नीलग्रहाच्या शोधात
नीलग्रहाच्या शोधात


अनामिकेने आळोखे पिळोखे हात डोक्याच्या वर ताणून मस्तपैकी अंगडाई घेतली व आळस झटकून टाकत नव्या जोमाने खुर्चीवर सरसावून बसली. थर्मासमधून कॉफी मगमध्ये ओतून घेत हळूहळू घोट घशाखाली उतरवत हातातील सायन्स जर्नलमध्ये पुन्हा डोके खुपसून बसली. कॉफी पिल्याने आता ब-यापैकी तरतरी आली होती. जडावलेल्या डोळ्यातून झोपेची गुंगी कधीच उडून गेली. ॲस्ट्रानॉमिकल सायन्स जर्नलमधील एका लेखामुळे ती खूपच चलबिचल झाली होती. एक नवीनच चॕलेंज तिच्यासमोर उभे ठाकले होते. ती पुन्हा पुन्हा ते आर्टिकल वाचून विचारात गुंतून पडली होती-- प्रश्न होताच तेवढा गहन !
खगोल शास्त्राशी संबधित लेखात एका गूढ पुस्तकाबद्दल बरेच काही अनाकलनीय व अविश्वसनीय अशा गोष्टींबद्दल उल्लेख केला गेलेला होता. त्यात म्हटल्याप्रमाणे 'हॉयनिच संहिता' हे गूढ लिपीत व अज्ञात भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे. कित्येक भाषा व लिपीतज्ज्ञांनी त्यातील मजकूर उलगडण्याचा प्रयत्न केला, पण ती लिपी वा भाषा पृथ्वीवरच्या कुठल्याही ज्ञात भाषेशी मिळतीजुळती नाही, हाच सर्वांचा निष्कर्ष आहे. या पुस्तकात निरनिराळ्या वनस्पती व फुला-पानांची तपशीलवार चित्रं आहेत, पण तसल्या कुठल्याही वनस्पती अद्याप कोणत्याही वनस्पतीतज्ज्ञांनी पाहिलेल्या नाहीत. त्याचबरोबर काही खगोलीय आकृत्याही आहेत, पण त्यांचाही अर्थ कुणी लावू शकलेलं नाही.
हे पुस्तक खोटं असेल, किंवा कुणीतरी सहज म्हणून किंवा गंमत म्हणून रचलं असेल, असं मात्र कुणालाच वाटत नाही. कारण किमान २७२ पृष्ठांचा हा जाडजूड ग्रंथ कुणी मस्करी करण्यासाठी लिहून काढेल, हे पटण्यासारखे नाही !' खरंच पुन्हा पुन्हा वाचून आपण त्यात अधिकाधिक गुंतत जात आहोत ही जाणीव अनामिकेला होऊ लागली.... खरंच का मी उलगडू शकेल हे गूढ?' अनामिका स्वतःलाच प्रश्न करीत होती. यावर अधिक भर देण्याचे दुसरेही अजून एक कारण होते. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील नॕशनल लायब्ररीत,तळ ठोकून असलेले अमेरिकन शास्त्रज्ञ प्रो. पाब्लो यांचे आलेले ते पत्र ! अनामिकेला यूएसमधील अॉटोनॉमस युनिव्हर्सिटी फ्लोरिडा येथून डॉक्टरेट मिळवून देणारे ते तिचे मेन्टार होते. प्रो. पाब्लो यांचा खगोलशास्त्राविषय गाढा अभ्यास होता. अनामिकेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शॉर्टकटस इन स्पेस अँड टाईम ट्रॕव्हेल म्हणजेच कालप्रवास एक वास्तव या विषयावर संशोधनात्मक प्रबंध लिहून प्रकाशित केला होता, ज्याचा अभ्यास अंतराळ संशोधन शास्त्रज्ञही करीत होते. अतिशय तैलबुध्दी असलेल्या भारतीय वंशाच्या अनामिकेच्या नव्या सिध्दान्ताने जगभरात धमाल उडवून दिली होती. अंतरिक्षातून कैक प्रकाशवर्षे दूर अंतरावर प्रवास करतांना जो शॉर्टकट वापरण्याची थिअरी केवळ कागदावर मांडली जात होती. तिला प्रत्यक्षात आणणारा भौतिक शास्त्राच्या नियमातंर्गत नवा सिध्दांत तिने मांडला होता. थोडक्यात म्हणजे कालप्रवास करतांना वॉर्महोल म्हणजे कृमीविवर या शॉर्टकटची गरज भासते किंवा ब्लॕकहोल म्हणजे कृष्ण विवर हा ही दुसरा पर्याय असतो पण तो पर्याय अशक्यप्राय गोष्ट म्हणून तिने वॉर्महोल यावरच लक्ष केंद्रित करून अथक प्रयत्नाअंती कृत्रिम वॉर्महोल तयार करून ते अवकाशात कसे स्थिरावू शकते हे एका वेगळ्या थिअरीने सिध्द केले होते. अर्थात शास्त्रज्ञांनी आतापर्यंत कल्पना केलेले नैसर्गिक वॉर्महोल हे अतिशय सूक्ष्म व तकलादू असते. त्यातून अंतरिक्ष यानाने प्रवास करायचे म्हटले तरी ते कधी कोलमडून पडेल व नष्ट होईल हे सांगता यायचे नाही. यातून जायचे जरी म्हटले तरी ते फोटोन स्वरूपात अॕन्टी मॕटरचा वापर करून ! या सर्व थिअरीजना फाटा देऊन स्वतःची मॕग्नेटिक वॉर्महोल संबंधित व हे प्रत्यक्षात कसे साकार होऊ शकेल याबद्दल काही नव्या थिअरीज अनामिकेने मांडल्या होत्या ज्या आजवर कोणी शोधू शकले नव्हते. अनामिकेला आधीच नासा अंतरिक्ष संशोधन केंद्रातून भविष्यकाळात आखून ठेवलेल्या अवकाश मोहिमेसाठी आधीच राखीव करून ठेवले होते.
या महिन्यात यूएस मधून प्रकाशित झालेल्या सायन्स मॕगेझीनमध्ये आलेल्या लेखामुळे भलेभले शास्त्रज्ञ अचंबित झाले होते. एक मोठी खळबळ खगोल शास्त्रज्ञांच्या जगतात उडालेली होती. ती केवळ या पुस्तकातील व्हॉयनिच संहितेमुळे ! हे केवळ भूलथापा आहेत असे म्हणणारा वर्गही जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये होता. असे असले तरी ब्रम्हांडातील रहस्याचा शोध घेऊन त्याविषयी संशोधन करणारे प्रो. पाब्लो हे हाडाचे संशोधक होते. त्यांची चिकाटी व जिज्ञासू वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आठ दिवसांपूर्वीच प्रो. पाब्लोंनी इजिप्तची राजधानी अलेक्झांड्रिया येथे प्रयाण केले होते. त्या त्यांच्या लाडाक्या शिष्येस अलेक्झांड्रिया येथे येण्याचे निमंत्रण धाडले होते. अनामिका सुटीमध्ये आपल्या आजोळच्या गावी आलेली होती. पहाटेच्या शांत व उत्साहदायी प्रहरी अनामिका आपल्या संशोधनाचे पेपर्स सोबत नेऊन टिपणे काढत बसलेली असायची. आता प्रो. पाब्लोंनी समोर मांडलेल्या व्हॉयनिच संहिता संशोधन मोहिमेद्वारे एक नवे आव्हान तिच्या समोर उभे ठाकले होते. पुढील आठवड्यात इजिप्तला रवाना व्हायचे होते. प्रो. पाब्लोंनी तिचा व्हिसा ताबडतोब मिळेल याची व्यवस्था आधीच करून ठेवली होती.
अलेक्झांड्रिया येथील नॕशनल लायब्ररीच्या कॉन्फरन्स रूममध्ये जागतिक कीर्तीचे अंतरिक्ष संशोधक जमले होते. आज भारतातून आलेली सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ मिस अनामिका इनामदार ही कॉन्फरन्सची सूत्र संचालक म्हणून माईक पुढ्यात उभी होती. पूर्वीपासून परिचित असलेले इजिप्शियन शास्त्रज्ञ साही हुसैन तिच्या मदतीसाठी शेजारी उभे होते. कॉन्फरन्सला सुरूवात झालेली होती. डॉ. साही हुसैनने माईकवर येत अनामिकेची ओळख सर्वांना करून देत आजच्या कॉन्फरन्सचा विषय म्हणजे व्हॉयनिच संहिता व त्यातील अजब लिपी व चित्रे यावर खुली चर्चा होणार असल्याचे जाहीर केले. अनामिकेने काल इजिप्तमध्ये पाऊल ठेवताक्षणी आधी अलेक्झांड्रिया स्थित जगातील सर्वात प्राचीन व मोठी लायब्ररीत हजेरी लावली होती. प्रो. पाब्लो व डॉ. साही यांचेसोबत त्या गूढ व वादग्रस्त पुस्तकातील मसुद्यांवर चर्चा केली होती. त्यासाठी आधी त्यात दर्शवलेल्या अतिशय वेगळ्या आकारातील व रंगातील पाने फुले असलेल्या वनस्पती, अवाढव्य घेर असलेली गगनचुंबी झाडे इत्यादी या शिवाय काही गूढ खगोलशास्त्रीय आकृत्या, सूत्रे यावर भाष्य करण्याची डॉ. साहींनी तयारी दर्शवली होती. यातील सारी माहिती ही आकाशगंगेच्या बाहेर आणि आपल्यापासून २४० प्रकाशवर्षे दूर असलेल्या नीलग्रहाविषयी असल्याचे डॉ. साहींनी प्रतिपादन केले होते. या ग्रहाचा सरळ सरळ संबंध हंटर स्टार क्लस्टर आणि इजिप्तमधील पिरामिडस, स्फिंक्स व नाईल नदीशी येत होता. पृथ्वीच्या अगदी बरोबर मध्यबिंदूवर असलेले गिझा पठार हे स्थान खगोलियदृष्ट्या अतिमहत्वाचे होते. कॉन्फरन्समध्ये जवळजवळ वीस देशांचे शास्त्रज्ञ/ अभ्यासक उपस्थित होते. कॉन्फरन्सची संचालन सूत्रे हाती घेत डॉ. साही माईक धरून जागेरून उठले व बोलायला सुरूवात केली.
" अति प्राचीन वारसा लाभलेल्या या अलेक्झांड्रिया लायब्ररीत हे जे गूढ पुस्तक उपलब्ध झालेले आहेत. त्यातील सर्वच गोष्टी अनाकलनीय आहेत. अशा आकारांची व आकर्षक दिसणाऱ्या चमचमत्या निळ्या व जांभळ्या रंगांची झाडे, पाने, फुले ही पृथ्वीवरील खचितच नाही... पण याविषयी क्ल्यू देणाऱ्या काही खगोलीय आकृत्या मात्र त्यावर निश्चितच प्रकाश टाकत आहे. याविषयी मी डॉ. साही हुसैन ठामपणे भाष्य करू शकतो कारण या आकृत्यांचा मला अर्थ लागलेला आहे व मी काही टिपणे काढून ठेवली आहेत. त्याविषयी प्रथम सांगतो. त्यानंतर डॉ. अनामिका आणि डॉ. पाब्लो या ग्रहापर्यंत कसे जाता येईल याविषयी विवेचन करतील !"
" म्हणजे डॉ. अनामिका या २४० प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहावर पाऊल ठेवणार आहे की काय ?" फ्रेंच शास्त्रज्ञ गिल्बर्ट यांनी शंका उपस्थित करून विचारले.
" हे बघा तेथे जायचे किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही पण आमची म्हणजे अमेरिकन मानवरहित याने तेथे निश्चितच लॕडिंग करतील ! आधी या ग्रहाचे निश्चित असे स्थान व इतर खगोलीय माहिती समजून घेऊ या. त्यानंतर मी विशेष एका सत्रात अंतराळ मोहिमेविषयी माहिती देणार आहे. तरी आधी डॉ. साही काय म्हणताहेत ते समजून घेऊ या.... ठीक आहे ?" अनामिकेने गिल्बर्टला खाली बसायला खुणावत सांगत सर्व उपस्थितांना माहिती दिली. डॉ. साहींनी समाधानाने तिच्याकडे पाहिले व लॕपटॉपशी जोडलेला प्रोजेक्टर चालू केला समोरील मोठ्या पडद्यावर काही आकृत्या यायला सुरूवात झाली. आता डॉ. साहींनी बोलायला सुरूवात केली.
"ओकेss लुक हिअर माय टीम ! ही ओरीयन कॉन्स्टिलेशन ह्यात सात प्रमुख तारे आहेत. हा समूह हंटर नावाने ओळखला जातो. हातात ढाल व दुसऱ्या हाती तलवार पकडलेली व पाय फाकून आक्रमक पोझमधील उभी मानवी आकृती जर ह्यातील तारे एका रेषेने जोडले तर तशी दिसून येईल. त्यासमोर असलेल्या टॉरस म्हणजे वृषभ राशीतील प्लियाडेस तारकासमूहाने बनत असलेल्या वृषभाकृती प्राण्याशी सामना करीत असलेल्या हंटरची संकल्पना आहे ही याशिवाय ग्रीक मायथॉलॉजीनुसार प्लियाडेस स्टार क्लस्टरमध्ये दडलेल्या सात सुंदर बहिणींचा पाठलाग करीत धावणारा हा हंटर आहे अशीही कथा निगडित आहे! ओरीयन बेल्टमधील बेटेलजियस, रिगल, बेलाट्रिक्स व साईफ ह्या चार ता-यांनी बनलेल्या साधारण आयताकृतीमध्ये अलनिटाक, अलनिलम व मिन्टाका हे लख्ख चकाकणारे तीन तारे गिझा पठारावर उभे असलेल्या तीन पिरामिडसशी साम्य साधतात. दोन तारे सरळ रेषेत खुफू व खाफ्रे पिरामिडसना तर तिसरा मिन्टाका तारा थोडा बाजूने ऑफसेट असा मॅन्कॉयर पिरामिडला रिप्रेझेंट करतात. अगदी म्हणजे आकाशातील ता-यांचे प्रतिबिंब पृथ्वीवर पडलेले दिसून येईल!"
" ओके.... राईट सर !" आपल्या नोटबुकमध्ये पॉईंटस लिहून घेत रशियन शास्त्रज्ञ क्लावदिना म्हणाली.
"हंटर स्टार कॉन्स्टिलेशन्स यामधील ह्या चार प्रमुख मोठ्या ता-यांपैकी बेटेलजियस हा तारा ६४३ प्रकाशवर्षे दूर असून तो हंटर आकृतीच्या उजव्या खांद्याच्या ठिकाणी पडतो. बेलाट्रिक्स हा २४० प्रकाशवर्षे दूर आहे व डाव्या खांद्याच्या ठिकाणी आहे. तर रिगल हा ७७२ प्र. वर्षे दूर असून उजव्या पायावर पडत आहे आणि साईफ हा ९०० प्र. वर्षे लांब अंतरावर असून डाव्या पायाच्या ठिकाणी आहे. तसेच अलनिलम म्हणजे शास्त्रीय नाव एप्सिलॉन ओरीयन हा १३५९ प्र. वर्षे , अलनिटाक मीन्स झेटा ओरीयन हा ८०० प्र. वर्षे व तिसरा मिन्टाका डेल्टा ओरीयन हा ९०० प्र. वर्षे अशा अंतरावर स्थित असून हंटरच्या कमरेच्या भागी आहेत. हे तीनही तारे म्हणजे परफेक्टली अलाईनड विथ थ्री पिरामिस ॲट गिझा. ओरीयन तारकासमूहाच्या समोरील मिल्की वे म्हणजे जमिनीवरील नाईल नदीचे प्रतिबिंब म्हणायला हवं !"
" पण सरजीss या हंटरचं डोके कुठे गेलं ," नासातील सिनियर साईंटिस्ट डोरोथी मोठ्याने हसून म्हणाली.
" अगं हो ! सांगतोय ना ! तर स्टार मेईस्सा गॅलेक्सीज पृथ्वीपासून ११०० प्रकाश वर्षे दूर व डोक्याच्या ठिकाणी आहे. स्टार हात्स्या हा हातातील तलवार शो करतोय ! तर हायडास ह्या दुसऱ्या स्टार क्लस्टर मधील दोन तेजस्वी तारे हे एक्झॅक्टली ओरीयनचे कंम्प्लीट हेड दर्शवतात. हे स्टार्स इजिप्तमधीलच व्हॅली ऑफ किंग्जच्या दहशूर व अबूसीर येथील पिरामिडस शो करतात.
" पण सर मला वाटते केवळ हंटर कॕन्स्टिलेशन्स मधील ता-यांविषयी समजून घेणे पुरेसे नाही कारण जेथे हंटर तारकासमूहाचा संबंध येतो तेथे प्रत्कर्षाने गिझा पठारावर स्थित स्फिंक्सशी साधर्म्य साधणा-या लिओ तारकासमूहाचा उल्लेख येतो आय मीन हे दोन्हीही एकमेकांशी निगडित आहेत असे माझे म्हणणे आहे तर डॉ. साही यावर प्रकाश टाकतील काय ?" स्पॕनिश अॕस्ट्रानॉमिकल साईंटिस्ट क्रिस्टीना उभी राहून डॉ. साहींना विचारीत होती. डॉ. साहींनी स्क्रीनवर लियो कॉन्टिलेशन्सची आकृती स्थिरावून त्याविषयी सांगण्यास सुरूवात केली.
" तर लियो कॉन्स्टिलेशन हे ग्रीक मॉयथालॉजीनुसार नेमिएन लॉयन रिप्रेझेंट करते. कुठल्याही शस्त्रांनी आहत न होणाऱ्या ह्या सिंहाला ग्रीक देवता हर्क्युलसने नेमेन प्रातांतील डोंगरावरच्या एका गुहेत शिताफीने अडकवून जेरबंद केले होते. विश्वातील महान योध्दा, अचाट शक्तिशाली अशा देवदूत हर्क्युलिसने हातांनी जबडा फाडून त्या अचाट बलशाली सिंहास ठार केले होते. हर्क्युलिस हा लिओ म्हणजे सिंह तारकासमूहाच्या समोरील व्हर्गो म्हणजे कन्या तारकासमूहांतील ता-यांनी मिळून बनलेली आकृती आहे. अगदी लिओच्या पुढ्यातच उत्तरेकडील आकाशात दिसून येते !"
" सर ही दंतकथा पुरे ना ! शास्त्रीय माहिती सांगा ना ? फ्रेंच साईंटिस्ट मि. रेडक्लिफ हसून म्हणाला.
" ओके.... ओके सांगतो। तर लिओ राशी तारकासमूहास ब-याच गॅलेक्सीजनी वेढलेले आहेत त्या म्हणजे मेसियर्स ६५,६६,९५,९६,१०५, एनजीसी- ३६२८ इत्यादी इत्यादी. ह्या लिओ कॉन्स्टिलेशनमध्ये चार प्रमुख तारे आहेत. फर्स्ट द लिटील किंग रेग्युलस अल्फा लिओनिस हा ७.७ लाईटईयर्स दूर असून सिंहाकृतीच्या छातीच्या मध्यावर आहे. मीन्स लायन्स हार्ट ! अगदी असाच पॉईन्ट जमिनीवरील स्फिंक्सच्या छातीवरील मध्यावर एक फुगीर उंचवट्याच्या स्वरूपात हा बघायला मिळतो. जणू अवकाशातील हंटर व लियो तारकासमूहाचे प्रतिबिंब गिझा पठारावर उभे असलेले तीन पिरामिडस व स्फिंक्स या शिल्पाच्या रूपाने पृथ्वीवर पडलेले दिसून येईल. आपण याच लायन्स हार्टपासून डिटेल्स घेऊन अवकाशातून नीलग्रहापर्यंत जाणारा मार्ग आखणार आहोत. अल्फा लिओनिस हा तारा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा असून आकारमान सुर्याच्या १०० पटीनेही जास्त आहे. म्हणजे फुटबॉल शेजारी टेबल टेनिसचा बॉल ठेवावा असा दिसेल. प्रचंड गुरुत्वाकर्षण व हैड्रोजन - हिलीयमच्या स्फोटांनी धगधगत असलेला ब्राईटेस्ट स्टार इन लिओ कॉन्स्टिलेशन !"
" लियो कॉन्टिलेशन्समधील बाकी ता-यांंचीही माहिती सांगा ना सर !" चायना येथील ली वांग चुंग अधीर होत म्हणाली.
" हो.... हो सांगतो तर ! तर असे आहे की
या तारकासमूहातील दुसरा तारा हा डेनाबोला बिटा लिओनिस हा ३६ लाईटईयर्स दूर असेल व सिंहाकृतीच्या शेपटीकडे स्थित आहे. तर तिसरा अलेज्बिया मीन्स गॅमा लिओनिस हा रेग्युलसच्या अपोझिट असा १२६ लाईटईयर्स दूरवर आहे. नेक्स्ट इज झोस्टा म्हणजे डेल्टा लिओनिस हा सिंहाकृतीच्या पाठीवर आहे. तर अनेक कमी तेज असलेले तारे म्हणजे थिटा, के, लॅम्ब्डा,ओ, मु, ईटा, एप्सिलॉन, आयोटा, सिग्मा लिओनिस तारे व वुल्फ- ३५९ मिळून हे तारे मिलीयन्स ऑफ लाईटईयर्स दूर दूर पसरले आहेत. हे सर्व तारे धावत्या रेषेने जोडले तर पूर्ण सिंहाकृती अंतराळातील आकाशात दिसून येईल. ओकेss पण बाकीच्यांचा फारसा विचार करायची गरज नाही आपला सुपरस्टार म्हणजे रेग्युलस !"
" बाप रे ss बाप ! म्हणजे आपल्या स्पेसशिप्सना एवढ्या मोठ्या जॉयन्ट स्टारच्या जवळून जायचयं की काय ? " अमेरिकन शास्त्रज्ञ डेव्हिड नेल्सन आश्चर्याने स्तिमीत होत म्हणाला.
" नाही रेss ह्याच्या उलट दिशेने जायचे आहे. ओरीयन कॉन्स्टिलेशन म्हणजे वे टू हेवन आहे. पूर्वी इजिप्शियन फारोह ह्याच मार्गाने स्वर्गात गेलेत असं म्हणतात !" डॉ. साहींनी स्पष्टीकरण देत म्हटले.
" ओके अॉल राईट .... सर पण आता स्फिंक्सचा व लिओ कॉन्स्टिलेशनचा परस्परसंबंध तरी समजावून सांगा ना आता." रशियन साईंटिस्ट रोमालियाने साहींना सूचना करीत म्हटले.
" येस्स आय ॲम कमिंग टू द पॉईंट ओन्ली. गिझा पठारावरील तीन पिरामिडस व स्फिंक्स हे एक ॲस्ट्रॉनॉमस क्लॉक आहे. स्फिंक्सच्या पुढ्यात एक कोरीवकाम केलेली उंच भिंत आहे व त्यावर लिओ, स्कार्पियो, ॲक्वेरियस व टॉरस ह्या राशीचक्रातील राशी असलेल्या खगोलीय घड्याळारूपी कोरीव आकृत्या चौकोनाकृती रचनेत स्थित आहेत. या चारही राशींची चित्रे त्या भिंतीवर चौकोनाकृतीत कोरलेली आहेत. या चारही राशींचे ॲक्सिस परस्परांना छेदून जातात. ह्या छेदनबिंदूच्या वर स्फिंक्सच्या छातीच्या ठिकाणी लायन्स हार्ट म्हणून जो उंचवटा आहे एक्झॅक्टली त्यासमोर लिओ तारकासमूहातील सिंहाकृतीच्या छातीवर स्थित असलेला तारा रेग्युलस सरळ रेषेत येईल तेव्हा स्फिंक्सपासून अवकाशातील अनंत अंतरावर असलेल्या अतिप्रगत ग्रहावरील संस्कृतींशी कम्युनिकेशन सुरू होईल. इथेच स्फिंक्सच्या पुढ्यात आपण आपले हॕम रेडियो युनिट इंस्टॉल करू या व या सोबत सूक्ष्म ध्वनीलहरी संग्रहित करून त्या डिकोड करण्यासाठी एक मेसेज डिकोडर ॲप्रॉटस जोडून तयार ठेवायचे. ही अशी खगोलीय गोळाबेरीज होऊन एकत्रितपणे साधून येणारी खगोलीय स्थिती प्रत्येक २६००० वर्षानंतर येत असते. आय वुड लाईक टू से नाऊ द सिच्युएशन इज व्हेरी क्लोजर .... मला वाटते आपण त्याचाच फायदा उठवला पाहिजे. याच काळात आपण अज्ञात ग्रहांवरील संस्कृतीशी संपर्क स्थापित करून व्हॉयनिच संहितेत दर्शविलेल्या ग्रहाविषयी माहिती मिळवू शकू !"
" मला वाटते यावर थोडे अधिक स्पष्टीकरण द्याल का ?" इजिप्शियन शास्त्रज्ञ मिस सबिहाने हात वर करून विचारले.
" हो म्हणजे मला आनंदच होईल खरं तर लिओमधील रेग्युलस, स्कार्पियोमधील फॉरमॉव्हा अँड ॲक्वेरियसमधील अँटेरियस, टॉरसमधील ॲल्डेबरान वगैरे ७२ वर्षात एक अंश सरकतात. २६००० वर्षांत चारही ता-यांचे एक ऑर्बिट पूर्ण होते. तेव्हाच त्यापासून डिस्ट्रक्शन सायकल सुरू होऊन पृथ्वीवर प्रलय येतो. हल्ली सतत येणाऱ्या सुनामीज,भूकंप आणि अतिशय नुकसान घडवून आणणारे नद्यांना आलेले पूर, बर्फाच्या अति प्रचंड ग्रेशियर्सचे वितळणे, विध्वंसकारी वादळे या सर्वांमुळे आधीच पृथ्वीवर प्रलयसदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे. मला वाटतं तो काळ जवळ येतोय की काय ?" डॉ. साही चिंताग्रस्त चेहरा करून समोर बसलेल्या शास्त्रज्ञांकडे पाहून बोलत होते.
" हो.. खरेच आहे म्हणा कारण हल्ली पृथ्वीवर त्याचे पडसाद नक्कीच उमटायला सुरूवात झालीयं म्हणजे संपूर्ण जगभरात मोठमोठाले पूर, ८.५ - ९.०० रिश्टर स्केलचे भूकंप ! भूस्खलन, अकस्मात येणारी अस्मानी संकटे, सारे काही तबाह करणारी चक्रीवादळे ! इंडोनेशियात हल्लीच झालेला ज्वालामुखीचा स्फोट व त्या पाठोपाठ आलेली भयंकर सुनामीने होत्याचे नव्हते करून टाकलेले आहे हे सर्वविदितच आहे !" प्रो. पाब्लो डॉ. साहींच्या विधानाला पुष्टी देत सांगत त्यांच्या बाजूला उभे होते.
" होss मान्य आहे ही ॲस्ट्रॉनॉमिकल थिअरीचा आपल्या व्हॉयनिच संहितेशी संबंध कधी, कसा आणि कुठे येईल ते सांगितलेत तर जरा बरे राहिल !" शास्त्रज्ञांच्या टीममधील एकाने विचारले.
" व्हॉयनिचने आणलेल्या पुस्तकातील गूढ आकृत्या ह्या ओरीयन कॉन्टिलेशन्समधून जाणारा हेवन'स पाथ संबंधित दिसताहेत.... ब्ल्यू प्लॕनेट अर्थात नील ग्रहावर पोहचायचे असेल तर अवकाशातील निश्चित एका रूटवरून स्पेसशिप्स घेऊन जावे लागतील. या तारकासमूहात असलेल्या ब्रम्हांडातील तीन नंबरचा सर्वात मोठा तारा निळ्या रंगाचा बेलाट्रिक्स याच्या ग्रहमालिकेत चार नंबरचा ग्रह म्हणजे आपले लक्ष्य ठरलेला ब्ल्यू प्लॕनेट हा आहे. त्या नील ग्रहावर एक संपन्न व अतिप्रगत संस्कृती नांदत असल्याचे या पुस्तकातील आकृत्या दर्शवत आहेत. तसेच या ग्रहावरील पर्वतरांगा, समुद्र व हरितपट्टे असलेले काही भाग ग्रहाच्या मध्यावर स्थित असल्याचे या आकृत्या दाखवत आहेत. थोडक्यात हा जीवसृष्टी असलेला पाणीदार ग्रह आहे. या ग्रहाची एक बाजू त्याच्या सुर्याभोवती म्हणजे बेलास्ट्रिक्स समोर अधिक काळ राहत असल्याने ग्रहाच्या बाहेरच्या भागात अतितप्त तापमान राहणार आहे तर जसजसे मध्यभागाकडे जाऊ लागलो तर कदाचित पृथ्वीवर असते तेवढे तापमान, प्रकाशाची तीव्रता आणि पाण्याचे साठे व समुद्री भाग मिळू शकतात !"
" म्हणजे आपल्याला मानवी वस्ती करण्यास योग्य ठिकाण असल्याचे म्हणा ना ! नाहीतरी हल्ली नवनव्या ग्रहांचा शोध लागत आहे तेथे पाणी उपलब्ध असून अॉक्सीजन भरलेले वातावरण असल्याचे कळत आहे. तर या ग्रहावर वातावरण असेल का ? त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा तेथे वावरतांना काय परिणाम होऊ शकतो. तसेच सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तेथे अतिप्रगत अशी संस्कृती नांदत असल्याचे म्हटले आहे तर नेमके ती कोणती प्रजाती असावी म्हणजे मानवासदृश्य एलियन तेथे असतील काय ?" अमेरिकन साईंटिस्ट डेरिकने विचारले.
" या पुस्तकातील गूढ चित्रांचा व आकृत्यांचा अगदी तंतोतंत अर्थ सांगणे कठीण काम आहे पण काही प्रेडिक्शन्स मात्र सांगू शकतो !" डॉ. साही हातातील पेपर्स वरखाली करून पाहत म्हणाले.
" तरमग काही अंदाज म्हणून का होईना पण सांगावे ही विनंती समजा !"
" सांगायला हरकत नाही म्हणजे येथील काही वनस्पती या पाणथळ भागात आहेत. उंचच्या उंच झाडे देखील आहेत. जमिनीवर पसरलेल्या काही वेलीसदृश्य पण मजबूत देठ असलेल्या वनस्पतीची पाने आठ ते दहा फूट व्यास असलेल्या गोलाकार आहेत. तर काही त्रिकोणी आकाराची, चौरसाकृती किंवा वेगवेगळ्या डिझाईन्स बनत असलेल्या आकारात व निळ्या व जांभळ्या रंगांची आहेत. या ग्रहावर ब-याच मोठ्या भूभागावर पाण्याचे साठे अस्तित्वात असल्याचे यात म्हटले आहे. काही आकृत्या समुद्र व उंच पर्वतशृंखलाविषयी सुचवत आहे. येथे निळ्या व जांभळ्या रंगाचे प्राबल्य दिसून येते म्हणजे झाडांच्या विशालकाय पानांचा रंग गर्द जांभळा तर निळा ते त्यात विविध रंगछटा असलेल्या झाडांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असावी असे सांगता येते ! निळेशार समुद्र, आकाश यांचा निळा रंग वातावरणात भरून असल्याने यास नीलग्रह असे म्हटले आहे. दुसरे म्हणजे येथे अतिप्रगत अशी मानवसदृश्य प्रजाती वास्तव्य करून असल्याचे या पुस्तकात चिन्हांच्या द्वारे दर्शवण्यात आलेले आहे. म्हणजे ताडमाड उंच व पाठीवर पंख असलेली ही प्रजाती म्हणजे ब्ल्यू रेसमधील रेप्टाईल एलियन्स असावेत, आपल्या पंखांचा वापर करून ते आकाशात उड्डाणे भरून उडत येतात तसेच त्यांच्या मुखातून आगीचे लोळही बाहेर पडत असतात. बहुधा पर्वतरांगामध्ये वसलेल्या वसाहतींमध्ये यांचे वास्तव्य असले पाहिजे असेही गूढ लिपीमध्ये लिहिले आहे अर्थात हा असा सगळा केवळ तर्क केलेला आहे. प्रत्यक्षात त्या ग्रहावर गेलो तरच निश्चितपणे आपल्याला खरी माहिती कळू शकेल !"
" तुम्हाला असे म्हणायचे आहे की मानवांना घेऊन जाणारे स्पेसशिप तुमच्याकडे आहे आणि चक्क २४० प्रकाशवर्षे तुम्ही प्रवास करून पहिला मानव त्या ग्रहावर उतरवणार आहात?"
" मला वाटते या मिशनविषयी भारतीय मूळ वंशाची नासा अवकाश संशोधन केंद्रामधील सिनियर साईंटिस्ट मिस अनामिका आपल्याला माहिती देऊ शकेल तर आता पुढे अनामिकाजी येत आहेत माईकवर ... वेलकम मिस अनामिका !" डॉ. साहींनी माईक जवळ येऊन उभी राहिलेल्या अनामिकेकडे सोपवला. अनामिकेने सर्वांना अभिवादन करून बोलायला सुरूवात केली.
" गेल्या मागील आठवड्यापासून डॉ. साही व प्रो. पाब्लो यांच्या मदतीने मी पुढील ॲक्शन प्लॕन बनविलेला आहे. त्याबद्दल मी थोडक्यात सांगते !"
" म्हणजे तुम्ही या ब्ल्यू प्लॕनेटवर स्वारी करणार की काय ?" समोरून विचारणा झाली.
" हो.... हो ! आम्ही मिशन ब्ल्यू प्लॕनेट प्लॕन केलेले आहे संपूर्ण प्रपोझल यूएस प्रेसिडेंटकडे स्वीकृतीसाठी पाठवलेले आहे. मला वाटते साधारण एक महिन्यानंतर आमच्या स्पेसशिपने ब्ल्यू प्लॕनेटच्या झेप घेतलेली असेल. तो पर्यंत डॉ. साहींनी या अगोदर सांगितल्याप्रमाणे खगोलीय स्थिती अवकाशात जमून आलेली असेल म्हणजे २६००० वर्षानंतर खगोलीय घड्याळातील चार राशींमधील ग्रह पृथ्वीवरील स्फिंक्सच्या समोर येतील व स्फिंक्सवर लायन्स हार्ट हा संदेशवहन बिंदूसमोर लिओ कॉन्टिलेशन्समधील तारा रेग्युलस अगदी सरळ रेषेत काल्पनिक रेषेने जोडला जाईल. त्याच बरोबर ओरीयन कॉन्टिलेशन्समधील अलनिटाक, अलनिलम हे तारे गिझा पठारावरील खुफू व खाफ्रे तसेच मिन्टाका हा तारा थोडा अॉफसेट उभा असलेल्या मॕन्कॉयर या अशा तीनही पिरामिडसच्या अगदी परफेक्टली डोक्यावर येतील म्हणजे काल्पनिक लंबरेषा काढली तर बरोबर पिरामिडसच्या मध्यातून जाईल. यावेळी येथून ब्ल्यू प्लॕनेटवर संदेशांची देवाण - घेवाण सुरू होईल. येथील आघाडी डॉ. साही आणि त्यांचा संशोधक ग्रुप सांभाळणार आहे. येथे मिळत असलेल्या संदेशाद्वारे अवकाशातून ब्ल्यू प्लॕनेटपर्यंत जाणारा शास्त्रीय व गणिती माहिती देणारा नकाशा बनवून तयार झालेला असेल. डॉ. साही तो नकाशा कम रूट मॕप आम्हाला नासा सेंटरमध्ये मेल करतील. त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्पेसशिपमध्ये अवकाशात उड्डाणासाठी आवश्यक असणारा प्रोग्राम कंट्रोलिंग सिस्टीममध्ये इन्स्टॉल करणार आहोत !"
" म्हणजे ब्ल्यू प्लॕनेटवर असलेली एलियन्स मंडळी तुम्हाला आमंत्रित करणार असे समजायचे का आम्ही ? तसेच या स्पेसशिपमधून त्या ग्रहावर कोण कोण जाणार आहेत त्यांची नावे निश्चित झाली आहे काय ?"
" हे बघा अवकाशातून २४० प्रकाशवर्षे दूर जायचे म्हणजे हाती असलेल्या माहितीनुसार अचूक तेथे पोहोचू याबद्दल संभ्रम आहे किंवा खात्री नाही. अंतरिक्षात स्फिंक्सच्या समोरून हॕम रेडिओद्वारे संपर्क साधला तर अवकाशातील कुठल्यातरी अज्ञात प्रजातीकडून मार्गदर्शनपर संदेश पाठवले जातील असे व्हॉयनिचच्या पुस्तकातील चित्रे व चिन्हे लिपी असलेल्या मजकुरातून कळते. तर आमचा तसा प्रयत्न राहिल. मला वाटते डॉ. साही यांची सारी हयात स्फिंक्स, पिरामिडस व ओरीयन तारकासमूहातून जाणाऱ्या स्वर्गाच्या महामार्गाविषयी अभ्यास करण्यात गेलेली आहे. अलेक्झांड्रिया व कैरो येथील जगातील सर्वात मोठ्या लायब्ररीतील हजारो संदर्भग्रंथ त्यांनी वाचलेले आहे. प्राचीन इजिप्शियन्सनी मांडलेल्या सिध्दांताचा आधार घेत डॉ. साही आम्हाला तो अवकाश मार्गाचा नकाशा मिळवून देतील. तसे अजून आपल्याला तरी कुठे ब्ल्यू प्लॕनेटचा शोध लागलेला आहे ?" अनामिकेने समोर बसलेल्या शास्त्रज्ञवृंदांकडे नजर टाकून आत्मविश्वासाने सांगितले.
" तुम्ही मानवसहित स्पेसशिप घेऊन जाणार आहात काय.... आणि कुठल्या तंत्रानुसार म्हणजे वॉर्महोल वा ब्लॕकहोल यामध्ये शिरून जाणार आहात काय ? त्याबद्दल नाही सांगितले अजून.... तर त्याची माहिती द्यावी !"
" हो... हो नक्कीच ! आमचे स्पेसशिप हे वॉर्महोल मधून प्रवास करीत ब्ल्यू प्लॕनेटवर पोहचणार आहे आणि मानव विरहित आमचे स्पेसशिप राहणार आहे. यातील संपूर्ण कंट्रोल ड्रोन तंत्रज्ञान धर्तीचे राहिल. हे स्पेसशिप ब्ल्यू प्लॕनेट भोवती घिरट्या घालत फिरत राहणार पण याच बरोबर मंगळावर धाडलेल्या क्युरियासिटी यानाची सुधारीत आवृत्ती असलेली संशोधन यान कम ट्रॉली राहिल. एका प्रोबद्वारे हे यान ब्ल्यू प्लॕनेटच्या भूमीवर भिरकावण्यात येईल. प्रोबमधून बाहेर येऊन क्युरियासिटी - सुप्रीम 2 ही संशोधक ट्रॉली तेथील जमिनीवरून धावू लागेल व त्यावर असलेल्या कॕमे-याजने संपूर्ण लाईव्ह शूट करून आमच्याकडे पाठवणार आहे.... ओके ?"
" तुम्ही त्यावेळी नासाच्या कंट्रोल स्टेशनमध्ये बसून असणार आहात काय ?"
" नाही आम्ही अवकाशस्थित स्थानकात असणार आहोत. येथून आम्हाला अवकाशात उभे राहून वॉर्महोल बनवायचे आहे !"
" कायss तुम्ही वॉर्महोल बनवणार ? ते कसे आणि ते जमणार आहे का तुम्हाला ?" फ्रेंच साईंटिस्ट रेडक्लिफ डोळे मोठाले करीत आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला.
" आम्ही अॉलरेडी ते जमवलेयं फक्त चाचणी घेऊन आमच्या मिशनमध्ये वापरण्याची परवानगी घेण्यासाठी यूएस बेस्ड साईंटिस्ट ग्रुप्स समोर ठेवायचे आहे. सुरूवातीला प्रायोगिक स्वरूपात हे वॉर्महोल लॕबोरेटरीमध्ये बनविले जाईल नंतर मिशन ब्ल्यू प्लॕनेट अंर्तगत ते स्पेस म्हणजे अवकाशात तयार केले जाईल व त्यातून आमचे मानवारहित स्पेसशिप ग्रीन प्लॕनेटवर पाठविले जाईल ! पण ही सारी प्रक्रिया ही मिशनच्या गुप्ततेची बाब असल्याने निश्चित कुठे हे आर्टिफिशियल वॉर्महोल उभारले जाईल हे सांगणार नाही आहोत !"
" ठीक आहे पण या वॉर्महोल शक्यतेविषयीची कल्पना आईन्स्टाईनची जनरल थिअरी अॉफ रिलेटिव्हिटीचा सिध्दांतानुसार १९३५ साली मांडण्यात आली होती. आल्बर्ट आईन्स्टाईन व नाथन यांनी थिअरी अॉफ जनरल रिलेटिव्हिटी ही वॉर्महोलच्या शक्यतेला मानते म्हणजे अवकाशातील खूप दूरवरील दोन स्थानांना जोडणारा आईन्स्टाईन रोझन ब्रीज हा यातून एखाद्या पदार्थाला त्यातून जाण्यास अनुकूल असेल अशी संकल्पना मांडण्यात आली पण हे वॉर्महोल अतिशय सूक्ष्म असून अतिशय तकलादू असू शकणार होता की त्याच्या टनेलमधून केवळ ॲन्टीमॕटरसदृश्य पदार्थ व तेही फोटोन स्वरूपात गेल्यास ते वॉर्महोल टिकणार होते पण अवकाशातून दुसऱ्या त्या स्थानापासून परतण्यापूर्वी हे वॉर्महोल नष्ट झालेले असणार होते म्हणजे परतण्याचे सारे दोर कापले जाणार होते. त्यामुळे या कल्पनेवर अधिक काम वा संशोधन झाले नाही. पण आता मी आणि माझा स्पॕनिश सहकारी जोर्डी प्राट मिळून मॕग्नेटिक वॉर्महोलची कल्पना प्रयोगांनी सप्रमाण सिध्द करून दाखवली आहे !"
" याबद्दल तुम्ही आम्हा शास्त्रज्ञांच्या टीमला सांगाल काय.... म्हणजे आम्ही ते चांगल्या प्रकारे समजू शकतो वा त्यात सुधारणेच्या दृष्टीने सूचना करू शकतो !"
" हो.... चालेल ना ! आपले स्वागतच आहे. तर आधी मी हे वॉर्महोल कसे तयार करणार आहोत ते सांगू इच्छिते तर बघा असे आहे .... हे नेहमीसारखे स्पेस - टाईम वॉर्महोल नसणार आहे पण अदृश्य स्वरूपातील इलेक्ट्रोमॕग्नेटिक लहरींचे बनलेले आहे. आमच्या टीमने अनेक वर्तुळांनी बनत असलेली म्हणजे हवंतर स्पायलर सिलिंडर म्हणा, अशी तीन स्तरीय दंडगोलाकृती ही वस्तू बनविली आहे. ज्याची दोन्हीही टोके ही स्फिअर म्हणजे आत केंद्रापासून समान अंतर असलेले वर्तुळे बनत जात अनंत अंतरापर्यंत विस्तारीत जात आहेत. एखाद्या सुपर कंडक्टर पदार्थ ज्याच्यामधून अतिउच्च विद्युत प्रवाह वहन केला म्हणजे आतील अणू- रेणू विद्युत्भारीत होऊन त्याच्या आतमध्ये वक्रिय चुंबकीय रेषा उत्सर्जित होतील व आतमध्ये त्रिमितीय चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल. हे डिव्हाईस बनवणे ही आमची पहिली पायरी असेल !"
" हो... खरंय पण यापासून इलेक्ट्रो मॕग्नेटिक वॉर्महोल म्हणजे ?" समोरून दोघा- तिघांनी शंका उपस्थित केली.
" तर आता स्पायलर सिलिंडरच्या सर्वात आतील स्तरामध्ये वेटोळ्यांच्या आकारात विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार झालेले असेल व ते या डिव्हाईसमधून अवकाशात वॉर्महोलच्या रूपाने प्रक्षेपित झालेले असेल. या डिव्हाईसमधून तयार होत असलेल्या इलेक्टो मॕग्नेटिक क्षेत्रास स्थिर करण्याचे काम पुढे यावर संरक्षक आवरण चढवत बाहेरील दोन स्तर करतील. आतील वॉर्महोल रूपी स्पायलर सिलिंडरचे अस्तर हे फेरो मॕग्नेटिक मु - मेटल ( मुन्त्झ ) म्हणजेच ६०% तांबे व ४०% झिंक यांच्या संयोगाने बनलेले असेल. हे फेरो मॕग्नेटिक मटेरियल शक्तिशाली चुंबकत्व तयार करीत अत्युच्च तापमानाला न जुमानता आतून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस म्हणजे स्पेसशिप्सना संरक्षक कवच प्राप्त करून देईल. अर्थात इथे एक आपण त्यास थिन शेल म्हणू या जो उच्च तापमानरोधक, सुपर कंडक्टर मटेरियल 'यट्रियम बेरियम कॉपर अॉक्साईडपासून' बनलेले असून त्याचे आवरण आतील सिंलिंडरच्या अंर्तभागावर लावलेले असेल. त्याच्यामुळे आत निर्माण होत असलेल्या चुंबकीय क्षेत्रास वॉर्मप्रमाणे वाकवून या स्पायलर सिलिंडरमधून पुढील प्रवासासाठी घेऊन जाईल!"
" यात यशाची खात्री किती आहे ?" सबिहाने भुवया उंचावून आश्चर्य व्यक्त करीता विचारले.
" अर्थात १००% यशस्वी होईल ! आता बाह्य आवरणाविषयी समजून घेऊ या... हा मध्य आणि अंतिम शेल दुसऱ्या एका मु- मेटलपासून ( मुन्त्झ) बनलेला असेल पण आख्खा नव्हे तर १५० तुकड्यामध्ये कापून घेत उच्च दाब देऊन कॉम्पोझ्ड केलेला असेल. हा स्तर वॉर्महोलला तोलून धरत आधार देण्याचे काम करेल म्हणजे हे वॉर्महोल नष्ट होण्यापासून वाचेल. तसेच हा बाहेरील सुपरकंडक्टिंग शेलमध्ये उत्पन्न होणाऱ्या विद्युत चुंबकीय क्षेत्रास निष्क्रिय करेल. हे संपूर्ण डिव्हाईस हे द्रवरूप नायट्रोजनमध्ये बुडवून ठेवले जाईल कारण उच्च तपमानात कार्यरत राहणाऱ्या सुपर कंडक्टरला न्यूनतम तपमान आवश्यक असते!"
" ओके.... ओके अनामिका मॕडम !इथंपर्यंत कळाले पण आता पुढे काय ?" एका स्पॕनिश शास्त्रज्ञाने खोचकपणाने विचारले.
" या आमच्या नव्या वॉर्महोलमध्ये एन्ट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंटवर चुंबकीय क्षेत्रांनी बनत असलेली वॉर्महोलची मुखे ही फनेलाकृती असतील... पण ही दिसू शकणार नाहीत. त्यातून कसला तरी आधार म्हणजे स्पेसशिप घेऊन शिरलात तर यातील मॕग्नेटिक फील्डमधून ते स्पेसशिप प्रवास करीत असल्याचे जाणवेल व दुसऱ्या उघडत असलेल्या मुखातून म्हणजे आपल्या गन्तव्य स्थानापाशी पोहचलेले असेल. अर्थात हे वॉर्महोल आम्हांला अवकाशातच स्थापित करावे लागेल आणि त्यासाठी अमेरिकने हल्लीच्या काही वर्षात अवकाशात उभे करून ठेवलेल्या अत्याधुनिक व एलियन्सच्या कंट्रीशिपप्रमाणे बनविलेल्या अवाढव्य अशा अंतराळ स्थानकात मुक्काम ठोकावा लागेल. याच अंतराळ स्थानकावरून आमच्या डिव्हाईस थ्रू मॕग्नेटिक वॉर्महोल तयार करून त्याचे आपल्या इच्छित ग्रहापर्यंत दुसरे मुख जाऊन पोहचेल अशा रीतीने गणिती मांडणी करावी लागेल. यासाठी आधी आमचे वॉर्महोल बनवण्याचे उपकरण व त्यातून प्रवास करणारे ड्रोन तंत्रज्ञान असणारे मानवरहित स्पेसशिप अंतराळ स्थानकात नेऊन ठेवावे लागणार आहे. डॉ. साही हुसेनना नील ग्रहाचे अंतरिक्षातील अचूक स्थान दर्शवणारा नकाशा स्फिंक्स व लिओ क्लस्टरच्या युतीद्वारे मिळवावा लागेल. आम्हाला तो अवकाशाचा नकाशा मिळताच वॉर्महोल उभारणीसाठी आवश्यक तेवढे चुंबकीय क्षेत्र, त्याची लांबी, व्यास व ग्रीन प्लॕनेटवर पोहोचायचा अवकाशातील शॉर्टेस्ट रूट याचे गणिताने हिशेब करून नियोजन करावे लागेल. जोपर्यंत डॉ. साहींकडून अवकाशाचा नकाशा हाती लागत नाही तोपर्यंत अंतराळ स्थानका बाहेरील अवकाशात वॉर्महोल उभे करता येणार नाही अन्यथा जाना था जापान और पहुँच गए चीन असे व्हायचे !" अनामिका आपल्याच विनोदावर खळाळून हसत म्हणाली.
" अनामिका मैम तुमचे आणि प्रो. पाब्लो व डॉ. साहींचे अभिनंदन ! जवळजवळ तुम्ही नील ग्रहावर यान पाठविण्याची तयारी करून ठेवली आहे. सध्या कागदावर दिसत असलेली योजना कधीपर्यंत प्रत्यक्षात येऊ शकेल ? तुमचे यान नील ग्रहावर लॕण्ड झाल्याचे आम्हला पाहायची उत्सुकता लागून आहे. तुमच्या अंतरिक्ष मोहिमेसाठी खूप सा-या शुभेच्छा !" कॉन्फरन्स हॉलमध्ये बसून असलेली सर्व शास्त्रज्ञांची टीम उठून उभे राहत टाळ्या वाजवून अनामिका आणि कंपनीचे कौतुक करीत होती.
"आमच्या मोहिमेला शुभारंभ साधारणपणे एक महिन्यानंतर होईल. अमेरिकचे नव्याने बनविण्यात आलेले अटलांटिया शटल यान मी आणि माझे चार सहकारी ॲस्ट्रॉनॉटससह जॉन केनेडी प्रक्षेपण केंद्रातून उड्डाण भरेल. त्या आधी अंतराळ स्थानकातील आमचा स्टाफ प्रो. पाब्लोंच्या मार्गर्दर्शनाखाली वॉर्महोल निर्मिती व यान प्रक्षेपणाची संपूर्ण तयारी करून ठेवणार आहे. २१ एप्रिल २०१५ रोजी म्हणजे आमच्या गुढीपाडवा या मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर आमच्या मानवरहित यानाने कृत्रिम वॉर्महोलमधून ब्ल्यू प्लॕनेटच्या दिशेने झेप घेतलेली असेल. तो सोहळा आम्ही अंतराळ स्थानकातून लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दाखवूच तोपर्यंत प्रतिक्षा करावी !" अनामिकाने आपले भाषण संपवून मिटिंग बरखास्त होत असल्याचे जाहीर केले.
--------------------------------------------------
२१ एप्रिल २०२५ ! आवकाशात स्थित असलेले जवळपास दोन कि. मी. विस्तार असलेले अमेरिकेच्या कल्पना चावला अंतराळ स्थानकात स्पेसशिपच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू होती. अनामिकेने डॉ.साही हुसेनकडून आलेल्या रूट मॕपनुसार स्पेस स्टेशनच्या कंट्रोल सिस्टीममध्ये प्रोग्राम इन्स्टॉल केला होता. त्यानुसार तिला वॉर्महोलची दिशा ठेवता येणार होती. संपूर्ण तयारीनिशी अवकाशातील दोन स्थानांना अचूक जोडणारे वॉर्महोल साकारले जात होते. अनामिकेने तयार केलेल्या अभूतपूर्व डिव्हाईसमधून अदृश्य स्वरूपातील इलेक्ट्रो मॕग्नेटिक लाईन्स तयार होऊन निर्माण झालेल्या मॕग्नेटिक फील्डच्या साह्याने एकाशी एक जोडलेल्या असंख्य स्पायरल विद्युत चुंबकीय वेटोळ्यांच्या स्वरूपात कृत्रिम वॉर्महोल तयार होऊन सरसरत अवकाशात झेपावले. अवकाशात दुसऱ्या बिंदूस म्हणजे नीलग्रहाच्या बाह्य कक्षेशी जोडले गेलेल्या ह्या मानव निर्मित वॉर्महोलमधून नासामध्ये बनविण्यात आलेले अत्याधुनिक मानवरहित स्पेसशिप उड्डाण भरण्यास तयार झाले. कॉम्प्यूटरवरून कंट्रोलिंग सिस्टीमला कमांडस देण्याच्या कामात अनामिका गढून गेली होती. अखेर तो क्षण आला. अंतराळ स्थानकातील प्रक्षेपक केंद्रातून स्पेसशिप रोरावत वॉर्महोलच्या पहिल्या मुखात शिरले. अनामिकेने संशोधित केलेल्या नवीन थिअरीनुसार बनविण्यात आलेल्या कृत्रिम इलेक्टो मॕग्नेटिक वॉर्महोलमध्ये शिरून मानवरहित यानाने ग्रीन प्लॕनेटच्या दिशेने नवा किर्तीमान गाठून झेप घेतली होती. अंतराळ स्थानकातील स्पेस शटल कंट्रोलिंग विंगमध्ये प्रो. पाब्लो व अमेरिकन अंतराळ शास्त्रज्ञ मिस अनामिका इनामदार इतर सहका-यांसोबत बसून सुपर कॉम्प्यूटरच्या कमांडिंग सिस्टीमद्वारे वॉर्महोल मधून जाणाऱ्या मानवरहित यानास नियंत्रित करीत होते. कॉम्प्यूटरच्या स्क्रीनपर लखलखाता ठिपका क्षणाक्षणाला पुढे सरकत जात होता. वॉर्महोलच्या स्पायरल सिलिंडरमधून प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास गती पकडून स्पेसशिप भराभरा उडत जात असल्याचे स्लो मोशनमध्ये कॉम्प्यूटरच्या स्क्रीनपर दिसत होते. जवळजवळ तीस दिवसांच्या अवधीत ते स्पेसशिप वॉर्महोलच्या दुसऱ्या मुखातून बाहेर पडून बेलास्ट्रिक्स ता-याच्या ग्रहमालिकेतील चौथा ग्रह ब्ल्यू प्लॕनेटभोवती प्रदक्षिणा घालायला सुरूवात करणार होते. कृत्रिम वॉर्महोल अवकाशात अद्यापही टिकून होते. स्पेसशिपचा विलक्षण गतीने प्रवास सुरूच राहिला.
अनामिका एकदम किंचाळून चेयरमधून ताडकन उठली. कंट्रोल पॕनेलच्या भाल्यामोठ्या स्क्रीनवर पहिली इमेज येऊन धडकली होती. ब्ल्यू प्लॕनेटच्या अंर्तभागावर क्युरियासिटी - २ ट्रॉली प्रोबमधून बाहेर पडली होती. क्युरियासिटीवर लावलेले शक्तिशाली कॕमेरे ब्ल्यू प्लॕनेटच्या भूमीवर दृश्ये टिपू लागले होते. या ग्रहावरील जमीनही चमचमत्या निळ्या रंगाच्या वाळूने भरलेली होती. ब-याच दूर दूर अंतरापर्यंत वाळूच्या टेकड्या जमिनीवर उभारल्या गेल्या असल्याचे दिसत होते. तर खूप दूरवर पर्वतशृंखला सुर्याच्या निळ्या प्रकाशाने लखलखतांना दिसत होती. प्रचंड दूरवर विस्तारलेल्या मोठ्या पाणथळ जागी शंभर फूट उंचीचे निळ्या रंगातील महाकाय झाडे व जमिनीलगत पसरलेल्या पाणवनस्पतींची दहा फूट व्यासाची वर्तुळाकार निळी, जांभळी पाने सर्वत्र पसरलेली दिसू लागली होती, क्युरियासिटी भरधाव वेगाने डावी - उजवीकडे वळून पुढे धावत जात आधाशासारखे फटाफट फोटोज शूट करून अनामिकेच्या स्पेस स्टेशनवर पाठवत होती. सर्व शास्त्रज्ञांनी धावत येऊन अनामिकेच्या पाठीशी उभे राहून न भूतो न भविष्यती अशी दृश्ये डोळे विस्फारून पाहू लागले. प्रो. पाब्लोंनी अनामिकेला पाठीवर थोपटून शाबासकी दिली. हीच दृश्ये पृथ्वीवरील अवकाश संशोधन केंद्रांमध्ये जाऊन पोहचली. संपूर्ण जग आश्चर्य व्यक्त करीत नव्या विक्रमाने भारावून गेले. व्हॉयनिच संहितेच्या पुस्तकातील गूढाचा अर्थ आता लागत होता. खरेच पण या अनंत ब्रम्हांडात पृथ्वीला नवा भाऊ गवसला होता. आता जीवसृष्टी असणारा पृथ्वी हा एकच ग्रह राहिला नव्हता. एक पाणीदार जिवंत ग्रह जोडीला आला होता. अनामिकेने अज्ञात व्हॉयनिच गृहस्थास मनापासून हात जोडून धन्यवाद दिले. कदाचित व्हॉयनिच हा मानव नसून ग्रीन प्लॕनेटवरील एलियन्सपैकी सुधारीत मानवरूपी एलियन असावा. त्यानेच सुवर्ण धातूची पातळ पाने असलेले २७२ पानांचे पुस्तक पृथ्वीवर देऊन अवकाश जगतात नवा अध्याय उघडला होता.