Pranjali Lele

Inspirational

4.5  

Pranjali Lele

Inspirational

माझी आजी

माझी आजी

4 mins
567


  एकोणीसशे सत्तावीस सालची गोष्ट.. एका सधन कुटुंबात दुर्गाचा जन्म झाला. चार भावंड आणि ती एकुलती एक लेक..त्यामुळे लाडाकोडात वाढलेली..पण हे कौतुक फारच कमी काळ दुर्गाच्या नशिबी आलं..तिचे हे सुख नशिबाला काही मान्य नव्हतं..काही काळातच आई वडिलांचे छत्र त्या मुलांच्या डोक्यावरून हिरावून गेलं आणि मग दुर्गा आपल्या भावासह मामाकडे राहायला आली. 


   मामी मात्र अगदी कडक शिस्तीची. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच सगळ्या कामाची सवय दुर्गाला लागली. भाऊ शिकून मोठे झाले तसे त्यांना सरकारी नोकरी लागली. दुर्गा ने दहावी पर्यंत शिक्षण घेतले आणि मग इतर शिवणकाम, विणकाम शिकू लागली. नागपूरचे एक चांगले स्थळ येताच मामांनी तिचे लग्न लावून दिले.


    मुलगा छान शिकला, सवरलेला, चांगली नोकरी त्यामुळे दुर्गा इथे सासरी अगदी आनंदात होती. सासूबाई तर अतिशय प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांना सगळे जिजी म्हणत. सगळं कसं छान चालले होते. लवकरच त्यांची संसार वेल बहरली..तीन गोंडस मुली आणि एक बाळकृष्ण यांनी कुटुंब बहरले. मुले हळूहळू मोठे होत होती. दुर्गाचे हे सुख काळाला बघवले नाही आणि परत काळाने मोठा आघात केला. काही महिन्यातच एका आजाराने पतीचे निधन झाले. तिच्यावर दुःखाचा मोठा पहाड कोसळला.


    मुले अजून लहान होती..घरी कर्ता पुरुष नाही त्यामुळे दुर्गाला यातून स्वतः ला सावरायलाच लागले. मुलांना खंबीरपणे जिजिंकडे कडे सोपवून तिने नर्सिंग कॉलेज मधे प्रवेश घेतला. मोठ्ठ्या हिमतीने तिने हा कोर्स पूर्ण केला. आणि तिला दुसऱ्या एका गावी हॉस्पिटल मधे परिचारिकेची नोकरी मिळाली. त्यामुळे मुले शिक्षणासाठी तिथे नागपूरला जीजी जवळ आणि दुर्गा मात्र एकटी गुमगावला नोकरीसाठी आली. 


     घरची परिस्थिती फारच बिकट झाली होती. तिच्याकडे हॉस्पिटलला घालायच्या बाहेरच्या मोजक्या दोनच साड्या होत्या. त्याच आलटून पालटून ती वापरत असे. जमेल तितकी काटकसर करून ती धान्य, कपडे, पैसे घरी नागपूरला पाठवत असे. इकडे मुले उत्तम रित्या शिकत होती. जिजी अगदी मनापासून मुलांची काळजी घेत. त्यांना हवं नको ते बघत असे. मुले देखील कसलाही हट्ट न करता शहाण्या सारखी वागत असे.


   मुळातच लाघवी स्वभावाच्या दुर्गाला तिथे गुमगाव ला देखील जीव लावणारे लोक भेटलेच. शेजारच्या माई आजी दुर्गाला आपली मुलगी च मानत. तिला हवं नको ते बघत. तिच्या शेजारी अजून एक बंगाली कुटुंब होते..ते पण तिच्या अगदी घरच्यासारखेच झाले होते. त्यांचा धाकटा मुलगा तर दुर्गाच्या घरीच राहतं असे आणि तिलाच आई म्हणून संबोधत. आपल्या प्रेमळ आणि लाघवी स्वभावामुळे तिने इथे पण खूप माणसं जोडली.


    अश्या प्रकारे आलेल्या कठीण परिस्थितीवर धेर्याने मात करत दुर्गा ने आपल्या मुलांना आपल्या पायांवर उभे केले. त्यात तिला तिच्या सासू बाईंची फार मोलाची मदत मिळाली. मुले देखील परिस्थितीमुळे खूप लवकर आत्मनिर्भर बनली. पाहता पाहता मुलांना उत्तम नोकऱ्या मिळाल्या. आणि काही काळातच योग्य स्थळ येताच तिने मुलांची लग्न केली.


   अशी ही धैर्यवान, कर्तबगार व्यक्ती म्हणजे माझी प्रिय आजी.. माझ्या आजीचा मला खूप अभिमान वाटतो. तिचे जीवन म्हणजे जणु सर्वांना प्रेरित करणारा खराखुरा चित्रपटच होय. आयुष्यभर तिने अनेक कष्ट सहन केले पण कधीही हार मानली नाही उलट खंबीरपणे आलेल्या परिस्थितीला सामोरे जात तिच्याशी दोन हात करत यशस्वीपणे तिने संकटावर मात केली. आलेल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलून तिने नंतर आम्हा नातवंडांना देखील प्रेमाने सांभाळले. असे तिचे हे संघर्षमय जीवन हे कुणा ही साठी साठी प्रेरणादायी ठरेल.


   आमची आई नोकरी करत असल्याने आम्ही मुले जास्त वेळ आजी जवळ असायचो. आजीची प्रत्येक बाबतीत शिस्त असायची. आमचा अभ्यास, खेळ, झोपणे सगळे अगदी वेळच्या वेळी आम्हाला करायला लागे. आजी नेहमी म्हणायची, कुठेही जायचे तर पाच मिनिट आधी पोचायला हवे. वेळ खूप महत्वाची असते त्यामुळे कधीही कुणाला आपल्यामुळे ताटकळत ठेऊ नये. लहान सहान कामे करताना देखील उत्तम रित्या करावी म्हणजे आपसूकच प्रत्येक काम चांगले करण्याची सवय लागते. कसलीही नासाडी करणे तिला खपायचे नाही.. ती नेहमी म्हणत, काटकसर करून चार पैसे कायम आपल्या जवळ ठेवावे. कधी कधी आजीच्या शिस्तीचा राग देखील यायचा पण आता मोठे झाल्यावर त्याचे महत्त्व कळले. 


    माझी आजी तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे सर्वांनाच खूप आवडायची. मग ते नातेवाईक असो, शेजारी पाजारी असोत वा तरुण मुले...सर्वच आजी जवळ आपले मन मोकळे करीत. माझ्या मैत्रिणींची ती तर मैत्रिणीच होती. परत ती सर्व कामात हुशार..विणकाम, शिवणकाम, किवां खाण्याचे पदार्थ असो, सगळ्यात निपुण होती. जुन्या पिढीतली असूनही स्वतंत्र विचारांची असल्याने सर्वांचा आदर्श होती. 


 सर्वांच्या मदतीला ती कायम तत्पर असे. माणसे जोडणे आणि ती नाती टिकून ठेवणे हे आजीकडून आम्ही शिकलो. ती नेहमीच म्हणत असे, माणसांसारखे दुसरे मोठे धन नाही. ज्यांनी आयुष्यात प्रेमाचे हे धन मिळविले तो खरा सुखी..त्यामुळे आजीचा प्रचंड गोतावळा असे..ती आवर्जून सगळ्यांना भेटायला जात आणि आम्हालाही सांगत, नाती जपल्याने ती टिकतात..तिच्या संस्कारांचे बाळकडू आम्हाला तिच्या दैनंदिन जीवनातून आपसूकच मिळत गेले आणि आमचे आयुष्य अधिक समृध्द करून गेले.


 आजीबद्दल कितीही बोलले तरी ते अपुरेच पडणार कारण मला ते शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे.

खरंच आजी हा शब्द सर्वांसाठीच हृदयस्पर्शी असतो. त्यात सामावल्या असतात असंख्य गोड आठवणी... ज्या आयुष्यभर पुरून उरतात. माझ्या मनातही माझ्या आजीच्या असंख्य आठवणी कायमच्या घर करून आहेत. कधी स्वयंपाक करताना तिने सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवतात तर कधी मुलांचे संगोपन करताना तिने दिलेल्या चार उपदेशा च्या गोष्टी नेहमीच डोळ्यासमोर येतात. 


  अशी आमची आजी आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणा स्थान बनून सदैव आठवणीच्या रुपात आमच्या बरोबरच आहे.


कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे कमेंट खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा.

धन्यवाद.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational