Sunil Jawale

Tragedy Others

2.3  

Sunil Jawale

Tragedy Others

अमंतरलेल्या रात्री

अमंतरलेल्या रात्री

28 mins
1.2K


    

           आज दुपारी अॉफिसमध्ये लंचनंतर कामात लक्षच लागत नव्हते. सैरभैर झाल्यासारखी मी उदासपणे बसून होते. मनाला निराशेने घेरले होते. नजर अनंतात कुठेतरी लागून राहिली होती. समोरच्या पीसीवर येणारा डाटा अंधुक अंधुक होत दिसेनासा झाला, कीबोडवरील बोटे सैलावली होती. सिलींगच्या ग्रिलमधून येणाऱ्या थंडगार हवेच्या लहरींनी मोकळ्या लांब केसांच्या बटा विस्कटून टाकत चेहऱ्यावर नाचत होत्या पण त्यांना आवरण्याएवढेही भान राहिले नव्हते. कॉर्पोरेट वर्ल्ड मधील नामांकित सॉफ्टवेअर कंपनीचे वातावरण काही अलगच होते. कोणीही कामात दखल द्यायला वा विचारपूस करायला तिच्या क्युबिकलमध्ये डोकावणार नव्हते. जसे काही कोणासही कोणाशी काहीच देणेघेणे नव्हते. मघाशी तासाभरापूर्वी कॉफीचा मग डेस्कवर ठेवून गेलेला चंद्रकांत प्यून पुन्हा मग न्यायला आला तेव्हाच भावसमाधी भंग पावली होती. सप्टेंबर शेवटी सारे प्रोजेक्ट पूर्ण करून द्यायचे होते आणि मी ही अशी कोलमडलेली. खरेतर तो आघातच होता माझ्या मनावर.... कसे सावरू मी या निराश मनाला ? कामाच्या रामरगाड्याला जुंपून घ्यायचे तरी ते ही होत नव्हते. पुन्हा पुन्हा त्याच त्या आठवणी फेर धरून डोळ्यासमोर नाचत होत्या. माझ्याच बाबतीत असे का व्हावे ? आतापर्यंत सहा महिने जास्त होऊन गेले होते तरी मी विसरू शकलेली नव्हती. कशी वाचा फोडू या गोष्टींना.... कोण विश्वास ठेवेल ना माझ्यावर ? लग्नानंतर माझ्या किती अपेक्षा होत्या.... किती किती सोनेरी स्वप्ने मनाशी रंगवलेली होती ! त्याच्याकडून सुखी जीवनाबद्दल किती आशा लागून राहिल्या होत्या.... सहजीवनाच्या नुसत्या कल्पनांनी अंगावर रोमांच उभे राहायचे ! सुखी संसाराचा स्वप्नमयी पत्त्यांचा बंगला उभारला होता... पण ? छेss नकोच त्या आठवणी.... कविता तुला आता सावरायला हवे !

" कविता मॅडम.... हे काय ! कॉफी प्यायची इसरलात की काय ? अहो ताई.... कामाचा व्याप हलका करायला बूस्टरचे काम करणारी गरम कॉफी घेयाला पाहिजे ना ! आता थंडगार होऊन गेलीये ... म्या आनतो की बनवून दुसरी मस्त गरमागरम !" चंद्रकांत आपुलकीने विचारत बाजूला उभा होता.

" अरेss तसे काही नाही... मीच विसरले तुला सांगायला की कॉफी नको होती.... ॲसिडिटी वाढलीयं ना म्हणून !" मी चेहऱ्यावरील सैरभैर भाव लपवत म्हणाले. " अरे.... मयूरसर काही विचारीत होते काय माझ्याबद्दल ?"

" नाही बॉ... काय पन बोलले नाही पन अरोराला दम भरत होते मघाशी.... टारगेटस पूर्ण झाली नव्हती म्हणून !" चंद्रकांतने कॉफीचा मग उचलून ट्रे मध्ये ठेवत सांगितले. तसे त्याचे म्हणणे ऐकून मी ही जरा धास्तावलेच. पीसीवर नजर टाकत खोळंबलेल्य कामाच्या डोंगराची उंची मनात मोजत राहिले. 

" बरं... तू जा आता ! मी थोडी कामात बिझी आहे !" चंद्रकांत क्युबिकलमधून बाहेर जाण्यासाठी निघाला. " अरे चंदू... मयूरसर आता असतील का अॉफिसमध्ये ?" मी त्याला थांबवून विचारले.

" नाही जी... ते मिटिंगला गेले मघाशी, मला सांगून गेलते बघा... मेन ब्रँच अॉफिसला काय काम हाये म्हने.... परत नाही येनार ते !"

" बरं ठीक आहे... उद्या बोलते मी त्यांच्याशी ! कॉफी आणतोस माझ्यासाठी ?" मी आपला पीसी पुन्हा चालू करीत म्हणाले. चद्रकांत आ वासून पाहतच राहिला. " आनतो की.... तेच मी म्हनतोयं कवापास्नं पन तुमी काय आयकतच नव्हत्या !" चंद्रकांत कॉफी आणण्यासाठी निघून गेला. खरंतर यावेळी मलाही कॉफीची खूप गरज होती, पुन्हा विचारचक्रात गुंतून जाण्यासाठी ! चार वाजून गेले होते. अजून दोन तास तरी निवांत होते मी !

            चार दिवसांपूर्वी मनाचा कोपरा उघडून मला सा-या जगाला ओरडून सांगावेसे वाटले म्हणून जवळजवळ सहा महिन्यानंतर पुन्हा फेबुवर लॉगिन केले. हिंमत करून वॉलवर नव्याने पोस्ट टाकली. 

' Happily single. 

No more questions about relationship status !'

लगेचच धडाधडा कमेंटस व लाईक्स पाऊस धो धो कोसळायला लागला. मनाला सांत्वना देणाऱ्या, कोंडी फोडून टाकत योग्य निर्णय घेतला म्हणून माझे कौतुक करणाऱ्या कमेंटस मिनिटा मिनिटाला वॉलवर दिसू लागल्या. मी ही भारावून गेले... वाटले मी या जगात एकटी नाही कितीतरी चाहते माझ्या बाजूने आहेत. पण एक अप्रूप वाटले कोणीही याबद्दल विचारले नव्हते... जरी लग्नानंतर केवळ दोनच महिन्यात मी बंधनातून मुक्त झाले होते तरीही ! मी आता नवी उभारी घेऊन राखेतून पुन्हा जन्म घेऊन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे मुक्त नभांगणात भरारी घेणार होते. अर्थात झाल्या प्रकाराबद्दल मला दुःख नव्हतेच मुळी... त्याची लायकीच नव्हती माझ्या सोबत संसार करायची... नामर्द बेवडा साला !

           पण फक्त एकाच कमेंटने मी पुन्हा सैरभैर झाले. ' कविता... एनी प्रॉब्लेम ?' मोठेबाबांनी चक्क वॉलवरच विचारले होते. काय सांगणार होते मी.... गेले सहा महिने मी मजेत असून सुखी संसारात रमून गेली असावी... अशा विचाराने त्यांनीही मला डिस्टर्ब करायला नको म्हणून फेबुवर चॕटिंगला विराम दिला होता. मी फेबुवर काय सांगणार होते.... इथे तेच कारण मला जगजाहीर करायचे नाही... एवढेही कळले नसावे त्यांना ? पण त्यांना तरी कसा अंदाज येणार ना काय झाले असावे ते.... मी पुन्हा सिंगल लाईफ अनुभवणार म्हणून ! मला व्हॉटस ॲपवर त्यांना सर्व काही सांगावे लागले. त्यांनाही असे कळून धक्काच बसला होता. त्यांनी समजूतीच्या चार गोष्टी सांगून माझ्या कुंडलीचा अभ्यास करून पुढील आयुष्याविषयी मार्गदर्शन करण्याचे कबूल केले. त्यांच्या मते लग्न ठरण्यापूर्वीच या बाबी तपासून पाहायच्या असतात .... पण नेमके हेच झाले नव्हते. तेव्हाच त्यांना विचारले असते तर .... ? असो प्रारब्ध कोणासही चुकलेले नाही अगदी देवदेवतांना सुध्दा.... आपण तर मर्त्य मानव ना !

           एप्रिल महिन्यात सारे किती आनंदात होते ना.... मला मोठ्या श्रीमंत घरातील स्थळ आपणहून चालून आलेले होते. मुलगाही दिसायला गोरापान सहा फूट उंच, सॉफ्टवेअर कंपनीत एक्झिक्युटिव्ह तेही अमेरिकन बेस्ड मल्टीनॕशनल कंपनीत ! सुरूवातीचे सहा महिने भारतात राहून अमेरिकेत अटलांटा येथील मेन ब्रांचमध्ये पोस्टिंग झालेली असेच सागण्यात आले होते. गलेलठ्ठ पगार, मुंबईत दोन बेडचा टॉवरमध्ये अत्याधुनिक फ्लॕट, आई - वडिल गावी, मुलगा एकुलता एक, दोन बहिणी, पंधरा एकरात केळीच्या बागा, जमीनजुमला व बंगल्यासारखे घर सारेकाही मनातले हवे तेच होते. मग काय राजवाड्यात राहणारी जणू मी महाराणीच ! आई- वडिल तर ऐपत नसतांना पंधरा- वीस लाख खर्च करून लग्न करून द्यायला एका पायावर तयार झाले होते. मीही नोकरी करत होते पण मुंबईबाहेर... म्हणजे पुण्याजवळचे हिंजेवाडी येथील आयटी पार्कमध्ये ! मला अमेरिकेत त्यांच्या कंपनीत सामावून घेण्याचे आश्वासनही सासरेबुवांनी दिले होते. आता काय 'दिन दूना और रात  चौगुनी !' राहणार होती. माझ्या मनात भराभर स्वप्नाच्या बंगल्याचे इमल्यावर इमले भराभरा चढत होते. परदेशात मी स्थायिक होणार... माझी स्वप्ननगरी अमेरिका ! मी तर बीई कॉम्प्यूटर पास झाले तेव्हापासून अमेरिकेची स्वप्ने पाहायला सुरूवात केलेली. एवढ्या लवकर तो योग चालून येईल हे स्वप्नात देखील वाटले नव्हते. माझ्या नशीबाचा सर्व मित्र- मैत्रिणींना हेवा वाटत असावा, तोंड भरून कौतुक केलेले माझ्या कानी पडत होते. माझी कुंडली खूप चांगली असल्याचे पूर्वीच मोठेबाबांनी सांगितले होते पण विवाह जुळवतेवेळी एकदा सूचीत करायचे म्हणून निक्षून सांगितले होते हे मला आजही आठवते. अर्थात सासरची मंडळी आधुनिक विचाराची म्हणून कोणीही ती बाब विचारात घेतली नव्हती. मलाही तशी गरज भासली नव्हती. समोर रेड कार्पेट अंथरलेले होते मी सोनपावलाने चालत राजाच्या महाली जाणार होते. एकदंरीत मनाला पंख फुटले होते व सोनेरी स्वप्नामध्ये गुरफटून जात मी व्यावहारिक जग विसरले होते. खरेतर एवढ्या गडगंज श्रीमंत मुलाला मुंबईतच त्याच्या तोलामोलाची आणि माझ्यापेक्षा दसपटीने सुंदर मुलगी नक्कीच मिळाली असती. मग असे असतांना त्यांनी गावची मुलगी का निवडावी हा साधा प्रश्नही कोणाच्या डोक्यात आला नसावा. मोठेबाबांना मी व्हॉटस ॲपवर लग्नपत्रिका पाठवली होती व लग्नास येण्यास अगत्याचे निमंत्रण दिले होते. 

          तसे पाहिले तर मोठेबाबा खरंतर माझे कोणीच नव्हते. त्यांच्या फेबुवरच्या कविता, सायन्सफिक्शन कथा, प्रेमकथा, साहसकथा इ. वाचून मी प्रभावित झाले होते. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्यांच्या पीडीएफ मी वाचलेल्या होत्या. आमच्या समाजातील अग्रगणी लेखक म्हणून मान्यता त्यांना होती. मुंबईतच एका सरकारी कंपनीत मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते. तेवढाच आमचा परिचय पण अजून एक कारणही होते त्यांची पुतणी नेहा माझी क्लासमेट कम जीवश्चकंठश्च मैत्रीण होती. ते योगायोगानेच कळाले होते फेसबुकवर बोलतांना ! ते एक उत्तम ज्योतिषीही आहेत हे नंतर कळाले.... पण स्वतःच्या मुलीवर करावी एवढी माया नक्कीच होती. काका - पुतणीची मैत्री मात्र घट्ट जमली होती. माझे लग्न गावीच पण जिल्ह्याच्या ठिकाणी होते पण त्याच दिवशी ते सुध्दा दुसऱ्या एका पुतणीचे लग्न असल्याने येऊ शकत नसल्याचे कळवले होते. आज वाटते योग्य वेळी एक घातलेला टाका ... पुढे जीवनाचे वस्त्र फाटण्यापासून वाचवले असते. हे व्हायचे नियतीच्या मनात नसावे कदाचित ! 

          आमचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. वडिलांनी जमवलेली सर्व माया माझ्या लग्नावर उधळून टाकली होती ऐपत नसतांनाही ! स्थळही तसेच तोलामोलाचे होते ना शेवटी.... लग्नानंतर बाबांनी मालदीवचे हनीमून ही बुक करून दिले होते. सासरकडची मंडळीही खूष झाली होती... त्यांच्या मनासारखा सर्व मानपान बाबांनी केलेला होता. माझा नवरा मात्र लग्न ठरल्यानंतर एकदाही मला भेटायला आलेला नव्हता आणि कधी फोनवर सुध्दा बोलला नव्हता. त्याच्या कामाच्या व्यापातून वेळ मिळत नसावा अशी मनाशी समजूत घालून मी उत्साहाने लग्नाच्या तारखेची चातकासारखी वाट पाहत राहिले. मला बघायला सासरच्या मंडळीसोबत तोही आलेला होता पण छेss चकार शब्द सुध्दा तोंडून काढला नव्हता. घरातून बाहेर पडतांना मामेबहिणीने जरा छेडलेच होते. ' जिज्यूss आमची दीदी आवडली नाही का हो तुम्हाला ? बोलला असता तिच्याशी तर निदान आवाज तरी ऐकता आला असता ना ! आता तरी काही बोलणार की नाही... आणि हो तुमचा फोन नंबर हवाय माझ्या दीदीला तर द्याल का ? ' त्याने घोग-या आवाजात पुटपुटत नंबर सांगितला. वर्षाला तो मुळीच आवडला नव्हता... एवढे काय रिझर्व्ह राहावे ना माणसाने... निदान मेहुणीशी तरी थट्टामस्करी करावी ना ? वर्षाने त्याला खूप ॲटिट्यूड असल्याचे सांगितले होते. 'असतो ग अबोल स्वभाव  एखाद्याचा... तू नको मनावर घेऊस ! शादी तों होने दो .... फिर मत बोलना जिज्यू बहुत छेडते है।' मी वर्षाला समजावले होते. 

           लग्नात सुध्दा अमेय गप्प गप्पच होता. चेहऱ्यावर बारा वाजलेले होते जसे काही... माझ्या अॉफिसचा सारा स्टाफ लग्नाला हजर होता. भलेमोठे गिफ्ट बॉक्सेस देतांना मयूरसरांनी हसून हात मिळवण्यासाठी पुढे केला तर चक्क त्यांना इग्नोर करून तो दुसऱ्याशी बोलू लागला. माझ्या मैत्रिणी स्टेजवर येऊन मला कानात पुटपुटल्या ' अग आताच हे कमरेत वाकलेले दिसताहेत... पुढे काय होणार ना... त्यांना सरळ करायचे जरा मनावर घे आता ! अमेय खांदे पाडून कमरेत वाकून माझ्या शेजारी उभा होता आणि मी सारखी चिवचिवत एकेक मित्र- मैत्रिणीची ओळख करून देत होते. अमेयच्या अॉफिसकडून मुंबईतून कोणीही आलेले दिसत नव्हते. सासरच्या नातेवाईकांमध्ये आमच्या समवेत फोटो काढून घेण्यासाठी चढाओढ लागलेली होती. माझ्या मैत्रीणी जरा नाराजच झाल्या होत्या. खरं म्हणजे त्यांना माझ्या नव-याला बरेच छेडायचे होते... काय काय फिरकी घेणारेत म्हणून खूप काही सांगत होत्या मला मेहंदीच्या वेळी... मलाच हसू आवरत नव्हते.... पण आज सर्व आनंदावर जणू विरजण पडले होते. सारे विधी पूर्ण होऊन विदाई सुध्दा झाली पण हे महाशय जणू पकडून आणलेल्या कैद्याप्रमाणे मागेमागे येत होते. लग्नात उखाणा सुध्दा घेतला नव्हता. मी डोळे पुसत सासरच्या गावाला जायला निघाली. आईला कळून चुकले होते व्याही मंडळींना गर्वाची लागण झाली होती. आम्ही पडलो सर्वसाधारण मध्यमवर्गीय लोक... आम्हाला ना मान ना सन्मान व शेवटी मुलीवाले पडलो ना ? मला सुध्दा थोडे चुकल्या चुकल्यासारखे वाटायला लागले.... कदाचित निवड चुकली होती ?

            दुसऱ्या दिवशी माहेरची मंडळी पूजेसाठी सासरच्या गावी आली. बाबांनी मालदीवचे हनीमून पॕकेजचे बुकिंग व प्लेन तिकिटस अमेयच्या हाती सोपवले. पण अमेयने त्यांनाच झापले की असे प्लॕन्स ठरवतांना त्याची परवानगी घ्यायला हवी होती ना.... मला कामासाठी ताबडतोब उद्याच मुंबईला निघायचे आहे तर फर्स्ट एसीची तिकिटे आणून द्या आधी !' म्हणून सुनावले, मी अमेयला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सारे पालथ्या घड्यावर पाणी ! सासरेबुवांनी मध्यस्थी करून ' चार दिवसानंतरची मुंबईसाठी तिकिटे ते स्वतः बुक करून देतील म्हणून सांगितले, अमेयला अॉफिसमध्ये कामाचा खूप ताण आहे आणि अमेरिकेतील कंपनीचा चार्ज घ्यायचा म्हणजे येथील कंपनीत खूप काम करावे लागेल... तर हनीमून वगैरेसाठी सवडीनुसार जाईलच की !' वडिल खिन्न मनाने स्थितप्रज्ञासारखे उभे राहून सर्व ऐकत होते. मोठ्या काकांचा विनय तर जाम भडकला होता पण स्वातीताई समजावून त्याला बाजूला घेऊन गेली, जरा ताणतणावातच पूजा पार पडली. सर्व माझी जीवाभावाची माणसे जेवून घरी निघून गेली, माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती पण मी अगातिक होते... एक लाचार, असहाय्य अबला ! माझ्या पुण्यातील नोकरीचा मी राजीनामा देऊन आले होते... अमेयचा संसार फुलवण्यासाठी पण पुढे काय वाढून ठेवले होते त्याची चुणूक मात्र जाणवली होती.  

           चार दिवसानंतर आम्ही मुंबईला आलो ते सुध्दा लग्नानंतर नव्यानवरीसह वणीच्या सप्तशृंगी देवीची ओटी भरण्याची प्रथा मोडून.... आम्ही कुठेच गेलो नाही. गावीही चार दिवसात अमेय एकदाही माझ्याजवळ यायचे तर दूरच पण जास्त काही बोललाच नव्हता. कदाचित पाहुणे मंडळीसमोर बोलायला संकोच वाटत असेल असे वाटले. मुंबईतील फ्लॅट अंधेरीत बाराव्या मजल्यावर होता. अगदी प्रशस्त, हवेशीर आणि दोन बेड, हॉल, किचन असलेला टेरेस फ्लॅट ... नवाकोरा माझ्या सारखाच !

" अमेय आता तरी मोकळेपणाने बोल ना... काय झालेयं ते तरी सांग ! तुझ्या मर्जीविरूध्द लग्न झाले आहे का आपले !" मी भीतभीतच विचारले.

" अगं कविता... तू समजतेस तसं काहीच नाही... बघ ना कामाचा डोंगर उपसायचा आहे आणि मनावर एवढे दडपण आहे ना की काहीच सुचत नाही !"

" अरे पण हवा कशाला एवढा अट्टाहास... आणि तुझ्या अॉफिसमध्ये इतर कोणी नाही का शेअर करायला ? तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुला खूप सुख देईन व आनंदात ठेवीन... मी सुध्दा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे... मला सांग मी काही मदत करू शकेन तुला !"

" बायकांकडून काम करून घेण्याची पाटील खादानची रीत नाही... तू घरात लक्ष दे एवढे पुरे !" त्याने कडक शब्दात सुनावताच मी निरुत्तर होऊन अमेयकडे पाहतच राहिले. 'काय माथेफिरू माणूस म्हणायचा हा ?'

" बरं आज खायला काय करू... तुला काय आवडते ? तुझ्यासाठी मी नॉनव्हेजही बनवून खायला घालीन.... जनाब सिर्फ फरमातें रहो।" खरेतर आमच्या घरी सामिष जेवण वर्ज्य होते, माझे आजोबा अजूनही वारीला जातात त्यांचा प्रभाव घरावर आजही टिकून आहे. पण अमेयसाठी काहीही करायची तयारी मी ठेवली होती.

" हे बघं.... रोज रोज मला मेन्यू विचारीत बसू नको... तुला काय जमेल ते कर !" अमेय बडबडला. मी किचनकडे मोर्चा वळवला. आज अमेय जाणार नव्हता अॉफिसला पण बाहेर जायच्या तयारीत पाहून त्याला विचारले.

" अरेss अमेय डियर ! एवढी दगदग झाली आहे मागील आठ दिवसांपासून तर आज घरीच आराम करू या... राहिलेला हनीमून आज.... ?" म्हणत मी डोळ्यांनी सहेतूक खुणावून लाजून खाली मान घातली व त्याचा हात धरला. तर मला झिडकारून तो दूर जाऊन कपाटासमोर उभा राहिला व बाहेर जायचे कपडे चढवू लागला. मी त्याच्या पाठीशी येऊन उभी राहत त्याला मिठी घातली व जवळ ओढले.

" कविताss हा काय चावटपणा चालवला आहेस... बरीच फॉरवर्ड आहे म्हणायचे तर !" तो अंगावर वसकन् ओरडला. मी हिरमोड होऊन मागे सरकले.

" अरे... असं काय करतोस ? इथे आपल्याशिवाय आणि दुसरे कोणी आहे का ? चावटपणा आपण नाही करायचा तर... अरे आपले नवरा - बायकोचे नाते आहे यात नाही म्हणण्यासारखे काय आहे ! तू पण ना यार... सर्व मूड घालवून टाकलास !"

" हे बघं एवढी आग लागली असेल तर  बाहेर जा शेण खायला कुठेतरी .... मला खूप कामे आहेत !" 

" अमेय तुला शोभतं का असं बोलणं ? मी तुला सोडून आजपर्यंत कोणाचाच विचार मनात आणला नाही रे... प्लीज माझ्यावर विश्वास ठेव !" मी गयावया करीत होते. अमेय धाडदिशी दरवाजा आपटून बाहेर निघून गेला. मी बेडमध्ये धाव घेतली वा भडभडून रडायला लागले. मला जरा शंकाच वाटायला लागली होती म्हणून हे पाऊल उचलले होते, मुंबईतील पहिल्याच दिवशी. बघू आज रात्री कसा रिॲक्ट होतो ते मनाशी बोलत मी किचनमध्ये स्वयंपाक करायला लागले. 

-------------------------------------------------- 

   अमंतरलेल्या रात्री --( २ )


           माझ्या डोळ्यासमोर कॉलेजचे स्वप्नील दिवस एखाद्या फिल्मसारखे सरसरत जाऊ लागले. सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचे डोळ्यासमोर ठेवून मी गावच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. आई - वडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे होते. मी घरी एकुलती एक मुलगी... वडिलांची परिस्थिती साधारणच होती. रेल्वेमध्ये डिआरएम अॉफिसमधील क्लार्कला पगार मिळून तो किती मिळायचा... जेमतेम खाऊन पिऊन पुरेल एवढा ! मी आज्ञाधारक स्टुडंटप्रमाणे केवळ अभ्यासात मन गुंतवले, कॉम्प्यूटरशी खेळता खेळता तेच माझे विश्व बनले होते, तशी कॉलेजमध्ये मी जिनीयस स्टुडंट म्हणून प्राध्यापक वर्गात आवडीची होते, माझा ॲकडेमिक रेकॉर्ड दृष्ट लागण्यासारखा होता. प्रत्येक वर्षी डिस्टिंशन सोडली नव्हती. कॉलेजात इतर मित्र - मंडळीही होतीच सोबतीला पण मी जरा अलिप्तच होते. सगळे मिळून हॉटेलिंग, मूव्ही, पिकनिक इ. मौजमजा करीत असायचे पण घरची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून या सर्वांपासून लांबच राहिले होते... पण माझ्या बोलघेवड्या स्वभावामुळे मित्र- मंडळींचा सतत गराडा पडलेला असायचा... माझ्या नोटस सर्व रेफर करीत असत व सबमिशन्सच्या वेळी मी पूर्ण केलेली जर्नल्स, प्रोजेक्टस फाईल यांच्या घरी जाऊन पडायची. माझा सर्वांना मदत करायच्या स्वभावामुळे मला सर्वच जपत असत. कधीही माझ्या गरीबीची थट्टा केली नव्हती. परीक्षेच्या आदल्या दिवशी माझ्याकडे डिफिकल्टी विचारायला येणाऱ्यांची रीघ लागलेली असायची, या सर्व दोस्तकंपूत तो ही एक माझ्याच सारखा अभ्यासू स्टुडंट होता. ' आकाश मल्होत्रा' त्याची माझ्याबद्दल काळजी वाटणारी नजर सतत माझ्याच भोवती भिरभिरत असायची. कदाचित त्याच्या मनात नक्कीच काही तसले नसावे आणि असले तरी मला कळत नव्हते. अभ्यासाबद्दल व कॉम्प्यूटरमधील नवीन नवीन सॉफ्टवेअर्स व डेव्हलपमेंटसबद्दल तो खूप खूप बोलायचा.... पण कधी कधी असे वाटायचे ना ' त्याला काहीतरी मनातले सांगायचे आहे मला... माझ्यामध्ये तो आयुष्याची जोडीदार म्हणून पाहत असल्याचा मला भास व्हायचा. खूपच काळजी घ्यायचा माझी... मी कॉलेजमध्ये नाही गेले तर दुसऱ्या दिवशी सर्वात आधी मला गाठायचा आणि तब्येतीची हालहवाल विचारायचा,पंजाबी असूनही तो खूप हळवा वाटायचा मला पण होता मात्र शरीरप्रकृतीने धडधाकट, रुबाबादार, उंचपुरा, जिममध्ये जाऊन बॉडी कमावलेला गबरू प्रसन्नचित्त, हस-या चेहऱ्याचा अगदी धर्मेन्द्रच जणू ... कॉलेजातील ब-याच मुली त्याच्या मागे धावून धावून थकल्या होत्या पण त्याने कोणालाही लिफ्ट दिलेली नव्हती. फक्त मीच काय एक अपवाद होते पण ती सोबत केवळ कँटिन व लायब्ररीपर्यंतच मर्यादित होती. वर्गातही तो माझ्यापासून दूरच बसायचा आणि त्याच्या शेजारी बसण्यास तिच्या मैत्रिणींमध्ये मारामारी होत असायची. माझ्या अगदी जवळच्या पाच- सहा मैत्रीणींनी मला त्याच्या सोबत सेटिंग लावून देण्याविषयी विनवले होते... पण मी ह्या सा-या छचोर प्रकारांपासून चार हात लांबच होते. बीई फायनलचा रिझल्ट आल्यावर तोही मेरीटमध्ये आलेला होता आणि पेढे द्यायाचा बहाणा करून आमच्या घरी आलेला. माझ्या आई - वडिलांना त्याच्याविषयी कळावे म्हणून ! मी बरोबर त्याचा हेतू ताडला होता पण अमराठी म्हणून बाबा परवानगी देणार नाहीत, समजूनच मी गप्प राहिली होती. तो जातांना नजरेनेच बरेच काही सांगून गेला होता. आता कुठे असेल तो धर्मेन्द्र ?... होय परफेक्ट धर्मेन्द्र सारखाच दिसायचा अगदी जुन्या सिनेमातला सारखा.... 'मेरे हमदम मेरे दोस्तवाला !' मी जरी शर्मिला टागोरसारखी सुंदर नव्हते पण नकळत का होईना... माझ्या अबोल मनात जोडी जमवून पाहत होते. मनातून तो आवडला होता पण ते सांगायला शब्द ओठांवर येत नव्हते. अचानक माझ्या स्वप्नाची साखळी खळ्ळकन तुटली. मी भानावर आले...दरवाजा उघडला गेलेला होता. कामवाली कृष्णाबाई स्वतःची ओळख सांगून आत आलेली होती. तिने येताबरोबर फ्लॅटच्या साफसफाईचा ताबा घेतला. कपडे, भांडी धुवून तासाभराने ती परत निघून गेली. तिने अमेयबद्दल फारसे काही सांगितले नाहीच पण आज स्वयंपाक मी केल्याने कृष्णाबाईने किचनमध्ये डोकावून पाहत फक्त भांडी आवरली होती. 

            रात्रीचे नऊ वाजून गेले होते अजूनही अमेय घरी परतला नव्हता. तिने फोन लावला तर बिल्डिंगखाली आला असल्याचे त्याने सांगितले. मी पटापट पाने घेतली. डायनिंग टेबलावर सर्व बाऊल्स आणून ठेवले व प्लेटस पुसत किचनमध्ये थांबून राहिले. अमेय त्याच्याकडे असलेल्या चावीने लॕच उघडून घरात आलेला होता.

" अरेss अमेय... हातपाय धुवून ये मी पानं घेतेय... चल बाबा भूक लागलीयं मला !" मी आवाज दिला. तो बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होत होता. मी पाने वाढली होती. तो नॕपकिनला हात पुसत किचनमध्ये आला व टेबलापाशी बसला. मी मस्त रस्सेदार भाजी केली होती. मऊसूत फुलके ताटात वाढले व भाजीचा बाऊल पानावर ठेवला. त्यालाही कडाडून भूक लागलेली होतीच. आधाशासारखे बकाबका खाऊन त्याने जेवण संपवले व हॉलमध्ये जाऊन टीव्हीसमोर बसला. मी जेवण आटोपून सारी आवराआवर, झाकपाक करून बेडमध्ये गेले. उत्साहाने आज पहिली रात्र म्हणून डबल बेडवर नवी चादर अंथरून व ब्लँकेट ठेवले. अमेय नाईटसूट घालून बेडमध्ये आला व धाडदिशी गादीवर अंग टाकून देत पडला, मी एसी सुरू केला व गाऊन घालून बेडवर त्याच्या बाजूला येऊन झोपले. मी दिवा मालवला व अंगावर ब्लँकेट ओढून घेत हळूच त्याच्या अंगावर हात टाकला. अमेयने माझा हात झटकून टाकत बेडच्या कॉर्नरला सरकून डोक्यावर ब्लँकेट ओढून झोपून राहिला. मी पुढाकार घेत त्याला हलवून माझ्याकडे वळवले व डोळ्यांनी जवळ येण्यास खुणावले.

" कविता.... अगं मी ना आज खूप थकलो आहे... माझी इच्छाच नाही प्लीज मला झोपू दे ना !" आताचा सूर जरा मवाळ वाटल्याने मला हायसे वाटून मी कूस बदलवून झोपण्याचा प्रयत्न करू लागले पण झोप येतच नव्हती. कशी येणार ना ? मी अभिसारिका बनून त्याला साद घालत होते आणि हा.... ? शीटss असला अरसिक नवरा थंडगार होऊन मढ्यासारखा पडलायं आणि मी यौवनाच्या आगीत होरपळतेयं ! बघू हळूहळू येईल ताळ्यावर... कधी कधी तरुण मुलांना सुध्दा सेक्सच्या कल्पनेने अंगात कापरे भरते.... जोडीदाराच्या पहिल्या स्पर्शाने सुध्दा अति आनंदाने हुरळून जात भीती वाटते एवढी की जोडीदाराकडे पाहण्याची हिंमतही होत नसते. असे कुठल्या तरी मासिकात वाचल्याचे मला आठवले. मी बेडवर तळमळत पडले होते. नंतर कधी झोप लागली ते कळलेच नव्हते. पहिली रात्र तर अशीच कोरी गेली होती. 

            सकाळी अमेय लवकरच अॉफिसला निघून गेला होता. डोळे उघडले तेव्हा खिडकीवरील पडदा बाजूला सरकून जात कोवळी सुर्यकिरणे चेहऱ्यावर नाचत होती. मी धडपडून उठले तर बेडवर अमेयचा पत्ताच नव्हता. मी सर्व रुम्समध्ये जाऊन पाहिले तरीही तो कुठेही नव्हता. मी हॉलमध्ये येऊन बसले तर टीपॉयवर फुलदाणीखाली चिठ्ठी ठेवलेली दिसली. मी ती उघडून वाचली तर माझ्यासाठी मेसेज होता. ' मी अॉफिसला जात आहे... जेवण कँटिनमध्ये घेईन... कृष्णाबाई येतील ते स्वयंपाक करून ठेवतील... तू जेवून घे ! संध्याकाळी यायला उशीर होईल !' ' अरे मी हक्काची बायको असतांना कृष्णाबाई कशाला स्वयंपाक करतील आणि मी माझे किचन तिच्या हातात देणार ?' मी मनात बडबडले. मी माझ्यापुरते थोडेसे काहीतरी बनवायचे ठरविले होते. मी आवराआवर करायला लागले. बेडवरील चुरगळेली चादर व्यवस्थित अंथरून ब्लँकेटस वॉर्डरोबमध्ये घड्या करून रचून ठेवले. 'आता मोठा प्रश्न समोर उभा होता... दिवसभर करायचे तरी काय ? अमेयच्या विक्षिप्त वागण्याचा मला अर्थच लागत नव्हता.... काय समजावे मी तरी ? त्याचे बाहेर कुठे अफेयर तर नसेल ना... असले तरी हक्काच्या बायकोला कोण सोडणार तरी आहे.... मेली पुरूषाची जातच ती ! एका ठिकाणी मन रमायचे नाही.... वेगवेगळ्या चॉईसेस हव्या असतात ! मला आज त्याला याविषयी बोलायलाच हवे.... नेमका काय प्रकार आहे हा ? ' मी विचारात गुरफटले असता अचानक सेलफोनची रिंग वाजली... स्क्रीनपर पाहिले तर आई होती लाईनवर.

" अगं कवे... काय म्हणताहेत जावईबापू आमचे ? सर्व व्यवस्थित आहे ना ? हे बघ मुंबईचे हवामान सहजासहजी मानवणार नाही तरी तब्येतीला जप हं... तिकडे दमट हवा असते तर पचन होत नाही म्हणे !"आईने प्रश्नांची सरबत्ती सुरू केलेली. 'काल तर आले ना मुंबईत मी...  लगेचच काय ? आईचे काळीज आहे म्हणा... काळजी वाटणारच ना !' मी मनात म्हणाले.

" अग आई मी ठीक आहे... तू नको काळजी करू.... अमेय सकाळीच गेला आहे आॉफिसला आणि त्याला घरी परत यायला नेहमी उशीर होतो.... सांगत होता मला !"

" अग ठीक काय म्हणतेस ? आनंदात असायला हवी ना ? बरं बाबांशी बोलून घे....फोन देते मी !"

" हॕलोss बेटा कविता कशी आहेस आणि अमेय ? थोडातरी स्वभावात बदल पडला की नाही त्याच्या..... बेटा मला खूप काळजी वाटतेयं, माझं कोकरू तिकडे एकटं पडलयं.... कशी सहन करीत असेल? देवा रक्षण कर रे माझ्या लेकीचे !" बोलतांना बाबांचा स्वर कापरा झाला होता. कदाचित डोळ्यात अश्रू दाटून कंठ भरून आला असावा.

" बाबा... मी बरी आहे. तुम्ही नका काळजी करू ..... अमेय आज नाही तर उद्या बदलेलंच ना ! सर्वकाही ठीक होईल.... बरं मी फोन ठेवते, कामं पडली आहेत !" म्हणत मी फोन कट् केला. कितीतरी वेळ मी तशीच बसून होते, खरंच बाबांना माझी खूप काळजी असते.... जरा काही झाले तरी हळहळतात. चला आपली लढाई आपल्याच लढायची आहे.... त्यांना नको डोक्याला ताप ! मी सोफ्यावरून उठले व कामाला लागले. 

          आजची सकाळ तर कामात निघून गेली. दुपार मात्र सतावणार होती. अचानक आठवले मोठेबाबांनी लग्नात आहेर म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांचा पूर्ण संच नेहाचे मिस्टर रोहनकरवी पाठवला होता. नेहाच्या चुलत बहिणीचे लग्न त्याच दिवशी असल्याने तिने रोशनला पाठवले होते माझ्या लग्नात प्रेझेंट देण्यासाठी ! नेहाच्या चुलत बहिणीचे वडिल आता हयात नसल्याने व्याही मंडळींची सरबराई करण्यासाठी मोठेबाबा तिथे थांबले असल्याचा निरोप रोशनने दिला होता. मी सामानातून मोठेबाबांनी लिहिलेली ' टेरिफिक' ही कादंबरी शोधून काढली व बेडवर पडून वाचायला सुरूवात केली. खरंच मोठेबाबा इतकं प्रभावी लिहितात ना की कादंबरीतील प्रसंग जिवंत होऊन डोळ्यासमोर उभे राहतात. टेरिफिक रॉ अॉफिसर क्वीन म्हणजेच रागिणी जाधव ही एकटी आतंकवाद्यांशी लढून मुंबई, पाकिस्तान, अफगाणिस्थान, सिरीया येथे घमासान कारवाया करून त्यांचे बेसकँपसह शेकडो आतंकवाद्यांना उडवून देते.... शूर रागिणीचे धाडस बघून मी खूपच प्रभावित झाले. आता मी सुध्दा सा-या संकटांशी एकटी लढणार... क्वीन बनून रणरागिणीचा अवतार धारण करणार. माझ्या कोलमडलेल्या मनाला खूप उभारी मिळाली. मी आता केवळ कविता राहिले नव्हते.... मोठेबाबांच्या कादंबरीतील नायिका बनणार होते.

            मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली. दुपारी कृष्णाबाई येऊन सारी कामे करून गेल्या होत्या. एवढ्या मोठ्या घरात मी एकटी भुतासारखी वावरत होते. खूप खूप बोलावेसे वाटत होते पण बोलणार कुठे.... त्या फ्लॅटमधील भितींशी ? रात्र झाली होती. साडे आठ वाजले तरी अमेय आलेला नव्हता. मी डायनिंग टेबलावर पाने घेऊन ठेवली होती. मी टीव्हीवर व्हेल नेल पाहत हॉलमध्ये बसले होते. नऊ वाजता दरवाजा अचानक उघडला गेला. कमरेत पोक काढून थकलेला अमेय आत आला होता. मी जेवणासाठी त्याला फ्रेश होऊन किचन यायला सांगून तयारीला लागले. अमेय खाली मान घालून डायनिंग टेबलावर येऊन बसला. दोघेही गप्प राहून जेवत होतो. एका साध्या शब्दाचा संवादही झाला नाही आमच्यात. तो स्वतः हाताने वाढून घेत बकाबका गिळत बसलेला होता. पाच मिनिटांत जेवण आटोपून तो बेडरूममध्ये निघून गेला. मी सारी आवराआवर करून गाऊन बदलून बेडामध्ये गेले तर हा चक्क घोरायलाच लागला होता. मी अंगावर ब्लँकेट ओढून स्वस्थ पडून राहिले. 

     असे मात्र रोजच होऊ लागले होते. आठ - साडेआठ वाजता यायचे, बकाबका खायचे आणि माझ्या विरूद्ध बाजूने कूस करून झोपून जायचे. मी प्रत्येक रात्री वाट पाहत होते.... कधी अमेय कूस बदलून माझ्या बाजूने वळेल म्हणून... पण छेss रोजच्या दिनचर्येत तसूभरही फारक पडलेला नव्हताच. कसले एवढे काम करतोयं हा अॉफिसमध्ये की लग्नानंतर पुरूष ज्या गोष्टीची अधीर होऊन वाट बघत असतात. सळसळणारे यौवन लपेटून मदनिका बाजूला येऊन झोपते याशिवाय दुसरा कसला आनंद असू शकतो. स्त्री - पुरूष ओढ ही नैसर्गिक असते. त्यासाठी सर्वच प्राणीमात्रांमधील नर - मादी जीव तडफडत असतात.... आणि मी अजूनही अबोध कळीच राहिले होते. कळीला ध्यास असतो उमलून फुल होण्यासाठी पण इथे सर्वच विपरीत घडत होते. माझीही काही स्वप्ने होती .... काही शारीरिक गरजा होत्या... मलाही आनंद उपभोगायचा होता पण इथे तर सदा न कदा पार्टनरचा ध्वजभंग झालेला. रोज रात्री हा तोंड फिरवून झोपून राहायचा. किती मन मारायचे ना मी... आता याची तड लावलीच पाहिजे ठरवले. जवळजवळ पंधरा दिवस होऊन गेले होते आम्हाला मुंबईत येऊन... पण आता नाही, मुळीच नाही ! उद्या सकाळी अमेय निघून जाण्यापूर्वी मी झोपेतून लवकर उठायचे ठरवून झोपून गेले.

" अमेय.... अरे खूप कामं असतात का अॉफिसमध्ये ? पण तू तर एक्झिक्युटिव्ह आहेस मग कशाला एवढे मर मर काम करतोस.... आपल्यालाही काही लाईफ आहे की नाही ?"

" कविता.... सॉरी टू से बट इटस कंपलसरी ! खरंतर मी एवढा थकून जातो की कशाला उत्साह राहतच नाही.... तू तरी समजून घे ना !"

" होss रे .... कळतंय मला ! पण हे असं किती दिवस चालू राहणार ना ? तुला कळतंय का आपल्याला मुंबईत येऊन दोन आठवडे उलटून गेलेत ते ? बरं ते जाऊ दे आज मी स्पष्टच विचारणार काही गोष्टी.... खरं खरं सांगायचं हं !"

" म्हणजे काय म्हणायचंय तुला ?"

" तुझे बाहेर कुठे अफेयर वगैरे आहे का म्हणून तू मला टाळतोस ? की मी तुला आवडत नाही ?"

" तुझ्यासारखा चालू नाहीये मी..., म्हणे अफेयर आहे !"

" अरेss मी फक्त विचारले तुला... आरोप नाही करत आणि माझ्याबद्दल तुला काय माहित आहे ते तरी सांग ना.... म्हणजे माझ्या चालूपणा विषयी ? मी तुला आज अशी जाऊ देणार नाही.... तुला बोलावेच लागेल !" 

" कविता.... तू ना पराचा कावळा करतेस बघं.... माझ्या मते गावच्या मुली जरा जास्तच फॉरवर्ड असतात म्हणून बोललो मी !"

" म्हणजे तुझ्या बहिणीसह आईसुध्दा.. ? त्याही तर गावच्याच आहेत ना ? सगळेच तसे आहेत तुझ्या मते ?"

" कविता.... थोबाड फोडून ठेवीन माझ्या घरच्यांबद्दल आणखी काही बोललीस तर ... हे आता अति होतंय हां.... चल हो बाजूला मला उशीर होतोयं जायला !" अमेयने कानफटीत मारण्यासाठी हात उगारला. 

" अच्छा तर.... म्हणजे आता हात उचलण्यापर्यंत मजल गेली म्हणायची.... खरा मर्दचा बच्चा असेल तर ना वर उचललेला हात खाली आणून दाखव .... नाही तुझ्या गळ्यात तुझा हात बांधायला लावला तर रागिणी नाव सांगणार नाही !" मी अनावधानाने टेरिफिक रॉ अॉफिसर रागिणी बोलून गेले. तो आ वासून माझ्याकडे पाहतच राहिला.

" मला धमकी देतेस ?" 

" हो... आणि चल आज मीच येते तुझ्या अॉफिसमध्ये आणि तुझ्या बॉसला भेटून खरं खोटं ते बघते.... म्हणे बारा तास अॉफिसमध्ये करतो.... कसलं काम करतोस रे आणि तू एक्झिक्युटिव्ह आहेस की नाही ते ही व्हेरिफाय करते !"

" हे बघ.... मुकाट्याने घरात बसून राहायचेस तू... पाटील खानदानच्या लोकांना हे असलं ऐकण्याची सवय नाही !"

" मान्य आहे पण पाटील खानदानची लोकं बाहेरच्यांकडून मुलं जन्माला घालतात का ते ही सांग !"

" कविताsss शीट् ..... तू ना बोलूच नको माझ्याशी.... मी ना आता सरळ जातो जीव द्यायला ट्रेनखाली !" 

" अरेss वा रेss वा मर्द.... ही बायकी भाषा शोभते का तुला ? आजपर्यंत पंधरा दिवस होऊन गेलेत लग्नाला आपल्या... अजून तू स्पर्शदेखील केलेला नाही मला... !" मी देखील आता चवताळले होते. त्याच्या प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर करीत दरवाजा अडवून उभी होते. अमेय मला ढकलून धावतच बाहेर पडला. मी त्याच्या पाठमो-या आकृतीकडे बघतच उभी राहिले आमचा वरच्या पट्टीतील आवाज ऐकून आजूबाजूचे शेजारी दरवाजे उघडून बाहेर आले होते. लिफ्ट सुरू झाल्याचा आवाज कानी पडला... अमेय पसार झालेला होता.

           मी अमेयच्या फाईली चाळायला सुरू केल्या त्यावर मला त्याच्या अॉफिसमधील सीईओ अरून चक्रवर्तीचा नंबर मिळाला. मी तो लिहून घेतला. ' बघते बारा वाजता फोन करून अॉफिसमध्ये नेमका हा कलंदर तिथे करतो तरी काय ?' दरवाजा बंद करून सोफ्यावर मटकन बसले. कितीतरी वेळ काहीच सुचत नव्हते..... नुसते डोके भणभणत होते. मुंबईच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये मर्डर जरी झाला तरी कोणी येत नसते बघायला हे मी जाणून होते. मी चहा - नाश्ता घेऊन हॉलमध्ये येऊन बसले. साडे अकरा वाजून गेले होते. मी अरून चक्रवर्तींचा नंबर डायल केला.

" क्या ...आरूनसर बात कर रहे है ? मैं मिसेस अमेय पाटील घर से बात कर रही हूँ.... दो मिनट बात हो सकती है?" मी जरा चाचरतच बोलले.

" हां जी.... हां ! भाभीजी आप फोनपर ? वैसे कोई बात नहीं पर बडी खुशी हुई आप से मिलकर.... कहिए क्या कर सकता हूँ आप के लिये ?" पलिकडून अरूनसर बोलत असावे. आवाजात नम्रता होती. मला थोडा धीर आला आणि मी हिंमत करून विचारायला सुरूवात केली.

" सर.... कहीं मैं आप को डिस्टर्ब तों नहीं कर रही हूँ ना ? "

" अजीं नहीं ... जी ऐसी कोई बात नहीं... आप के लिये समय तों जरूर दूंगा मैं ... हां तो कहिए दिदी!" चक्रवर्तीने मला दिदी म्हटल्याने जरा धीर आला.

" सर... क्या मेरे मिस्टर मतलब अमेय पाटील सुबह आठ बजे से रात आठ बजेतक आॉफिस में ही काम करतें है ? क्या वह आप के अॉफिस में एक्झिक्युटिव्ह के हैसियत से काम करते है ?"

" दिदी.... की होलो ? मतलब ऐसा क्यूँ पूछ रही हो.... क्या तुम से भी यहीं कहा की वों एक्झिक्युटिव्ह है ? वैसे तों अमेय है... एक सॉफ्टवेअर इंजिनियर लेकिन काम में परफेक्ट और पंक्च्युअल बिल्कुल भी नहीं... काफी शिकायते आ रही है... वैसे तों बहुत जल्द हम उसे फायर करनेवाले है। हमारे अॉफिस का टायमिंग सुबह नौं बजे से शाम पाँच बजेतक ही होता है... और बाद में हम किसी को भी जादा समय काम करने की परमिशन देते ही नहीं .... बराबर सवा पाँच बजे अॉफिस बंद हो चुका होता है। वैसे मुझे लगता है, अमेय को शराब की भी लत लगी हुई है....पक्का बोल नही सकता पर शक जरुर है। हमे अफसोस है दिदी... आप के साथ जो हुवा वह गलत ही है। सॉरी टू से बट... वह नालायक तो आदमी कहने भी काबिल नहीं है ! ना किसी से घुल - मिलकर बात करना, ना ही कुछ पर्सनल प्रॉब्लेम्स शेअर करना .... यह सब बातें तों छोडिए पर सीधे मुँह बात तक नहीं करता।" 

" तों वह पाँच बजे के बाद कहाँ जाता है... कुछ अन्दाजा ? मतलब.... कुछ अफेयर वगैरा ?"

" कहाँ जाएगा दिदी वह कम्बख्त पूरी शाम बम्बई के रास्तों की खाक छानते घूमते रहता होगा... उस मरियल मुर्दे से कौन मोहब्बत करेगा.... मुझे तो शक है कि शायद ये बन्दा तों इसी काबिल भी है या नहीं.... और कुछ ?"

" जी नहीं.... शुक्रिया !" मी वैतागून फोन बंद करून टाकला. माझा संशय खरा ठरला होता. 'येऊ दे आज घरी बरोबर झाडाझडती घेते आणि त्याच्या आई - वडिलांनाच इथे घेते बोलावून.... एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागूच दे !' मी त्याच्या गावच्या घरी फोन करून सास-यांना सर्व काही पटवून सांगितले तर ते दोघेही दोन दिवसांनी मुंबईला येत असल्याचे कळवले त्यांनी.

         रात्री अमेय ब-याच उशीरा म्हणजे दहा वाजता घरी आला तो सरळ बेडरूमचा रस्ता पकडला. हॉलमध्ये पाऊल ठेवताक्षणीच जाणवले की त्याचा तोल जात आहे तो अक्षरशः झोकांड्या देत चालत होता. कशामुळे काही कळायला मार्ग नव्हता. अॉफिसमधील अतिताणामुळे म्हणा की त्याच्यावर मॅनेजमेंटने काही ॲक्शन वगैरे घेतली की काय ? अमेयला नोकरीतून तर काढून टाकले नसावे ? नेमका काय प्रकार आहे ते कळतच नव्हते. तो ही काही बोलण्याच्या किंवा ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हता. आता त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही समजून मी दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन झोपले. सकाळी अमेय तयार होऊन पायात बूट चढवत होता. मी धावतच हॉलमध्ये येऊन त्याच्या समोर चेयर सरकावून बसले. तो खाली मान घालून बसला होता. मी हनुवटीला धरून त्याचा चेहरा वर उचलला व त्याच्या डोळ्यात रोखून पाहिले. त्याच्या शरीराला कंप सुटलेला होता. त्याचे लालभडक डोळे पाहून तो ही रात्रभर झोपलेला नसावा असेच दिसत होते.

" अमेयss का असे करतोस रेss ? तुझ्या घरचे एवढे तालेवार लोक आहेत आणि तू... हा असा?"

" म्हणजे तुला काय म्हणायचे आहे ?"

" हे बघ... मला तुझे सगळे प्रताप कळलेले आहेत चक्रवर्ती साहेबांकडून ! तुला नोकरीतून काढून टाकणार आहेत हे खरे ना आणि तू कोणी एक्झिक्युटिव्ह वगैरे नसून साधा सॉफ्टवेअर इंजिनियर आहेस ना.... आता तरी खरे सांगणार आहेस की नाही ? हे बघं मी तुझ्या सर्व चुका पोटात घेऊन तुला माफ करायला तयार आहे पण तू इमानदारीत वागायला शीक अगोदर आणि एक चांगला पती होऊन दाखव.... हवं तर आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करू ! अरेss यात भिण्यासारखे काही नसतेच... आपले प्रेम जसे फुलत जाईल तसे आपण जवळ येऊ... असतो रे कधीकधी एखाद्याच्या मनात न्यूनगंड पण हा प्रश्न आपणच सोडवू या ! खरं तर मलाही तुला असे बोलायला आवडत नाहीये पण नाईलाज होतोयं बघं.... तू मला हमी देतोस मी सांगेन तसे वागण्याची ?" मी मृदू भाषेत त्याला समजावून सांगत होते.

"अगं पण मी बारा बारा तास काम करतो ते कोणासाठी ? आपल्या सुखी संसारासाठीच ना ?"

" बोललास.... पुन्हा खोटं बोललास ना ? तुझे अॉफिस तर पाच वाजताच बंद होत असते. त्यानंतर तू कुठे जाऊन बसतोस.... देहाच्या बाजारात की दारू प्यायला गुत्त्यामध्ये ?"

" हे बघ ... तुला आता सगळे कळलेच आहे तर तर तू तुझा रस्ता निवडू शकतेस... मी तीला मोकळं करायला तयार आहे आणि हो वेश्येकडे जाण्यासारखी माझी लायकी नाही. मी तुला सुख नाही देऊ शकणार.... मी मनातच कुढत असतो आणि जाऊन बसतो गिरगाव चौपाटीवर ! मला माफ कर कविता मी तुझ्या लायकीचा मुळीच नाही. खरंतर मीच या लग्नाला तयार नव्हतो पण आईने जीव द्यायची धमकी दिली म्हणूनच.... !"

" ओके... ओके ! परवा तुझे आई- बाबा येताहेत आपल्याकडे.... मी त्यांच्या सोबतच निघून जाईन गावी .... कायमची ! मग तुला काय हवे ते गुण उधळ.... माझ्या जीवनाचे मातेरे केलेस तू... मी अस्पर्शा राहूनही घटस्फोटिता म्हणून कायमचा बट्टा लागलायं ना... माझ्याशी कोण लग्न करणार... फार फारतर एखादा बिजवर ! शीss मला किळस वाटतेयं तुझी.... आजपासून मी स्वतंत्र झोपणार दुसऱ्या बेडमध्ये... ओके ना ?"

" ओके....! या शिवाय काही पर्याय राहिला आहे का ?" अमेय आपली बॕग उचलून चालू पडला. मी मागूनच आवाज दिला त्याने वळून पाहिले.

" हे बघ... जीव वगैरे द्यायचा प्रयत्न करू नकोस... निदान मी इथे आहे तोपर्यंत तरी.... तुला माझी शपथ आहे आणि संध्याकाळी लवकर ये घरी !"

" हो... नाही असे करणार येतो मी !" त्याने धाडकन् दरवाजा लावून घेतला. मी सुध्दा पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. 

-------------------------------------------------- 

अमंतरलेल्या रात्री -- ( ३ )

          माझी तंद्री भंग पावली व मी भानावर आले तर पुण्याच्या अॉफिसमध्ये असल्याचे कळून चुकले. डोळ्यासमोरून चित्रपट संपलेला होता. कोणीतरी मला हलवून जागे करीत होते. मी डोळे उघडून बघितले तर मयूरसर आणि दुसरा कोणीतरी इसम त्यांच्यासोबत उभा असल्याचे दिसले. मयूरसर काळजी वाटून मला विचारीत होते.

" कविता.... एनी प्रॉब्लेम ? तब्येत ठीक नाही का.... किती वेळ होऊन गेला कळतेयं का ? अॉफिस बंद व्हायची वेळ टळून गेलीयं.... बघ तो चंद्रकांत तुझ्यामागे स्टुलावर बसून आहे.... तू कधी उठतेस याची वाट पाहत !" मयूरसर बोलत होते पण शब्द जेमतेमच कानात शिरत होते.

     डोळ्यापुढे अजूनही अंधारी येत समोरचे सारे काही धूसर दिसत होते. मयूरसर आणि तो आगंतुक इसम तिच्या समोरच्या चेयरवर बसले. हळूहळू सारे काही स्पष्ट दिसू लागले. पहिल्यांदा नजर पडली ती वॉल क्लॉकवर साडेसहा वाजत असल्याचे दिसत होते आणि समोर मयूरसर ! आणि...आणि ? आश्चर्याचा सुखद धक्का बसावा तसा संपूर्ण शरीराला झटका बसत जणू वीज सळसळून गेली. हो.... तोच आहे हा नक्कीच त्याच्याशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही... शर्मिलाचा धर्मेन्द्र ! येस्सss आकाश.... आकाश मल्होत्रा ! माय कलिग... माय अनस्पोकन लव्ह.... मुझपर मरनेवाला गबरू नौजवान!

" हैलोss आकाश ! तू इथे कसा ? तेही मयूरसरांसोबत .... माझ्या डोळ्यासमोर ? मी अजूनही स्वप्नच पाहतेयं की काय ? "

" कविता... हा आकाश आणि आजपासून तुझा कलिग... सध्या दुसरी व्यवस्था होईपर्यंत तुझ्या क्युबिकलमध्ये बसला तर चालेल ना ? तुझा वर्कलोड शेअर करण्यासाठी मी डेप्युट करतोयं त्याला ... डन् ?"

" ओके.... ओके, डन सर आणि नुसतं चालेल नाही तर तो ही धावेल माझ्या जोडीनं ! पण हा चमत्कार घडला तरी कसा ?" मी सीटवरून उठून हर्षवायू झाल्याप्रमाणे अक्षरशः किंचाळून बोलत होती.

" कविता ... मी सांगतो सारे काही ! तुझी चार दिवसांपूर्वीची फेसबुकवरील enjoying single ची पोस्ट पाहिली आणि आलो सरळ तुमच्या मेन ब्रांचमध्ये... वॉक इन इंटरव्ह्यूसाठी ! मयूरसर तेवढ्याच साठी तिथे आलेले होते. मी सिलेक्ट तर झालोच होतो पण चौकशी केल्यावर कळाले की तू त्यांच्याच सब ब्रँचमध्ये आहेस कामाला ! मग काय मयूरसरांना सर्व भूतकाळ समजावून सांगितला आणि फिर चलें आये आप का हाथ थामने !" आकाश अत्यानंदाने हुरळून जात बोलत होता. मयूरसर मंद हसत दोघांकडे पाहत होते.

" खरंss खरंच सांगतोयं तू ना हे ? पण अरे मी परित्यक्ता... तरीही ?"

" ऐ बाईss सरळ समजेल असे सांग ना... ते परितेक्ता मतलब ?" आकाश बुचकळ्यात पडल्यासारखा माझ्याकडे पाहत म्हणाला.

" अरेss म्हणजे ना मी डायव्होर्सी आहे आता ! सहा महिने होऊन गेलेत लग्नाला आणि आता डायव्होर्स पेपरवर कोर्टाने मोहोर उमटवली आहे. मी आता स्वतंत्र आहे.... पंछी बनू उडती फिरु मस्त गगन में.... आज मैं आजाद हूँ मस्त... !" मी नरगीसप्रमाणे हात पसरवून नाचत गात होते.

" कविता.... बाय द वे मला तशी काही जास्त वाट नाही बघावी लागली ना.... शायद हमारा रिश्ता पहले जनम से बनकर आया होगा ना ? "

" बिल्कुल.... बिल्कुल है ! पण कविता तू गेले दोन अडीच तास समाधी लावून काय बघत बसली होतीस ?" मयूरसर भुवया उंचावून माझ्याकडे बघून म्हणाले.

" सांगूss नक्की ? मी बघत होते अमंतरलेल्या रात्री ! अभीं अभीं नया सवेरा हुवा है मेरे जीवन में..., थैंक्स आकाश आखिर हमें तों मिलना ही था !" मी आकाशचा हात हातात धरून त्यावर किस करीत म्हणाले. मी टाळीसाठी उंचावलेल्या हातावर टाळी देत मयूरसर व आकाश दोघेही हसू लागले. 

           क्युबिकल बाहेर बसलेला चंद्रकांत प्यूनही मोठ्याने हसू लागला. मी मागे वळून पाहिले तर तो लगबगीने अॉफिस किचनच्या दिशेने धावत जात होता. थोड्या वेळातच कॉफीचे मग भरलेला ट्रे हातात घेऊन क्युबिकलमध्ये आला. कॉफीचा ट्रे टेबलावर ठेवून आम्हा तिघांना कॉफी दिली. चंद्रकांतने खुशीत येऊन माझ्या व आकाशकडे डोळे विस्फारून पाहत दोघांशीही हात मिळवला. मी विचारले 'कशासाठी... ? तर चंद्रकांत म्हणाला 'अमंतरलेल्या रात्रीसाठी !' माझ्या बोलण्यात आलेल्या अमंतरलेल्या रात्रीचा अर्थ त्याला कळला नव्हता तरीही !

-------------------------------------------------- 

          

     


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy