#Love Language
#Love Language
दारावर जोरजोरात टकटक वाजण्याच्या आवाजाने अनुला जाग येते.रडुन रडुन जेमतेम आत्ताच कुठे तिचा डोळा लागला होता.घरी कुणी नसल्याने तिलाच जावे लागले दार उघडायला.एवढ्या दुपारी कोण आले असेल कलमडायला,कोण आहे??, आले थांबा जरा!
वैतागलेल्या स्वरात अनु ओरडली.
दरवाजा उघडला तर एक इसम हातात काही तरी पार्सल घेऊन उभा होता.अनुराधा जोशी इथेच राहतात का? जोशी ऐकून अनुच्या डोळ्यात पाणी आले.
कारण जोशी अडणाव सोडून चार दिवसांपूर्वी ती अनुराधा मोहिते झाली होती.जड आवाजात हो! म्हणत तिने पार्सल हातात घेतले. या घरात येऊन मला चारच दिवस झाले, इथे मला कोण पार्सल पाठवेल? तेही माहेरच्या नावाने. असा विचार करत करत अनु पार्सल उघडते.
बॉक्स छोटा पण त्यातील आठवणींचा पिटारा मोठा असतो.त्यातील वस्तू पाहून अनुला कळले तो आईने पाठवला आहे.
कारण त्यात असतात अनुच्या . लहानपणा पासुन ते मोठी होईपर्यंत च्या सर्व आवडीच्या वस्तू पहिल्या वाढदिवशी घेतलेली बाहुली,शुज,ब्रासलेट, सायकल च्या चावीचे कीचेन, दहावी पास झाल्यावर बाबांनी घेतलेले घड्याळ, फोटो फ्रेम,
या सर्व वस्तू तिच्या आवडीच्या आणि तिच्याही नकळत आईने सांभाळून ठेवलेल्या होत्या.
अगदी मागच्याच महिन्यात घेतलेला स्टोल ही होता त्यात.पण अनुला जे जास्त जवळचे आणि प्रिय होते तीच वस्तू त्यात दिसत नव्हती.
अनु अधीर होऊन एका हाताने डोळे पुसत दुसऱ्या हाताने तो कॉफी मग शोधत होती.ज्यावर अनु,आई आणि बाबा तिघांचाही फोटो लावून बनवलेला होता.
बाबाने मोठ्या हौसेने अनुला तो दिला होता.
तो मग मिळाला नाही.पण एक चिठ्ठी मिळाली अनुच्या आईची चिठ्ठी होती ती.अनुला चिठ्ठी पाहुनी खुपचं आनंद झाला.उत्सुकतेने ती चिठ्ठी वाचु लागली.
अनुराधा,
माझे नाव "राधा" आणि बाबांचे नाव "अनुप" दोघांचे मिळून तुझे नाव आंम्ही अनुराधा मोठ्या हौसेने ठेवले होते.तुझ्या येण्याची चाहूल लागली होती.तेव्हा बाबांनी ठरवले होते मुलगी झाली तर तिचे नाव अनुराधा ठेवले.माझ्या पेक्षा तुझ्या येण्याची वाट तुझ्या बाबांनी जास्त पाहिली होती.जेव्हा पहिल्यांदाच तुला त्यांच्या हातात दिले तेव्हा ते खुप जपत होते.एवढासा जीव कसा सांभाळु म्हणुन खुप काळजी पुर्वक पकडत होते ते तुला.तुझ्या अर्धवट उघड्या डोळ्यात ते आपले भविष्य पहात होते.पहिल्यांदा तु बाबा बोललीस तेव्हा आकाश ठेंगणे झाले होते त्यांना.जेव्हा तु पहिले पाऊल टाकले होते.तेव्हा तुझ्या पायावर उभी राहुन तु त्यांचे नाव करशील असे अभिमानाने बोलले होते ते.
माझ्या पेक्षा जास्त जिव लावला त्यांनी तुला.मी जरी तुला मारले असेल, रागावले असेल पण त्यांनी नेहमी लाडच केला तुझा.लाडाकोडात वाढवली तुला त्यांनी कधीच कुठली गोष्ट कमी पडुन दिली नाही.
तु दहा वर्षांची झालीस तोपर्यंत रोज झोपवतांना तुला गोष्ट सांगितली त्यांनी हे तर आठवत असेलच तुला?
खुप प्रेम दिले त्यांनी तुला तरीही कुठल्या गोष्टीची कमी राहीली? ज्यामुळे तु आंम्हाला न सांगता परस्पर लग्न करून निघुन गेली.या विचारातच बसलेले असतात ते.बोलुन दाखवत नाही पण आतल्या आत कुढत बसतात ते.
तुम्ही आजकालची मुलं विचारांनी,वागण्याने इतकी पुढारलेली असतात.तर मग सर्व च गोष्टी आई-वडिलांशी स्पष्ट पणे का बोलत नाही?तेवढे स्वातंत्र्य तर दिलेच होते आंम्ही तुला,वयाची कुठलीही दरी न ठेवता तेवढे मोकळे वातावरण तुझ्या बाबांनी या साठीच तर ठेवले होते की,तुला कधीही काहीही बोलावेसे वाटले तर तु अगदी मित्र मैत्रिणी सारखे आमच्या शी बोलावेस.पण तरीही तु आंम्हाला तुझ्या मनातल्या गोष्टी आंम्हाला कळु दिल्या नाहीस.थोडी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली होती.तर तुझे बाबा मला म्हणाले होते आपल्या मुलीवर आपला पुर्ण विश्वास आहे.ती कुठलीही गोष्ट आपल्या पासून लपवणार नाही.पण तसे काही झाले नाही...
तुम्हां मुलांना आपल्या आईवडिलांच्या प्रेमावर इतका विश्वास नसतो का? की ते तुमच्या प्रेमाला समजु शकणार नाही.थोडीफार परीक्षा तर कुठलेही आई-वडील घेतीलच.कारण लहान पणापासून तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेल्या आपल्या मुलीला ते असे कसे कुठल्याही अनोळखी व्यक्तीला सोपवुन देतील.पण तुमच्या साठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या आई-वडिलांचे प्रेम तुम्ही समजु शकत नाही.
आणि आई-वडिलांच्या प्रेमावर ते तुमचे काही महिन्यांचे प्रेम भारी पडते.
खरे बोलली होतीस तु आई-वडील छोट्या छोट्या गोष्टी आठवुन देतात.आणि मुलांना इमोशनल ब्लॅकमेल करतात.पण आमच्या त्या छोट्या छोट्या प्रेमाच्या गोष्टींमध्ये ही मोठे प्रेम असते गं!!
छोटासा घास भरवतांना घरभर तुझ्या मागे फिरायचे
ते माझं छोटंसं प्रेम होते तु लवकर मोठी होऊन तुला चांगले आरोग्य लाभावे.तुझे छोटेसे कपडे धुतांना वाटायचे जेव्हा तु मोठी होशील तुला छान छान ड्रेस घेईल.अगदी राजकुमारी सारखी ठेवेल.हे स्वप्न पाहण्यात ही माझे प्रेमच होते की,पण तुला तुझ्या त्या मोठ्या प्रेमापुढे आमचे छोटे प्रेम कधी आठवलेच नाही का? आमच्या या छोट्या छोट्या प्रेमाच्या गोष्टी जर आठवल्या असत्या तर नक्कीच तुला एकदा तरी आमच्याशी बोलावेसे वाटले असते.तु लग्न करणार आहेस आई-वडिलांना अंधारात ठेवण्यापेक्षा एकदा तरी तु सांगितले असते? तर आंम्ही तुझ्या आनंदासाठी तुझ्या आवडीच्या मुलांसोबत तुझे लग्न लावून दिले असते.तुझ्या प्रेमासमोर आंम्ही आमच्या छोट्या प्रेमाची आहुती दिली असती गं!
पण अचानक पणे कोर्ट मॅरेज करुन गळ्यात माळा घालून तु आमच्यासमोर येऊन उभी राहतेस आणि सांगतेस मी या मुलावर प्रेम करते, आणि याच्या शिवाय जगू शकत नाही. मग आंम्ही इतके वर्ष तुझ्यावर केले ते प्रेम नव्हते का ? हे विचारल्यावर तु सांगतेस जसं आमचं तुझ्यावर प्रेम, जसं तुझं आमच्या वर प्रेम तसंच हे सुद्धा तुझे प्रेम आहे आणि हे आंम्ही स्वीकारावे तरच आंम्ही खरोखर तुझ्या वर प्रेम करतो.
तुझे प्रेम ते प्रेम आणि आमचे प्रेम ते इमोशनल ब्लॅकमेल आहे??
तुझ्या आवडत्या ज्या वस्तू होत्या त्या पाठवुन दिल्या आहेत. तो कॉफी मग तु शोधत असशील ना? तो माझ्या कडे ठेवला आहे.कारण छोट्या मग मधुन दाखवलेले ते मोठे प्रेम होते आमचे.त्याची तुला गरज नसेलच कारण आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा मोठे प्रेम तुझ्याकडे आहे.ज्या साठी तु आई-वडिलांचा विश्वास घात करुन,आपले घर,आपलीच प्रेमाची माणसं सोडून गेलीस.तेही न सांगता,न विचारता,न कळु देता.
म्हणजे तु नक्किच खुप सुखी आणि आनंदी असशील.
तुझा संसार सुखाचा होवो.तुझ्या पोटी एक छोटीशी परी येईल.त्या दिवशी तुला कळेलच .
"प्रेम म्हणजे प्रेम असत पण आई-वडील आणि प्रियकराचं ते सेम नसतं!!"
( वरील कथा आणि कथेतील पात्र पुर्णपणे काल्पनिक आहेत.तरीही कुठल्याही व्यक्तिचा कींवा व्यक्तीच्या आयुष्यातील मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा.लिखाणात व्याकरणाच्या किंवा कुठल्याही चुका असल्यास क्षमस्व कथा आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.)
