Archanana Borawake

Inspirational

3  

Archanana Borawake

Inspirational

नातं रक्तापलीकडचं!

नातं रक्तापलीकडचं!

5 mins
202


    निशाचा या नवीन हॉस्पिटलमध्ये पहिलाच दिवस होता. कॅन्सर वार्डात तिची अपॉइंटमेंट होती. नवीन ठिकाणी आता रुळायला वेळ लागणार होता. आधीच्या हॉस्पिटलमध्ये एक वर्षाचा अनुभव मिळाला होता.... 'ती' गोष्ट झाली नसती तर तिने ते हॉस्पिटल असे तडकाफडकी सोडलेच नसते...

त्या हॉस्पिटलमध्येच तिने भावी आयुष्याची स्वप्ने पाहिली आणि तिथेच त्या स्वप्नांचा चक्काचूरही झाला. विनीत आणि तिने डॉक्टरीचे शिक्षण एकाच कॉलेजमध्ये घेतले... इंटर्नशिपही एकाच ठिकाणी! त्या सहवासाचे रूपांतर कधी प्रेमात झाले त्यांनाही कळले नाही. काही वर्ष अनुभव घेऊन, पैसे साठवून स्वतःचे हॉस्पिटल टाकायचे त्यांनी ठरवलं होतं. दोघेही मग एकाच हॉस्पिटलमध्ये काम करू लागले... एकमेकांच्या अजूनच जवळ आले... सगळ्या हॉस्पिटलमध्ये ही लैला-मजनूची जोड़ी फेमस होती.. दोघेही एकमेकांना साजेसे. निशाच्या आई- बाबांनाही विनित आवडला होता. पण एक दिवस अचानक विनितचा साखरपुडा झाल्याची बातमी तिला कळली..... ती धावतच त्याच्या घरी गेली. विनीत नव्हताच. त्याच्या आईने जे सांगितले ते ऐकून ती पुरती खचून गेली.


  "विनितचं लग्न आम्ही खूप आधीच ठरवलं होतं. मुलीचे वडील मोठे उद्योगपती आहेत... त्याला हॉस्पिटल बांधुन देणार आहेत...त्याला आता विसर."

 केवढा मोठा विश्वासघात! धक्का बसलेल्या अवस्थेत ती परत आली.... ! राजीनामा लिहिला आणि गावाला परतली... तीन-चार महिने विमनस्क अवस्थेत काढले.. आई बाबा म्हणाले, " अगं विसर त्याला, तुला त्याच्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल."

  " बाबा, मी आता कुणावर विश्वास ठेवूच शकत नाही. मी दुसऱ्या कुणाशी लग्नच करू शकणार नाही. मी एका हॉस्पिटलला जॉईन होते.. आता फक्त माझं काम आणि मी!" 

     

   ती हॉस्पिटलला रुजू झाली... नवे काम समजून घेतले... आणि एकेक पेशंटचे रिपोर्ट चेक करु लागली. तेव्हड्यात एक जोडपे वार्डात आले. ती मध्यमवयीन स्त्री प्रत्येक बेडजवळ जाऊन प्रत्येकाची चौकशी करत होती.. तिचे पती, बरोबर आणलेली ताजी फुले एकेकाच्या हातात देत होते. पूर्ण वाॅर्डमध्ये जणू चैतन्य संचारले... सर्व जण त्यांच्याशी बोलत होते... एकच गलका झाला. निशाला काही समजेना. कॅन्सर पेशंटच्या वार्डात असा गोंधळ! " हे काय चाललंय? शांत पडून रहा सर्व. आणि तुम्ही कोण?"

  तेव्हड्यात नर्स आली, " यांची आज केमोथेरपी आहे. डॉक्टर तुम्हाला बोलावताहेत."

  थोड्या वेळातच ती स्त्री बेडवर होती. मोठ्या डॉक्टरांनी प्रोसिजर सुरू केली... निशाला पुढचे सर्व सांगून ते गेले. निशाने फाईल हातात घेतली,

" तुम्ही मिसेस... "

" मला मावशी म्हण... इथले सर्व जण मला दळवी मावशीच म्हणतात....तुझं काय नाव? "

" मी डॉक्टर निशा! हं मावशी, काही त्रास नाही ना आधीच्या केमोचा?"

" कसला त्रास गं? त्या कॅन्सरमुळे गर्भाशय काढावा लागलं...किडका भाग बाजूला केला... आता या छोट्या गोष्टीचा कसला आलाय त्रास? मी मजेत आहे. "

निशाला आश्चर्य वाटले. तिला अनेक पेशंट आठवले... वैतागलेले, केमोच्या त्रासाने चिड़चिड़े झालेले, कायम रडणारे आणि आकांडतांडव करणारे. या मावशी म्हणजे अजब रसायन आहे... इतक्या दिव्यातून जात आहेत आणि चेहर्‍यावर प्रसन्न हसू! 

" काय विचार करतेस निशा? अगं त्रास होणारच... पण त्या त्रासाला धरून थोडंच बसायचं.. अगं माझ्यापेक्षा जास्त सहन करणारे आहेत इथे. मी इथे अ‍ॅडमिट होते ऑपरेशनच्या वेळी तेव्हा पाहिलंय.... कित्येक लहानगी मुले आक्रोश करताना... खेळण्याच्या वयात बेडला जखडून असलेले, कित्येक बायका ज्या शरीराचे दुःख सहन करत असतात पण मनावरचे आघात सहन न करता आल्याने कोसळून गेलेल्या.....स्त्रीत्वाची ओळख असलेले अवयव गमावून, आत्मविश्वासही गमावलेल्या.... पुरुषाला जर असा दुर्धर आजार झाला, तर त्याच्याबरोबर पूर्ण कुटुंबाची ससेहोलपट मी पाहिली आहे आणि पाहते आहे. त्या सर्वांपेक्षा माझे दुःख ते काय.? मी नियमित येते, ट्रीटमेंट घेते... माझी काळजी घेणारे कुणीतरी आहे...याचेच मला मोठे सुख वाटते. "

  निशा ते ऐकून एकदम स्तब्ध झाली.

" निशा, किती छान डोळे आहेत गं तुझे! पण त्या डोळ्यात एक कमी आहे... कसली माहितेय, आनंदाची! ... मनातला आनंद ओठातून झळकत डोळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे....त्यासाठी मन आनंदी ठेव. तरच तुझ्याबरोबर तो आनंद प्रत्येक पेशंटपर्यंतही पोहोचले....गोळ्या औषधांबरोबर आनंदही वाटत जा गं. आणि राग नको येऊ देऊ हं.. म्हणशील कोण कुठली मावशी आणि हे काय उपदेशाचे डोस देतेय. "

त्यांनी हसून निशाकडे पाहिले. निशानेही मग हसून त्यांना प्रतिसाद दिला आणि ती पुढच्या पेशंटकडे वळली.


    दुपारी केबिनमध्ये बसल्यावर दळवी मावशींचं बोलणं तिला आठवलं," माझे दुःख माझ्या चेहर्‍यावर खरंच दिसते का? मावशी असं का म्हणाल्या? "

तिने नर्सला विचारले, " या दळवी मावशी नेहमीच्या पेशंट ना? "

" हो ना डॉक्टर. खूप प्रेमळ बाई! दर वेळी येताना दुसर्‍या पेशंट्ससाठी स्वतःच्या बागेतली फुले आणते, प्रत्येकाशी थोडा वेळ तरी बोलतेच. कुणाला हसवते, कुणाला धीर देते...दोघे नवरा-बायको ज्या दिवशी येतात त्या दिवशी वार्डात जणू जादूच होते... मोठा बंगला आहे त्यांचा! पण दोघेच राहतात.. मुले परदेशात आहेत. पण कसली तक्रार नसते त्यांची....नाहीतर काही बायका, मुलांच्या नावाने अश्रू गाळत बसतात.. कॅन्सरचं दुखणं स्वतः सहन करत असल्याने दुसर्‍या पेशंटचं दुःख त्यांना समजतं ते दूर करण्याचा त्या प्रयत्न करतात... हे दोघे काही गरीब पेशंट्सला मदतही करतात. पैसा असला तरी तो दुसर्‍यांवर खर्च करायला मोठी दानत लागते... ती त्यांच्या जवळ आहे. "


 हे सगळे ऐकून निशाला दळवी मावशींचे किती कौतुक वाटले. तिलाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली.. ती स्वतःचे दुःख विसरून नव्या उत्साहाने कामाला लागली. जेव्हा-जेव्हा दळवी मावशी हॉस्पिटलमध्ये येत, तेव्हा निशा त्यांच्याबरोबर किती तरी गप्पा मारी. त्याही किती प्रेमाने तिच्याशी बोलत. कधीतरी तिच्यासाठी स्वतः बनवलेले खायला घेऊन येत... कधी बागेतली फुले तिच्यासाठी आणत.. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला निशाला त्यांनी बोलावले... तीही गेली. त्यांना खूप आनंद झाला. म्हणाल्या, " निशा, लग्नाला 45 वर्ष झाली... आपल्या जीवाला जीव देणारं माणूस मिळालं ना, मग कोणतंही दुःख पार करण्याची शक्ति मिळते. तुलाही असाच जीवनसाथी मिळू दे. तुम्ही ऑपरेशन करताना नको असलेल्या गाठी काढून टाकता... कधी कधी तर एखादा अवयवही काढून टाकता.. पण त्यामुळे आमच्या सारख्यांचं आयुष्य वाढतं ना! तसंच आहे जीवनाचं.. दुखरी गोष्ट मनातून काढून टाक... ती काढल्यावरच तुझ्या जीवनात आनंद परत येईल. आमच्यासारख्यांना जगण्याची दुसरी संधी तू देतेस.. स्वतःलाही दुसरी संधी दे ना! "


      आयुष्यात काही माणसं आपल्याला अचानक भेटतात.... आणि आपल्यावर अशी काही जादू करतात की रक्ताचे नाते नसतानाही ती आपल्याला जवळची वाटू लागतात. इतकी जवळची की आपली सुखदुःख ती वाटून घेतात, आपल्याला योग्य रस्ता दाखवतात आणि आपल्या हृदयात कायमचं घर करून राहतात.


निशाला दळवी मावशींच्या रूपाने एक जवळची मावशी मिळाली . तिच्या कोलमडलेल्या मनाला, उभारी देणारी, तिला एक नवी दृष्टी मिळवून देणारी, तीच्या निराशेवर फुंकर घालणारी.


    काही महिन्यांनी निशा परत दळवी मावशींच्या घरी गेली... पण आता वेगळं कारण होतं. त्यांच्या हातावर तिने लग्नपत्रिका ठेवली, " नक्की यायचं हं लग्नाला.... माझी मावशी आली नाही तर मी लग्नाला उभीच राहणार नाही."

" नक्की येणार आम्ही. माझ्या लाडक्या निशाचं लग्न ना!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational