मुंगी पैठण
मुंगी पैठण
मुंगी, पैठण येथील राजेंभोसले वाडा
मुंगी गावात काही सरदार घराणी वंशपरंपरेने राहतात. त्यापैकीच वेरुळचे प्रसिद्ध भोसले घराणे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे बंधू विठोजीराजे यांना मुंगी गावाची जहागिरी मिळाली होती. विठोजी भोसले यांचे पाचवे सुपुत्र नागोजी हे त्या ठिकाणी स्थायिक झाले. पुढे, त्याच भोसले घराण्याने राक्षसभुवनच्या लढाईत मोलाची कामगिरी बजावली. पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात 10 ऑगस्ट 1763 रोजी राक्षसभुवन येथे लढाई झाली होती. त्या लढाईत पराभूत झालेल्या निजामाने मुंगी गावात तह केला होता. तो तह ‘मुंगी-शेवगाव‘चा तह म्हणून ओळखला जातो.
मुंगी या गावामध्ये विणकर लोकांची मोठी वस्ती होती. ते लोक पैठणी विणण्याचे काम करत. मुंगी गावातूनच पैठणीला लागणारा कच्चा माल पुरवला जाई असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात.
मुंगी गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 1951 साली झाली. मुंगी गावची लोकसंख्या पाच हजार पाचशे आहे. गाव सात हजार एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. गावात हनुमान, महादेव, खंडोबा यांची मंदिरे आहेत. मुंगादेवी ही गावाची ग्रामदेवता आहे. तिची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेनंतर भरते. मुंगादेवीच्या आकर्षक छबिन्याची मिरवणूक गावातून यात्रेच्या रात्री निघते. त्यात ग्रामस्थ नृत्य करत सहभागी होतात. यात्रेला कोकणातूनही भाविक येतात.
मुंगी गावाच्या उत्तरेला असलेल्या दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण या शहरावर मोगलांनी पंधराव्या शतकात हल्ला केला होता. त्यावेळेस संत एकनाथ महाराजांची पालखी मुंगी गावाच्या विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात वास्तव्यास होती असे सांगितले जाते. मुंगी गावीच एकनाथ महाराजांचे कट्टर शिष्य कृष्णदयार्णव यांनी ‘श्री हरी वरदा’ हा ग्रंथ लिहिला.
