Rekha Sonare

Classics

3  

Rekha Sonare

Classics

मनाचा कोपरा

मनाचा कोपरा

4 mins
265


ताई गोळी घ्यायचीय तुम्हाला आणि किती वेळ अशा बसून राहता तुम्ही? इतकं बसून राहणे योग्य नाही असे म्हणत नर्स आली नी माझी तंद्री भंग झाली किती सुंदर दृश्य टिपत होते या दोन डोळ्यात..! तसही यांना काय कळणार म्हणा..? दिवसरात्र त्या औषधाच्या वासात रहावं लागतं..त्यांना कुठे इतका वेळ मिळतो हे मनमोहक , सुंदर दृश्य टिपायला….सतत या निरस वातावरणात राहून राहून त्यांना सुद्धा त्या वातावरणाची सवयच होऊन जाते.. वाटतही असेलच पण कोण देणार त्यांना इतका वेळ ? मला दोन दिवस झाले होते या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती होऊन..माझ्या पायाचे ऑपरेशन झाले असल्यामुळे  पाय लांब करूनच परंतु धक्का न लागता बसता वगैरे येत होते. अजून मला चारपाच दिवस हॉस्पिटललाच रहावे लागणार होते.स्वतंत्र खोली घेतली होती आणि बेडच्याच जवळ छान मोठी खिडकी होती. आता बरे वाटत होते व मी उठून सुद्धा बसू शकत होती पण आधाराने…

सहजच म्हणून खिडकीवरील पडदा बाजूला केला तर त्या खिडकीतून इतकं सुंदर दृश्य पाहून मी तर मनातून हरखुनच गेली.सकाळचे पाच वाजलेले होते . उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उजेड दिसत होता पण अजूनपर्यंत सुर्यदेवानी दर्शन दिले नव्हते , पक्षी नुकतेच घरट्यातून निघून इकडे तिकडे फिरून विहंगत होते. सारखी किलबिल सुरू होती.जणू तेही कोमल किरणाची वाट बघत होते आणि बाजूलाच पलीकडे तलाव होता.. तलावाच्याच बाजूने एक मोठं वडाचे झाड आणि आजूबाजूला पण बरीच झाडं होती. त्यामुळे सर्व पक्षी त्यावर बसलेले होते. आता हळूहळू अरुणोदय व्हायला लागला होता.तो प्रखर लालबुंद गोळा आपल्याच मर्जीने वरवर येऊन आपला अंगरखा बदलून सोनेरी रूप धारण करून हळूच डोकावत होता त्याच्या त्या लपंडावाने तलावातील शांत असणारे पाणी कधी लाल छटा तर कधी सोनेरी छटा लेवून मिरवीत होते आता त्यावर कोवळे ऊन पडायला सुरुवात झाली होती. हळूच एखादा तरंग त्या पाण्यात उठत होता. काहीवेळाने बदकांचे पूर्ण कुटुंब हलत डुलत एका बाजूने पोहून जात होते आणि आता कुणाचीच भीती नाही या अविर्भावात त्या बदकांची पिल्ले स्वच्छंद पणे विहार करीत होते.

बाजूच्या झाडावरील बगळे आपल्या त्या कोषातून बाहेर निघून पाण्यावर इकडून तिकडे फिरत आणि मधेच एखादा मासा दिसला की लगेच टिपत होते.. आणि हे त्या खिडकीतून अगदी स्पष्टपणे दिसत होते.सर्व विसरून त्या विश्वात रममान व्हावं.. किती निसर्गाची ही किमया.. एरवी कधी आपलं या सर्व गोष्टीवर लक्षही जात नाही पण आज या शांततेत ही खिडकी मला खूप काही सांगत होती.

नर्स ने गोळी दिली आणि आराम करायला सांगीतला पण कुठे झोप येत होती माझं पूर्ण लक्ष त्या तालावाकडेच होते..पण गोळीमुळे सुस्ती येत होती त्यामुळे झोपावं लागलं..जाग आली तेव्हा बघते तर बाहेर चांगलेच ऊन होते त्यामुळे तलाव सूर्याच्या प्रखर तेजामुळे, प्रभाकरने ओकलेली आग सहन करीत तटस्थपणे आपले शांत रूप घेऊन जागीच खिळला होता..त्यालाही वाटत असेल ना कुठेतरी बांध फुटून वाटेल त्या रस्त्यांनी धावावं आणि नाचत बागळत कुणाच्या तरी कुशीत शिरावं पण बिचारा एकाच ठिकाणी खिळून होता कसलीही तक्रार न करता..त्यालाही त्या बंदिस्त घरातून निघून आपले साम्राज्य स्था पण करावे असे वाटत नसेल का ? दुपारची वेळ असल्यामुळे रहदारीही जरा कमीच होती.एखाद दोन  कोळी जाळे टाकून मासे पकडीत होते.आता मला हे न्याहाळण्याची सवय झाली होती.जणू ही खिडकी त्या चार दिवसात माझे विश्वच बनून गेली होती. त्या भकास वातावरणात मला छान सोबत मिळाली होती. दुपारच्या वेळी तर सर्व बगळे एकाच झाडावर बसल्यामुळे असं वाटत होती झाडाला पांढरी शुभ्र फळे लागली की काय ? मग सहजच लहानपण आठवले, " बगळ्या बगळ्या दूध दे पाचही बोटं रंगू दे….." किती रममाण झाले होते मी…!! मला तशाही कल्पना करायला आवडतातच आणि त्यामध्ये भरीस भर हे इथले दृश्य….! संध्याकाळ झाली तशी तशी तालावाजवळ गर्दी व्हायला लागली… पाखरं घराच्या दिशेनी झेप घ्यायला लागली आणि इथे तर चक्क त्यांचेच घर होते.. थव्या थव्याने उडत उडत किलबिल करीत करीत थोडे मागे पुढे पण शिस्तीत येऊन त्या झाडावर असलेल्या घरट्यात प्रवेश करीत होते..काहीतरी झाडावरच बसलेली दिसली आणि क्षणात विचार मनात डोकावला याला झोप लागली तर पडणार नाही ना ..! एक क्षणभर मी पण बालपणात पोहोचले होते. संध्याकाळी मग तिथे माणसांची गर्दी व्हायला लागली.. थोडा अंधार पडत असल्यामुळे जरा काही गोष्टी अस्पष्ट दिसत होत्या. एखादं प्रेमीयुगुल त्या तलावाकाठी असलेल्या बेंचवर हातात हात घालून प्रेमालाप करीत होते तर काही लोक भेळपुरी खाण्यात मग्न होती. तलावाचे पाणी शांत, धिरगंभीर पणे आपल्याच जागी शिक्षा दिल्याप्रमाणे जागेवरच खिळून होते. एखाद्या छोटया मुलांनी खडा किंवा छोटासा दगड पाण्यात भिरकावला की त्याचे ध्यान भग्न व्हायचे आणि राग आल्याप्रमाणे एक जोरात डुबकन आवाज देऊन आपला हात उगारल्याप्रमाणे तरंग उठवीत होता..त्यालाही राग येणारच ना..! त्याला केव्हा शांतता मिळते? 

खरंच हे असले दृश्य कधी या धका धका धकीच्या जीवनात निवांतपणे साठवताच येत नाही..इतके दिवस हॉस्पिटल मध्ये होते पण मला त्या खिडकीतून बघण्याचा रोजचाच छंद लागला होता.. ते पाणी, पक्षी पाहिलं नाही की चैनच पडत नव्हते. खरं म्हणजे त्या हॉस्पिटल तो विशिष्ट दर्प, औषधं, इंजेक्शन घेऊन घेऊन असे वाटते की केव्हा घरी जाणार पण मी इथे इतकी रमली की ती खिडकी मला सतत खुणावत होती.तिलाही माझी सवयच लागली होती की काय? मी खूप काही हे निसर्गाचं देणं डोळ्यात आणि मनाच्या कप्प्यात साठवून ठेवले होते.सात दिवस झाले होते घरी जाण्याची वेळ आली होती पण उद्यापासून परत मी ही सुंदरता पाहू शकणार नाही याचे दुःख वाटत होते.. ते सात दिवस का होईना ती खिडकी माझे विश्वच बनले होते.. परततांना एकवार पलटून मी त्या खिडकीकडे पाहिले आणि तीही हसून मला निरोप देत होती आणि संदेश पण …..उद्या कुणी इथे आले तर असंच मला आपलं समजेल का?? जड पावलांनी आणि घरी जाण्याच्या हर्षानी मी ती खोली सोडली पण खिडकी मात्र आठवणीत राहिली..



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics