मेलोड्रामा
मेलोड्रामा
"कोनो घर देवत है क्या घर ...? तनीख शांती से बैठने के लिये कोनो घर देवत है क्या .." - दोन्ही हात वर करुन आभाळाकडे पहात तोंडातून येणारा पानाचा ओघळ पुसत आमचा वोचमॅन चौबे नटसम्राट चा डायलॉग भोजपुरी मध्ये म्हणत होता.
नक्की स्वतःच्याच ऑफिस मध्ये आलोय न याची खात्री करून पुढे निघालो. ऑफिस मध्ये पाय ठेवताच राठोड साहेब तिकडून हातात लोखंडाची स्केल घेऊन "जय महिष्मती..... " असे जोऱ्यात ओरडून माझ्याकडे धावत येताना मला दिसले, अचानक अंगावर येत असल्याने मी जरा बिथरलोच पण माझ्या मागनं सतीश साहेब भल्लालदेव बनून आले अन मला बाजूला सारून त्यांनी युद्ध सुरु केले. बाहुबलीच्या स्टेलनेस स्टील च्या तलवारीने ने मला काही जखम तर झाली नाही न याची खात्री केल्यानंतर नेमका काय प्रकार चालू आहे ? सर्वजण असे विचित्र का वागताय ? याचा विचार करत असतानाच आत ऑफिस मधून मला टेप रेकॉर्डर चालू असण्याचा आवाज आला आत जाऊन बघतो तर काय शाळेत गॅदरिंग ला उभं राहतात तासा उरलेला स्टाफ रांगेत उभा होता आणि आमच्या ऑफिस मध्ये जॉब करण्याआधी प्रार्थमिक शाळेवर भूगोलाच्या शिक्षिका असणाऱ्या शिंदे मँडम सर्वांचा " आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं " या गाण्यावर नृत्य बसवून देत होत्या. शिंदे मॅडम जरी भूगोलाच्या शिक्षिका होत्या तरीही सर्व डान्स स्टेप्स मात्र पिटी च्या घेतलेल्या होत्या. त्यात आमच्या पुरुष मंडळींचा स्टाफ तर अस्ताव्यस्त नाचत होता मागच्या काहींनी तर ठाकरं ठाकरं सोडून "जवा नवीन पोपट हा ..... " यावर ठेका धरायला सुरवात केली होती.
खाली बसून परत उठण्याच्या स्टेप ला खाली बसलेल्या ढमढेरे बाई उठल्याच नाही, त्या जेव्हा उठल्या तेव्हा डान्स ची प्रॅक्टिस संपलेली होती. या सर्वांमध्ये आमचे मॅनेजर साहेब डोकं दुखत म्हणून टाय गळ्यात बांधण्याच्या ऐवजी डोक्यावर बांधून बसले होते. ह्या इथे कोणालाच विचारून काहीच फायदा नाही हे समजल्यावर मी सरळ आमच्या मॅनेजर साहेबांकडे गेलो. त्यांना विचारपूस केल्यावर काहीच न बोलता त्यांनी माझ्या हातात एक लेटर दिलं अन डोक्यावरचा टाय अजून थोडा घट्ट आवळला.
" दर साल प्रमाणे ह्या हि वर्षी कंपनी चा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जोमात साजरी करण्यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आणि प्रत्येक ब्रांच मधील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यात भाग घेणे अनिवार्य आहे."
हेड ऑफिस वरून आलेलं ते लेटर वाचलं अन सर्व प्रकार माझ्या लक्षात आला.
मॅनेजर साहेबाना आलेलं टेन्शन साहजिकच होत. खार तर अश्या अवलियाना घेऊन नाटक बसवणं ते हि ऑफिसच काम आणि टार्गेट सोडून काही माहीत नसताना हे म्हणजे करंगळीने गोवर्धन उचलण्यापेक्षा काही कमी नव्हतं. खूप विनंती करून मॅनेजर साहेबांनी आमच्या MD साहेबांकडून एक दिग्दर्शक मागवला होता . आम्ही सर्व अन मॅनेजर साहेब सर्वच आनंदी झालो होतो. दिग्दर्शक येणार म्हणल्यावर शिंदे बाईंनी आधीच नाक मुरडले -" बाई ... माझ्या कलेला ना वावच नाही मुळी मी असले असते न तर पहिला नंबर कुठेच गेला नासता." त्यावर सर्वांनी बरोबर आहे बरोबर आहे असं म्हणून शिंदे मॅडम ला वडाच्या झाडावर चढवलं कारण त्यांची शरीरयष्टी पहाता हरबऱ्याच झाड झेपणार नव्हतं.
थोडं फार बर लिहितो म्हणून आमच्या मॅनेजर साहेबांनी लिखाणाची जबाबदारी माझ्याकडे दिली. मी सुद्धा माझ्या ठेवणीत असलेलं मस्त थरारक नाटक सुचवलं आणि सर्वाना वाचून दाखवलं. सर्वाना ते फार आवडलं. शिंदे बाईंनी नाक मुरडून का होईना नाटक बसवण्यास संमती दिली. पण त्या नाटकात सर्व स्टाफ चा आम्ही ठाकर ठाकर या गाण्यावरचा डान्स त्यांना हवाच होता. "पुढचं पुढे पाहू "- अश्या अर्थाने मॅनेजर ने मला खुणावलं आणि नाटक बसवायचं हे फायनल झालं. आता MD साहेबांनी पाठवलेल्या दिग्दर्शक साहेबांना आपली स्क्रिप्ट आवडली म्हणजे झालं.
मानेपर्यंत वाढलेले केस , टी -शर्ट वर चार पाच खिसे असलेलं जॅकेट बर्मोडा व त्या खाली सॉक्स न घालता घातलेले बूट अश्या अवतारात दिग्दर्शक साहेब आले. चेहऱ्यावर नेहमी काहीतरी गंभीर विचार करतोय अशी मुद्रा त्याच्यासोबत त्याच्या मागे पुढे करणारा त्याचा असिस्टंट होता. आमच्या मॅनेजर साहेबानी मोठ्या उत्साहात त्यांना हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला तर त्यांच्याकडे पाहून मोठ्या गर्वाने हसून हस्तांदोलन न करता तिथून निघून गेला वर खुर्चीत ऐटीत जाऊन बसला. आमच्या साहेबांचा झालेला अपमान बघता चंदू प्युन ने मॅनेजर साहेबांच्या हातात हात देऊन सर्व सावर केली. तरीही मॅनेजर साहेब त्यांच्याकडे गेले आणि मी लिहिलेली स्क्रिप्ट त्यांच्या हातात देऊन म्हणाले - " सर हि आपल्या नाटकाची स्क्रिप्ट ,आपण यावर नाटक बसवणार आहोत." यावर डायरेक्टर सरानी परत चिडून मॅनेजर कडे पाहिले. त्यांच्या हातातली स्क्रिप्ट घेऊन असिस्टंट कडे खूप माजात दिली त्याने सुद्धा दोन तीन शब्द वाचून तोंड वाकड करीत - "नाही काही दम नाही ह्याच्यात, आमच्या सरांना नाही आवडणार." असं म्हणून ती स्क्रिप्ट बाजूच्या टेबल वर आपटली. मी त्याला जाब विचारणारच होतो पण आमच्या मॅनेजर साहेबांचा झालेला अपमान आठवला आणि माझ्या लिखाणाचा अपमाण विसरून मी तसाच उभा राहिलो. त्यावर शिंदे मॅडम ची जग जिंकल्याची फिलिंग काही औरच होती. त्यावर आलं अंगावर असं म्हणीत मॅनेजर ने पुन्हा एकदा डायरेक्टर ला विचारलं - " मग कोणत्या स्क्रिप्ट वर नाटक बसवायच आपण.?" असिस्टंट बोलणार तेव्हड्यात हाताचा इशारा करून डायरेक्टर साहेब स्वतः बोलायला लागले.
- " को......को......... को. . न कोण ...ली.... ली ..... लिहिणार म्हणून का का ..... काय वि ...विचारताय ? मा.... मा...... माझ नाटक मी ...मी.... मीच लिहिणार .."
यावर आम्ही सर्वच एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो आमच्या मॅनेजर साहेबांच्या डोळ्यासमोर तारे येऊ लागले. फारच कमी दिवस बाकी आहेत आणि हा असा अडकत अडकत बोलणारा दिग्दर्शक. ह्या स्पीडब्रेकर च्या स्पीड ने नाटक कस बसणार ? डायरेक्टर च बोलणं कोणालाच समजत नसल्याने सगळी तारांबळ उडाली होती.
चिंता आणि अपमान असाह्य होऊन आमच्या मॅनेजर साहेबांनी वर सिनियर ला मेल पाठवला. दुसऱ्याच दिवशी आमचे MD साहेब ज्यांनी डिरेक्टर पाठवला होता ते ऑफिस मध्ये आले. कोणीतरी आपल्या अपमानाची दखल घेतली म्हणून मॅनेजर साहेबांना अश्रू अनावर झाले होते. मिटिंग रूम मध्ये सर्व स्टाफ जमला होता . नेमकं काय काय बोलायचं काय काय मुद्दे मांडायचे याचा विचार सगळे करू लागले. मॅनेजर साहेब MD साहेबांना मिटिंग रूम मध्ये घेऊन आले. तोच सर्वांनी कालवाकालव सुरु केला. कम्पलेंन करण्याच्या घाईमध्ये कोणाचंच बोलणं व्यवस्तीत जात नव्हतं. सर्वाना शांत करीत मॅनेजर बोलायला सुरूच करणार होते तोच डायरेक्टर साहेब आतमध्ये आले. डायरेक्टर कडे पाहून आमचे MD साहेब फारच खुश झाले अन डायरेक्टर सुद्धा " भा ..... भा...... भावजी ..." असं म्हणून त्यांच्या गळ्यात पडला.
डायरेक्टर हा MD चा साला आहे हे सर्वांसाठीच फार धक्कादायक होते. या घटनेनेनंतर मॅनेजर साहेब परत पूर्ण दिवस ऑफिस मध्ये आलेच नाहीत, शिंदे बाईंनी सुद्धा आपल्या नृत्य कलेला अखेरची तिलांजली दिली.
" सांगा कोणाला काय अडचनी आहेत ?" - MD सर सर्वाना विचारू लागले. कोणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं त्यामुळे मला व्यक्तिगत विचारल्यावर मी फक्त एव्हढच म्हणू शकलो - " सर प्रॅक्टिस कधीपासून सुरु होणार आहे?"
दिवसेंदिवस आमच्या मॅनेजर साहेबांचा डोक्याचा ताण अजूनच वाढत होता. बाकीच्या ब्रांच मॅनेजर समोर होणारी नाचक्की त्यांना नको होती. त्यातल्या त्यात असा अवली दिग्दर्शक म्हणल्यावर मॅनेजर चा त्रास अजूनच वाढत होता. खरं तर आमच्या दिग्दर्शकाला कधी कोणी आपली कला दाखवण्याची संधी दिलीच नव्हती . परंतु आता भावजी च्या कृपेने त्यांना हि संधी भेटलीच आहे तर त्या संधीच सोन करण्याच्या प्रयत्नात तो मॅनेजर साहेबांच्या अब्रूची माती करत होता हे मात्र नक्की.
आज दिग्दर्शक साहेब आम्हाला त्यांनी लिहिलेल्या नाटकचे वाचन करून दाखवणार होते. त्यांच्या असिस्टंट सकट आम्ही सर्वांनी त्यांना नाटकं आमच्यापैकी कोणीतरी वाचेल असा आग्रह केला. परंतु परत - " मा.... मा...... माझ नाटक " असे दिग्दर्शक साहेब म्हणाल्यावर सर्व एका स्वरात म्हणाले - "तुम्हीच वाचा. "
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास " प..... प..... पडदा ऊ ...... ऊ...... ऊ.... घडतो. " अशी दिग्दर्शकाने जी सुरुवात केली ती दुपारी दीड वाजेच्या सुमारास -" प..... प..... पडदा " प..... प..... पडतो. " अश्या प्रकारे शेवट झाला शेवटी असिस्टंट ने वाजवलेल्या टाळ्यामुळे आम्हाला जाग आली व आम्हीही टाळ्या वाजवू लागलो. दीड तासाच्या नाटकच्या वाचनाला पाच सहा तास यावरूनच सर्वांना पूर्वज दिसत होते. या पाच तासामध्ये कोणालाच काहीच समजत नव्हतं फक्त दिग्दर्शकाच्या अन असिस्टंट च्या हावभावाप्रमाणे आम्ही हावभाव देत नाटकं खुप उत्तम रित्या समजत आहे असे दर्शवत होतो. जिथे त्यांनी विनोद लिहिला होता तिथे ते स्वतः त्यांच्या स्पीडब्रेकर शैलीत हसत होते. आम्ही अनुकरन करून हसलो की त्यांना आम्हाला प्रवेश आवडला आहे असं वाटायच आणि तो पूर्ण प्रवेश ते परत पहिल्यापासून वाचत होते. ते पाच तास आमच्या आयुष्यातले सर्वात वाईट पाच तास होते यात वादच नाही. जस जस नाटकं बसत होत तस तस विभिन्न पात्र संबंध नसताना त्यात जोडल्या जातं होती. दिग्दर्शक त्यांना हवी ती पात्र हवी त्या प्रसंगात आपल्या सोईप्रमाणे लावत होता.
उदा. ऐतिहासिक नाटकाचा प्रवेश त्यामध्ये केवळ दिग्दर्शक साहेबांना आवडत म्हणून शोले पिक्चर मधला जय विरू चा डान्स, इमोशनल सीन व्हाव्हा म्हणून मदर इंडिया आणि माहेरची साडी मधला क्लायमेक्स, विनोदी वाटाव म्हणून उगाच अशी ही बनवा बनवी मधील सुधा अन पार्वती म्हणून सुरवातीला बाहुबली अन भल्लालदेव झालेल्या राठोड साहेब अन सतीश साहेब यांना स्त्री भूमिका दिल्या. भरदार शरीर आणि पिळदार मिश्यामुळे सुधा-पार्वतीची ही जोडी अधिकच विभत्स वाटत होती.
त्यातल्या त्यात कहर म्हणजे आमच्या ऑफिस मधला रघुवीर याला चक्क राजाचा रोल दिला. आता रघुवीर ला राजा च पात्र दिल यात काही चुकीचं नव्हतं. पण सहा साडेसहा फूट उंची, भारदस्त शरीर, रुंद छाती, ब्राम्हदेवाच्या भट्टीत जरा जास्तच वेळ भाजल्या गेल्याने गडद काळा करपल्या सारखा रंग, लाल भडक डोळे अश्या वर्नाचा रघुवीर हा पुरुष जरी असला तरी त्याचा आवाज, त्याचे हावभाव, हातवारे सर्व बायकी.
इयर क्लोजिंग च्या पार्टीला त्याचा त्याच्याच आवाजात - "काटा लागा है लगा" या गाण्यावर मनमोहक डान्स हा ठरलेला असतो.
आमच्या ऑफिस मधल्या महिला मंडळ एक वेळेस कमी पडतील परंतु कुठल्या भाजीत कोणता मसाला टाकल्याने चव येते, काय केल्याने चेहऱ्यावर चमक येते किंवा काय लावल्याने केसगळती थांबते हे अर्ध टक्कल पडलेल्या आमच्या रघुवीर ला सांगितलं तर तो बरोबर सांगेल. हा असा व्यक्ती राजाच्या पात्रात म्हणल्यावर सर्वाना हसू काही केल्या आवरत नव्हतं.
या सर्व गोंधळात कमी म्हणून की काय आमच्या देशपांडे मॅडम बाळंतपणची सुट्टी संपवून रिजॉईन झाल्या होत्या. घरी संभाळायला कोणी नाही म्हणून त्या मुलीला त्या आपल्या सोबत ऑफिस मध्ये घेऊन येत होत्या. ती मुलगी त्यांना सोडून एक मिनिट पण राहात नसल्याने आमच्या दिग्दर्शक साहेबांनी मुगले आझम या प्रवेशात झाशीची राणी म्हणून त्यांच्या मुलीला त्यांच्या पाठीला बांधून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.
जसा जसा एक एक दिवस कमी होत होता तसा तसा आमच्या मॅनेजर साहेबांच्या डोक्यावरचा एक एक केसांचा गूच्छा कमी होत होता. आधीच अर्धटक्कल पडलेल्या मॅनेजर च अजून पडलेल्या टकलेच अवचित्य साधून डायरेक्टर ने त्यांना शांतता अन अहिंसावादी गांधीजी ची भूमिका दिली होती..
शेवटी तो दिवस आलाच पुढच्या अर्ध्या तासावर नाटक येऊन थांबलेल होत अन डायरेक्टर आम्हाला सर्वांना एकत्र करून शहरूक खान ने जसं चक दे इंडिया मध्ये आपल्या टीम ला मोटिवेट केल तस डायरेक्टर साहेब सुद्धा प्रयत्न करू लागले परंतु हे भाषण झालं तर ते खरंच सत्तर मिनिट च होईल या भितिने मॅनेजर ने त्याला व त्याच्या असिस्टंट ला मेकअप रूम मध्ये कोंडले.
ढमढेरे बाईनकडे नाटकच्या आनाउन्समेंट ची जबाबदारी होती परंतु माईक हातात घेताच त्यांना टेन्शन मुळे घेरी येत होती. आमच्या चौबे वॉचमन ला पोलीस इनीस्पेक्टर च पात्र दिल होत खरं पण त्याच्या वर्दीची खाकी पॅन्ट नको तिथे शहिद झाल्याने तो परेशान होता. इकडे सुधा अन पार्वती झालेल्या राठोड साहेब अन सतीश साहेब यांना आपण आपल्या मिशी मुळे शोभत नाही आहोत हे त्यांना नाटकाची तिसरी घंटा झाल्यावर लक्षात आलं म्हणून ही जाऊबाईंची जोडी विंगेच्या कोपऱ्याला मोबाईलच्या टॉर्च च्या उजेडात दाढी करू लागली.
शिंदे मॅडम ने स्पेशल शिफारस करून मोराचा रोल मागून घेतला होता. पण नेमका त्यांचा पिसारा काही फुलत नव्हता. आमचा राजा झालेला रघुवीर महिला कलाकारांच्या साडीला गुढग्यावर बसून मिऱ्या पाडून देण्यात व्यस्त झाला. एव्हडा मोठा राजा परंतु तोंडात सेप्टी पिन धरून त्यांच्या साडीला मिऱ्या पाडून देतोय हे दृश्य खरंच विनोदी होत. हे सर्व पाहून मॅनेजर साहेबांना आपला होणारा अपमान स्पष्ट दिसत होता. त्यामुळे मॅनेजर साहेब जे गांधीजी झाले होते त्यांनी आपले धोतर उचलून धावपळ करण्यास सुरवात केली होती.
पडदा उघडला गांधीजींनी विंगेत एका हातात धोतर संभाळीत दुसऱ्या हाताने ढमढेरे बाईंचे डोळे घट्ट दाबले. तेव्हा कुठे त्यांनी एका दमात अनाउन्समेन्ट घेऊन टाकली.
आमचा राजा स्टेज वर लाजत मुरडत, ढोलकीच्या तालावर दरबारात आल्यामुळे पूर्ण नाट्यगृहात हषा पिकला. त्यात आमच्या चोबे ला बिहार वरून त्याची होनारी बायको छुट्टन नाटकला आली आहे हे समजल्यावर तो संधी मिळेल तेव्हा स्टेज वर जाऊ लागला. सुरवातीच्या अचानक घेतलेल्या दोन प्रवेशात त्याने राजाकडे पाहून -" हैंड्स अप" म्हणले परंतु छूट्टन काही केल्या नं दिसल्याने तिसऱ्या प्रवेशाला सरळ प्रेक्षकान कडे बंदूक करत - "छुट्टन हैंड्स अप" असा म्हणाला. तिकडून प्रेक्षकांमधुनही - "हाय दैय्या"
असे म्हणून छुट्टन ने हात वर केले. तेव्हा आनंदाच्या भरात तो गाणं म्हणून चालू नाटकत नाचू लागला.
अहिंसा प्रेमी गांधीजींचा राग अनावर झाल्याने ने चालू नाटकत राजाच्या दरबारात आले आणि डोळे वटारीत परंतु कोमल स्वरात - " चले जाओ..... चले जाओ " असे म्हणू लागले. चौबे तरीही जातं नाही हे समजल्यावर " नोकरीसे चले जाओ..... चले जाओ... " असं म्हणल्यावर चौबे लगेच विंगेत निघून गेला.
त्यात अजून भर म्हणजे शिंदे बाईंच्या एन्ट्री च्या वेळेस "नाच रे मोरा" या गाण्यावर नृत्य करताना त्यांना दम्याचा अटॅक आला. काहीच पर्याय नसल्याने मेकअप रूम मधून दम्याचा पंप गांधीजींनीच आणून दिला. राठोड साहेबांच्या साडी ची पिन निघाल्याने आमचा राजा स्वतः उठून आणीबाणीच्या काळासाठी राखून ठेवलेली करदोड्याला अडकवलेली सेप्टीपीन त्यांना देण्यासाठी संघर्ष करू लागला.
आमच्या देशपांडे मॅडम ची म्हणजे झाशीच्या राणीची एन्ट्री झाली तेव्हा त्यांच्या मागून नाचनाऱ्या मोररूपी शिंदे मॅडम जोऱ्यात घसरून पडल्या अन संपूर्ण स्टेजवर कसलातरी वास सुटला नंतर मोरपंखी पिसारा पिवळा झाल्यावर लक्षात आलं की नाटकं सुरु होण्यापूर्वी देशपांडे मॅडम ने मुलीला खुप कुरकुरे खाऊ घातले परंतु नेमक डायपर घालायचं विसरले. त्यावर गांधीजींनी परत नाकाला पंचा लावून जळालेल धूप चालू नाटकत स्टेज भर फिरवल.
शेवटी एकही प्रवेश विना अडथळा झाला नाही. पडदा पडल्या पडल्या सर्व कलाकारांसकट पूर्ण प्रेक्षकालंय खुप हसले खुप टाळ्या वाजवल्या. नाटकाचा प्रयोग फसला जरी असला तरी सर्वांनी एन्जॉय मात्र भरपूर केला. परिस्थिती कशीही असो आपला एक कर्मचारी आपल्या सहकार्मचाऱ्याची कोणत्याच परिस्थितीत साथ सोडत नाही याची प्रचिती सर्वांना आली.
