मरण कोणालाही चुकवता येत नाही
मरण कोणालाही चुकवता येत नाही
एके दिवशी एका व्यक्तीचे मरण हे त्याच्या घराच्या दारावर आलेले असते. मरण दारावर आलेले पाहून तो व्यक्ती खूप घाबरून जातो. आता काय करावे त्याला काही सुचत नसते. मरण कोणालाही चुकवता येत नाही हे त्याला माहीतच होते परंतु तो व्यक्ती खूप चालाख होता.
मरण दारावर उभे असते. मरणाच्या हातात नावांची भलीमोठी यादी असते. तो मरणाला घरात बोलावतो. मरण त्याला सांगते की,
मरण :- मानवा तुझ्याजवळ फार कमी वेळ उरलेला आहे. तुझी काही शेवटची इच्छा असेल तर ती पूर्ण करून घे व माझ्यासोबत चल.
मानव :- ठीक आहे. माझी एकच इच्छा आहे व ती फक्त तुम्हीच पूर्ण करू शकतात.
मरण :- अशी कोणती इच्छा आहे तुझी ? सांग मला.
मानव :- माझी इच्छा आहे की, आपण माझ्या घरी माझे आदरातिथ्य स्वीकारावे.
मरण :- तुझी शेवटची इच्छा हिच असेल तर मी ती नक्कीच पूर्ण करेल.
मग नंतर तो व्यक्ती मरणाचे आदरातिथ्य करायला सुरुवात करतो. तो व्यक्ती त्याच्या हाताने बनवलेले
गोड-धोड व्यंजन मरणाला त्याच्या ताटात वाढतो. मरण जेवण झाल्यावर बेशुद्ध होते. कारण त्या व्यक्तीने मरणाच्या जेवणात झोपेचे औषध मिळवलेले असते.
मरण बेशुद्ध होताच तो व्यक्ती मरणाजवळ असलेली नावाची यादी स्वतःच्या ताब्यात घेतो. त्या यादीत त्या व्यक्तीचे नाव सर्वात वर असते. तो व्यक्ती त्याची अक्कलहुशारी वापरून स्वतःचे नाव त्या यादीच्या शेवट लिहितो व ती यादी पुन्हा मरणाच्या जवळ ठेवून देतो.
थोड्यावेळानंतर मरणाला शुद्ध येते. मरणाला वाटते जेवण करून मला झोप लागली होती. त्या व्यक्तीचे आदरातिथ्य बघून मरण त्याच्यावर खुश होते व त्याबदल्यात त्या व्यक्तीला बक्षीस म्हणून मरण आता त्याच्याजवळ असलेली यादी शेवटून सुरू करते.
तात्पर्य :- मरण कोणालाही चुकवता येत नाही.
