नवे वर्ष नवा संकल्प
नवे वर्ष नवा संकल्प
" अदिती अगं तुझी पहिली संक्रांत आहे..हळदी कुंकू समारंभ जरा थाटातच करुयात आपण.आणि हो हळदी कुकंवाच्या दिवशी तु ना,जरा लवकरच ये हो..पण मला वाटतंय की,तु सुट्टी च घे एका दिवसाची. तुला कधी जमणार आहे.मला सांग म्हणजे त्याप्रमाणे तयारी करायला बरं मला."
"आई किती हो घाई? करुयात ना आपण आरामात सर्व.आणि हो तुम्ही एकट्यानेच सर्व धावपळ नका करू..मी फ्री असले की, करुया आपण. कामं."
"अगं अदिती घाई कुठंय कालच देशपांडे काकु च्या घरी झालं हळदी कुंकू, पाटील ताईंचे मिस्टर दवाखान्यात ॲडमिट आहेत.. म्हणून त्यांचं आता पुढे ढकललं गेलं.म्हणुन या आठवड्यात आपल्याच घरी उरकुन टाकुया हळदी कुंकू.. असंच ठरलं आहे आमच्या ग्रुप चं
आणि हो ते त्या वाणाच्या वस्तू काय द्यायच्या? ते अजुन ठरवलं नाही आपण..मला वाटतंय की, तुझं पहिली संक्रांतीचं हळदी कुंकू आहे.. जरा भारीतलंच काहीतरी देऊयात.."
अदिती ची लग्नानंतर ची पहिली संक्रांत सासुबाईंचा उत्साह पाहण्यासारखा होता.. कारण वाणात काहीतरी किंमती आणि जरा सगळ्यांपेक्षा वेगळी वस्तू देऊन त्यांना आपल्या किटीच्या ग्रुप मध्ये मोठेपणा मिरवायची संधी सोडायची नव्हती..
बरं आदीती आणि तिच्या सासु पेक्षा ही जास्त उत्सुकता किट्टीच्या ग्रुप लाच लागुन होती..कारण अदिती स्वतः एका मल्टी नॅशनल कंपनीत इंजिनिअर होती.. तिच्या सासु म्हणजे जोशी बाई त्यातर होत्याच मुळात हौशी आणि पैसेवाल्या सुद्धा बरका.. म्हणून त्या काय वाण देतात? हळदी कुकंवाचे कसे आयोजन करतात? याकडे त्यांच्या सर्व मैत्रिणींचे लक्ष लागुन होते... जोशी बाई तर चक्क चांदीचे हळदी कुकंवाचे करंडे वाणात देण्याचा विचार करत होत्या..तसे त्यांनी अदितीला ही बोलुन दाखवले.. अदिती तेव्हा काहीच बोलली नाही.कारण हळदी कुकंवाच्या नावाखाली उगाच जास्तीचा खर्च आणि बडेजाव पणा करणे तिला चुकीचे वाटत होते..पण सासुबाईंचा उत्साह पाहून ती काही बोलली नाही..
हळदी कुकंवाच्या दिवशी जोशी बाईंने खास पतंगांचे डेकोरेशन करवुन घेतले.. सुंदर, सुंदर हलव्यांचे दागिने, भारीतली काळी पैठणी सारं आयोजन अगदी व्यवस्थित आणि सुंदर ... फक्त वाणात देण्यासाठी करंडे तेवढे अदिती आणणार होती..तिने सासुबाईंना तसे सांगितलेच होते.. "आई तुम्ही बाकी सर्व तयारी बघा..मी वाणाचं बघते आणि हो हळदी कुकंवाच्या दिवशी च आणेल बरका वाणाची वस्तू.." सासुबाई ने तिला एक डिझाईन ही देऊन ठेवली होती..अशाच डिझाईन चे करंडे आण म्हणून बजावुन सांगितले होते..
अदिती छान काळी पैठणी, हलव्यांचे दागिने घालून तयार झाली.. फोटो सेशन झाले.. नंतर हळदी कुंकू झाले..आता वाणाच्या वस्तू देण्याची वेळ आली.. सासुबाई ने अदिती ला विचारले "करंडे कुठे ठेवले आहेत मी घेऊन येते.." लगेच अदिती उठून बाहेर गेली.. आणि वाणात देण्यासाठी आणलेली तुळशीची रोपं घरात घेऊन आली.. सासुबाई अवाक् होऊन पहात होत्या..एवढी रोपं कशासाठी आणली हा प्रश्न त्यांना पडला..
"अदिती अगं काय हे? मी तुला करंडे मागते आहे आणि तु हे काय करतेस? ही वेळ आहे का आता ही रोपं घरात आणुन ठेवण्याची.."
"आई अहो हेच तर आहे आपले हळदी कुकंवाचे वाण तुळशीचे रोप."
"काय हे रोपं आणलेत तु वाटण्यासाठी? मी तर तुला करंडे......"
"आई आपण चांदीचे करंडे देणार होतो..जे मला वाटतं सर्वांकडे असतील..तुळसही सर्वांच्या घरी असेलच..पण आपण हळदी कुकंवाचे वाण देण्याचा एक नवा पायंडा घालुया.. नवीन वर्षात एक नवा संकल्प करुयात.. कुठलीही मोठी आणि कींमती वस्तू देऊन मोठेपणा दाखवण्यापेक्षा ही प्राणवायू देणारी, औषधी गुणांनी परिपूर्ण अशी तुळस देऊयात सर्वांना..काय वाटतं तुम्हाला?"
सुनेचा जास्तीचा आगाऊ पणाचा तसा राग तर आला होता सासुबाईंना पण तिच्या विचारांपुढे त्यांचा राग टिकला नाही.. हळदी कुकंवाला आलेल्या बायकांनाही अदितीचा अभिमानच वाटला होता..
(वरील कथा आणि कथेतील पात्रे पुर्णपणे काल्पनिक आहेत तरी कुणाच्या आयुष्याशी मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा)
