. अंगात अजिबात त्राण नसतांनाही मुलांच्या ओढीने तिने हातपाय उचलले. कसेतरी स्वतःला फरफटले पण कोसळलीच ती काही अंतरावर. आता काही आपण वाचत नाही, कुठल्यातरी जंगली प्राण्याच्या भक्ष्यस्थानी पडू या विचारांतच ती बेशुद्ध पडली.
याक्षणी ती जागी झाली परंतु तिच्यातली चेतना नष्ट झाली होती. हा विटाळलेला देह घेऊन घरी जायची इच्छा नव्हती. किती सुंदर संसार होता तिचा. ती, तिचा हसतमुख मिस्कील नवरा केतन, दोन छोटी गोजिरवाणी मुले. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. ऑफिसमधून घरी परतताना सुनसान रस्त्यावर तिची गाडी बंद पडली नि ती त्या दुर्जनकर्मींच्या वासनेचा शिकार झाली. स्वतःच्या खरचटलेल्या फाटल्या शरीराकडेही पहावत नव्हते तिला.
आतापर्यंत केवळ केतनच्याच स्पर्शाने मोहरलेला हा देह आज किती बटबटीत दिसत असेल? ती प्रचंड घाबरली. अंगावरचे चिखलाने भरलेले वस्त्र फाडून फेकत एखाद्या स्त्रीने भरधाव धावत सुटावे तसे ती बाटलेले शरीर सोडत धावायचा प्रयत्न करू लागली. तिला जायचे होते खूप दूर. त्या सगळ्या विचारांपासून, त्या काळ्याकुट्ट प्रसंगापासून. लपून बसायचे होते आपल्या उबदार घराच्या सुखद कवचात. पण कंबरेखालून जोरकस कळ आली आणि हे भीषण वास्तव्य कधीच बदलणार नाही याची भयानक जाणीव तिला खचवत गेली. जीव द्यायला म्हणून तिने आसपास नजर फिरविली. एखादी विहीर, डोह काहीतर दिसावे.
जंगलातले झाड न् झाड डुलत होते. नुकताच पाऊस येऊन गेला असावा. कोवळ्या किरणांची दाटी झाली होती. "श्रावण लागला आहे, सोमवारी आठवणीने देवाला बेल वहा बरं", परवाच सासूबाईंचा फोन आला होता. कसे सगळे निसटून निसटून गेले?
चालता चालता ती जोरात ठेचकाळली. जखमी शरीराला तो आघात सहन न होऊन तशीच खाली बसली. वाऱ्याच्या झुळकीसरशी तिच्या कानावर धीरगंभीर स्वर पडले 'ओम नमः शिवाय'. ओम नमः शिवाय !! तिने समोर पाहिले. आठदहा स्त्री पुरुषांचा घोळका शिवशंभूच्या पिंडीभवताली उभा होता. छोटेसे देऊळ असावे. त्या सगळ्या लोकांनी पिंडीवर दुधाची धार धरली. तिला तिच्यातूनच काही घाण वाहून गेल्यासारखे का वाटले?
अंबाड्यावर जाईचा गजरा लावलेल्या त्यातील एका शालीन स्त्रीने जवळच्या रेशमी उपरण्याने हळुवारपणे पिंड पुसायला सुरुवात केली. इतर भक्तगण हात जोडून स्थानापन्न झालेत. पुन्हा ; आपल्याला गिळू पाहणारी काळी छाया कुणी हळूच पुसून टाकतंय असे का वाटले तिला? तिनेही नकळत हात जोडलेत.
अहा सुंदर दृश्य ! शिवशंभूच्या नामाचा तो अनाहत नाद नि हलके हलके फुलांनी वेढली जाणारी पिंड. त्या आधी पिंडीला चंदनाचे लेपन ! त्यावर पिवळ्या, पांढऱ्या, लाल-गुलाबी, निळ्या-जांभळ्या फुलांची मुलायम आरास. बिल्वपत्रांचा अभिषेक सुरू झाला अन् तीही धीम्या स्वरात 'ओम नमः शिवाय' पुटपुटू लागली. अवघा परिसर फुलपत्रीच्या मंद सुवासाने गंधाळला. तिला कळ्या सुमनांनी घमघमणारे आजीचे अंगण आठवले. ते आजोळ, ती वयोवृद्ध आजी, वयस्क मातापिता, सासुसासरे, घरसंसार सोडून आपल्याला अर्ध्यातच निघून जावे लागणार असल्याची दुःखवेणा ठणकून ठणकून वर आली. समोरचे पवित्र दृश्य नजरेत साठवत तिने डोळे गच्च मिटून घेतले.
ज्या देहाची काल रात्री भयंकर विटंबना झाली तो देह घेऊन तिला कदापिही जगायचे नव्हते. त्या निर्गुण स्वरूपाच्या आधीन हा देह सोपवायचा तिचा निश्चय पक्का झाला होता. आता जीव द्यायला तिला कुठली विहीर, नदी, डोह लागणारच नव्हता. तिच्या स्व इच्छेनेच तिचा प्राण तिच्यातून सुटावणार होता. तशी तिची मानसिक तयारी झाली होती. ती प्राणांतिक आवेगाने स्वर्गातील सोपनाच्या पायऱ्या चढू लागली. इहलोक मागे मागे पडत होता. बस ; शेवटचीही पायरी सरली. ते भव्य स्वर्गीय दार उघडले की प्राण कापरासारखा उडणार होता.
दारापलीकडे असलेल्या स्वर्गलोकीच्या फुलझाडांचा दरवळ येऊ लागला. धूप कर्पूराचे सुगंधी वलय लहरू लागले. स्वर्गजगतातही त्या अजाणबाहू भोळ्या शंकराची पूजा अर्चना सुरू असावी. तिच्या अंगाखांद्याभोवती बिल्वदलाचे लोटच्या लोट लगटू लागले. देह त्यागून द्यायला ती सर्वशक्तीनिशी पुढचे स्वर्गाचे द्वार उघडणार तोच मागून येणाऱ्या सांबशिवाच्या नामध्वनीसह तिच्या कानावर एक कोवळी हाक सरसरली 'मम्मा'. ती प्रचंड दचकली. सर्रकन मागे वळली. तिचे मुलं बंटी आणि पिंटू "जाऊ नको" म्हणून आर्जवं करत हात पसरून उभे होते. त्यांच्या केविलवाण्या दृष्टीस तिची नजर भिडताच ती अंतरबाह्य थरथरली. डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. विचारांचे किल्मिश झटकून आतुरतेने उन्मळून तिने त्यांना जवळ घेतले. नासला देह गळून गेला होता. यष्टी-समेष्टीचा घोळ सोडून ती नव्या जाणिवांसह पृथ्वीवर परत आली होती.
"आली, त्यांना शुद्ध आली, ते कमंडलूतील देवतीर्थ द्या बरं", कुणीतरी कुणालातरी सांगत होते.
हळूहळू तिचे ओठ ओले झालेत. घशाची कोरड नष्ट झाली. केसर, वेलची पूड, कापूर, तुळस घातलेले तीर्थ तिची तहान मिटवू लागले. अंगात प्राणवायू खेळू लागला.
"मंदार माला कलितालकायै
कपाल मालंगित सुंदराय
दिव्याम्बरायै च दिग्मबराय
नमः शिवायै च नमः शिवाय !"
दीपाराधनेचा बीजमंत्र तिच्या कानावर पडत होता. तिने डोळे किलकिले केले. नजर आपसूकच शिवशंभूच्या पिंडीवर गेली. तळहातावर दिवा घेऊन केतन देवाला आळवत होता. दोन्ही मुले चिमुकल्या हातांनी तिचे तळपाय चोळत तिला उठवत होते.
काही अंतरावर खाकी पोषाखातील पोलीस उभे होते. पुजारीजींनी नुकतेच लावलेले अष्टगंध त्यांच्या कपाळावर चमकत होते. सगळे कसे सात्विक, आश्वासक दिसत होते. तिचे मनोबल वाढले. गुन्हेगारांना शिक्षा देत हा अपघात आपण विस्मरणात टाकायलाच हवा असा दृढनिश्चय करत ती उठून बसली.
हो, अपघातच नव्हे का?
"ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणी
प्रथमण्यासन् ..."
मंदिर मंत्रपुष्पांजलीच्या आवाजाने दुमदुमले होते !

