माता पिता आणि व्यथा
माता पिता आणि व्यथा
एक ३ वर्षांचा लहान मुलगा नेहमी एका आंब्याच्या झाडाभोवताली खेळायचा. त्या मुलाच्या त्या खेळण्या बागडण्याने त्या आंब्याच्या झाडालाही कमालीचा आनंद मिळायचा. पुढे काही वर्षे सरून जातात आणि तो मुलगा त्या झाडाभोवती खेळायला यायचा बंद होतो त्यामुळे ते झाड अतिशय अस्वस्थ होते.
परंतु एके दिवशी अचानक तो मुलगा त्या झाडापाशी येतो झाडाला खूप आनंद होतो. झाड त्या मुलाला विचारते," का रे इतकी वर्षे का नाही आलास माझ्यासोबत खेळायला?
तो मुलगा बोलतो," मी आता मोठा झालोय मी तुझ्याभोवती कसा खेळेल. मला आता खेळायला खेळणी हवी आहेत पण माझ्याकडे पैसे नाहीत.
झाड बोलते," तू नाराज होऊ नकोस मला चांगले आंबे लागलेत ते आंबे घे बाजारात वीक आणि आलेल्या पैशातून खेळणी घे."
मुलगा आनंदित होतो तो त्या झाडावरचे आंबे उतरवून ते बाजारात विकून खेळणी घेतो. परंतु तो पुन्हा बरीच वर्षे झाडाकडे येत नाही, झाड मात्र त्याची आतुरतेने वाट पाहते.
बऱ्याच वर्षांनी तो मुलगा परत येतों झाडाला अतिशय आनंद होतो. झाड त्या मुलाला विचारते , का रे इतकी वर्षे का नाही आलास मला भेटायला?
तो मुलगा बोलतो," मी आता माणूस झालोय मला मुलेबाळे आहेत मी तुझ्याभोवती कसा खेळेल. मला आता घर बांधायचे आहे तुझी काही मदत होईल का?
झाड बोलते," माझ्याकडे तुला द्यायला काही नाही पण तू माझ्या फांद्या तोडून ने आणि त्याच्या लाकडातून तुझे घर बांध"
तो माणूस झाडाच्या फांद्या तोडतो आणि त्याचे एक घर बांधतो. परंतु घर बांधल्यानंतर अनेक वर्षे पुन्हा तो त्या झाडाला विसरतो. आणि काही वर्षांनी एक साथ सत्तर वर्षांचा म्हातारा बनून तो माणूस त्या झाडापाशी येतो आणि झाडाला म्हणतो," मी आता म्हातारा झालोय त्यामुळे मला पोहून नदी पार करता येत नाही. तेव्हा मला होडी करायला तुझे मजबूत खोड मला दे"
ते झाड उरलेसुरले खोडही त्या व्यक्तीला देऊन टाकते. परंतु पुन्हा अनेक वर्षे तो व्यक्ती त्या झाडाकडे फिरकत नाही. आणि अचानक काही वर्षांनी तो व्यक्ती अतिशय थकलेल्या अवस्थेत झाडापाशी येतो.
झाड त्याला बोलते," आता तुला द्याय
ला माझ्याकडे काहीही नाही फळे ,फांद्या, खोड असे काहीही नाही.
त्यामुळे तुला सावलीसाठी पाने किंवा अगदी चालताना आधाराला काठीही द्यायला माझ्याकडे नाही.
त्या माणसाला त्याची चूक कळलेली असते आयुष्यभर केवळ आपल्या सहवासासाठी सर्वकाही देणाऱ्या त्या झाडाला काहीही किंमत उरलेली नसते. थरथरत्या हातानी स्वतःला दोष देत आणि डोळ्यांची असावे पुसत तो त्या झाडांच्या मुळापाशी तसाच निपचित पडून राहतो.
ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाते. याचे तात्पर्य शोधताना आपण झाडे जगवा किंवा एखाद्याचा आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेऊ नका असे अर्थ आपण काढणार.
परंतु हि गोष्ट आपल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. ती झाडे आपल्या आई वडिलांसारखी आहेत. ते आपल्याला नेहमी जे हवे ते निस्वार्थीपणे देण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु आपण लहानपणी त्यांच्या अवतीभोवती बागडणारे, सर्व हट्ट पुरवून घेणारे मोठे झाल्यावर मात्र त्यांना विसरतो.
त्यानंतर आपण फक्त त्यावेळेसच त्यांच्याजवळ जातो जेव्हा आपल्याला पैसे किंवा इतर काहीतरी गरज असते. परंतु ते त्यांच्याजवळ आहे ते सर्व आपल्याला सतत देतच राहतात आणि त्यानिमित्ताने मिळणाऱ्या त्या अल्प सहवासात आपला आनंद शोधतात. एखादी गोष्ट मिळाली नाही तर आपण त्यांची निंदा करतो परंतु त्यांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाची आपण कधीही दखल घेत नाही.
नटसम्राट सारख्या चित्रपटांना आपण जेवढी आसवे गळतो तेवढी आसवे कधीतरी आपल्या आईबाबांच्या त्यागासाठी डोळ्यात असायला हवीत.
माझ्या मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे निसर्गाचा नियमच आहे "पेराल ते उगवेल" म्हणूनच आपणही वृद्ध होणारच आहे याचे जरा भान ठेवा. आई बापाला कमी लेखुन त्यांचा छळ करून पुढे नरकयातना भोगण्यापेक्षा त्यांच्या अस्तित्वाचा आदर करून घराचा स्वर्ग करूया.
पेराल तेच उगवेल
हा नियम साधासोपा
वेळ येते प्रत्येकावर
आई बाबांना जपा