मां साहेब जिजाऊ
मां साहेब जिजाऊ
८४ लक्ष योनींनंतर मिळणारा हा मनुष्य देह.या जन्माचं सार्थक व्हावं,हा जन्म पुण्यकर्म अन् यशस्वितेने परिपूर्ण असावा,ही प्रत्येकाची इच्छा असते.अगदी माझी ही तशीच.आई-वडिलांच्या पोटी जन्म होऊन,शिकून मोठं व्हावं,स्वत:च्या पायावर ऊभं रहावं, अशी माझीही इच्छा आहेच.
माझी आताची परिस्थिती पहाता बाबांच्या अपघातानंतर आर्थिक परस्थितीला तोंड देत,शिकून आईबरोबर आज संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळत आहे.मला हा जन्म मिळाला,मात्र सुखाचा सहवास फार काळ लाभला नाही.एक एक संकट समोर उभे ठाकतच आहे.ना वंश परंपरागत चालत आलेल्या जमिनीचा तुकडा मिळाला.ना त्याविरुद्ध आवाज उठवून,दावा करून हक्क मागू शकले.
आज स्वातंत्र्य मिळालेले असूनही बऱ्यापैकी सर्व सत्ता पुरुषप्रधान आहे.अशातच स्त्रियांचा जर विचार केला,तर या युगातही एका निडर,कर्तृत्ववान स्त्रीची गरज आहे.तलवार घेऊन लढायची वेळ नसली,तरी वेळ आल्यावर तिला शस्त्र चालवताही यायलाच पाहिजे.शिवपूर्व व शिवराज्य काळात स्त्रियांही शस्त्र विद्येत पारंगत होत्या.वेळप्रसंगी लढाईसाठी तयार होत्या.त्या मुळातच धैर्यवान, धीट होत्या.
या काळात गरज आहे,त्या रूपातील मातेची,बहिणीची,शिक्षिकेची,त्या एका स्त्रीची जी आपल्या बाळाला पोटात असल्यापासूनच अन्याय,अत्याचार न गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवायला शिकेल.स्वतः वर होणाऱ्या अन्याय,स्वतः वर ओढल्या जाणाऱ्या तशे-यांना खुडून काढायला शिकेल.
आपण म्हणतो,"राजे तुम्ही पुन्हा जन्माला या",
मात्र ते स्वराज्यरक्षक शिवराय जन्माला येण्यासाठी त्या राजमाता जिजाऊ ही जन्माला येणं तितकच आवश्यक आहे.अन्याय,अत्याचाराने भरलेल्या या कलियुगात त्या राजाची,त्या मातेची नितांत गरज आहे.खंत आहे की,शिवराज्य काळ तर पाहू शकले नाही,भरभरून ऐकला मात्र आहे.तत्यांच्या पराक्रमाच्या,त्यांच्या शौर्याच्या कथा अंगावर अजूनही शहारा आणतात.
मां जिजाऊंचे शिवरायांवर पोटात असल्यापासूनच खूप सुसंस्कार झाले.त्या शिवरायांना रामायण,महाभारत,शौर्यकथा ऐकवायच्या.स्वराज्याचं स्फुल्लिंग त्यांच्या मनात चेतवायच्या.त्याचेच फलित म्हणून शिवरायांनी पहिला तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले अन् अखेर हिंदवी स्वराज्य स्थापिले.
दुर्दम्य बुद्धीचातुर्य अन् निष्णात युद्धनिती
रांधायलाही सुगरण सर्वगणसंपन्न ती,
धन्य ती राजमाता अन्
धन्य स्वराज्यजननी ती...
तरबेज युद्धनिती,तल्लख बुद्धीचातुर्य अन् रांधण्यातही उत्तम अशा माता जिजाऊ एक सर्वगणसंपन्न लढवैय्या स्त्री,एक आदर्श पत्नी,भगिनी,माता म्हणवल्या जातात.स्वराज्य उभारणीसाठी राजमाता जिजाऊंचे शिवरायांना केलेले मार्गदर्शन बहुमोलाचे आहे.
जर कोणी विचारलं,पुन्हा तुला मनुष्य जन्म मिळाला तर उत्तर काय असेल? मी म्हणेन,"कि माझा जन्म माझ्या या जन्मीच्याच आईपोटी झाला नाही तरी चालेल,मात्र मां साहेब जिजाऊंच्या पोटी नक्कीच व्हावा".
अगदी माझ्या या शब्दांप्रमाणे..
आयुष्याच्या सरतेशेवटी मनिषा असेल एकच
पुन्हा मनुष्य जन्म घ्यावा,
अन् धन्य धन्य होण्यासाठी जन्म
मां साहेब जिजाऊंच्या पोटी घ्यावा...
जन्म मां साहेब जिजाऊंच्या पोटी घेण्यासाठी या काळात पोटी एक जिजाऊची लेक जन्माला येणं, तितकंच गरजेचं आहे.कारण,जशा जिजाऊ मां साहेब निडर,धडाडी,लढाऊ व संयमी वृत्तीच्या होत्या,अत्याचारांविरुद्ध लढणाऱ्या होत्या.अगदी ही लेकही तशीच असायला हवी ना.हीच काय तर जन्मणारी प्रत्येक लेक माता जिजाऊंसारखी जन्मावी.जेणेकरून माझा येणारा जन्म त्याच मां साहेब जिजाऊंपोटी व्हावा.
मिळवा एकतरी जन्म
प्रेम,वात्सल्य, संस्कार तिचे लाभण्यासाठी,
जन्मावी मी मग पुन्हा नव्याने
कुशीत तिच्या खेळण्यासाठी...
जन्माला येण्यास शिवराय पुन्हा
स्वराज्य ते पुन्हा संस्थापिण्यासाठी
इच्छा न उरावी आता मागे कोणती
फक्त जन्म घ्यावा मॉंसाहेब जिजाऊंच्या पोटी...
शिवरायांचा इतिहास त्यांच्या राजमाता जिजाऊंच्या मुखातून ऐकण्यासाठी,स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला येण्यासाठी अन् त्या जिजाऊंसारखीच एक "जिजाऊंची लेक" होण्याचं भाग्य लाभण्यासाठी मला पुन्हा मां साहेब जिजाऊंच्या पोटी जन्म घ्यावा वाटतोय.
