Vihang Mayekar

Others

4  

Vihang Mayekar

Others

संन्यास

संन्यास

1 min
357


मध्यान्हीच्या उन्हात झपझप पावले टाकत तो रस्त्यावरून चालत होता. शेवटची चढण एका दमात चढून गेल्यावर समोरच खालच्या अंगाला त्याला त्याच्या गावाचा सुंदर नजारा दिसला, आणि एका क्षणात इतक्या दिवसांच्या प्रवासाचा क्षीण कुठल्या कुठे गायब झाला. उन्हात रापलेल्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. वरून इवल्या इवल्याश्या दिसणाऱ्या घरांमध्ये त्याच्या घराची कौलं दिसताच, अगणित आठवणींचा एक झोका त्याला अंतर्बाह्य प्रफुल्लित करून गेला. घरच्या ओढीने आपसूकच पावलांनी वेग धरला.

   

   पण पुढल्याच क्षणी त्याने स्वतःला सावरले. "नाही, मला आता भावनांवर ताबा ठेवायला हवा. आपल्याला पुन्हा संसारात गुंतायचं नाही. परमार्थाच्या वाटेवर चालताना घर म्हणजे पाश, जो आपण तोडला, दोन वर्षांपूर्वीच". स्वतःशीच पुटपुटत, उतारात लयीत येणाऱ्या पायरवासोबत तो भूतकाळात पोहोचला. 

ऐन चाळीशीतच विरक्ती आल्याने घरा दाराचा त्याग करून आपली अध्यात्मिक भूक शमवण्यासाठी, फक्त अंगातल्या कपड्यांवर तो बाहेर पडला होता. सुरुवातीचे काही महिने वाराणसीच्या आखाड्यांमध्ये आणि नंतर बरेच महिने हिमालयात व्यतीत केल्यानंतर, शेवटी एका भारत भ्रमण करणाऱ्या संन्याशांच्या जथ्थ्यात सामील झाला. वैरागी होऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत जात असताना, आपल्या गावाजवळून चालत जाताना मात्र त्याच्यातील मुलगा-नवरा-आणि बापाने बंड केले. आणि त्याची पावले गावच्या दिशेने वळली. फक्त एका अटीवर, ‘रात्री घरी न थांबता पुन्हा जथ्था गाठायचा, मुक्कामाच्या ठिकाणी‘.


   दोन वर्षानंतर आज त्याला असा अचानक दारात उभा ठाकलेला पाहून बायको काही क्षण स्तब्ध झाली, आणि तिने हंबरडाच फोडला. राग, तक्रार, प्रेम, आनंद साऱ्याच भावनांचा आवेग उफाळून आल्याने अश्रू रूपाने तो वाहू लागला. त्याची जिवंत परतायची पुसटशी आशा म्हणून असेल, किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या टोमण्यांना उत्तर म्हणून असेल, त्याच्या नावाची सौभाग्य लेणी तिने अंगावर तशीच ठेवली होती. लाजेची तमा न बाळगता भावनावेगात ती त्याला मिठी मारायला धावली. पण तो चपळाईने दोन पावलं मागे सरकला. आणि हाताने गळ्यातली रुद्राक्षांची माळ दाखवत आपण आता संन्यासी झालो असल्याची तिला जाणीव करून दिली. आता मात्र राग अनावर झाल्याने तणतणतच ती ओटीच्या पायरीवर जाऊन हुंदके देत रडत बसली. माजघरातून इतका वेळ कानोसा घेणारी त्याची म्हातारी आई, काठी टेकत बाहेर आली. आणि पोराला समोर पाहून खळगी झालेल्या तिच्या सुकलेल्या डोळ्यातूनही अश्रुंच्या धारा सुरू झाल्या. गळ्यातील तुळशीची माळ मुठीत घट्ट पकडून लगबगीने ती आधी देव्हाऱ्यात शिरली. शेवटी आज तिच्या विठूने तिची आर्त हाक ऐकली होती. 


"बस, आता राधा शाळेतून आली की तिला भेटून, तिन्ही सांजेचं गुपचूप घरा बाहेर पडू. रात्रीचं जेवण सन्याशांसोबतच मुक्कामी करू". स्वतःशीच पुटपुटत तो पडवीत येरझारा घालत होता. काळोख पडला की निसटणं सोपं व्हावं म्हणून मुद्दाम त्याने मागच्या खळाची कवाडी उघडीच ठेवली होती. स्वयंपाक खोलीत त्याची आई आणि बायको त्याच्या आवडीचं जेवण बनवायच्या तयारीला लागल्या. आज तब्बल दोन वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. दिवाळी असल्या सारखं घरचं वातावरण अगदी प्रसन्न होऊन गेलं. त्याच्यामागे घराचे झालेले हाल, चूल पेटती ठेवण्यासाठी आणि मुलीला वाढवताना करावा लागणारा रोजचा संघर्ष, या सर्वाचा, आनंदाच्या भरात दोघींना विसर पडला. 


    इतक्यात पुढच्या अंगणाचा बेडा उघडून राधा आत आली आणि बापाला घरात पाहून अविश्वासाने मोठ्याने किंचाळली. तो घर सोडून गेला तेव्हा राधा सात वर्षांची होती. तिच्या स्मृती पटलावरील बापाची आकृती कालौघात धूसर झाली होती. आणि आज अचानक त्याला समोर पाहून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. धावत येऊन त्याला मिठी मारून ती ओक्साबोक्शी रडू लागली. रोज आपल्याला पाठीवर बसवून अख्खा गाव फिरवणारा, आणि रात्री कुशीत घेऊन गोष्टी सांगणारा बाबा अचानक कुठे गायब झाला हेच तिला कळत नव्हतं. पण आज ती त्याला सोडणार नव्हती. इतक्या दिवसांच्या गप्पा, शाळेतल्या नवीन मैत्रिणी, त्यांची भांडणं, गुरुजींनी स्वतः तिला गायनाच्या स्पर्धे करीता कसं तयार केलं, मस्ती खूप करते म्हणून आईने कशी शिक्षा केली, आणि आजीने तिला कसं वेळोवेळी वाचवलं...सारं सारं काही तिला आज बापाला सांगायचं होतं...


  बाहेर आता बऱ्यापैकी अंधार झाला होता. जवळजवळ दोन तास अविरत बडबड करून देखील राधाच्या गप्पा काही संपायचं नाव घेत नव्हत्या. तो ही तिच्या गप्पांमध्ये चांगलाच गुंग झाला होता. तिच्या निरागस चेहऱ्याकडे तासनतास कौतुकाने पाहात राहाणं, हा त्याचा एकेकाळी सर्वात आवडता छंद होता. आज तो भूतकाळ थोड्या वेळा साठी का होईना, तो पुन्हा जगून घेत होता. गमती सांगताना राधाच्या डोळ्यांतली चमक पाहताना त्याचं भान हरपून जात होतं, अगदी पूर्वी सारखंच. अधून मधून आजी आणि आई तिला बाहेर येऊन गप्प बसायला सांगत होत्या. " बाबा प्रवासाने खूप थकले आहेत, त्यांना आराम करू दे" ..पण छे.! राधा कसली ऐकतेय. 


  "चला, निरोपाची वेळ झाली, आता निघायला हवं. काळोखातून बरंच अंतर कापायचंय." मनाशी बोलत, राधाला मांडीवरून खाली उतरवत तो उभा राहिला आणि मागच्या खळाच्या दिशेने चालू लागला. राधाही त्याची करंगळी पकडून त्याच्या सोबत चालू लागली. 

-"बाबा, मला सांग, तू आम्हाला सोडून कुठे गेला होतास?? लडिवाळ आवाजात राधाने प्रश्न केला. 

-"मी गंगातीरावर आणि नंतर हिमालयात गेलो होतो राणी"

-"पण असं एवढं काय आहे तिथे?? पुन्हा राधाचा प्रश्न.

-"मी तिथे आनंद शोधण्यासाठी गेलो होतो बेटा." त्याचं अध्यात्म जमेल तितकं सोपं करत तो उत्तरला.

-"तिथे खरंच इतका भरपूर आनंद मिळतो आपल्याला, बाबा??" राधाचे निरागस प्रश्न काही थांबायचं नाव घेत नव्हते. 

-"हो खूप,,खूप जास्त" तिच्या गालावर शेवटचा मुका घेत तो उत्तरला. 

-"आज तू आल्यामुळे आम्हांला जेवढा झालाय त्यापेक्षा पण जास्त आनंद मिळत असेल तर मग आम्हांला पण घेऊन चल ना."


एकाएकी त्याच्या सर्वांगातून वीज चमकली. पोरीच्या त्या साध्या वाक्याने त्याच्या मनातल्या कित्येक गहन प्रश्नांची उकल केली. कुटुंब वाऱ्यावर सोडून, स्वार्थी बनून आनंद शोधण्यापेक्षा, संसारात राहून कुटुंबाच्या आनंदात आपला आनंद पाहणं या सारखं सुख नाही. प्रचंड अपराधी भावनेने त्याने रडतच राधाला घट्ट मिठी मारली. " मला माफ कर पोरी, मी तुमचा अपराधी आहे. माझा गुन्हा माफ करण्यासारखा नाही आहे, तरी ही" राधाला काहीच कळत नव्हतं. त्याने शांतपणे कवाडी घट्ट बंद करून घेतली, आणि राधाला पाठीवर बसवून तो स्वयंपाक घराच्या दिशेने चालू लागला.


Rate this content
Log in