ओला कोपरा
ओला कोपरा


गेल्या दोन दिवसांपासून सुर्यदर्शन नाही. बाहेर पावसाची रिपरिप सुरु आहे. हवेत सुखद गारवा आहे. अशी बाहेर पावसाची झड लागली की मी अंतर्मुख होतो. आत्ताही एकटाच हाती कॉफीचा मग घेऊन, खिडकीबाहेरचा पाऊस आणि गार वाऱ्यात ओले झालेले त्याचे तुषार चेहऱ्यावर झेलताना होणारा आल्हाद एन्जॉय करतोय.
काळ्या - निळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, त्या पावसाच्या रेशमी सरी, कॉफी आणि हेडफोन मधून एकू येणार 'रिमझिम के तराने लेके आई बरसात' हे गाणं! (रफी + गीता दत्त), या क्षणासाठी मी स्वर्गसुखसुद्धा लाथाडीन! पावसापेक्षा पावसावरची गाणीच जास्त असतील. पण या गाण्यात मी गुंतलोय. मला ते खूप आवडतं. कारण मलाही कोणाची तरी 'पहिली मुलाकात' याद येते.
त्या दिवशी आमचा दहावीच्या वर्गाचा एक्स्ट्रा क्लास होता. संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटली. क्लास संपायला सहा वाजले. पाऊस पडून गेला होता, पण रिमझिम चालूच होती. आभाळही निवळले नव्हते. मी शाळेच्या बाहेर आडोशाला उभा राहून, पाऊस थांबण्याची वाट पाहात होतो. (आत्तासारखे ढग आले की छत्री घेऊन शाळेत येणारे माय - बाप तेव्हा नव्हते. कार्टं चट घरी येणार याची खात्री असणाऱ्या बेफिकिर जन्मदात्यांचा तो सुवर्णकाळ होता!)
"सुऱ्या, चल येतोस? माझ्या छत्रीत. पाऊस थांबेलसं नाही वाटत. रात्रीचा पाहुणा दिसतोय," आमच्या घराशेजारची ऊषा केव्हा आली कळलंच नाही. माझ्याच वर्गातली पण दुसऱ्या शाळेत जायची. मी जरा घुटमळलो. कारण त्या काळी आम्ही मुलं मुलींपासून जरा लांबच राहायचो. पाऊस तसा फार जोरात नव्हता. मला भिजण्याची काळजी नव्हती. पण सोबतची वह्या - पुस्तकं भिजली असती ना? म्हणून मग मी तिच्या चिटुरन्या छत्रीत डोकं घातलं. कसचं काय? एरवी ती एकटी न भिजता त्या छत्रीतून घरापर्यंत आरामात गेली असती. पण त्या छत्रीन आम्हा दोघांनाही ओलचिंबं केलं!
घरी गेल्यावर मी ओले कपडे बदलून कोरडे घातले. आईने 'मेलं इतकं भिजायची काही गरज होती काय? सर्दी झाली म्हणजे,?'असलं काहीतरी म्हणत, आगंमागं 'मेल्या, मुडद्या' लावत खसाखसा डोकं पुसून कोरडं केलं. आमच्या घरात कांदा - लसूण - वांगं हे पदार्थ चातुर्मासात वर्ज्य असतात. पण कॉफी मात्र वर्षभर बंद! का? माहित नाही. पण त्या दिवशी आईने गरमागरम कॉफी करून दिली. पाहुण्यांना म्हणून आई कॉफीची एखादी वडी घरात ठेवत असे. आज चहा संपला होतो म्हणून कॉफी.
माझे काहीतरी हरवले आहे. ऊषा आसपास जवळच आहे. 'येतोस, माझ्या छत्रीत!,' म्हणतीय. अजून पावसात भिजावं वाटत होतं. तिची छत्रीत असतानाची ऊब पुन्हापुन्हा आठवत होती. अंगावर गोड काटा येत होता! थोडंसं अधांतरी तरंगल्यासारखं वाटत होतं. का? आज जरी या 'का?'चं उत्तर माहित असलं तरी, तेव्हाचं 'वाटण' वेगळंच होत. मी माझ्या अभ्यासाच्या खोलीची खिडकी उघडली. खिडकीच्या ओट्यावर, आईने दिलेला बिनकानाचा कॉफीचा कप (मी त्याला तेव्हा मग म्हणायचो) ठेवला. खरखऱ्या ट्रान्झिस्टर लावला तर त्यावरही पावसाचीच गाणी लागलेली होती. 'रिमझिम के तराने लेके आई बरसात...,' तो रेडिओही मी खिडकीच्या ओट्यावर ठेवला. खिडकीच्या बाहेर पाहिले तो पावसाच्या सरी लयीत, रेशमी धाग्यासारख्या बरसत होत्या, आणि... आणि चार घरे सोडून असलेल्या, घराच्या गच्चीवर ऊषा दोन्ही हात पसरून स्वतःभोवती गोलगोल फिरत, बेभान होऊन नाचत होती! ओलिचिंब! मला जे वाटत होते, नेमके ती तेच करत होती!
त्या दिवशी माझं भिजलेलं अंग, कपडे, डोकं, कोरडं झालंय. पण सगळं नसलं तरी मनाचा, एक कोपरा अजून ओलाच आहे! तो क्षण, तोच मी, तीच ऊषा परत येणार नाही. मला माहित आहे. तरी ओला जीव कुठेतरी गुंतलाच आहे!
"अहो, काय मेलं त्या पावसाच्या रिपरिपीत टक लावून पाहताय? हातातल्या कॉफीचा कोकाकोला झालाय! बंद करा ती खिडकी. गार वारं झोंबतंय!"
बायकोने नेहमीप्रमाणे माझ्या ओल्या विश्वातून कोरड्या जगात खेचून आणलं...