मनातलं पत्र..
मनातलं पत्र..
अब्राहम लिंकनचे शिक्षकास नवे पत्र...
प्रिय गुरुजी,
या पूर्वीचं मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र आजही शाळेच्या कार्यालयात खुंटीला टांगलेंल आहे. नेहमी ऑफलाईन असणारे तुम्ही आता ऑनलाईनही झालां आहांत. शिक्षणाचे संदर्भ बदलले आहेत. विद्यार्थ्यांना लाईन वर आणणं तुमच्या हातात आहे. पालकांच्या अपेक्षांना तुम्हीच न्याय देऊ शकता. आईच्या कुशीत आणि शिक्षकांच्या मुशीतंच मुलं घडतात. तुमचा प्रत्यक्ष सहवास आता आभासी सहवास झाला आहे. संवादही आभासी झाले आहेत. शिक्षण प्रक्रियाच आभासी झाली आहे. अधिक संवाद नसलेल्या घरात आता संवाद नसलेल्या शाळेत मुलं वाढत आहेत. संवाद नसणं पोकळी निर्माण करतं. पोकळी व्यक्तिमत्वाला घातक असते. हाताची घडी तोंडावर बोट तुम्हाला आता म्हणावं लागत नाही.
तुम्ही आता पोकळीत शिकवत आहात. तुम्हाला आता तंत्रस्नेही व्हावा लागेल. तुमचं अध्यापन, तुम्ही आणि तुमचे उच्चार, तुमचे व्यक्तिमत्व हे आता मुलावरंच परिणाम करणार नसून पालकांना देखील ते उपलब्ध होणार आहेत. तुमची जबाबदारी आता जास्त वाढली आहे. उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा हा प्रकार आहे. मुलांच्या दृष्टीने तुम्ही फक्त शिक्षक असाल, माहिती शिकविणारे, माहितीची देवाण-घेवाण करणारे, पण संस्कार करणारे गुरुजी त्यांच्यासमोर असणार नाहीत याचे वाईट वाटते, कारण तुम्ही ऑनलाईन आहात.
मुलांचा नुसता स्क्रीनटाईम वाढला नाही तर सीन टाइम सुद्धा वाढला आहे. माणसापेक्षा तंत्रज्ञानाच्या साह्याने मुले जास्त वाढणार आहेत. अनेक अव्यक्त भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य पत्रात असतं.पत्राने व्यक्तिमत्व फुलतांत.पत्र आठवणीचे पक्षी असतात त्यातले काही मनात घर करतात. पत्र आनंद देतात, बेचैन करतात,अस्वस्थ करतात, विचार देतात, दिशा देतात. काही पत्र आयुष्यभर जोपासायची असतात,पत्राचे विचार मनात बंदिस्त करायचे असतात. किमान अध्ययन क्षमता किंवा किमान अध्यापन कौशल्य या बरोबरच यशस्वी जीवन जगण्यासाठी संस्कार, श्रमसंस्कार हवेत. आज दोन्हीची वानवा आहे.
शैक्षणिक संस्था,कुटुंब, समाज यांनाही आज दीपस्तंभ हवेत.मुलांना घडवत असताना मी यापूर्वी लिहिलेल्या पत्राकडे दुर्लक्ष करू नका. पत्राचे बदलते संदर्भ लक्षात घेऊन किंवा परिस्थिती बदलते हे लक्षात घेऊन या पत्राचा नव्याने विचार तुम्ही करावा. मी नसलो तरी पत्ररूपाने तुमच्यात आहे. आज सगळंच बदललं आहे. जीवनाचे संदर्भ बदलले आहेत. घरात माणसे व चौकाचौकात आदर्शांचे पुतळे धूळ खात पडलेले असताना विषाणूपेक्षाही जलद गतीने माणसे एकमेकांवर जळण्यात व एकमेकांना संपवण्याचा आराखडा तयार करण्यात मग्न असताना माणसांनी देवांना बंदिस्त केलं का देवांनी माणसांना बंदिस्त केलं? हे कळणं आवाक्याबाहेरचं असतानाच, देव ऑनलाइन उपलब्ध आहेत पण भक्ती अजून ऑनलाईन उपलब्ध नाही भक्ती म्हणजे मनातून मनाकडचा प्रवास जीवनाचाही अभ्यासक्रम असतो तो बदलला की नव्याने सामोरे जावं लागतं नव्याअभ्यासक्रमाला जुनी प्रश्नपत्रिका चालत नाही.
अनेक प्रश्न अनुत्तरित असतांना जोड्या लावा व संदर्भासहित स्पष्टीकरण द्या? हे प्रश्न कसे सोडवणार? माणसे आता चेहऱ्यावरून ओळखलेच जात नाहीत अशा युगात आजकाल मधूनच अचानक उस्वस्थ, अस्वस्थ व्हायला होतं सगळं संपलं असं वाटत असतानाच अचानक लक्ष जातं अडीअडचणीत, कपारीत उगवणारे इवलेसे कोंब जे जगायला प्रवृत्त करतात. कुठे रुजावं, कुठे वाढावं याचे अजून तरी ठोकताळे नाहीत. परिस्थिती विपरित असली तरीही रूजता आलं की संदर्भ गौण ठरतात. शैली बदलली की जगणं सुलभ होतं. नव्या परिस्थितीत नवी उकल होते. काही पत्र काळाशी भान ठेवून लिहिलेली असतात, काळ बदलतो, काळ सुखावतो.
परिस्थितीचे संदर्भ बदल ल्यावरही पत्रातील विचारांची उंची कमी होत नाही. समाज थिटा पडतो तेव्हा विचाराची उंचीच कामाला येते. पत्रात मी लिहिलेलं तुम्ही आजच्या संदर्भात पारखून घ्यावं. बदलून घ्यावं. सगळीच माणसे न्यायप्रिय, सत्यनिष्ठ नसतात हे मी म्हणालो होतो. आज याचा प्रत्यय मुलांनाही येत असेल. विद्यार्थ्यांसमोर संस्कार या पेक्षा आता परीक्षेचा पॅटर्न, ऑनलाइन बिंबवले जाईल.शाळेत शासन कमी व प्रशासन जास्त आहे,आता तर तेही नाही. काही शाळा आता परिपत्रकांनाही केराची टोपली दाखवत आहेत,त्यांना ते बंधन वाटतं. मुख्याध्यापकांचा व तुमचा परिसस्पर्श सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. मुलं आता पाठ्यपुस्तका बाहेरचं पाहतील, शिकतील. प्रत्येक बदमाश गणीक एक बदमाश आजही वाढत आहे.
राजकारणाचा पगडा समाजजीवनावर जबरदस्त आहे. शाळेत विषयाचे वेळापत्रक बनवता येतं,पण आशयाचं काय? आताही ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन करता येईल पण आशयाचं काय? संबोध स्पष्ट तेंचे काय? शंकानिरसनांच ? काय?
Destiny of the nation is being shaped in the four walls of the classroom राहिलं नाही.मुलांचं भवितव्य चार भिंती बाहेरंच घडत आहे. विजयाचा आनंद संयमाने नाही, उन्मत्तपणे आजचा विद्यार्थी घेत आहे. तो कोचिंग क्लासला, पॅटर्नला, ऑनलाइन शिक्षणाला जास्त महत्त्व देतो आहे. कोचिंग क्लासच्या जाहिरातीचं साधन बनतोआहे.यशाची त्याला खात्री होती म्हणतो, कारण परीक्षकाची क्षमता, तपासाचा प्रामाणिकपणा त्याला माहित आहे. पालकांची व शिक्षकांची धडपड जास्त आहे कारण त्यांचं भवितव्य त्यावर ठरणार असतं. शिस्त, मूल्य संवर्धन या गोष्टी अभ्यासक्रमाचा भाग नसल्यामुळे शाळेपासून दूर गेल्या आहेत. हर्ष संयमानं व्यक्त करायला मुळातच हर्षाचे प्रसंगच कमी होत चाललेत. आनंददायी शिक्षण कागदावरच आहे. चार भिंतीत मुलांना हर्ष सापडत नाही. वर्गपाठ, गृहपाठ दप्तराचं ओझं, घर ते शाळा अंतर यात भरकटलेली मुलं, पास होण्यापुरता हर्ष त्यांच्या वाट्याला आहे. निर्मितीचा आनंद नाही, रूक्ष अभ्यासक्रमात पोपटपंची आहे. पॅटर्नमुळे पोपटांच्या संख्येत भर पडत आहे.
घाम गाळून कमावलेला छदाम यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना अनेक घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर पटवणे कठीण आहे. सही वर शैक्षणिक संस्था निघत आहेत. संस्कारासाठी प्रसिद्ध असलेल्या शैक्षणिक संस्था टक्केवारी वरून प्रसिद्ध होत आहेत, ओळखल्या जात आहेत. पूर्वी मुलांच्या घरात, चांगल्या व्यक्तींचा राबता होता, तिथे मुलं आयुष्यात पुढे प्रसिद्धीस आली. आता निर्बुद्ध सिरीयल च्या उपस्थितीत मुलं वाढत आहेत. शैक्षणिक संस्था कडे पुरेसे भौतिक व नैतिक दोन्ही नाही,आहे ते फक्त जाहिरातीत.जाहिरातीवर देश चालत नाही. देश आज वैधानिक इशाऱ्यावर चालत आहे. मग संस्कार कसे रुजणार. आजची दुःखं शैक्षणिक दलालांनी वाढवली आहेत. आज शैक्षणिक पोकळी इतकी निर्माण झाली आहे की पत्र, संवाद प्रक्रियानेच भरून येईल. सभोवताली निराशा असली तरी यशोगाथा व तंत्रज्ञानाशी, सृजनाशी नाते जोडंत विद्यार्थ्यांना घडवावे लागेल.
तुमच्याकडे शिक्षक दिनाला खूप महत्त्व आहे म्हणून केवळ शिक्षक न होता गुरु म्हणून काय काय देता येईल ती शिदोरी त्याला द्या. शाळा ह्या अभ्यासक्रम तोंडी व लेखी सांगणाऱ्या संस्था झाल्या आहेत आणि मुलं तावून सुलाखून निघतच नाहीत, सुखावून निघत आहेत. सगळा शैक्षणिक डोलारा कोसळत असताना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. फार थोड्या शाळा आजही चांगल्या शिक्षकांमुळे ओळखल्या जातात. ऑनलाईन गुणवत्तेपेक्षा ऑफलाईन यशस्वी जीवन जगता येणं महत्त्वाचं आहे. शिक्षक दिनी तुम्हाला स्वतःला बदलायच आहे, विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणायचा आहे.
परीक्षेत विश्वास आज राहिलाच नाही. अध्ययन-अध्यापन यापेक्षाही प्रश्न परीक्षा व मूल्यमापन यासंदर्भात निर्माण होत आहेत. मूल्यमापनाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी वाढत आहे. शिकविणारे व शिकणारे यामध्ये समायोजन नाही, नुसतेच आयोजन आहे. कागदावरच्या अध्यापनाची परीक्षा कागदावरच होत आहे. शिकवणे ऑनलाइन परीक्षा ऑनलाईन असलेली व्यवस्था चालू ठेवणे एवढेच
समाजाच्या हातात आहे,?अवस्था बदलणार कशी? परीक्षा न देताच कौशल्यावर विजय मिळवावा असं प्रत्येकालाच वाटतं.आरटीओ मध्ये ते शक्य आहे. कौशल्यच अपघात रोखू शकतो, कौशल्याचा प्रमाणपत्र नाही शिक्षणाची व परीक्षेची विश्वासार्हता कमी होत असताना शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याला पर्याय चालणार नाही.शिक्षणाचे बदलते संदर्भ.
शिक्षणाचा आशय, प्रक्रिया काळानुसार बदलते तेव्हा आपण शिक्षणाचे संदर्भ बदलले आहेत असे म्हणतो,व त्यानुसार आपल्याला स्वतःला तडजोड करून घ्यावी लागते. संदर्भ बदलण्या आधी आपण बदलायला हवं नाहीतर आपण प्रवाहा पासून दूर फेकले जाऊ. काळ बदलला की संदर्भ बदलतात मानवी हस्तक्षेपामुळे किंवा निसर्गाच्या आपत्तीमुळे किंवा भौगोलिक रचनेतील बदलामुळे नवीन घटनांची नोंद घ्यावी लागते. इतिहासातल्या गोष्टीपासून सुधारणा करावी लागते, झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून नव्याने आखणी करावी लागते या सर्व प्रक्रियेत जुन्या गोष्टींना चिकटून चालणार नाही. नवीन आराखडा, नवीन संकल्पना अंमलात आणाव्यात लागतात. माणसे बदलली की सत्ता बदलते, सत्ताबदलली की विचारसरणी बदलते आणि ती विचारसरणी कळत-नकळत शिक्षण प्रक्रियेत उतरते.
माणसांनी विज्ञानाची कास धरत तांत्रिक क्षेत्रात आमूलाग्र बदल केले, त्याचा वापर शिक्षणात सुरू झाला आणि शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने शिक्षण गतिशील बनले.एखादी रोगराई झाल्यानंतर शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. एक विषाणू मानवजातीला उध्वस्त करायला निघतो तेव्हा त्यांची जीवनपद्धती तर बदलतेच. शिक्षण घेण्याच्या देण्याच्या प्रक्रिया ही बदलते. तडजोड नाही केले की अस्तित्व दुभंगतं. नव्या परिस्थितीत जगायचं असेल तर जीवनशैली बदलावी लागते. शिकायचं असेल तर शिकणारा बदलावा लागतो. मूल्य चिरंतन असतात, मूल्ये बदलत नाहीत पण ती देण्याची व घेण्याची प्रक्रिया राबवताना नवीन परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. संकल्पना स्पष्ट करताना नवीन दाखले द्यावे लागतात. जीवनपद्धती बदलू शकतें, शिक्षण पद्धती कां नाही.
पूर्वी शिकलेल्या अनुभवाच्या शिदोरीवरच नवीन संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून घ्याव्या लागतील.शाळेत शिकून व विसरल्यानंतर जो शैक्षणिक अनुभव त्यांना मिळाला असेल त्याच्यावरच त्यांची शैक्षणिक अनुभती ठरणार आहे. जीवन शैली बदलू शकते तर शिक्षण शैली का नाही?
शिक्षणाचे संदर्भ इतके बदलले आहेत की विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव पुस्तकांच्या बाहेरचेही शिकावे लागणार. करोना पूर्व शिक्षण व करोना उत्तर शिक्षण याचा वेगळा विचार करावा लागेल. कोरोना च्या काळात, कळत नकळत मुलांनी अनौपचारिक शिक्षणाद्वारे अनेक चांगल्या गोष्टी, तंत्र कौशल्य, कला, छंद जोपासले. हा अभ्यासक्रमांचा भागंच समजला गेला पाहिजे. अनौपचारिकपणे जे कौशल्य, मूल्य मुले शिकतात त्याची नोंद व्हायलाच पाहिजे.
सजग पालक home schooling मध्ये अभ्यास,छंद पुर्ण करून घेतातच.पालकांच उद्बोधन करून याची व्याप्ती वाढवावी. शिक्षा होऊ नये म्हणून मुलांचा गृहपाठ करणारे हळवे पालक आहेतच की. आता ऑनलाईनमध्ये पालक जास्त सज्ज,सजग झाले आहेत.हे चित्र सार्वत्रिक झालं तर? ऑनलाइन शिक्षणात खरंच मुले शिकली, तंत्रज्ञानाच्या जवळ गेली कां? काहींना त्यांच्या पालकांनी जबरदस्ती केली. काही शाळांनी त्यांचा वेळ रिकामा जाऊ दिला नाही. केवळ पाठ घेणारी, अभ्यासक्रम शिकविणारी औपचारीक पद्धत इथून पुढे आपल्याला सोडून द्यावी लागेल कां? काही काळासाठी तरी.
शैली आणि सवयी, पध्दती बदलाव्या लागतील.
शिक्षण औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने राबवावे लागेल. की काय अशी परिस्थिती आपल्यासमोर आहे.अशी ही निरीक्षणे पाहायला हवीत जिथे काहीच एक घडले नाही,घडत नाही.2005च्या शैक्षणिक आराखड्यानुसार शिक्षण ही वाटण्याचीभौतिक गोष्ट राहिली नाही. मुले अनुभवातून, कृतीतून, व्यक्त होण्यातून चर्चा करण्यातून प्रश्न विचारण्यातून, ऐकण्यातून,निरीक्षण करण्यानं शिकत असतात असे म्हणले आहे,आणि आताही शिकायला हवेत. काहीशा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे, कामाचा अनुभव घेता येणे, कौशल्य निवड,कलाप्रकार याचे रसग्रहण करता येणे, सर्जनशीलता वाढवणे ही शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे आहेत. ही ध्येय साध्य होतील अशी साधने व संधी शिक्षण व्यवस्थेने,समाजव्यवस्थेने उपलब्ध करून दिली पाहिजेत. शिक्षकांनी, पालकांनी प्रेरणा द्यायची गरज आहे.
आजपर्यंत हे अपेक्षेप्रमाणे झालं नाही, पण आता करायचेआहे.अशाही विद्यार्थ्यांचा विचार करावा लागेल जे शाळेत जातच नाहीत,अभ्यास करत नाहीत त्यांना कोणी काही म्हणत नाही. जिथे पालक शिक्षणाबद्दल अनभिज्ञ आहेत, जिथे आर्थिक विवंचना आहे जिथे विद्यार्थ्यांची गरज पालकांना हवी आहे. जिथे आई वडील घरी नसतील कामानिमित्त बाहेर असतील, तिथे मुले मोबाईल सहवासात राहणार. शिकवणे कंटाळवाणे असेल तर मुले ऑफ स्क्रीनहोणार.सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, सॅनिटायजर वापरासाठी नवीन नवीन योजना आखाव्या लागतील. शाळे शिवायअनौपचारिक शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थ्यांनी शिकावं असं वाटत असेल तर अभ्यासक्रम बदलावा लागेल. अचानक अभ्यासक्रम बदलता येणार नाही, पण काही मार्गदर्शक सूचना वितरित करता येतील.अभ्यासक्रमातून अनौपचारिक शैक्षणिक अनुभव त्यांना कसा मिळेल याची तरतूद करायला हवी.शिकण्याच्या संधी मुलांना आपण किती आणि कशा उपलब्ध करून देतो यावरही ते अवलंबून आहे. राहू दे तुला जमणार नाही असाच पालकांचा कल असतो. किती मुले भाजी आणतात ,व्यवहार करतात, घरात उपकरणांची दुरुस्ती करतात ,घरात स्वयंपाकात मदत करतात, नवीन म्हणून एखादा पदार्थ करणं वेगळं आणि आईला मदत करणं वेगळं. भांडे घासायला मदत करतात कां? श्रम प्रतिष्ठा कशी व किती रूजतें. मुले घर झाडतात कां,अंगण झाडतात का ? सुट्टीत मुलं काही गोष्टी करतात.ते नेहमीच करतील तरच मूल्यं रुजतील.
आपल्याला वेगळ्या मूल्यमापनाचा विचार करता येईल का? ज्याच्यामुळे विद्यार्थी काही कौशल्य शिकु शकतील, याची नोंद घेता येईल .काही ज्ञान त्यांचे वृद्धिंगत झाले काय याची चाचणी घेता येईल. हे सगळं नवीन करण्याची संधी आहे. एकीकडे स्क्रीन टाईम वर वेबिनार घ्यायचे व त्यांच्या हातात जास्त वेळ स्क्रीन द्यायचा.
निर्जीव समूह संपर्क साधनातून विद्यार्थ्यांना शिकावे लागणार. ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया एकतर्फी चालेल.ऑफलाईन मध्ये संवादाला जास्त वाव आहे. द्रोणाचार्य ऑनलाईन उपलब्ध होतील व मुलांना ऑफलाइन एकलव्य व्हावं लागेल. मूल्य बदलले की व्यवस्था बदलावी लागते. समान मूल्य अभ्यासक्रमातअसताना मूल्ये समान झिरपली नाहीत,याची जबाबदारी कोणाची? मूल्य झिरपले पाहिजेत,केवळअभ्यासक्रम नाही. अभ्यासक्रम माहीत आहे पण मूल्ये माहीत नाही अशी आज अवस्था आहे.अभ्यासक्रम केव्हा ही पूर्ण करता येतो. पूर्ण झाला असं लिहिता येतं. मूल्यात्मक बदल होतोंच असं नाही. ते होण्याची संधी आली आहे. शैक्षणिक संदर्भ बदलतील याची कल्पना कोणीही केली न्हवती. शिक्षणाचे आता दोन प्रवाह झाले आहेत एक ऑनलाईन व दुसरे ऑफलाईन. शिक्षण परिस्थितीजन्य झाले आहे. शिक्षणतज्ञा पासून ते पालक, विद्यार्थ्यां पर्यंत सर्वांनाच परिस्थितीस सामोरे कसे जायचे हा प्रश्न पडला आहे.पुस्तक जेव्हा निरुपयोगी ठरतं आयुष्यातले प्रश्न सोडायला तेव्हा मस्तकच कामाला येतं. परिस्तिथी संधी बनून आली आहे.
आपत्तीमध्ये शिक्षण वरदान ठरू शकतं. प्रत्येक जण आपल्या गतीने, सजग होऊन, स्वअनुभवाने, स्वयंअध्ययनाने शिकणार आहे. ऑनलाईन चे प्रश्न वेगळे व ऑफलाइन चे प्रश्नवेगळे. प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या संदर्भात सोडवावे लागतील. आता सरसकट एकच फुटपट्टी शिक्षण क्षेत्राला लागू करता येणार नाही. मूल्यमापनाच्या मापदंड बदलावे लागतील. शिकवण्यापेक्षा शिकणे याला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासक्रमाचे वर्गीकरण करावे लागेल. काही घटक स्वयंअध्ययनासाठी गृहपाठ सारखे विद्यार्थ्यांना द्यावे लागतील.
आता समंत्रणcouncellinपद्धत अंमलात आणता येईल. केवळ सगळं शिकवायचे नाही, वाचून शंका निरसन करायचे.तास कमी करून त्या तासांमध्ये आधी मुलांना वाचायला सांगून, नंतर एक दिवस चर्चेचा ठेवता येईल. हुशार ,मध्यम व अभ्यासात कच्ची असणारे विद्यार्थी यांची उत्तरे ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेता येतील.,आणि त्याच्यावर चर्चा करता येईल. शिकवायचं नाही.पाठावर चर्चा करायची. मुलांच्या शंकेचे निरसन करायचे. विद्यार्थ्यांनी वाचून तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा.
अनेक घरात कादंबऱ्या ,पुस्तके काय, खायला भाकरी नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीचाही विचार करावा लागेल. काही अजून सर्वेक्षण करून पाठबळ मिळाले पाहिजे. होम लर्निंग साठी चांगली संधी आहे.जिथे शक्य आहे तिथे सुशिक्षित पालकांच उदबोधन अभ्यासक्रमाबाबत ऑनलाईन करता येईल. मग तो मुलाकडून करून घ्यायला सांगा. काही ठिकाणी हे घडतं ते सार्वत्रिक व्हायला हवं. प्रत्येकाचं जगणं हाच अभ्यासक्रम व प्रत्येकाचे अनुभव हेच त्याला उत्तर. अशा रीतीने जीवनानुभावावर आधारित मुलांना व्यक्त होऊ द्या. मुलांच्या कृतीतूनही त्यांचे मूल्यमापन करावे लागेल,केवळ अभ्यासातून नाही.
मुले काहीच शिकणार नाही त्याचा बाऊ नको.अभ्यासक्रम शिकणार नाही,पण जीवनानुभव शिकतील तो महत्त्वाचा आहे. कौशल्य शिकतील ती महत्त्वाची आहेत. करोना सुट्टीत मुलांनी केले ते नाविन्याची कास धरणारं आहे पण त्यात सातत्य हवं. कोणती मूल्यं मुलांमध्ये रुजली हे पाहायला हवं, व्यवहारात ते दिसायला हवं. तात्पुरती प्रसंगानुरूप एखादी गोष्ट करणं वेगळं व अंगवळणी पडणं,रुजणं वेगळंं. जे जे रूचतं ते रुजतं.
शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना प्रयोग करायला वाव आहे. सृजनात्मक काहीतरी करण्यासाठी वावआहे.प्रत्येकाला आपापल्या पातळीवर जे करायचे आहे ते करू द्या. मी लिहलेल्या पत्रातल्या प्रमाणे विद्यार्थी घडायला हवेत, केवळ परीक्षेत यशस्वी असणारी मुले नको, जीवनात यशस्वी होणारी हवीत,केवळ पुस्तकी नको.प्रतिज्ञेच्या प्रत्येक वाक्यापुढील प्रश्नचिन्ह काढायचे असेल तर शिक्षणाचा वेगळ्या संदर्भात विचार करावा लागेल. काहीतरी व सृजनात्मक नक्कीच घडेल, फार काही भयंकर घडणार नाही, पण सुंदर घडेल. थोडं पाठबळ हवं. ओंनलाईन असो ऑफलाईन असो शेवटी लाईफलाईन महत्त्वाची. आज लिंक शिवाय काही होत नाही.
तुमचाच लिंकन.
