STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Classics

3  

Amruta Shukla-Dohole

Classics

मंगळागौर

मंगळागौर

5 mins
199

श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवारी परिचितांपैकी कोणाकडे तरी मंगळागौर असतेच. नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने हे व्रत करावयाचे असते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्षे सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्षे हे व्रत केले जाते. ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात.

मला आजही तो दिवस आठवतो.

माझी पहिली मंगळा गौर..

सर्व तयारी जोरात सुरू होती.

पण मला कथेबद्दल जाणून घायचे असल्याने, मी

थोडीशी विचारमग्न होते..

त्यावेळी आजीने माझ्या मनातील घालमेल जाणून, मला कथा सांगितली, ती अशी


 भूलोकावरचे शिवपार्वती यांचे प्रिय स्थान म्हणजे काशीनगरी. या काशीनगरी मध्ये आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते, त्या मंदिरात एक देवीची मूर्ती असून तिचं नाव मंगळागौरी असे आहे. पार्वती अर्थात गौरी तिच्यासारखीच शिवभक्त असलेल्या मेधावती चे हे मंदिर. ही मेधावती कोण? ती मंगळागौरी कशी झाली? तिला हळद कुंकू लावणाऱ्या स्त्रीला अक्षय सौभाग्याचं वरदान कसं मिळतं? हा सर्व भाग शिवपुराणातल्या एका कथेत आला आहे.” 

“ हरि आणि हर ह्या तर दोन भिन्न देवता आहेत ना?”हा प्रश्न मी तिला विचारला असता त्या प्रश्नाचे समर्पक उत्तर देताना ती म्हणाली, हरि आणि हर हे भिन्न रूपे असली तरी, त्या दोन्हींच्या आतलं ईश्वरीतत्त्व हे एकच आहे. त्या दोघांमधला फरक हा केवळ बाह्यात्कारी, केवळ एका वेलांटी चा फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की अधिक मासातील पुरुषोत्तमाची भक्ती आणि उपासना करणार्‍या मेधावती या कन्येला प्रत्यक्ष पार्वती मातेनेच हे वरदान दिले आहे.” 

मेरू पर्वताच्या दक्षिणेस विंध्य पर्वत आहे. त्या पर्वतातून प्रत्यक्ष शिवशंकराच्या हातून उगम पावलेल्या नर्मदा नदीच्या पवित्र काठावर एक सुंदर नगरी होती. त्या नगरीचे नाव होते भृगु नगरी. त्या नगरीमध्ये कुलशर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव कुशावती. ह्या सत्वशील, धार्मिक, आचारनिष्ठ आणि ईश्वरनिष्ठ विप्र दंपतीला एक सुंदर, रूपवान, सुशील आणि सद्गुणी अशी कन्या होती. तिचे नाव मेधावती. 

मेधावती ही लहानाची मोठी झाली. ती उपवर झाली आणि कन्येचा विवाह हा एका पद्मनाभ नावाच्या विद्वान ब्राह्मण पुत्रासोबत करून दिला. सारा लग्न समारंभ मोठ्या आनंदाने पार पडला. मेधावती आणि पद्मनाभ हे दोघे मोठ्या आनंदाने आपला नवीन संसार करू लागले. मात्र एक दिवस काय झाले, नदीवर स्नानाला गेलेला पद्मनाम हा घरी परतलाच नाही. तर घरी अशी वार्ता येऊन धडकली की, ‘स्नानाला नदीत गेलेल्या पद्मनाभला एका मगरीने पाण्यात ओढून नेले, पद्मनाभ बुडाला व मेला.’ 

या वार्तेने बिचाऱ्या मेधावती वर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. सर्वत्र एकच हाहाकार झाला. मेधावतीच्या दुःखाला सीमाच राहिली नाही. कुलशर्मा व कुशावती या दोघांनाही जावयाच्या ह्या अकालीच निघून जाण्याने अतीव दुःख झाले. पती निधनाच्या दुर्दैवी आघातातून बिचाऱ्या मेधावतीला सावरायला काही काळ लागला. हळूहळू ती आपले मन ईश्वराचे भजन, पुजन, नामस्मरण आणि पोथी पुराणांचे श्रवण यात रमवू लागली. अशाच एक पुराण श्रवणाच्या निमित्ताने मेधावतीला अधिक महिन्यातील नारायणपूजा, पवित्र स्नान, दान, धर्म, ब्राह्मण भोजन आणि हरिचिंतन या गोष्टीचे अपूर्व महत्व समजले. 

पुढे काही दिवसातच अधिकाचा महिना आला. मेधावतीने या मासातले स्नान, ध्यान, दान, चिंतन, उपवास, नवस, मौन भोजन विविध प्रकारची दाने इत्यादी गोष्टी या यथाशक्ती, यथामती पण मोठ्या श्रद्धापूर्वक केल्या. आपल्या अधिकमास उपासनेची सांगता तिने एका विप्र दंपतीला भोजन, दान इत्यादी देऊन केली. तिने त्या दोघांनाही आपले उपास्य दैवत शिवपार्वती आणि अधिक मास उपासनेची देवता लक्ष्मीनारायण मानून त्यांची पूजा, दान, भोजन, अर्चन इत्यादी करून सांगता केली. 


त्यामुळेच कैलासनगरी वरून एक विमान आले. त्यातून आलेले शिवगण यांनी मेधावतीला मोठ्या सन्मानाने कैलासावर नेले. अधिकमास उपासनेच्या पुण्याईमुळे आपण आपल्या उपास्य देवतेच्या जवळ आलो आहोत, ही गोष्ट लक्षात येताच मेधावतीला आनंद झाला. तिने पुढे होऊन भगवान शंकर आणि माता पार्वती यांना विनम्र अभिवंदन केले. पार्वती मातेला ती सश्रद्ध, सुशील, सद्गुणी आणि भाविक विप्रकन्या फार आवडली. पार्वती मातेने जेव्हा तिला निरखून पाहिले, तर त्यांच्या असे लक्षात आले की, या कन्येच्या भाळावर कुंकू नाही. ती विधवा होती. तेव्हा पार्वतीने या मेधावतीला सौभाग्यलेणे द्यावयाचे ठरविले. 

पार्वती मनोमन शंकरांना म्हणाली, “नाथ, मी ह्या कन्येला देवता बनवणार, तिला सौभाग्याचं वरदान देणार. अखेर या मेधावतीचा पार्वतीच्या प्रिय सख्यांमध्ये समावेश झाला. ती पार्वतीमाते बरोबरच सतत राहू लागली आणि शिवपार्वती यांची मनोभावे सेवा करू लागली. एक दिवस भगवान विष्णूनारायण हे शिवपार्वती यांच्या भेटीसाठी कैलासावर आले. तिथे मेधावती त्यांच्या दृष्टीस पडली. “अरे ही इथे कशी?” त्यांनी विचारले. मग पार्वती मातेने मेधावती ची सर्व कहाणी नारायण यांना सांगितली. 

बोलता-बोलता भुमंडळीच्या काशीनगरीचा विषय निघाला. शिवपार्वती, मेधावती आणि भगवान नारायण हे सर्वजणच त्या पवित्रक्षेत्री आले. तिथे येताच सर्वांनी पापाहरिणी श्री गंगामाईचे पवित्रस्नान केले. तेव्हा परत एकदा पार्वतीला मेधावतीच्या कपाळी कुंकू नाही याची जाणीव झाली. तिने शंकराकडे पाहिले. त्यांनी तिला खुणेनेच ‘थांब, सर्व काही योग्य वेळी होईल’ अशी सूचना केली. 

पुढे या पवित्र काशीक्षेत्रात विष्णू भगवंतांनी निळकंठेश्वर या महाशिवलिंगाची स्थापना केली. हा महालिंग स्थापनेचा सोहळा चालू असतानाच मेधावतीही शिवपार्वती यांचे मानस पूजन करीत असतानाच मेधावतीने आपली प्राणज्योत ही आदिमाया पार्वती देवीच्या आत्मस्वरूपात विसर्जित केली. मेधावती ही त्या चैतन्य शिवपार्वती स्वरूपात विलीन झाली. आपल्या या सखीची चिरंतन स्मृती म्हणून पार्वतीने त्याच काशीनगरीत एका मंदिराची उभारणी केली. त्या मंदिरात मेधावतीची एक सुंदर मूर्ती बनवून, त्या मूर्तीची मंगळागौरी या नावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या मूर्तीस्वरूप देवता मंगळागौरीला म्हणजेच आपल्या प्रिय सखी मेधावतीच्या मस्तकी स्वतः पार्वती मातेने हळद-कुंकू लावले. तिची निष्ठा, भक्ती आणि विनम्र भावावर प्रसन्न होऊन पार्वती मातेने तिला असा मंगल आशिर्वाद दिला की, ‘ज्या नारी ह्या काशी नगरीतील मंगळागौरीची पूजा करतील, तिला हळद कुंकू लावतील, त्यांना अक्षय सौभाग्यप्राप्ती होईल.’ 

इतकी कथा सांगितल्यानंतर थोडे थांबत सूत म्हणाले, “लोकहो, आजही त्या पवित्र काशी नगरीत येणारे लाखो भाविक मुद्दाम या मंदिरात येतात, या देवतेचे दर्शन घेतात आणि या देवतेला हळदी-कुंकू लावून आजही अनेक नारी त्या पार्वतीप्रिय देवतेकडे अक्षय सौभाग्य याचे दान मागतात. तसेच आजी म्हणाली की,पवित्र पुण्य कर्माचे फळ हे असे आहे.

हरी आणि हर यांच्या ऐक्याची साक्ष म्हणून या कथेचा इथे विशेष समावेश केलेला आहे. त्याच्या मागचा उद्देशही हा आहे कि, पूजेचे महत्व, श्रेष्ठता आणि त्या अंतर्गत येणाऱ्या कर्माचे महत्व आपल्या लक्ष्यात यावे.”

अतिशय सुंदर कथा मला भावली.. आणि प्रसन्न मनाने मंगळा गौर पूजन मी केले..






Rate this content
Log in

Similar marathi story from Classics