मुग्धा
मुग्धा
आई ए आई.......
आई गं......
हां, मुग्धा काय झालं सकाळी सकाळी ओरडायला तुला?
आई आज मला काॅलेजहुन घरी परत यायला उशीर होईल.
का गं? रोजचं झालंय हां तुझं हे, रोज काय असतं गं काॅलेजला असं उशीर व्हायला नक्की काय चाललंय तुझं?
आई अगं काही नाही चाललंय गं तू ना उगाच जरा जास्त विचार करते, आजपासून आमची वादविवाद स्पर्धेची तयारी सुरू होत आहे बाकी काही नाही.
अच्छा, बरं बरं, मग थांब डब्बा देते तो घेऊन जा, बाहेरचं काही खाऊ नकोस.
आई, राहू दे ना, उगाच डब्बा कशाला? कोणी नाही आणत काॅलेजला डब्बा वैगरे मी खाईन कॅन्टीन मध्ये काही.
बरं बाई, मी नाही म्हटलं की ते आधी करायचं हे तू ठरवलेलंच आहे तर मी काय बोलणार आता, ते सोड स्पर्धा कुठली आहे जिल्हास्तरीय की राज्यस्तरीय?
ए् आई तुला काय कळतं गं त्यातलं? तुला काय करायचंय कुठलीही का असेना....
असं म्हणत दरवाजा जोरात माझ्या तोंडावर मारून मुग्धा निघुन गेली.
"मुग्धा"
माझी मुलगी जिला जन्माला घालण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं, आणि आज ती पट्कन माझ्या जिव्हारी लागेल असं बोलून निघून गेली. मनाला लागलं हं तिचं बोलणं.पण त्यात तिची काय चूक होती, मी आणि तिच्या बाबांनीच तर तिला लाडवुन ठेवलं होतं.
मुग्धाला बघितलं की मला माझ्या काॅलेजच्या दिवसांची आठवण येते.
मी ही एक उत्तम वादविवादपटु होते. अनेक वादविवाद स्पर्धा मी ही जिंकल्याच होत्या. मात्र मी मुग्धा सारखी स्वभावाने फटकळ नव्हते. वादविवाद स्पर्धा म्हणजे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता.नुसत्या महाविद्यालयीन नव्हे तर राज्यस्तरीय बाहेरगावी असणाऱ्या स्पर्धांना सुध्दा मी जायचे. अगदी आजच्या वीस वर्षांपूर्वी आम्हां मुलींना कुठे असायची मूभा पण मी रडून- रडून आईला तयार करून घ्यायचे. मी अभ्यासातही हुशार असल्याने परवानगी मिळुन जायची अर्थात काॅलेजातील महिला प्राध्यापिका ही सोबत असायच्या. काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना माझी महाविद्यालयीन जीवनातील शेवटची वादविवाद स्पर्धा होती आणि ती मला काही ही करून सोडायची नव्हती. अर्थातच त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने एक विद्यार्थिनी म्हणून मला स्पर्धा करता येणार नव्हती. पण यावेळी माझ्या घरचे मला पाठवायला तयार नव्हते. कारण स्पष्टच होतं माझं लग्न ठरलं होतं आणि त्यावेळी लग्न ठरलं म्हणजे आम्हां मुलींचीं स्वप्नं बघण्याची, ती जगण्याची, ती पुर्ण करण्याची वेळ ही संपलेली असायची. मी फार रडले, भांडले, मला जे-जे शक्य होतं ते ते सर्व मी केलं पण शेवटी आई-वडीलच ते माझे नाही जाऊ दिलं तर नाहीच जाऊ दिलं. त्यामुळे मी फार निराश झाले होते.पण काय करु शकत नव्हते. काॅलेज संपल्या संपल्या माझ्या लग्नाची तारीख देखील ठरली आणि मग आमच्या घरात सुरू झाल्या त्या लग्नाच्या तयाऱ्या, यंदा कर्तव्य होतं ना!
लग्नाच्या दहा दिवस आधी आई-बाबा लग्नाचं आमंत्रण द्यायला गेल्यानंतर माझा होणारा नवरा आमच्या घरी आला. त्याचं हे असं अचानक येणं मला फार भीती वाटली कारण तेव्हा घरात तो आणि मी एकटेच होतो. तो आला, बसला मी आपलं स्वतःला सावरत त्याच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेले माझ्या मागोमाग तो ही किचनमध्ये आला, खरं म्हणजे त्याला बघताच मला फार भीती वाटली होती. पण त्यावेळी हे आज सारखे मोबाईल नव्हते. कसंबसं स्वतः ला धीर देत तो कधी इथून निघून जाईल याची मी वाट बघत होते. म्हणून चहा सुध्दा विचारला नव्हता मी त्याला.
मृदुला.....
त्याने मला हाक मारली आणि माझ्या काळजात जोर-जोरात ठोके वाजु लागले, मी घामाघुम झाले होते. मी त्याच्या पासून लांबच उभे राहिले होते. बघता-बघता तो एकदम माझ्याजवळ आला मी फार घाबरले होते. त्याने एकदम खेचून मला स्वत:च्या कुशीत ओढून घेतले. मला त्याने हात लावताच मी जोरात ओरडले, मी ओरडले म्हणून त्याने जोरात एक माझ्या थोबाडीत मारली, त्यानंतर त्याने मला फार मारलं मी बेशुद्ध झाले होते, त्यांचा फायदा घेऊन त्याने नको ते सर्वंच माझ्यासोबत केलं. फक्त दहा दिवसच तर राहिले होते, नंतर तर मी त्याचीच होणार होते ना! पण नाही त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला, कारण आज जे काही त्याने माझ्यासोबत केलं त्याला माझी सहमती नव्हतीच. मी रडुन-रडुन पार सुजले होते. आणि तो वर अजून निर्लज्ज सारखा मला सांगत होता, यात रडण्यासारखं काय आहे, तूला पण तर मजा आली असणार ना!
तेवढ्यात घराच्या दाराची घंटी वाजली आता तो जरा घाबरला आणि मला हात धरून बाहेर घेऊन आला, मला गप्प रहायची धमकी दिली. मला चालता सुध्दा येत नव्हते. तरीही तो मला खेचुन बाहेर घेऊन गेला. दार उघडलं तर समोर आई-बाबा उभे होते. मला बघताच माझी दशा बघून दोघंही घाबरले. बघतात तर समोर होणारा जावई बसला आहे. ते दोघे मला इशाऱ्यातच विचारण्याचा प्रयत्न करत होते, मला काही समजतच नव्हते. जे झालंय ते कसं, कोणत्या तोंडाने सांगायचंय. आई- वडिलांना बघुन तो घाबरला आणि काही न म्हणताच निघून गेला. त्याच्या जाताच मला एकदम रडू कोसळलं मी इतक्या जोरात ओरडले आणि बेशुद्ध झाले. आई-बाबांना काही कळलंच नाही. दहा दिवसांत लग्न, सगळ्यांना पत्रिका वाटल्या गेल्या आणि हे काय चाललंय, ते मला हाॅस्पिटलला घेऊन गेले. तिथे डाॅक्टरांनी आई-बाबांना सांगितलं की माझा बलात्कार झाला आहे. ते ऐकून आई-बाबा तर एकदम सुन्न झाले. माझ्या हातावर, पायावर प्रचंड जख्मा झाल्या होत्या. आई-वडिल डाॅक्टरांसमोर हात जोडत होते काही ही करा पण आमच्या मुलीला डिस्चार्ज द्या तिचं लग्न आहे दहा दिवसांत. कसंबसं दोन दिवसांत डिस्चार्ज घेऊन मी घरी आले. आई-बाबा आणि मी आम्ही तिघे सोडलो तर बाकी कुणालाच काही माहिती नव्हतं, सर्वांना हेच सांगण्यात आलं की माझा अपघात झाला होता. लग्नाच्या चार दिवस आधी माझे होणारे सासु- सासरे घरी आले आणि माझं लग्न मोडुन निघून गेले. आजच्या वीस वर्षांपूर्वी मुलीचं लग्न मोडणं ही फार मोठी वाईट बाब होती. कारण लग्न कोणीही मोडलं तरी मुली मध्येच काही दोष असणार हा पुर्वाग्रह ठासलेलाच होता. माझ्या आई-बाबांवर आभाळ कोसळलं होतं. अगदी ऐनवेळी पोरीचं लग्न मोडणं आणि त्या मुलाने आपल्या मुलीसोबत जो दुराचार केला हे सगळं पचवणं फार कठीण होतं.पण काळाचे अजून त्यांच्यावर आघात करायचे बाकीच होते. लग्न मोडले म्हणून समाजात सर्व माझ्या परिवाराला नावं ठेवत होते. मनात त्यांना ही माहित होतंच की यामध्ये आमची काही ही चुक नाही. पण आपल्या कडे मुलांकडची बाजू नेहमी मुलींपेक्षा वरचढ असते की, एका महिन्यानंतर त्या मुलाचं लग्न एकदम थाटामाटात झालं. मी मात्र त्या प्रसंगानंतर इतके हादरले होते की पुर्णपणे डिप्रेशन मध्ये गेले होते. तेव्हा कुठे कुणाला कळायचं डिप्रेशन वैगरे ही भानगड, अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार येऊन गेला. दोन महिने झाले आणि एक दिवस माझी तब्येत फार बिघडली अचानक उलट्या सुरू झाल्या. मला समजलेच ना काय झालं ते, आई डाॅक्टरांकडे घेऊन गेली, डाॅक्टरांनी जे सांगितले ते ऐकून मी आणि आई सुन्न झाले. मी दोन महिने प्रेग्नंट होते. आईला तर कळलेच नाही की बाबांना हे कुठल्या तोंडाने सांगायचं?
मी फार व्यथित होते, आई होण्यासाठीची माझी मानसिक तयारी नव्हतीच . हे सर्व हे असं माझ्यासोबत का झालं! आणि ज्यांने हे सर्व घडवून आणलं तो तर अगदी बिनधास्त फिरतोय. फार फार राग येत होता स्वतः चा असं कसं त्या नालायक माणसाला जाऊ दिलं या चा पण काय करू शकत होते. घरी आल्यावर घाबरत घाबरत का होईना आईने बाबांना शेवटी सांगुन टाकले. बाबांनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि मला जवळ करत म्हणाले, मृदुला..
तू या बाळाला पाडायचं आणि नव्याने तुझ्या आयुष्याला सुरुवात करायची झालं आता यावर मला अजून चर्चा नको. मी हो अशी मान डोलावली मन मनात काही वेगळेच चालू होते. आईने डाॅक्टरांची अपाॅइनमेंट घेतली आणि मी आणि आई गेलो हाॅस्पिटलला. माझं मन लागतच नव्हतं . मला कळतच नव्हतं मी हे जे काही करतेय ते बरोबर आहे का चूक त्या द्विधा मनस्थितीत ऑपरेशन थिएटर मध्ये गेले पण शेवटी नाहीच झालं ते माझ्याकडून रडतच बाहेर निघून गेले, आईला सांगितलं मला हे जमणार नाही. आईने फार समजावण्याचा प्रयत्न केला पण मी काही ही ऐकुन घेतले नाही.आम्ही घरी निघून आलो. घरी आल्यावर मी बाबांना ठामपणे सांगितले की हे मला जमणार नाही, ते ऐकून आई-बाबा दोघेही फार चिडले. बाबा रागावून म्हणाले या घरात रहायचं असेल तर हे करावं लागेल. एवढं बोलून ते निघून गेले. त्यांचा शब्द तो शेवटचा त्यानंतर त्यात काही बदल होत नाही. मी रडतच माझी बॅग घेतली आणि निघून गेले. हे तुम्हाला जरा सिनेमातलं वाटत असेल पण मी हे खरंच केलं आईने ही मला थांबवलं नाही कारण ती आई नंतर बायको आधी होती .
आणि मग सुरू झाला माझा खडतर प्रवास एकट्या बाईला कुणीच साथ देत नाही ते खरंच! घराबाहेर पडल्या नंतर बाहेरचं जग हे किती किती वाईट आहे हे मला कळालं. निदान शिकलेले होते म्हणून एक चांगली नोकरी मिळाली, नोकरी इतक्या सहजासहजी नाही हो मिळाली. सुरुवातीला मी अशीच जायचे नोकरीला पोट पुढे आलं होतं पण कपाळावर कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, आणि एक मुलगी आई होणार अन् मग नोकरी मागणार तर मग तिला नोकरी कोण देणार? म्हणून मग मी खोटं कुंकू, मंगळसूत्र घेतलं घालून, आणि मग जास्त प्रयत्न न करता एक नोकरी मिळाली खरी पण संघर्ष होताच. एकट्याने सर्व करणं ते ही गर्भावस्थेत हे फार त्रासदायक होतं. पण माझ्याकडे पर्याय नव्हता. कसे-बसे दिवस जात होते. ज्या ठिकाणी राहत होते तिथे कुजबुज सुरु झाली, लग्न झालंय मग नवरा कुठे? सोबत का नाही राहत? वैगेरे वैगेरे...
त्यावेळी लाखात एक कुणाचा तरी घटस्फोट व्हायचा म्हणुन ते कारण न देता नवरा शहरात नोकरीला आहे असं खोटं बोलुन तात्पुरती त्यांची तोंड बंद केली. दिवस उलटत गेले माझा नववा महिना सुरू झाला होता आणि आता कधीही माझं बाळ येणार होतं. आजूबाजूंच्या सोबत मी जरा जमवून घेतलं होतं. तेही सर्व मला सांभाळून घेत माझी काळजी घेत. एक दिवस पोटात कळा सुरू झाल्या. माझ्या एका हाकेला ते मला हाॅस्पिटलला घेऊन गेले. बारा तासांच्या त्या पिडादायक त्रासानंतर माझी मुलगी जन्माला आली. तिला बघताच जोशी काकूंनी तिचं "मुगधा" असं नाव ठेवलं. तिला बघताच सर्व मंत्रमुग्ध झाले होते. मुग्धा म्हणजे उदार, आनंदी, सक्षम, आधुनिक आणि लक्षपूर्वक अगदी अशीच आहे माझी मुलगी मुग्धा.
ती माझ्या आयुष्यात आल्याने जरी माझा संघर्ष वाढला असला तरी "तीचं" असणं माझ्या साठी खूप काही होतं. 'ती' माझं सर्वस्व आहे तिच्यासाठी मी तेव्हा ही आणि आजही काही करायला तयार आहे. एकट्याने मुलं वाढवणं फार कठीण पण मी केलं. मुग्धा दोन महिन्यांची झाली, जोशी काकू सारख्या तिच्या वडिलांची चौकशी करायच्या म्हणून मग मी ते गाव सोडून पुण्यात निघून गेले. पुण्यात आल्यावर मी काही पैसे जमवले होते ते सुरूवातीची जमवाजमव करण्यासाठी कामी आले. नोकरीचा अनुभव असल्याने मला कमी पगाराची पण नोकरी मिळाली. दिवस जात होते. एवढ्या दिवसांत माझ्या आई-बाबांनी एकदाही माझी विचारपूस केली नव्हती. अर्थात मी ही तसा काही प्रयत्न केला नाही. का कुणास ठाऊक गरजच वाटली नाही. मी मागचं मागे सोडून पूढे निघून आले होते. मी जरा अतीच मुव ऑन केलं. गावाकडे काय चाललंय याचा मी कधी विचार केला नाही.मी जिथे होते त्याचाच विचार करायचे. मुग्धा तीन वर्षांची झाली तेव्हा मी तिला शाळेत घातले. तेथुन माझी खरी परीक्षा सुरू झाली. ती शाळेतून घरी आल्यावर मला एक ना अनेक प्रश्न विचारू लागली. आई आपण फक्त दोघेच का राहतो? माझी मैत्रीण प्रियंकाच्या घरी तर तिचे आई-वडील, आजी आजोबा सर्व आहे. तिच्या या अशा प्रश्नांची उत्तरे माझ्या कडे नव्हती. म्हणून मग मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण एका आईसोबत लग्न करणार कोण?
माझं नशीब जरा चांगलं होतं, जिथे मी काम करत होते तिथे माझी भेट डाॅक्टर शहा सोबत झाली. आम्ही चांगले मित्र झालो होतो. मी माझ्या सर्व गोष्टी त्यांच्या सोबत शेअर करत होते. बऱ्याच वर्षांनी कोणी जवळचा मिळाला होता. डाॅक्टर शहा यांना माझ्या विषयी जरा जास्तच आपुलकी होती. हे मला कळत होतं. म्हणून मी त्यांच्या पासून लांबच राहण्याचा प्रयत्न केला. कारण पुरूषांवर या बाबतीत विश्वास ठेवायचा नाही हे माझं ठाम मत होतं. पण डॉ. शाह इतर पुरूषांसारखे नव्हते. ते नेहमी मुग्धा ची काळजी घ्यायचे. माझ्या ही जास्त जवळ यायचे नाही. त्याचं व्यक्तिमत्त्व इतकं आकर्षक असतांनाही अजून त्याचं लग्न का झालं नसावं हेच कळत नव्हतं. मी एकदा त्यांना तसं विचारलं ही- डॉ. शाह लग्न का नाही केलं अजून? अगं मृदुला लग्न कसं करणार मी? तू आता कुठे आयुष्यात आली आहे माझ्या.....
त्या एका वाक्यात ते सर्व काही बोलून गेले. आम्ही लग्न केलं. मुग्धा फार खुश होती. आता तिच्याकडे तिचा हक्काचा बाबा होता. तिची स्वतःची एक फॅमिली होती. डॉ.शहाच्या घरी त्यांचे आई वडील होते की, अगदी त्यांनीही डॉ.शहासारखं आम्हांला स्वतः मध्ये सामावून घेतलं होतं. मी डाॅ. शहाच्या आग्रहामुळे नोकरी सोडली घरीच असायचे, सर्वांना काय हवं नको ते बघायचे. आम्ही एकत्र सर्व खुश होतो. पण मला आणि डाॅ. शहांना मुल झालं नाही.कारण मला माहित नाही पण माझ्या सासूबाईंना वाटायचं आम्हांला एक तरी मुल व्हावं. पण तसं काही झालं नाही.
दिवस कसे पट्कन निघून जातात, कुठे ती एक दिवसाची 'मुग्धा' आणि कुठे आज ती मला पट्कन जे मनात येईल ते बोलून गेली. डॉ.शहांना मुग्धाचं हे वागणं पटत नाही. आजही ते फार चिडले होते तिच्यावर, पण त्याचं मुग्धा वर इतकं प्रेम होतं ना की तिला रागावणं त्यांना कधी जमलंच नाही. पण आज त्यांना मुग्धाला समजवण्याची गरज वाटत होती, त्यांना ओरडुन तिला सांगायचं होतं की तिच्या आईने किती कष्ट घेऊन तिला मोठं केलंय, तिची आई एक उत्तम वादविवादपटु होती. ते त्यांना गरजेचं वाटत होतं. त्यांनी ठरवलं ते त्यांच्या पद्धतीने तिच्याशी बोलतील. पण मुग्धा च्या वयाची सर्वंच मुलं हल्ली अशीच आहेत. हा जो जनरेशन गॅप आहे तो नेहमी राहणारच ना!
मुग्धा वादविवाद स्पर्धा जिंकली नेहमीसारखी आणि त्यानंतर तिला प्रेमाने स्वतः समोर बसवुन डॉ. शहांनी फार प्रेमात तिच्याशी बोलायला सुरुवात केली.
मुग्धा मी आणि तुझी आई आम्हाला दोघांना तुझा फार अभिमान वाटतो. मुग्धाला वाटलं आता तिचे बाबा तिला काही तरी बोरींग लेक्चर सारखं ऐकवतील म्हणून मग ती बाबा मला हे माहितयं मला पार्टीला जायला उशीर होतोय आपण बाकीचं नंतर बोलू असं बोलून ती निघून गेली.
डॉ.शहांना तिचा राग आला होता पण ते काही न बोलता तिथून निघून गेले.
आता एक आई म्हणून माझी जबाबदारी होती की आयुष्य म्हणजे काय हे माझ्या मुलीला मी समजावुन सांगणं फार गरजेचं होतं. म्हणून आज हे असं लिहून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला.
हल्लीची तुम्ही मुलं आम्हां आई वडीलांना फार तुच्छ लेखतात. तुम्हाला वाटतं की आम्हाला काही कळत नाही. पण इथे तुम्ही चूकतात, आम्हाला सर्व कळतं फरक फक्त इतकाच की तुमच्या वर प्रेम करतांना आम्ही हे विसरून जातो की आम्हाला एक माणूस म्हणून देखील तुम्हाला घडवायचं आहे.
तुमच्या लहान-लहान चूकांना दुर्लक्ष करण्याऐवजी आधीच तुम्हाला चांगलं बजावलं पाहिजे. आजवर लाडात तुम्हाला फार सूट दिली पण एक नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. लाड करणं वाईट नाही पण शिस्त लावणं फार महत्त्वाचं आहे.
'मुग्धा' तू फार गुणी आहेस पण फक्त तूच गुणी आहेस हा अहंकार करू नकोस बाळा....
बाकी तु समजूतदार आहेस............
