Rekha Sonare

Inspirational Children

3  

Rekha Sonare

Inspirational Children

अनुभव

अनुभव

5 mins
214


सायंकाळचे ५.३० वाजलेले.. मी ऑफिस मधून निघालेली..कॅम्पस क्रॉस केले आणि मुख्य रस्त्याला लागले. माझ्या गाडीसमोर एक 30 - ३२ वर्षांची महिला आपल्या दिड वर्षाच्या मुलीला स्कुटीवर समोर उभे ठेऊन जात होती.(. ती चिमुकली मागे बसू शकत नव्हती)मध्ये मध्ये मुलगी झोपत होती त्यामुळे ती क्षणभर थांबायची आणि मुलीला सरळ करून परत हळूहळू निघत होती पण नंतर तिला ते सर्व अशक्य होत होते.तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती स्पष्ट दिसत होती. तिला गाडी चालवणे कठीण जात होते. मी तिला बघून तिच्यामागे हळू हळू जायला लागले कारण मला ते बघवत नव्हते.नंतर तिचा तो त्रागा बघून मी माझी गाडी तिच्यासमोर घेतली आणि तिला थांबायला सांगितले क्षणभर ती पण गोंधळली.मी म्हणाले, "अगं मुलगी झोपत आहे आणि सारखी ती तुझ्या हातावर पडत आहे." ती काकुळतीस येऊन गेली होती त्यामुळे तिच्या डोळ्यात पटकन अश्रू जमा व्हायला लागले आणि म्हणाली, 'हो ना ताई,तिला झोप न यायसाठी किती प्रयत्न करीत आहे पण तिला झोपच आवरत नाहीये.' मनातच म्हणाले किती ग वेडी तू..!!आई ना तू !!!....आईजवळ आपलं बाळ किती सुरक्षित रहातं ..तिला तुझं कवच मिळालंय मग त्या इवल्याश्या जीवाला कशी झोप येणार नाहीये..!!!!

मी म्हणाले, 'अगं नको इतका त्रागा करुन घेवूस ...मी पण यामधून गेलेली आहे.'मी पाहिले तिने स्कार्फ डोक्याला बांधलेला होता त्याव्यतिरिक्त मला तिच्याकडे सूटवर घेतलेली ओढणी दिसली मग मी तिला ती मागितली आणि दोघींनाही एकमेकींना छान बांधून दिले त्या दोघीनाही सुरक्षित वाटायला लागले. तो इवलासा जीव आईला अजूनच बिलगला...आणि माझ्याकडे पाहून खुदकन हसला मी पण तिला हसून बाय बाय केला.. ती बरीच समोर जाईपर्यंत मी बघत होते आणि एकदम मला माझा भूतकाळ आठवला..चल चित्रपटाप्रमाणे एक एक चित्र डोळ्यासमोर यायला लागले.

 

माझी शासकीय नोकरी… त्यावेळी फक्त 3 महिने प्रसूती रजा मिळत होती आता बरे की ती रजा ६ महिने झालीय आणि दुधात साखर म्हणजे ६ महिने बालसंगोपन रजा पण मिळायला लागली. प्रसूती नंतर ३ महिने निघून गेलेत.काही दिवस अजून रजा घेतल्यात आणि आपल्या कर्तव्यावर रुजू झालीये.६ महिने पर्यंत आई असल्यामुळे काही चिंता नव्हती.भाऊ परदेशात असल्यामुळे तिला पण वहिनीच्या पहिल्या बाळंतपणाकरीता जावे लागले. सासूबाईंना यायला जमत नव्हते..मग माझी खऱ्या अर्थानी परीक्षा सुरू झाली.अजून काही दिवस रजा घेऊन ७ महिने काढले मग बाळाला पाळणाघरात ठेवायचे ठरविले..घरी बाई ठेवायची तर तो पण अनुभव मी शेजारी बघितला होता , विश्वासू बाई मिळणे कठीण आणि माझी आर्थिक बाजू पण ठीक नव्हती त्यामुळे मला माझ्या बाळाकरिता इतका कठोर निर्णय इच्छा नसतांनाही घ्यावा लागला.माझा प्रवास तेथून सुरुवात झाला होता.. रोज सकाळी माझी दैनंदिनी नंतर त्या पिटुकल्या जीवाला कसेतरी खाऊ घालून मी स्वतः कसेतरी घास तोंडात कोंबून त्याला कांगारु बॅग मध्ये लपेटून ती बॅग स्वतःला बांधून सर्व सामानासाहित आम्ही दोघे मायलेक निघायचो. थोडावेळ का होईना वाटायचं झाशीची राणी निघालीया..पिल्लू आईला बिलगून जायचंय,रस्त्यांनी जाताना भीती वाटांयची...समोर वाहन दिसले की मला एकदम टेन्शन यायचे आणि मग अजूनच भीती वाटायचीय.मनात काही भलते सलते विचारांची गर्दी व्हायची,.. त्या विचारांच्या गर्दीतून बाहेर पडत नाही तोच कर्णकर्कश हॉर्न कानावर पडायचा...


कर्णकर्कश हॉर्न नी इवलासा जीव अक्षरशः भीतीने डोकं टेकवून आपल्या चिमुकल्या हातानी मला पकडून सांगत होता की ,आई मी सुरक्षित आहे गं ..!!तू काळजी नको करुस ...आणि मी मनातच त्यालाही भीती वाटत असणारच पण आईच्या सावलीत असल्यामुळे त्याची भीती गायब व्हायची.. सोडताना वाटायचं जणू आपलं सर्वस्व घेऊन जात आहो...पाळणाघरात ठेऊन ,कसेतरी स्वतःला आवरत ऑफिस गाठायचे आणि तोच क्षण विलक्षण कठीण.. डोळ्यात पाणी साठवून त्याला टा टा करायचा आणि ते पिल्लू केविलवाण्या नजरेनी आपल्या स्वार्थी आईकडे बघायचंय.. हो..!! त्यावेळी कदाचित स्वार्थीच म्हणता येईल मला पण परत वाटायचं हे तुम्हासाठीच करतेय ना,..!मग कशी असेंन रे मी स्वार्थी..? घरी सर्व सुखसोयी असून बाळाला घरी ठेऊ शकत नव्हते.तिथे आपलं बाळ किती सुरक्षित आहे?रडत तर नसेल ना ? त्याला वेळे वर खायला देत असतील का?असे कितीतरी विचार मनात घोळत राहायचे आणि मोबाईल नसल्यामुळे काही कळायला मार्ग पण नव्हता.मग काय तर ऑफिस सुटायची वाट...सायंकाळी५.३०केव्हा होतात आणि केव्हा एकदा पिल्लूला बघते असं व्हायचं..तो चिमुकला जीव सुद्धा केविलवाणा होऊन आपली आई येण्याची वाट बघायचा आणि दिसले की आनंदानी मोहरून निघायचा.. खरच नोकरीमुळे आपण किती वेळ देऊ शकतोय? बाकीच्या आई बाळामागे फिरून फिरुन खाऊ घालतांना पाहिलं की ,डोळ्यात अश्रू जमा व्हायचे आणि वाटायचे आपलं बाळ यापासून वंचितच राहिलय..खूप काही गोष्टीसाठी पुरेपूर वेळ देऊ शकले नाही हे शल्य अजूनही आहे .खूप काही गोष्टी करायच्याच राहून गेल्याय ..तुझ्या बाललीलाही बघायला वेळ मिळत नव्हता खरच तेव्हा वाटतं होते किती मी दुष्ट आई आहे.बाकी आवरता आवरता,सर्वांच्या मर्जी सांभाळता सांभाळता वेळ निघून जायचा..


कुणी नातेवाईक म्हणायचे कशाला नोकरी करायची? मुलांची आबाळ होते.यांनाच नोकरी करायला आवडतं पण कुणाकुणाला नोकरी करणे जरुरीचं असतं हे त्यांना कसे समजावून सांगणार? आपली व्यथा कोण ऐकणार?घर सोडून पाळणाघर ही कल्पनाही सहन होत नाही. खरंच कुण्या स्त्री ला वाटेल हो घर सोडून पाळणाघरात ठेवावे.. मन घट्ट करून हा निर्णय घ्यावा लागला होता.. कुणाला बोलायला काय जातंय..बोलणे बाजूला ठेवून त्यांनी नोकरी करणाऱ्या स्त्री चा विचार करायला हवा.त्यांच्या विरुध्द बोलण्याआधी विचार करायला हवाय की ,यांना खरंच नोकरीची गरज आहे की नाही? उगीचच "उचलली जीभ लावली टाळ्याला करू नये.." माझ्यासारख्या अशा कितीतरी नोकरदार स्रीया आहेत त्यांना या अशा विपरीत परिस्थितीतून जावे लागते.. तारेवरची कसरत असते हो….!!!कुणीतरी तिला समजून घ्यायला हवं,तिच्या भावना जाणून घ्यायला हव्याय..ऑफिस मध्ये जरी असलो तरी लक्ष सर्व घराकडे ,बाळाकडेच असतं.ऑफिस सांभाळता सांभाळता घर,मुलं ,कुटुंब,परिपाहुणे तर ऑफिस मध्ये बॉस,सहकारी यांची मर्जी सांभाळायची..अक्षरशः डोक्याचा भुगा होतोय हो..!!


असे कितीतरी प्रसंग आयुष्यात येतात की जे कितीही पुसायचा प्रयत्न केला तरी ते कधीच मन:पटलावरून पुसल्या जात नाहीत .त्या आठवणी म्हणा की कटू प्रसंग आठवतच राहतात.


म्हणूनच सांगावेसे वाटते, सासूबाईंनी आणि आईनी यामध्ये आपला रोल नातवंडांसाठी कसा राखून ठेवता येईल याची काळजी घेतली तर थोडाफार हातभार लागेल जेणेकरून काही दिवस तरी बाळ पाळणाघरात ठेवावे लागणार नाही. माझ्या एका मैत्रीणीकडे तिचे सासू सासरे घरी असून सुदधा त्यांनी बाळाला सांभाळायचे नाकारले त्यामुळे नाईलाजाने ती आपल्या बाळाला पाळणाघरात सोडायची पण हेच जर तिने त्यांना सांभाळायचे नाकारले असते तर

….तिची किती बदनामी झाली असती पण असो...याबद्दल बोलायलाच नकोय..त्यामध्येही दोन बाजू असतात ती फक्त सासुलाच दोष देऊ नये तर सुनेने सुद्धा आपली बाजू भक्कम ठेऊन सासू ला समजून घेऊन व आपली आवश्यकता समजून एकमेकींना मदत करावी.शेवटी वंशज हे त्यांचेच असतात..बाहेर पडणाऱ्या स्त्रीची व्यथा या सारख्याच फक्त अनुभव वेगळे असतात..

 सर्व नोकरदार स्त्रियांना समर्पित…


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational