Vihang Mayekar

Abstract

2  

Vihang Mayekar

Abstract

माझे अध्यात्म

माझे अध्यात्म

1 min
94


जीवनाचे प्रयोजन, मृत्यू नंतरचे जीवन, पुनर्जन्म, मोक्ष-निर्वाण-कैवल्य अशा गहन विषयांवर व्यक्ती व्यक्तींमध्ये टोकाची मतभिन्नता आढळते. माझ्या अल्पमति प्रमाणे माझंही बनलेलं 'वेगळं' मत व्यक्त करण्याकरिता हा लेखप्रपंच. तुमची वैयक्तिक धारणा, वैचारिक बैठक ही वेगळी असू शकते.

(टिप: मी कला शाखेचा विद्यार्थी असल्याने विज्ञानाच्या दृष्टीने काही 'Conceptual Error' असल्यास जरूर निदर्शनास आणूनद्यावी.)


मनुष्याचा देह हा प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन या प्रमुख चार आणि इतर काही मुलद्रव्यांनी बनलेला असतो. पण ही सर्व मूलद्रव्य तर तशीही निसर्गात विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. मग त्यांचं रूपांतर मनुष्याच्या देहात कसं काय बरं झालं ? तर उत्क्रांतीच्या करोडो वर्ष चालू असलेल्या, एक पेशीय सजीव ते बहुपेशीय प्राण्यां पर्यंतच्या, स्लो & स्टेडी प्रक्रियेचं ते फलित आहे.


इतर कोणत्याही सजीवा प्रमाणे, मनुष्याच्या जीवनाचे केवळ 2 उद्देश आहेत. स्वसंरक्षण आणि प्रजनन. पण निर्जीव मूलद्रव्यांपासून बनलेला देह, ही दोन कामं कशी काय बरं करणार ? कारण त्यासाठी त्याला बलाची (Force) आवश्यकता भासणार. आणि बलासाठी हवी 'ऊर्जा (Energy)'. शरीरातील जवळपास 3 पद्म (300 खर्व किंवा 3,000 अब्ज) पेशी मिळून अविरतपणे अन्नातून ऊर्जा मिळवण्याचं काम करत असतात, जेणेकरून स्वसंरक्षण आणि प्रजनन, ही दोन कामं पार पाडली जावीत. अख्खं शरीर आणि आतील यंत्रणा मिळून मेंदू ला जगवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. मेंदू मधील 1 खर्व (100 अब्ज) न्यूरॉन्स इलेक्ट्रिक सिग्नल्स च्यामाध्यमातून जन्मा पासून मृत्यू पर्यंत अखंडित 'विचार' करत असतात. माहितीची साठवण करतात. त्यांची एक, एकत्रीत युनिक ओळख बनवतात. ज्याला आपण 'मी किंवा स्व' समजतो.

'रेने देकार्त' म्हणतो त्या प्रमाणे ' I think, Therefore I am’. बाकी सर्व मिथ्या असो वा नसो, विचार करणारा 'मी' हे मूळ गृहीतक आहे किंवा मूलसत्य आहे.


मृत्यूनंतर मृतदेहाचं विघटन/ज्वलन झालं की, ज्या जड मूलद्रव्यांमधून हे शरीर बनलं आहे ती मूलद्रव्य पुन्हा पृथ्वीवर त्यांच्या मूळस्वरूपात मिसळतात. ज्या इलेक्ट्रिक पल्सेस च्या माध्यमातून 'मी' विचार करत असतो ती ऊर्जा मुक्त होते, आपलं स्वरूप बदलते. शेवटी पुढील अगणित काळा करिता आपण पुन्हा त्याच स्थितीत परत जातो ज्या स्तिथीत आपण अब्जावधी वर्षांपासून होतो, याविश्वात निर्जीव स्वरूपात विखुरलेली स्थिती. आता आपल्या शरीरात असलेले सारे अणू हे पार बिंगबँग पासून (बहुतेक त्या ही आधीपासून) जसे होते तसेच आहेत आणि मृत्यू नंतरही अनंत-अनंतकाळ तसेच राहतील. अर्थात काळ ही निर्जीव गोष्टींसाठी निरपेक्ष गोष्ट आहे. वेळेचं बंधन फक्त चैतन्य स्वरूप सजीवांना. 


थोडक्यात सांगायचं तर या विश्वाचाच आपण एक अविभाज्य भाग असतो. आज आपण ‘मी’ म्हणून ज्या शरीराचे चोचले पुरवतो त्यातला प्रत्येक अणू हा अब्जावधी वर्षांपूर्वी अवकाशात बेभान तरंगणाऱ्या 'नेब्युला' चा भाग होते. जे काही इथे आहे, ते या ना त्या स्वरूपात अनादि काळा पासून चर-अचर सृष्टीत हे असंच होतं. जी काही जाणिव / चैतन्य या अणूंना एकत्र येऊन (आपल्याला) फार थोड्या काळा करीता लाभते ते भोगून झाल्यावर प्रत्येकाला पुन्हा मुळ स्वरूपात, नेणिवेत परतायचं असतं.


सारं काही अद्भुत, विस्मयकारी आहे खरे. आज रात्री गच्चीवर जाऊन अथांग पसरलेल्या अवकाशाकडे डोळे भरून पहा. एक खोल श्वास उरात भरून घ्या. आणि स्वतःला जाणीव करून द्या - की हे विश्व स्वतःलाच पाहतंय, स्वतःचीच अनुभूती घेतंय.. तुमच्या रूपाने...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract